Ankilesh - 34 books and stories free download online pdf in Marathi

अंकिलेश - एक प्रेमकथा - 34

३४

@ अखिलेश

असं म्हणतात, चोरी कशी ही करा, तिला वाचा फुटतेच. मग चोर किती ही हुशार का असेना. पण तसा मी चोर नव्हतो. पण प्रेम म्हटले की चोरटेपणा आलाच त्या पाठोपाठ. पहिल्याच दिवशी आपण थोडीच सर्व जगाला सांगत असतो आपली कथा? म्हणजे सविस्तर प्रेमकथा? सर्व काही जगाशी फटकूनच. दुनिया जालीम आहे किंवा तिला ही प्रेमकहाणी पटायची वा पचायची नाही असले काही समज असतात की काय? त्यामुळे काही जवळचे मित्र सोडले तर ही बाब म्हणजे अति गोपनीय! आपण कितीही लपवले तरी ही दुरून जग आपली गंमत बघत असतेच. आपल्या नकळत. किंवा आपणच इतके गुंतलेले असतो की आजूबाजूस बघायला सवड नसते स्वत:ला!

त्या दिवशी असेच काही झाले. होस्टेलवरून घरी आलेलो. दोन दिवस लागोपाठ जागरण. नेहमीसारखी सर्जरीतली हेवी इमर्जन्सी. कुठे तरी मोठा ॲक्सिडेंट झाल्याने अजूनच. मग पोस्ट आॅपरेटिव्ह गडबड. घरी येऊन झोपलो. उठलो तर आईचा प्रश्न,"त्या गावस्करला मुलगी पण आहे का रे?"

गावस्कर? मी तीन ताड उडायचा बाकी होतो.

"कोण गं?" मग सावरून शक्य तितक्या साळसूदपणे मी म्हणालो.

"ओह ते! अगं रोहन गावस्कर. क्रिकेटर आहे. मला नाही वाटत त्याला कोणी बहीण आहे.."

बोलताना मी आईकडे हळूच पाहात होतो.

"अरे, जगात काय तेवढे एकच गावस्कर आहेत की काय?"

"का गं?"

"काही नाही. असंच.."

आई काही बोलली नाही. पुढे मला कळलं ते हे, की आईला खूप आधी सारी बित्तंबातमी होती. आणि कहर म्हणजे ती फोडणारा फितुर म्हणजे चक्क माझा मित्र कैलास होता! 'दोस्त दोस्त ना रहा' म्हणावे तर खरेतर त्याने माझे काम सोपे केलेले. घरी बातमी फोडण्यापेक्षा आपोआप फुटलेली सोपी की नाही? कैलासला म्हणालो हे तर म्हणाला,"यार तुम्हारे, तुम्हारी चिंता करते हैं सारी.. इकरार तो आसान, पर घरपर बताना मुश्किल है भारी!"

"वा! स्वानुभव दिसतोय!"

"नहीं भय्या.

देखकर तुम्हें पागल तडपता यूं प्यार में ऐसा

मालूम है हमें महंगा पडेगा प्यार में पडना कैसा..

म्हणून नो एक्सपरिमेंट्स विथ धिस! अनुभव नाही पण अवलोकन फक्त.. सूक्ष्म निरीक्षणातून शिकतोय."

"पण तू आईला सगळे काही सांगितलेस?"

"सगळे काही? मला काय माहिती सगळे काही म्हणजे काय काय आहे? तसा मी इमॅजिन करू शकतो.. सिनेमे पाहतो मी पण! पण आय बिलिव्ह इन प्रायव्हसी.."

"तू चुप रे.."

"ऐलान ए मुहब्बत पर वो क्यों भडक रहे हैं

गर्म शीशेपर पडे पानी ऐसे तडक रहे हैं..

 

ऐ दोस्त.. नाम न लेना प्यार का ऐसे

नहीं सुचता पुढे.. यमक जुळाउं कैसे?"

"नमक खा.. जुळेल यमक."

"नो. असेल धमक तर जमेल यमक!"

"तू तुझ्या जी कोणी होईल त्या बायकोचं असंच डोकं खाणारेस? बिचारी!"

तर आईला कुणकूण कसली, तर सगळी बातमीच ठाऊक होती. कैलासची कृपा, आणि काय! तसा आई बाबांचा माझ्यावर विश्वास होता, त्यामुळे असेल.. किंवा अभ्यासात नि कामात मी कुठेच कधी हयगय करत नसल्याने असेल ते आजवर काही बोलले नसावेत..

मग मध्ये एकदा ती सारी गडबड झाली..

म्हणजे हल्लीच्या भाषेत सांगायचं तर अंकिता एकाएकी 'आऊट आॅफ कव्हरेज एरिया' झाली. दोन तीन दिवस झाले, तिचा पत्ता नाही. अगदी डिपार्टमेंट मध्ये ही नाही. न राहवून मी गावस्कर मॅडमना त्यांच्या हाॅस्पिटलमध्ये भेटायला गेलो..

"अखिलेश तू? इथे?"

"मॅडम, अंकिता? तीन दिवसांपासून दिसली नाही. फोन ही उचलत नाहीये.."

"कारणच तसं आहे. तू भेट तिला.. घरी. आज संध्याकाळी ये.."

"पण तिला झालंय काय?"

"सांगेल तीच.."

"एनिथिंग सीरियस?"

"म्हटलं तर हो.. म्हटलं तर नाही.. इट्स अपटू यू.."

"म्हणजे?"

"तू जाशील तेव्हा कळेलच. आज मी संध्याकाळी घरी नाहीये. तेव्हा अंकिता हॅज टू टाॅक टू यू. नाहीतर मी असताना ती कदाचित बोलायला बाहेरच यायची नाही.."

"काहीतरी सांगाल मॅडम. हॅव आय डन एनिथिंग राँग?"

"तू भेट तिला. मग स्वत:च ठरव.."

खरं सांगतो, असलं टेन्शन वैऱ्यालाही मिळू नये. अंकिता माझ्याशी बोलायलाही तयार नसावी? काय झालं असावं?

त्या संध्याकाळी अंकिता एकटीच घरी होती.. मी गेलो तशी दचकल्यासारखी झाली ती.. नि म्हणाली,"अखिलेश तू? तू का आलास इथे?"

आजवर आमची भांडणं झाली नाहीत असं नाही. प्रेमीजनांचे रूसवे फुगवे असायचेच. त्यात विनाकारण रागावणे आलेच.. मग उगाच साॅरी बोलणे आले, लाडीगोडी लावणे आले नि काही करून तो अबोला संपवणे आले. तो जीवघेणा काळ संपेल कधी असे वाटेतोवर एकदा ती हसली की सारे परत पहिल्यासारखं, पुढच्या भांडणापर्यंत! पण आजवर असा अबोला कधी धरला नव्हता तिने.. तिचा आवाज ही रागीट वाटत नाही. काहीतरी स्वत:चेच बिनसलेय नि तिला एकटं राहावसं वाटत असावं.. कुठल्याही डिस्टर्बन्स शिवाय.. असेच वाटावे असा तिचा स्वर..

"व्हाॅट्स द मॅटर डियर?"

"आय डोन्ट वाॅंट टू टाॅक. अँड डोन्ट वाँट टू सी यू.."

"ओ.के. पण का?"

"तू जा आता.."

"ठीक आहे. उद्या येतो.. पण टेक केअर.."

"नो.. तू परत येऊच नकोस. आय वाँट टू बी अलोन.. फाॅर एव्हर.."

हिला अचानक काय झालं असावं? हिचं लग्न तर ठरवून टाकलं नाही ना डाॅ.गावस्करांनी?

"पण झालं काय सांगशील तर ना.."

"अखिलेश तू जा.. डोन्ट एव्हर लुक बॅक.. मी नाही, नव्हते, नसणार असं समज.. समज आय डोन्ट एक्झिस्ट.."

"बट व्हाय? तू काहीतर सांग.."

"आय डोन्ट वाँट टू.."

कधी नव्हे तो माझा राग अनावर झाला..

"हे बघ, तू एकटी नाहीस. तू अचानक काही ही करायला मोकळी ही नाहीस.. यू आर आन्सरेबल टू मी.. आणि आय हॅव अ राइट टू नो.. त्यानंतर जे व्हायचं ते होईल.. साॅरी, बट डियर.. काही तरी सांग.."

"तू काही ही बोल.. बट यू गो अवे.. नाऊ.."

अंकिताचा आवाज रडवेला होता. इतक्या दिवसांत ती कधीच माझ्यासमोर रडली नव्हती.

पण तिचा रागरंग बघून प्राण कंठाशी येणे, पोटात खड्डा पडणे, तोंडाला कोरड पडणे अशा काही वाक्प्रचारांचा प्रत्यक्ष अनुभव घेत मी जायला उठलो. काय करावे न कळून.

पाठोपाठ अंकिता धावत आली..

"जाऊ नकोस अखिलेश.. आय नीड यू.. डोन्ट.. प्लिज डोन्ट लिव्ह मी अलोन.."

हे एक विचित्र प्रकरण! एकदा जा म्हणते नि नंतर डोन्ट लिव्ह मी! अर्थात हे असे प्रसंग पुढे कितीतरी आले. अंकिताला नक्की काय हवे ते कळायला असाच द्रविडी प्राणायाम करायला लागतो. बहुतेकदा तिची सुरूवात अशीच असते. किंवा मूळ मुद्दा कोणता हे समजेपर्यंत अर्धे भांडण होऊन गेलेले असते! कुणीतरी म्हटलंय, भांडणं म्हणजे स्पाइस आॅफ लाईफ आहेत.. आणि हल्ली लाईक कधी कधी जास्तच मसालेदार होतंय!

तर ती मूळ मुद्यावर पोहोचली..

"अखिलेश.. बघ हे काय झालंय.."

तिच्या हातावरचा तो पांढरा डाग दाखवत ती म्हणाली. तो कोडाचा डाग.. सर्जरीत असलो तरी इतपत डर्म्याटाॅलाॅजी येत होतं मला..

"व्हिटिलिगो.. आताच तीन दिवसात इट्स स्प्रेडिंग.. आय डोन्ट नो पुढे काय होणार.."

"मग? इट्स नाॅट अ बिग थिंग.. म्हणजे त्याने फक्त स्कीन विचित्र आणि विद्रुप दिसेल.."

"फक्त? हाऊ कॅन यू से दॅट? फाॅर अ यंग गर्ल.."

"सो? तू आयुष्यभर रडत राहणार आहेस?"

"बट आय डोन्ट वाॅन्ट टू स्पाॅइल युवर लाईफ.. माझं तर आता कठीण आहेच.. यू गो अहेड.."

"अहेड? म्हणजे नक्की कुठे?"

त्या दिवशी घनघोर डिस्कशन झाले. अंकिताचा भरपूर अश्रुपात झाला.. नि शेवट.. अर्थातच गोड झाला. म्हणजे पुलंच्या शब्दात सांगायचे तर तिच्या मनातला तो सेल्फ पिटीचा बोळा निघाला नि पाणी वाहते झालं!