Ankilesh - 5 books and stories free download online pdf in Marathi

अंकिलेश - एक प्रेमकथा - 5

@ अखिलेश

तिकडून आलो तर खूपच अपसेट होतो मी. नाही म्हटले तरी अंकिता मला आवडली होती. थोडी, नव्हे जरा जास्तच आंग्लाळलेली असली तरी, जब प्यार करे कोई तो देखे केवल मन.. पण शेवटी दुनियादारी पडेगी निभानी. माझे घर, वन रूम किचन. बाबा मिल वर्कर. आई लोणची पापड बनवून विकते. नाही म्हणायला तशी आर्थिक चणचण खूप नाही. दोन वेळेस जेवण आणि कमी असल्याने बाकी गरजा भागवता यायच्या. मी मेडिकलला गेलो त्याचे आई बाबांना कोण कौतुक. तसा मी पहिल्यापासूनच हुशार. खरेतर हुशारीपेक्षा मेहनत महत्वाची. शाळेपासूनच मी नियमित अभ्यास करणारा. त्यात डाॅक्टर व्हायचे स्वप्न पाहिलेले. अगदी जीएस- केईएमसारख्या नंबर वन हाॅस्पिटलामध्ये मिळालेली ॲडमिशन. दोन तीन वर्षात माझे डाॅक्टर होण्याचे स्वप्न साकार होणार. मग पुढे जे काय जमेल ते. अशा निम्न मध्यमवर्गात अंकिता कुठे बसणार फिट? नाहीच बसणार. कदाचित तिला वस्तुस्थिती माहिती झाली तर स्वत:च ती सारे विसरून जाईल. खरेतर असेही झालेच कुठे होते काही?

सारे काही खरे, पण दिल है की मानता नहीं हेच खरे! काही दिवस असेच अस्वस्थतेत गेले. मग घरी अभ्यासाची सबब सांगून दोन दिवस होस्टेलवर आलो राहायला. म्हटले मित्रांत राहिलो की लवकर सगळ्यातून बाहेर पडेन. पण बेचैनी जाण्याचे नाव घेईना. उदासपणा कमी होईना.

नेहमी टाइमपास करणारा मी असा शांत नि होस्टेलवर पडीक पाहून मित्रहृदय कळवळणार नाही तर काय? अशा गोष्टींचा सुगावा त्यांना बरोबर लागतोच.. एखाद्या शिकारी कुत्र्यासारखा!

शेवटी माझा जवळचा मित्र, कैलास त्याला सारे सांगितले तेव्हा थोडा मनावरचा भार हलका झाला.

"अरे, असे ही कुठे काय झालेय? दोन वेळा भेटलायस. ती ही अशी ओझरती भेट.."

"यूं दिलकी लगी को कोई क्या जाने.. तुला नाही कळणार."

"हो ना. माझा जरठ विवाह होणारे.. पण उगाच अभ्यासाचा वेळ अशा गोष्टींत वाया घालवू नकोस. सेकंड इयर इज इझियर, पण आपण वाॅर्डात जास्त वेळ घालवायला हवा. त्याशिवाय प्रॅक्टिकल शिकायला नाही मिळायचे.. थोडक्यात बी प्रॅक्टिकल.."

"तू म्हणतोयस ते पटतेय.. कळतेय.."

"पण वळत नाहीये.. दिसतंच आहे ते तोंडावरून. मि.देवदास.. ऐक मला एक इन्स्टंट कविता सुचलीय..

एक मित्र आहे माझा खास

बनून बसला आहे देवदास

चावला त्याला एक डास

मित्र म्हणे, डासा आता बास

जा पसरव तू मलेरिया

इथे काय काम? हा तर लव्हेरिया

 

बट द ट्रान्समिशन इज बायलॅटरल

विल काॅज डॅमेज को लॅटरल..

 

म्हणजे काय?

 

वाण नाही पण गुण लागला

दाढी वाढवून डास उडू लागला..

 

मच्छरांतील हा प्रथम देवदास

डासांमधला बनला खासमखास!"

 

हे कैलासचे इन्स्टंट कवित्व! दाढी वाढवलेला डास म्हणे! जे न देखे रवी ते देखे कवी म्हणजे हे असे असावे? डासाला दाढी? आणि फॅक्ट इज ओन्ली फिमेल माॅस्किटोस बाईट.. पण कविला काय.. कविराजाला दिली ओसरी नि तो हातपाय पसरी आणि काय!

पण ते काही असो, कैलासच्या त्या कवितेने मला हसायला आलेच. थोडीफार उदासी दूर झाली. यह इश्क नहीं आसान.. इतना तो समझ लीजे.. गालिबच्या ओळी पटल्या मला. पण कठीण गोष्टी सोडून दिल्या तर कसे चालायचे? आळस झटकून मी काॅलेजच्या कट्ट्यावर येऊन बसलो.. विचार करत. एकटाच.

पूर्वी पुस्तकांतून लेखक लोक दोन मनांना एकमेकांशी आपुलाच वाद आपणासी घालायला लावत असत. एक मन एक म्हणे तर दुसरे अजून काही.

माझी ही दोन मने एकमेकांसमोर उभी ठाकली. मी स्वत: काय अंपायर बनणे अपेक्षित होते? म्हणजे हे तिसरे अजून एक मन की काय?

एका मनाचे म्हणणे: तिला तू आवडलायस. तुला ती, मग अजून कसला विचार करतोयस? बाकी गोष्टी होतील ॲडजस्ट!

दुसरे मन: असे नाही होत बाळा. डेव्हिल इज इन डिटेल्स! उगाच तिचाही नि तुझाही सुखी जीव दु:खात लोटू नकोस. टेक अ रिॲलिटी चेक!

पहिले मन: पण तरीही.. आजवर अशा जोड्या बनल्याच नाहीत की काय? वेगवेगळ्या धर्माच्या, जातीच्या, भाषांच्या जोड्या जुळतात.. नांदतात. तर फक्त आर्थिक फरकामुळे..

दुसरे मन: फक्त? फक्त आर्थिक फरक? मनी इज एव्हरीथिंग. बाकी गोष्टी होत राहतात. पैशाचे सोंग नाही आणता येत..

पहिले मन: पण हे दिवस बदलतील. मी चांगला डाॅक्टर होईन..

दुसरे मन: डोन्ट टेल मी की तू त्यासाठी डाॅक्टर होणारेस! असे नव्हते ठरवलेस तू. तूच म्हणायचास, मनी इज अ बायप्राॅडक्ट. आता पैशांसाठी मेडिसीन.. आप तो ऐसे ना थे..

पहिले मन: हे खरंय. मी बदललो नाहीये, पण कमीतकमी व्यवस्थित राहता येईल इतके तर कमावेनच ना?

दुसरे मन: आणि मग डायरेक्ट तिच्या दोन दोन गाड्या नि मोठ्या घराशी स्पर्धा करायला लागशील? उगाच जे पटत नाही ते करायला जाशील आणि मग कुढत बसशील..

पहिले मन: पण तिलाच हे सारे नको असेल तर?

दुसरे मन: होय ना! आशेवरच जगते दुनिया..

पहिले मन: यस.. आशा इज होप!

दोन मनांचे द्वंद्व अजूनही कितीतरी वेळ सुरू राहिले असते पण तितक्यात मला काय दिसावे? हे सत्य की स्वप्न? नुसताच भास? भासच असावा म्हणेपर्यंत ती, म्हणजे अंकिता.. अंकिताच जवळ येऊन उभी राहिली.. विचारत.. " हाय! हाऊ आर यू?"

मी आजूबाजूला पाहिले. माझ्या मित्रमंडळींपैकी दोन तीन जण लांबून बघत होते.. अंकिता, खरीखुरी माझ्यासमोर उभी होती!

***

@ डाॅ.अरूणा गावस्कर

बापलेकीबद्दल काय सांगायचं? सुरेंद्रसाठी अंकिता म्हणजे तळहातावरचा फोड. सुरेंद्र तिला मिठू म्हणतो नाहीतर म्याऊ. लाडावलेली ती. त्यात एकुलती. हुशार तर खरी. माझ्यापेक्षा तिला पपाच प्यारे. माझ्याकडे फक्त लाडीगोडी लावण्यापुरते काम. तसा सुरेंद्र प्रॅक्टिसमध्ये बिझी असतो दिवसभर. मी आपली फार्म्याकाॅलाॅजी डिपार्टमेंट सांभाळते. जवळच घर. त्यामुळे अंकिताकडे लक्ष देणे नि तिचा अभ्यास वगैरे माझी जबाबदारी. आम्ही सुरूवात केली तेव्हा आमच्याकडे काय होते? साध्या क्वार्टर्समध्ये राहणे, मग यथावकाश सारे जमत गेले. घर झाले, गाडी झाली. सुरेंद्रपण तसा गरीबीतून आलेला. पण आता त्याला गरीबीबद्दल सख्त नफरत. हे मात्र त्याचे मत बदलायला तयार नाही. एकतर स्वभाव हट्टी. मी म्हणेन तेच खरे मानणारा. त्यात हे मत त्याचे बदलणार कोण?

त्या दिवशी अंकिताबरोबर कुणी मुलगा दिसला नि त्यानंतर सुरेंद्रची झोप उडाली. मी म्हणाले ही, मुलगा चांगला आहे का ते पहा.. सुरेंद्रचा यावर हेका एकच.. माय प्रिन्सेस कॅन नाॅट सफर. श्रीमंतांत ही चांगला मुलगा सापडेलच ना! नि तो मुलगा गरीब का? तर बस ने जात होता म्हणून! हृदयाच्या चारी कप्प्यांत त्याच्या अंकिता आहे. थोडे अटिपिकल आहे. साधारण आई लोक अशा असतात. अंकिता केव्हा न केव्हा लग्न होऊन दुसऱ्या घरी जायची आहेच. तिला ही तिचे आयुष्य आहे. पण सुरेंद्रला ते कोणी पटवून द्यावे? त्यादिवशी ते डाॅ.अस्थाना आलेले. याचा हेतू एकच.. केतन नि अंकिताची जोडी जुळली तर.. आता त्या केतनला अंकिता पसंत पडेल की नाही हा विचार कुणी करायचा? पण सुरेंद्रचा हेका एकच, माझ्या प्रिन्सेसला कोणीही राजकुमार हसत घेऊन जाईल. स्वयंवरच जणू! सुरेंद्रचा भरवसा नाही, मांडेलही एखादे स्वयंवर. वरती फिरता मासा नि खाली आरसा लावेल. काळ बदलला म्हणून माशाचा डोळा फोडायला एखादी छोटी बंदूक ठेवेल. बाजूला अंकिता वरमाला घेऊन बघत राहिल! जणू काही अचूक नेमबाजीने सुखी संसाराचाच नेम साधला जाईल. पण सुरेन्द्र करेलही असे काही. नेम नाही त्याचा.

पण बापाचे हृदय नि आईच्या काळजात फरक आहे नि असतोच. नऊ महिने पोटात वाढलेले पोर, काही झाले तरी द चाइल्ड इज ॲन एक्स्टेंशन आॅफ द मदर्स बाॅडी. अँड सोल ॲज वेल. त्यामुळे अंकिता किती अस्वस्थ होती हे सुरेंद्रला नाही कळले पण माझ्या नजरेतून सुटणार नव्हते ते. मी तेव्हा तिला काहीच विचारणार नव्हते.. माझ्याकडे हा पेशन्स भरपूर आहे. असायलाच हवा. नाहीतर सुरेंद्रला सांभाळणे कसे जमले असते? एक क्षण भाळण्याचा आलेला कित्येक वर्षांपूर्वी. तेव्हा सारे काही किती साधे सोपे सरळ होते, पण सुरेंद्रला हवी होती ती श्रीमंती.. नाही, खरेतर सुरेंद्रला नको होती ती गरीबी. त्यासाठी धडपड सारी. त्या भाळण्यातून आता सांभाळण्यापर्यंत प्रवास झालाय!

तेव्हा अंकिताचा तो कुणी खास मित्र आहे की नाही मला ठाऊक नव्हते, पण माझे मन तसे ओपन होते, मुलगा फक्त चांगला हवा.. सुरेंद्रला पण तेच हवे होते पण या 'चांगला मुलगा' शब्दाच्या व्याख्येत सुरेंद्र श्रीमंती देखील इन्क्ल्यूड करत होता..

पुढे काय नि काय काय होणार आहे याची कुठे कल्पना होती तेव्हा. पण आज एक सांगू शकते, अंकिताचा चाॅइस परफेक्ट होता नि आहे. भले ही आज ही सुरेंद्र उगाचच नाक मुरडो..