Aatmsanmaan books and stories free download online pdf in Marathi

आत्मसन्मान

आत्मसन्मान...

आजपर्यंतच्या आयुष्यात आपण एकसे बढकर एक नोकऱ्या सोडल्या! का माहीत आहे? आपल्याला अपमान अजिबात सहन होत नाही.जीवनात आत्मसन्मान महत्वाचा! पुर्वी एकदा मला टेलिफोनखात्यात तात्पुरती नोकरी लागली होती; पण आपण ती सोडली, कारण आत्मसन्मान!कामचलाऊ ट्रेनिंग घेवून मी नोकरी करत होतो...एकदा काय झालं ...एका टेलिफोन एक्स्चेंजमधे माझी संध्याकाळची ड्युटी होती.माझ्याबरोबर दिलप्या होता. त्याच्याबरोबर मस्त गप्पा चालल्या होत्या.अशा गप्पा रंगात आल्या असताना मधेच एखाद्या कस्टमरने डिस्टर्ब केलं ना की डोकं जाम भडकायचं; पण करणार काय?पापी पेटका सवाल था ना! तर, रात्रीचे अकरा वाजले होते.माझा मित्र दिलप्या मला एक से बढकर एक नॉनवेज जोक ऐकवत होता आणि हसून हसून मी बेजार झालो होतो...आणि नको ती गोष्ट घडली.

ट्रिंगss ट्रींग ss फॉल्ट रिपेअर सर्व्हिसवर फोन वाजू लागला . पहिल्यांदा वाजू दिला भरपूर; पण जाम उचलला नाही, पुन्हा पुन्हा तो वाजतच राहिला.

सालाss,एखादा साहेब असायचा! नको ते वांदे व्हायचे!

पुन्हा कॉल आला, नाईलाजास्तव डोक्यावर हेडगियर घातला...“ नमस्कार,फॉल्ट रिपेअर सर्व्हिस....”“टेलोफोन एक्स्चेंज?”“ यस्स सर”“ हे बघा मी खूप वेळापासून माझ्या घरचा फोन लावतोय पण मला तो मिळत नाही.”“ सर, फोनवर कुणीतरी बोलत असेल, थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करा.”“ फोन बिघडलेला तर नाही ना?”“नाही सर,फोन चालू आहे,थोड्या वेळाने मिळेल तुम्हाला!”“ ओक्के, करतो प्रयत्न पुन्हा, थॅंक्यू!”“यू आर वेलकम सर.”एकदाचा त्या कस्टमरला कटवला आणि दिलप्याकडून पुढचे किस्से ऐकायला लागलो.दहा मिनिटे गेली असतील-नसतील, पुन्हा फोन वाजायला लागला.चांगला दोन मिनिटापर्यंत वाजू दिला आणि मग उचलला....“ नमस्कार,फॉल्ट रिपेअर सर्व्हिस....”“एक्स्चेंज?”“ यस्स सर, बोला”“ अरे, मी थोड्या वेळापूर्वी फोन केला होता,अजूनही माझा फोन लागत नाही. बघा खराब झाला असेल,”“ सर नंबर सांगा ना पुन्हा....”“ २६२११४२०”“ पुन्हा बघतो सर...”फोन पुन्हा टेस्ट केला तर फोनवर बोलणे चालूच!“ सर अजूनही फोनवर बोलणे चालू आहे.....”“ नक्की ना? नीट बघा, बिघाडामुळे लागत नसेल....”“ नाही सर, टेलिफोन बिलकूल ठीक आहे, बोलणे चालू आहे. काही वेळानंतर पुन्हा प्रयत्न करा मिळून जाईल.”“ ठीक आहे करतो पुन्हा प्रयत्न....धन्यवाद...”“ यू आर वेलकम सर!”फोन कट झाला. दिलप्या हे सगळ बघत होता.“ कोण होता रे तो ?”“ अरे त्या डायमंड सोसायटीतला कस्टमर होता,मोठा बिजनेसमन आहे, त्याच्या घरचा नंबर त्याला लागत नाही.त्याच्या फोनवर बोलण चालू आहे आणि तो म्हणतोय बिघडला असल!”दिलप्याच्या नजरेत चमक आली ...“इतकं काय बोलण चालू असेल बघायचं का रे ?”दिलप्या अशा गोष्टी शोधण्यात एकदम एक्स्पर्ट होता.आम्हाला कॉल चालू असताना तो मधे ऐकायची सुविधा उपलब्ध होती.अगदी अपवादात्मक परिस्थिती असली तरच या सुविधेचा वापर करावा असे संकेत होते. काही ठराविक नंबर्सवर रात्री आमचे मित्र याचा वापर करून वॉच ठेवून अनेक नंबर्सवर चाललेली रोमॅन्टिक बोलण्याचे श्रवणसुख घ्यायचे. या नंबरवरही असेच काही मिळते का बघायचे दिलप्याने ठरवले... आता आम्ही दोघे तो संवाद ऐकू लागलो...“ हॅल्लो डार्लिंग, बोल ना ग, रागावलीस का?”“ मी कशाला रागावेल रे तुझ्यावर, तू तर माझा राजकुमार आहेस!”“मग माझ्या राणी, अशी मधेच गप्प का झालीस? ....”“ काय बोलू, दुपारी तू खूपच मस्ती घातलीस ना,पार दमून गेली रे मी!”“ पण किती मजा आली ना, तुझा तो टकलू नवरा बाहेर गेला की असेच पुन्हा भेटू, मग मजाच की! काय....?”“ ए, असा लाडात नको येवूस पुन्हा, उद्या तो गावावरून आला ना की अजिबात फोनबिन करू नको बर का, नाही तर कायमचा निरोप घ्यायला लागेल!”“ अग, शुभ बोल ना, अजून त्याची टूर वाढू दे की! म्हणजे उद्याही भेटता येईल....”“ बस की आता; एकतर आता किती वाजलेत बघ, दिवसा झालाय की रोमान्स करून! अजून फोनवर चालूच आहे की तुझं!”“अभी ना जाओ छोडssकर, की दिल अभी भराss नही.....”“फारच चहाटळ ल तू बरका? झोप आता ”.....दिलप्याचा अंदाज खरा ठरला होता तर! फोनवर चांगलंच गुटर्गू चालू होतं, आणि तो बाबा म्हणतोय त्याचा फोन बिघडला असेलं!इथ तर त्याचा संसारच बिघडलेला होता!आता आम्ही दोघे त्या जोडीचा रंगात आलेला प्रीतीसंवाद मन लावून ऐकायला लागलो. ते दोघेही प्रेमरंगात बरेच मुरलेले दिसत होते.एकमेकांवर रोमॅंटिक वाग्बाणांचा मारा जोरात चालू होता.मधेच तोंडाचे आवाज काढून चुंबनसत्रही जोरात चालू होते.एकंदरीत बोलण्यावरून या बाईच या बाप्याशी अनेक वर्षापासून सूत असावं!अगदी लग्नाच्या आधीपासून हे प्रकरण चालू असलं पाहिजे. आम्हाला रात्री टाईमपास करायला अजून एक टेलिफोनठिकाण मिळाल! दिलप्या तर भलताच खूष झाला होता.हे लफडं ऐकण्यासाठी पुढच्या आठवड्यातही नाईट ड्युटी करायची त्याची तयारी होती.ट्रिंगSS ट्रिंगSSरसभंग करत पुन्हा टेलिफोन वाजायला लागला.आम्ही तो रोमॅन्टिक सीन मधेच ऐकायचा सोडून पुन्हा ड्युटीच्या मूडमध्ये आलो.ट्रिंगSS ट्रिंगSS ट्रिंगSS ट्रिंगSSफोन पुन्हा पुन्हा वाजत होता....“ नमस्कार फॉल्ट रिपेअर सर्व्हिस...”“ टेलिफोन एक्स्चेंज?”“ यस्स सर,बोला ““अरे बोला काय; बोला? गेले दोन तास मी तुम्हाला सांगतोय की माझा फोन खराब झालाय....”“ सर नंबर सांगा.....”“ किती वेळा नंबर सांगायचा? आत्तापर्यंत तीन वेळा सांगून झालाय.....”“ सर, पुन्हा चेक करतो, होल्ड करा प्लीज....”“ बघा काय ते,नुसता फुकट पगार खाता,काम करायला नको, लोकांना खोट सांगता, फोनवर बोलण चालू आहे....”तो म्हगाचा कस्टमर आता चांगलाच तापला होता!“ सर, टेलिफोन बिघडलेला नाही, अजूनही फोनवर बोलण चालू आहे...”“ धडधडीत खोट बोलताय तुम्ही मिस्टर, न बघताच तुम्ही मला फोन चालू आहे म्हणून सांगताय, गेले दोन तास मी पीसीओवर उभा आहे घराचा फोन लागत नाहीये, आणि तुम्ही सरळ सरळ खोट सांगताय ,फोन चालू आहे?”“ सर, खरच फोनवर बोलण चालू आहे! मी कशाला खोट बोलू?”“ तुम्हा लोकांना आता मस्ती चढलीय, काम करायला नको,झोपा काढून फुकटचा पगार मिळायला पाहिजे.बघा उद्या तुम्हा लोकांची तक्रारच करतो!”“ सर, खरच सांगतोय तुमच्या घरच्या फोनवर कॉल चालू आहे.....”“ खोट बोलताय तुम्ही मिस्टर.....”“सर, खरच फोनवर बोलण चालू आहे....”“ शक्यच नाही! माझ्या घरी फक्त माझी बायको आहे, इतक्या रात्री ती दोन दोन तास कुणाशी बोलण शक्यच नाही!, तुम्हाला काम करायचं नाही म्हणून खोट सांगताय....”कस्टमरचा आवाज वाढला तसा माझाही आवाज आता वाढायला लागला होता.प्रामाणिकपणे मी या माणसाला सांगतोय की फोनवर बोलण चालू आहे तर तो माझ्यावरच गुरकतोय! त्याला काय माहीत की त्याची बायको किती चालू आहे? तिच्या याराशी रात्रभर ती गुलूगुलू बोलतेय! याला फसवून दिवसा त्याला भेटतेय, वर हा माझा पगार काढतोय.तक्रार करायची म्हणतोय! करू दे काय करायचे ते त्याला; पण आता याला खर काय ते सांगायचं. माझा अपमान करतो काय? आता बघच!पुन्हा अंगात ड्युटी भिनवली ...“सर,अजूनही तुमच्या टेलिफोनवर बोलण चालू आहे ....”“ बास झाला तुमचा मूर्खपणा,मला माहीत आहे माझा फोन बिघडलाय !” मुर्ख? मी ...मुर्ख? उडत गेली ही टेंपररी नोकरी! काय व्हायचं ते होवू दे, आता याला खर काय ते समजायलाच हवं! मी मूर्ख काय?आता तुला दाखवतो मी मूर्ख का तू महामूर्ख!“सर, तुमच्या फोनवर तुमची बायको कुणाशीतरी बोलते आहे, आणि ती असे काहीतरी बोलते आहे ते तुम्ही ऐकू शकणार नाही.....”“ महाशय अजून किती खोट बोलणार आहात? असा मूर्खपणा करायला नोकरी करताय का? उद्या तुमची नोकरी घालवतो का नाही बघा!”“ सर, मी खरं सांगतोय, तुम्हाला ऐकायचय का बोलण?”खरं तर असं काही करायची आम्हाला परवानगी नव्हती; पण या माणसाने माझा पगार काढला होता, मला तो मूर्ख म्हणाला होता,झोपा काढतोय म्हणाला होता. तशीही ही नोकरी काय कायम नोकरी नाही.इमानदारी करूनसुध्दा उगाचं कुणाच का ऐकून घ्यायचं? गेली उडत नोकरी.....आत्मसन्मान महत्वाचा!“ सर, आता तुम्हाला ऐकवतो, तुमच्या बायकोच लफड ...!”मी सरळ त्या दोघांच्या बोलण्यात याला जोडून टाकलं, एक काळजी मात्र घेतली, याच बोलण त्या दोघांना ऐकू जाता कामा नये ....तो ऐकत होता ....हळूहळू त्याचा रागाचा पारा वाढलेला फोनवरही जाणवत होता ....“ बोल ना डार्लिंग, उद्या त्याच हॉटेलवर येशील ना?”“ बघते, जमल तर.”“बघते काय, उद्याही धमाल करू नेहमीसारखी काय/”“ अरे पण नवरा आला तर?”“ कटव ग त्याला,त्या टकल्याला नेहेमीसारख दे घालवून बाहेरगावी, मग तू राणी आणि मी तुझा राजा.....”इकडे टकल्या बायकोला दात ओठ खावून शिव्या घालत होता;पण त्या दोघांना ते ऐकू जाणे शक्यच नव्हत.दिलप्या आणि माझ्याबरोबर आता टकलूही फोनवरचा रोमान्स अगदी मन लावून ऐकत होता.दोन दिवसानंतर त्या टेलिफोनचा पत्ता काढून त्यांचं घर बघून आलो.घराला मोठ्ठ कुलूप लागलेलं होत....आणि हो , ती अपमानास्पद नोकरी मी कायमची सोडली बर का ...ऑफ्टर ऑल आत्मसन्मान सगळ्यात महत्वाचा! काय?........ प्रल्हाद दुधाळ.