Ankilesh - 18 books and stories free download online pdf in Marathi

अंकिलेश - एक प्रेमकथा - 18

१८

@ डाॅ.अरूणा गावस्कर

अखिलेश साळवी! आमच्या भावी जावयाचे नाव. डाॅ.अखिलेश साळवी खरं तर. ॲस्पायरिंग सर्जन तेव्हा. आता सुपरस्पेशालिस्ट युरोसर्जन. खरं सांगते, म्हणजे आता हे सांगायला आॅकवर्ड वाटते पण शेवटी मुलीच्या आयुष्याचा प्रश्न होता. आणि त्यासाठी मला पहिल्यांदाच सुरेंद्रशी भांडावे लागणार होते. मुग्धाने सांगितलेले अखिलेशबद्दल ते ऐकूनही थोडे मन धास्तावत होतेच. काही असो झाले ते असे झाले हे खरे. एका आईच्या मनाची घालमेल ध्यानी घेतली तर कदाचित यात काही चुकीचे वाटायचे नाही. पण आज विचार करताना वाटते, अंकिताने दुसरा कोणी, म्हणजे श्रीमंतांच्या घरचा, मुलगा निवडला असता तर मी हे असे केले असते? कदाचित नाही. अगदी मनापासून वाटते ते हेच. म्हणजे माझा ही आक्षेप त्या गरीबीलाच होता? तशी साळवींची गरीबी फक्त तुलनात्मक होती. खाऊनपिऊन सुखी, फक्त चैनी साठी पैसा नाही इतकेच. तशी ही चैन माणसाला कोणते सुख अधिकचे देते? समाधान चैनीतून मिळत असतं तर जगातील सर्वात सुखी माणसाचा सदरा सर्वात महागड्या कापडाचा नसता का? आणि श्रीमंतीही तशी एक दुसऱ्याच्या तुलनेतच मोजली जाते की नाही? गरीबा घरीच माणसं वाईट असतात का? मग श्रीमंताच्या घरी सारेच सरळसोट असते का? विचारांना अंत नाही, पण मी तेव्हा हे केले होते हे नाकारावे कशाला? कदाचित मलाच ते गरीबी श्रीमंतीबद्दलचे सुरेंद्रचे विचार आतून पटले असतील, कदाचित सुरेंद्रशी अंकिताच्या बाजूने भांडण्याआधी खात्री करून घ्यायची असेल किंवा पोरीच्या भविष्याची साधी चिंता असेल.. किंवा कदाचित या सर्वांच्या एकत्रित परिणामामुळेही असेल..

झाले असे की, मुग्धाने परत एकदा फोन केलेला, अंकिता केईएम मध्ये गेली परत तेव्हा. अर्थातच अखिलेशला भेटायला असणार.

"अगं तुझी अंकिता आलेली. तुला सांगते की नाही काही?"

"ती? नाही गं. घरी आली की सतत अभ्यासात बिझी. पुस्तकांबाहेर तिला सुचेल तर काही. फक्त मी संध्याकाळी योगासनात बिझी असते तेव्हा सात ते आठ वेळात फोन येतो तिचा. मी मार्क करून ठेवलेय. चांगली पंधरावीस मिनिटे बोलते, जनरली अबाऊट स्टडीज अँड आॅल.. पण वेळ ठरलेलीय.. आणि तेव्हा ती खुशीत असते एकदम."

"वा! तू डिटेक्टीव्हच व्हायचीस.."

इथे खरी ठिणगी पडली. म्हटले माहिती तर हवीय. मुग्धाला माहितीय मुलगा चांगलाय.. पण तरीही डिटेल्स हवेतच..

मग एका ओळखीतून चक्क प्रायव्हेट डिटेक्टीव्हला काँटॅक्ट केलं. म्हटले, काॅलेजात येऊनच भेटा. उगाच कोणाला संशय नको यायला. आज ही हे सांगताना थोडे विचित्र वाटते पण झाले होतं असं हे खरे!

एकूण हे साळवी कुटुंब सध्यातरी मुंबईतच स्थिरावलेले. गावी जमीन होती, ती भाऊबंदकीत गमावलेली. आत्माराम साळवी मिलमध्ये जाॅबर, पण संत माणूस. माळकरी. त्यांनी कोर्टकचेरी न करता जमीन देऊन टाकलेली. स्वत:च्या हिमतीवर जमेल तसे हे वन रूम किचन घेतलेले. माणूस अगदी साधा. भजनी मंडळात गाणारा. काही वर्षांत रिटायर होतील. अखिलेशची आई म्हणजे 'श्यामची आई' ची आवृत्ती. ती लग्नाआधी घरची बरी. आत्माराम साळवींशी लग्न झाले तेव्हा परिस्थिती चांगली होती. पुढे अखिलेशच्या दोन काकांनी कट कपट करून यांना बाहेर हाकलवून वडिलोपार्जित जागा बळकावलेली. आत्माराम साळवी मुंबईत आले, नोकरीला लागले. अखिलेश लहानपणापासूनच अभ्यासात हुशार. परेलच्या मराठी शाळेत शिकलेला. मेहनतीने बारावीनंतर मेडिकलला पोहोचला. तो ही बहुधा वडलांची छाप असावा असा सज्जन आणि प्रामाणिक. दिसायला अतिशय राजबिंडा, पण अगदी साधा. अंकिता केईएम हाॅस्पिटलात एका कार्यक्रमात भेटलेली त्याला. त्यानंतर वरचेवर भेटतात दोघे पण इतक्या महिन्यांत दोघांची गाडी विशेष पुढे सरकलेली नाही.. दोघे दर रविवारी सायकलिंगच्या निमित्ताने इकडच्या मैदानात भेटतात हे खरे, मध्ये मध्ये अंकिता वाट वाकडी करून बसने तिकडे जाते, अखिलेश तिला सोडायला परत त्या बसने येतो.. पण त्यापुढे काही नाही!

 

असा सारा रिपोर्ट हाती आला नि मी निश्चिंत झाले. जगात सज्जनपणा नि प्रामाणिकपणास किंमत कमीच आहे, अशांना टक्केटोणपे खावे लागतातच जगाच्या दृष्टीने पण तरीही त्यांचा स्वत:चा स्वत:च्याच नजरेत जो मान असतो तो महत्वाचा. साळवींकडे पैसा अडका गरजेपुरताच असेल तरीही मनाची श्रीमंती ही आयुष्यभर पुरणारी आहे. आता अंकिता ही बातमी माझ्याकडे कधी फोडते हेच बघायचे बाकी.. त्यानंतर सुरेंद्रशी असणारच आहे, रात्रंदिन युद्धाचा प्रसंग!

***

डाॅ.सुरेन्द्र गावस्कर

सेकंड इयर मध्येही अंकिताला चारही सब्जेक्टस मध्ये डिस्टिंक्शन! ग्रेट! आहेच अंकिता हुशार. तशी ती स्कूलमध्ये असल्यापासूनच आहे ब्रिलियंट. शाळेत डिबेट नि ओरेशन्स म्हणजे शुअर फर्स्ट प्राईझ. अगदी पाचवी ते दहावी शाळेत तीच पहिली. हुशार तर आहेच ती. आणि मेहनती ही. दिवसरात्र पुस्तक घेऊनच बसलेली असते. आणि माय टाइमलाइन वाॅज ड्राॅन. आय वाॅज वेटींग फाॅर सेकंड इयर रिझल्टस.

थर्ड इयरच्या मेडिसिन टर्म मध्ये केतन माझ्याच अंडर होता. त्याच्यासाठी, आणि कोणाच्या नजरेत येऊ नये म्हणून त्याच्या दोन चार मित्रांसाठी साइडरूम मध्ये मी सिक्रेट क्लिनिक घेत असे. एव्हरी सॅटरडे आफ्टरनून. त्यात अंकितालाही बोलावून बसवायचो. थर्ड इयरचे मेडिसिन आधीपासूनच कानावरून जाईल तर चांगलेच आहे. बहुतेकदा केतन आणि ती नोट्स एक्स्चेंज करताना दिसायचे. केतन इज अ स्टुडियस बाॅय. त्यामुळे तो व्यवस्थित नोट्स घ्यायचा. शिकवता शिकवता दोघांची जोडी कशी छान दिसेल याचा विचार करायचो मी. आणि माय प्रिन्सेस विल बी इन अमेरिका!

मग एके दिवशी डाॅ.अस्थाना स्टाफ रूम मध्ये भेटले. त्यांना म्हटले,"रविवारी फ्री आहात? घरी येतो, वाँट टू डिस्कस समथिंग."

ते 'बाय आॅल मीन्स' म्हणाले. घरी मी अरूणाला केतन आणि अंकिताच्या जोडीबद्दल आजवर बोललो नव्हतो. तिला रात्री बसवून नीट समजवून सांगितले. म्हटले, रविवारी जाऊन बोलूयात. विषय तर काढावा लागेल. का कोणास ठाऊक, अरूणा डिडन्ट साउंड ॲज इफ शी इज कन्व्हिन्स्ड. म्हणाली,"तुझी उगाच घाई. पोरगी जस्ट वीस वर्षांची नाही होत तोच अडकवून टाकायचे? आणि पोरांचा चाॅइस नको लक्षात घ्यायला?"

पोरांचा कसला चाॅइस असायचा? आमची गोष्ट वेगळी. वुई वेअर रिस्पाॅन्सिबल देन. तशी केतन नि अंकिताची जोडी छानच आहे. अंकिताला तर मी सांगेन, ती माझ्या शब्दाबाहेर नाही. केतनला तशी हरकत असायचे कारणच नाही. कारण अंकिता इज अंकिता! शेवटी डाॅ.गावस्कर्स डाॅटर आहे ती!

रविवारी आम्ही दोघे अस्थानांच्या घरी गेलो.. इकडच्या तिकडच्या गप्पांनंतर विषय काढला, अर्थातच मी. अरूणा उगाच माझ्याबरोबर यायची म्हणून आल्यासारखे वाटत होते.

"खरं सांगू, डाॅ.अस्थाना, वुई आर कलिग्स. आणि ओव्हर द इयर्स वुई आर गुड फ्रेंड्स. पण मला वाटतं आपण अजून जवळ यायला हवं. हाऊ अबाऊट केतन अँड अंकिता गेटिंग टुगेदर?"

"व्हेरी गुड! व्हाय नाॅट! दोघेही एकमेकांना ओळखतात. एवढी फायनल एक्झाम संपली केतनची की त्याच्याशी बोलतोच. माझ्याकडून ना नाही.."

थर्ड इयर एम बी बी एस, म्हणजे फायनल एक्झाम.. म्हणजे आता अजून तीन चार महिने थांबणं आलं.. पण एक शब्द टाकून ठेवला म्हणजे चिंता नाही. परत येताना मी अस्थानांचे नि केतनचे गुणगान गात होतो. अरूणा फक्त हो ला हो करत होती. एरव्ही माझ्याशी वादावादी करणारी ती, एवढी शांत बसावी? कदाचित केतनचा होकार आल्यावर बघू म्हणून शांत असावी. मी तिला म्हटले ही,"तू अंकिताशी बोलून तर ठेव. रादर टेल हर, धिस इज व्हाॅट आय वाँट हर टू डू!"

अरूणा म्हणाली,"यस, सांगावे तर लागेलच. प्रश्न पोरीच्या सबंध आयुष्याचा आहे.."

पुढे ती अंकिताशी कधी बोलली कुणास ठाऊक, पण अरूणाचे उत्तर एकच होते,"अंकिता नंतर ठरवेल.. प्रथम केतनचे तर उत्तर येऊ देत!" म्हटले कमीतकमी ही डायरेक्ट तर नाही म्हणत नाहीये.. आणि मी तिला नाही म्हणूच देणार नाहीये!

Share

NEW REALESED