Ankilesh - 11 books and stories free download online pdf in Marathi

अंकिलेश - एक प्रेमकथा - 11

११

@ अखिलेश

टी एन मेडिकल काॅलेजचा मेन लेक्चर हाॅल. स्टेज, वरती वरती अरेंज केलेले बेंचेस. बहुतेक हा नाटकाचा प्रोग्राम बराच प्रसिद्ध असावा. हाॅल तुडुंब भरलेला. नाटक कोणते? तर, 'प्यार किए जा!' क्षणभर वाटले अंकिताने ते नाव मुद्दाम द्यायला लावले की काय! ती काहीही करू शकते.. अर्थात तिला हवे असेल तर.. आणि तरच! हट्टीपणा हा जिद्दी स्वभावाचा बाय प्राॅडक्ट असतोच. तेव्हा ती हट्टी आहेच नि हवे ते मिळवण्यासाठी चिकाटी नि मेहनत करण्याची तिची सवय आहे.. नाटकाला तिने मला बोलावले ते इंटरकाॅलेजिएट नाटक म्हणून, पण तिथे माझ्याशिवाय कुणीच दुसऱ्या काॅलेजातून आलेले नव्हते. येणार कसे? हे आमंत्रण फक्त माझ्यासाठी.. पर्सनल होते! ती आमंत्रण द्यायला आली त्याच दिवशीच ते तसे असावे असा अंदाज मला आलेला.. मी ही सेक्रेटरी होतोच, तेव्हा अशी इन्व्हिटेशन्स कधी पाठवतात नि कधी नाही याचा मला अंदाज होता! पण मला तिचा तो 'अंदाज' आवडला. हा दुसरा अंदाज हिंदीतला. इथे हिंदी शब्द वापरायला हरकत नसावी, कारण नाहीतरी ते हिंदी नावाचे मराथी नाटक होते! आणि मराथी हा 'मराथी'चा खास अंकिता उच्चार! अगदी आजही ती माय मराठीला मराथीच म्हणते! तसं मराठी बऱ्यापैकी सुधारलंय तिचं आता, म्हणजे आमची भांडणाची भाषा मराठीच असते हल्ली! मी तर म्हणतो, मातृभाषेपेक्षा कपल्सची भांडण भाषा कोणती हा प्रश्न विचारायला हवा! म्हणजे घरात भांडताना कोणत्या भाषेत भांडता ह्या प्रश्नाच्या उत्तरावर त्या घराची भाषा ठरवली गेली पाहिजे! या निकषावर आमची गृह भाषा मराठीच आणि त्या गृह कलहासाठी आजकाल तिचा वापर ही सढळपणे होत असतो! पण ही हल्लीची गोष्ट! तर ते नाटक! पुढे तिने त्या आमंत्रणामागची कहाणीही सांगितली. म्हणजे तिकडच्या सेक्रेटरीला कसे पटवले वगैरे! तशी अंकिता हुशार आहेच.. त्यामुळे सहज जमवले असणार तिने!

नाटक म्हणजे एकांकिका तशी छानच होती. विनोदी अंगाने जाणारी. पण बऱ्यापैकी साहित्यिक दर्जा असणारी भाषा, शब्द प्रधान विनोद, त्यामुळे अंकिताला किती पूर्णपणे कळली कोणास ठाऊक. पण पूर्ण नाटक ती माझ्या बाजूला बसून होती. नाटकात तिला इंटरेस्ट नव्हताच. तो नाटक बघणाऱ्या माझ्यात होता हे तिच्याकडे पाहणाऱ्या कोणालाही सहज कळले असते! नाटक संपले नि ती मला तिकडच्या सेक्रेटरीला भेटायला घेऊन गेली.

"शेखर, छान झाला ड्रामा. आय लाइक्ड इट रियली.."

"थ्यांक्स.."

"मीट हिम. फ्राॅम जी एस मेडिकल.. युवर काउंटरपार्ट देअर.."

शेखरने शेकहँड साठी हात पुढे केला.

"हाय! गुड! तू आलास. वेलकम टू अवर काॅलेज! कसं वाटलं नाटक?"

"छान! थोडी अजून वेगळी रचना करता आली असती. पण प्रत्येक लेखकाचा थोडा लिहिण्याचा बाज वेगळा असतो."

"खरंय. तू लिहितोस की काय?"

"थोडं थोडं. काही एकांकिका लिहिल्यात. काही कथा. या एकांकिकेत ना हीरो थोडा वेंधळा आहे. काॅमिकल सिच्युएशन म्हणून त्याला जवळचे दिसत नाही म्हणे.. आणि काही गोष्टी कळत ही नाहीत.."

"अखिलेश, तू ड्रामाचे ॲनालिसिस नंतर कर. बट आय नो फ्यू पीपल.. ज्यांना जवळच्या गोष्टी दिसत नाहीत.. नि कळत तर अजिबातच नाहीत.. बट यू लाइक्ड द हिराॅइन?"

"दॅट रोल इज गुड.."

"रोल नाही. हिराॅइन.."

"यस. शी ॲक्टेड वेल!"

"ॲक्टेड काय? इट्स अबाऊट हर! ही नाही तर तुला स्वत:साठी हिराॅइन कशी आवडेल?"

"मी नाही विचार केला.. आणि मी कुठे हीरो आहे की माझ्याकडे कुठली येणार आहे हिराॅइन.."

"तू काही ही सांगतोस अखिलेश.. शेखर ही इज व्हेरी फेमस इन जी एस.."

"असणारच. म्हणून तर तुझी कीर्ती इथवर पोहोचलीय!"

"अरे, उगाच माझी ताणू नका.. आम्ही साधे लो बर्थ वेट बेबीज.. आमच्याकडे कोण बघतंय?"

"हुं.. तुला माहितीय आहे कुणीतरी.. पण तू बघशील तर ना!"

मी ऐकून न ऐकल्यासारखे केले. शेखरने हळूच अंकिताला केलेला इशारा माझ्या नजरेतून सुटला नाही. तिघांनी कँटिनमध्ये जायचे ठरले. तिथे गप्पा झाल्या. थोडीफार साहित्यिक चिरफाड परत झाली..

"यू नो तो सांगकाम्या, त्याचे कॅरॅक्टर मस्त.. पण तो जरा जास्तच डंब दाखवलाय.."

"अखिलेश, डंब? आय नो वन गाय डंबर दॅन हिम.." अंकिता चान्स साधत म्हणाली पण तिला कात्रजचा घाट दाखवत मी ही म्हणालो,"पण शेवटी तोच स्मार्ट ठरतो ना! त्या जवळचं न दिसणाऱ्याला हरवतो तो नि हिराॅईन त्याच्याच गळ्यात पडते!"

"नसीब अपना अपना.."

यावर अंकिताने काय म्हणावे?

"अरे, त्या रायटरने उगाच तीन कॅरॅक्टर्स वेस्ट केलेत. एकातच सारे गुण असते तर.. म्हणजे सम पीपल आर लाइक दॅट.."

शेखरने विचारलेच पुढे,"फाॅर एक्झांपल?"

अंकिता काही बोलणार इतक्यात एक मुलगी शेखरला शोधत आली.. 'तू अहिंया छे? हुं शोधिने थाकी गई.. चल हवे..' थोडी.घुश्शयातच ती गुज्जू गर्लफ्रेंड बोलली नि ते दोघे निघून गेले.

"त्याची गर्लफ्रेंड.." अंकिता म्हणाली. यावर काय रिॲक्ट करायचे हे न समजून मी गप्प राहिलो..

"क्यूट पेअर." अंकिता म्हणाली.

"हुं.. पण थोडी रागावलेली दिसतेय! म्हणजे प्रकरण पुढे गेलेय बरेच!"

"व्हाॅट डझ दॅट मीन?"

"माय आॅब्झर्वेशन. जेव्हा बाॅय अँड गर्ल आरन्ट शुअर, त्यांच्यात भांडणं होत नाहीत. मग पुढची स्टेज.. त्यात त्यांना भांडायला जमत नाही.. एकदा लोणच्यासारखे मुरले दोघे की मग भांडणं सुरू!"

"बराच एक्सपिरियन्स दिसतोय!"

"एक्स्पिरियन्स? नो! निरीक्षण डियर! ॲज अ रायटर निरीक्षण कसं बारीक हवं.."

हळूच अंकिता स्वत:शीच बोललेली.. मी ऐकलंच,"रायटर महाशय, थोडं प्रॅक्टिकल पण करा.. नुसती थियरी नको!"

थोडक्यात तो नाटकाचा प्रोग्राम नि मला इंटरकाॅलेजिएटच्या नावाखाली बोलावण्याचा अंकिताचा खरा प्रोग्राम.. दोन्ही यशस्वी झाले. इतक्या दिवसांत अंकिता माझ्या थाॅट प्रोसेसचा भाग झालेली. दिवसेंदिवस अधिकच आवडू लागलेली. त्यापुढे बाकी सगळ्या समस्या जाणवेनाशा झालेल्या. त्यामुळे कँटीनमधून तिचा निरोप घेताना पुढच्या भेटीची तजवीज कशी करावी ते समजत नव्हते. काय बोलावे न समजून मी गप्प होतो..

"आता काय?"

गंमत म्हणजे आम्ही दोघेही एकच वाक्य एकाच वेळी म्हणालो..

"तुला एक गंमत सांगू?"

माझ्या डोक्यातली विचारचक्रे पिठाच्या गिरणीतल्या चक्रांसारखी एकाएकी फिरली..

"काय?"

"तुमच्या काॅलेज मागचे ग्राउंड आहे ना.."

"दॅट इज नाॅट अ पार्ट आॅफ अवर काॅलेज .."

"आय नो.. पण मी तिथे दर रविवारी येतो."

"कशाला?"

"अगं सायकलिंग. एकच तर दिवस वेळ असतो. लोअर परेल ते बाँबे सेंट्रल. मला सायकलिंगची हौस फार."

"काय सांगतोस? दर रविवारी?"

"हो ना. सकाळी साडे सहा. सहा वाजता घरून निघतो. साडेसहा ते साडेसात.. मग बॅक टू होम! मस्त व्यायाम होतो!"

अंकिताचे डोळे चमकत होते. मला ही माझ्या क्विक थिंकिंगचे आश्चर्य वाटत होते.

"ओ के. डन!"

"काय?"

"फ्राॅम धिस संडे!"

"काय?"

"अरे, या रविवार पासून मी पण येते.. डायरेक्ट ग्राउंडवर भेटू. "

"ग्रेट!"

"आणि बाय द वे.. संडे उद्याच आहे!"

"ग्रेट! मग उद्याच भेटू!"

दर आठवड्यात भेटण्याची आयडिया निघाली म्हणून मी स्वत:वरच खूश होतो. त्या धुंदीत निघालो.. एकाएकी लक्षात आले, रविवारी इकडे यायचे तर खरे, पण ती सायकल कुठून आणायची? थापा ठोकणे ठीक, पण त्या निभावूनही नेता यायला हव्यात! पण आता बाण सुटून गेलेला. तोंडातून शब्द निघून गेलेला.

आणि एक सांगायला हवे, इथे मला कैलासच्या त्या कल्पनेची महती कळली. म्हणजे मौका ए वारदातचा मुआइना करतात.. तसेच मी केलेले. अंकिताबरोबर कँटीनमधून बाहेर पडताना आजूबाजूला नीट पाहिले तर ते ग्राउंड दिसलेले. त्यात सायकलिंग करणारी काही मुले ही होती. त्यावरून ही आयडिया निघाली.. आता फक्त ती सायकल कुठून पैदा करावी इतकाच प्रश्न बाकी होता! ती ही रातोरात दुसऱ्या दिवशी सकाळ पर्यंत! पण एक जग बदलणारी आयडिया सुचली, तिच्यापुढे ती सायकलीसारखी भौतिक यक:श्चित बाब! जो आयडिया देतो तो मार्ग ही दाखवेल!