Propose books and stories free download online pdf in Marathi

मागणी

मागणी

हेमंत पेशाने जरी इंजिनियर असला तरी एक हरहुन्नरी कलाकार होता.आपल्या नोकरीतल्या कामात जेव्हढा तो निष्णात होता तेवढाच तो कलासक्तही होता.संगीत,साहित्य, चित्रकला, नाट्यकला अशा चौफेर क्षेत्रात त्याची मुशाफिरी होती.
पुण्यातल्या सांस्कृतिक क्षेत्रातला अष्टपैलू उगवता तारा म्हणून त्या त्या क्षेत्रातले जाणकार लोक हेमंतकडे पहायचे.कुटुंबाची जबाबदारी पेलण्यासाठी आपली सरकारी नोकरी इमाने इतबारे करता करता आपल्या सगळ्या छंदाची जोपासनाही हेमंत करत होता...अगदी मजेत होता हेमंत!
दैवाला मात्र हे सुख फार दिवस पहावले नाही....
सरकारी नियमाप्रमाणे हेमंतची बदलीची ऑर्डर निघाली, तीसुध्दा मुंबई महानगरात!
पुण्याचे संथ सुखी आयुष्य सोडून अखंड धावणाऱ्या मुंबईत आपला निभाव कसा काय लागणार याची चिंता त्याला होती. नोकरी करणे ही गरज होती, पोटापाण्याचा प्रश्न होता त्यामुळे कितीही अप्रिय असला तरी हेमंतला नोकरीसाठी मुंबईला जायचा निर्णय घ्यावाच लागला....
मुंबईच्या ऑफिसला तो रुजू झाला.
पुण्याच्या काहीशा संथ जीवनाची सवय असलेला हेमंत मुंबईच्या धावपळीचे जीवन पाहून चांगलाच भांबावून गेला होता.
कुठे तरी उपनगरात राहून दररोज जीवघेणा लोकलप्रवास करून ऑफिसला धावतपळत पोहोचणाऱ्या सहकर्मचार्यांची एनर्जी व सळसळता उत्साह पाहून तो चांगलाच चकित झाला होता....
आपल्याला हे असे सगळे जमेल याबद्दल हेमंत साशंक होता त्यामुळे कुठेतरी उपनगरात रहाण्याच्या फंदात न पडता त्याने गेल्या गेल्या ऑफिसच्या इन्स्पेक्शन क्वार्टरमध्ये तात्पुरता आसरा घेतला.
कुठे रहावे यावर त्याने बराच विचार केला...
त्याने तातडीने रहाण्यासाठी ऑफिस क्वार्टर मिळावी यासाठी अर्ज केला.मुंबईत सरकारी कर्मचाऱ्यांना पगाराच्या तीस टक्के घरभाडेभत्ता मिळतो.क्वार्टर घेतली तर घरभाडे भत्ता सोडावा लागतो शिवाय वर काही रक्कम दरमहा पगारातून वजा होते.म्हणून सरकारी क्वार्टर घ्यायला लोक तयार नसतात;पण हेमंतने मात्र त्याला आर्थिकदृष्ट्या तोट्याचा असला तरी क्वार्टर घेण्याचा निर्णय घेतला...
नशिबाने ऑफिसच्या जवळ असलेल्या कॉलनीत त्याला ऑफिस क्वार्टर अलॉट झाली
त्यामुळे मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकलच्या संभाव्य धावपळीतून नाही म्हटले तरी हेमंतची सुटका झालेली होती.
आता तो आपले ऑफिसचे काम सांभाळून आपले छंदही जोपासू शकणार होता.
ऑफिसला जॉईन झाल्यावर लगेच स्वभावाप्रमाणे त्याने आपल्या कामात स्वतःला झोकून दिले....
पुण्याहून बदलून आलेल्या हेमंतचे एकंदरीत व्यक्तीमत्व आणि त्याचा उमदा स्वभाव पाहून ऑफिसातल्या अनेक सहकर्मचाऱ्यांशी त्याची लवकरच गट्टी जमली.
त्याच्या ऑफिसात शुभा नावाची त्याला ज्युनियर असलेली एक मुलगी होती.तिला तर हेमंतचा स्वभाव खूपच आवडला...
एरवी 'पुणेकर खडूस स्वभावाचे असतात' हे तिने ऐकले होते; पण हेमंत काही तसा वाटला नाही.अधिकारी असूनही तो सर्वाँना छान सांभाळून घेत होता.
जसे जसे दिवस जाऊ लागले शुभाने जाणीवपूर्वक हेमंतशी मैत्री वाढवायला सुरुवात केली.हेमंत सर्वांशी मनमोकळेपणी वागायचा त्याप्रमाणेच तो शुभाशीही वागायचा.
तिच्या मनात आपल्याबद्दल काही वेगळी भावना असेल याचा हेमंतला अजिबात अंदाज नव्हता.
ऑफिसच्या वर्धापन दिनानिमित्त कर्मचार्यांनी एक एकांकिका बसवायची ठरवली त्यात हेमंत नायक आणि शुभाने नायिकेची भूमिका केली. रिहर्सलच्या निमित्ताने दोघांचा एकमेकांशी सहवास वाढला.हेमंतला आता शुभा अगदी जवळून ओळखू लागली होती.त्याचे वागणे, बोलणे, त्याचे छंद आणि त्याच्या एकंदरीत स्वभावाच्या ती प्रेमात पडली.
आपल्याला आयुष्यभरासाठी जोडीदार म्हणून हेमंतच मिळावा असे तिला वाटू लागले.त्या दृष्टीने ती त्याच्याकडे पाहू लागली.
हेमंत मात्र तिच्याशी जेवढ्यास तेव्हढे वागत होता.एक अंतर ठेऊनच तो वागत होता.तो असा का वागतो याच्या मुळाशी जायचे असे शुभाने ठरवले....
एका विकएंडला आग्रह करून हेमंतला तिने शिवाजी पार्क भागातल्या तिच्या घरी नेले आपल्या आईवडिलांशी ओळख करून दिली.
आई वडिलांना शुभाचा हा मित्र खूप आवडला होता.
हेमंत परत गेल्यावर वडिलांनी तिला जवळ बसवून घेतले आणि तिच्या मनात काय आहे ते जाणून घेतले तसाही तो त्यांना आवडला होता.
या नात्याला पुढे न्यायचे तर हेमंतचा त्यासाठी पुढाकार असायला हवा असे त्यांना वाटले शुभाच्या वडिलांनी शुभाला एक अट घातली.
'हे नाते जर हेमंतने पुढाकार घेतला तरच त्यांना मान्य होणार होते.'
यासाठी हेमंतने तिला प्रपोज करणे आवश्यक होते ...
शुभासाठी हे मोठे आव्हान होते.
शुभाला कसेही करून हाच जोडीदार हवा होता!
आता ती दररोज हेमंतला काही ना काही कारण काढून ऑफिस संपल्यानंतर भेटू लागली.
शुभा आपल्या प्रेमात पडली आहे हे एव्हाना त्याच्या लक्षात आले होते;पण त्याला असे भरकटून चालणार नव्हते.त्याला त्याच्यावरच्या जबाबदाऱ्याची जाणीव होती.दोन लहान बहिणी आणि आईवडिलांची जबाबदारी त्याच्यावर होती. त्याच्या आयुष्यात त्याच्या जबाबदाऱ्या निभावणे ही प्राथमिकता होती...
शुभा हेमंतच्या मनात नक्की काय चालले आहे याचा अंदाज घेत होती.
कसेही करून त्याला या विषयावर बोलते करायचा प्रयत्न ती करत होती.
एका विकेंडला शुभा हेमंतला खूप आग्रह करून आऊटिंगला बाहेर पडली.एका निवांत ठिकाणी बसल्यावर शुभाने आपले मन हेमंत समोर मोकळे केले.
हेमंतनेसुध्दा कोणतीही लपवाछपवी न करता त्याच्याबद्दल सगळ्या गोष्टी तिला सांगितल्या....
शुभाच्या दृष्टीने हेमंतसमोरील समस्या अगदी फार मोठ्या नव्हत्या.
" आपण दोघे मिळून या सगळ्या जबाबदाऱ्या सहज पेलू " तिने त्याला विश्वास दिला.
हेमंतने विचार करण्यासाठी काही वेळ मागितला आणि शुभाने त्यासाठी आनंदाने होकार दिला.
आता ते दोघे दररोज भेटू लागले.आता हेमंतलाही शुभाबद्दल आकर्षण वाटू लागले होते...विचारातील दरी जवळीकीने हळूहळू भरू लागली होती ...
दर विकेंडला दोघे कुठे ना कुठे हातात हात घेऊन फिरत होते.
आज जुहू बीचवर दोघे बसले होते...
किनाऱ्यावर तिचा हात हातात घेऊन, तो येणारी प्रत्येक लाट मोठ्या कौतुकाने पाहात होता.
तिने त्याच्या खांद्यावर ठेवलेले डोके हळूच वर केले आणि त्याला ती तन्मयतेने न्याहाळू लागली. न राहवून थोड्या वेळाने तिने त्याला विचारले
"अजून कसला विचार करतोयस?"
हेमंत काहीही न बोलता बाजूला झाला. समुद्राच्या लाटा सहजा सहजी आपल्यापर्यंत पोहचणार नाहीत एवढे अंतर सोडून त्याने किनाऱ्यावर एक निर्मनुष्य जागा शोधली.
त्याचा तो नवा अवतार पाहून शुभाच्या मनात नाना विचार डोकावून गेले.
तिने प्रश्नांची सरबत्ती सुरू केली;पण गडी मोठा धिराचा,
"थांब थोडावेळ, सगळं समजेल!"
इतकेच तो बोलला.
आपल्या तोंडाची वाफ आपण हवेत दवडतोय हे ध्यानात येताच तिने सुद्धा मौन बाळगले.
हेमंतने एकाग्र चित्ताने वज्रासनात बसून. समुद्राकडे तोंड करून धरणीमातेवर डोके टेकवले आणि तो कामाला लागला...
सलग चार तास घाम गाळून मोठ्या मेहनतीने हेमंतने वाळूचे एक सुंदर शिल्प, देखावा बनवला.
बाजूला बघ्यांची गर्दी उसळून आली.
ती त्याच्याकडे कौतुकाने डोळे भरून पहात होती.
जराही न संकोचता, त्या सगळ्या लोकांसमोर, गुडघ्यांवर बसून त्याने तिचे दोन्ही हात हातात घेतले आणि म्हणाला,
"तु विचारत होतीस नं, कसला विचार करतोयस? मी हाच विचार करत होतो की तू माझ्यासाठी काय काय केलंस. माझ्या आयुष्यातील प्रत्येक भल्याबुऱ्या प्रसंगात सावली सारखी माझ्या मागे उभी राहीलीस. तू माझ्यासाठी खूप खूप खास आहेस. म्हणून तुला लग्नासाठी मागणी कशी घालावी याचा विचार मी करत होतो."
" मग जे मला सुचले ते तुझ्या समोर आहे. लग्न करशील माझ्याशी?'
गर्दीतुन एकच आवाज उठला, ' हो म्हण ,हो म्हण ! '
शुभा तर या क्षणाची वाटच पहात होती!
"हो... हो...हो रे राजा"
तिने त्याला घट्ट मिठी मारली.
आजूबाजूच्या लोकांनी त्यांच्या भोवती रिंगण करून टाळ्या पिटायला सुरुवात केली!
©प्रल्हाद दुधाळ पुणे
9423012020