Asam Meghalay Bhramanti - 4 in Marathi Travel stories by Pralhad K Dudhal books and stories PDF | आसाम मेघालय भ्रमंती - 4

आसाम मेघालय भ्रमंती - 4

#आसाम_मेघालय भ्रमंती ४

आज आमच्या ट्रिपचा तिसरा दिवस होता.सकाळी आठ वाजता एम क्राऊन हॉटेलचा मनसोक्त नाश्ता करून आम्ही आपापल्या गाड्यांमध्ये येऊन बसलो.आधीच्या कार्यक्रमाप्रमाणे सकाळी शिलाँग येथील प्रसिध्द डॉन बॉस्को म्युझियम बघणार होतो परंतु नुकत्याच शाळा सुरू झाल्याने म्युझियमकडे जाणाऱ्या अरुंद रस्त्यांवर प्रचंड ट्रॅफिक जाम झाले होते त्यामुळे म्युझियम संध्याकाळी बघायचे ठरले आणि आम्ही सोहरा अर्थात चेरापुंजी...सर्वात जास्त पर्जन्यमान असलेला प्रदेश बघण्यासाठी कूच केले. या भागात अनेक छोटे मोठे धबधबे आहेत.या सीझनला जरी ते कोरडे असेल तरी पावसाळ्यात नक्कीच त्यांचे सौदर्य अप्रतीम असणार, त्यापैकी एक भव्य एलिफंट फॉल्स आम्ही बघणार होतो.तीन टप्प्यात कोसळणाऱ्या या धबधब्याकडे जाण्यासाठी बऱ्याच ओबडधोबड पायऱ्या उतरून जाव्या लागणार होत्या.एकमेकांना आधार देत आणि आधार घेत आम्ही पहिल्या टप्प्यापर्यंत पोहोचलो.धबधब्याला पाणी कमी होते पण पावसाळ्यात मात्र नक्कीच तो धो धो कोसळत असेल.बरेच जण पुढच्या टप्प्याला उतरणे झेपणार नाही म्हणून तिथूनच सगळी दृश्ये कॅमेरात टिपत होते.आम्हीही फोटो काढले आणि दुसऱ्या टप्प्याच्या पायऱ्या उतरू लागलो.पहिल्या टप्प्यापेक्षा पायऱ्या अजून अवघड होत होत्या.दुसऱ्या टप्प्यावरील खालच्या तिसऱ्या टप्प्याचा अप्रतिम नजारा दिसत होता.तिसऱ्या टप्प्यावर जाणे धोकादायक वाटत असल्याने आम्ही तिथूनच तिसऱ्या टप्प्याचा आनंद घेतला भरपूर फोटो काढले आणि पुन्हा वर यायला निघालो पुन्हा वर आलो त्यावेळी बहुतेक जणांना श्वास लागला होता.बरेच जण उत्साहाने तिसऱ्या टप्प्यापर्यंत जाऊन आले होते.एके काळी म्हणे इथे एक हत्तीच्या आकाराचा खडक होता म्हणून याला एलिफंट फॉल्स असे नाव पडले.हा धबधबा पाहून वर येत असताना आमच्या BSNL Pune चा एक गृप जो दुसऱ्या ट्रॅव्हल कंपनीतर्फे इकडे आलेला होता, आम्हाला भेटला.दुसऱ्या प्रांतात आपली माणसे अचानक भेटल्याचा आनंद वेगळाच,तो आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होता.तिथे एकत्र फोटो घ्यायचा राहून गेला होता;पण आमची पुन्हा जेवणासाठी थांबलो त्या हॉटेलात भेट झाली आणि आम्ही फोनवर बोलण्याची पोज घेऊन फोटोची हौस भागवून घेतली...म्हणतात ना इच्छा तिथे मार्ग...असो...
त्यानंतर आम्ही चेरापुंजी येथील भव्य नोखालिका फॉलसचा नयनरम्य देखावा पाहिला. इथल्या खोल दरीत कोसळणाऱ्या धबधब्याचे खरे सौंदर्य पहायचे तर इथे पावसाळ्यात यावे लागेल....ती मस्त दृश्ये मनात साठवून आम्ही पुढे निघालो.रस्त्यात अजून एक उंचच उंच डोंगरातून कोसळणारे सेव्हन सिस्टर फॉल्स पाहिलें.सात वेगवेगळे धबधबे कोसळताना बघणे हा पावसाळ्यात निश्चितच नयनोत्सव असेल. त्यानंतर आम्ही सोहराच्या(चेरापुंजी) रामकृष्ण मिशनला भेट दिली. रामकृष्ण मठाच्या परिसरात फिरून एकदम शांत वाटले.
नंतर थोडा प्रवास करून मेघालय टुरिझम संचालित ऑरेंज रुटस या हॉटेलवर जेवणासाठी आम्ही थांबलो.इथली चविष्ट अनलिमिटेड थाळी खाऊन सर्वजण तृप्त झाले....
आमच्या पुणेकर bsnl सहकर्मिंची इथे पुन्हा एकदा गाठ पडली त्यांच्याबरोबर राहून गेलेले फोटो सेशन उरकून घेतले...
त्या नंतर उमियम लेकमध्ये यांत्रिक बोटीतली सुंदर रपेट करून आम्ही शिलाँग शहराकडे परत निघालो....
ईशान्य भारताच्या सर्वांगीण संस्कृतीची ओळख करून देणारे चार मजली डॉन बॉस्को म्युझियम आता आम्ही बघणार होतो.अत्यंत उत्तमरित्या ईशान्य भारतातील राज्ये,तिथल्या आदिवासी जमाती, त्यांची संस्कृती,त्यांच्या लोककला,हस्तकला,त्यांचे पेहराव, त्यांची घरे,पूर्वी त्यांच्या वापरातली हत्यारे यांची ओळख करून दिलेली आहे.ईशान्य भारताच्या सीमेवरील देशानबद्दल बरीच माहिती चित्र रूपाने इथे अभ्यासता येते तास दीड तासात हे संग्रहालय बघणे केवळ अशक्य आहे त्यामुळे मी मोबाईल फोटोग्राफीसाठी अतिरिक्त फी भरून पास घेतला होता.जेवढे नजरेत साठवता येईल तेव्हढे साठवून बाकी गोष्टींचे मनसोक्त फोटो काढले आता निवांतपणे ते सर्व फोटो पहाता येतात. ईशान्य भारतातील Ahom Warrior Lachit Borphukan ज्यानी ई स.1671 मध्ये मुघल साम्राज्याशी कडवी टक्कर दिली त्यांच्या Sarghat येथील लढाईवर आधारीत एक फिल्म या म्युझियममध्ये दाखवली गेली. आपल्या छञपती शिवाजी महाराज यांच्यासारखेच गनिमी काव्याने त्यांनी औरंगजेबाला जेरीस आणले होते.म्युझियम बिल्डिंग टेरेसवरून संपूर्ण शिलाँग शहराचा नजारा खूपच सुंदर दिसत होता ....
डॉन बॉस्को म्युझियम कॅन्टीनमध्ये चहा बिस्किटाचा आस्वाद घेऊन आम्ही पुन्हा शिलाँग मधील आमच्या हॉटेलवर पोहोचलो.जेवण करून बॅगा भरून ठेवल्या कारण आम्ही दुसऱ्या दिवशी नाश्ता करून काझिरंगाकडे निघणार होतो...अशा प्रकारे आमच्या सहलीच्या तिसऱ्या दिवसाची सांगता झाली ...
(क्रमशः)
©प्रल्हाद दुधाळ

Rate & Review

Be the first to write a Review!