dandeli books and stories free download online pdf in Marathi

दांडेली

                                                                                            दांडेली

        जंगलात भटकण्याची इच्छा सगळ्यांनाच असते. एकदा जोडून सुट्ट्या आल्या तेव्हा आम्ही कुठेतरी विकेंडला जाण्याचा प्रोग्राम बनवायला लागलो. शोधाशोध सुरू झाली. त्यातून समोर आले ते कर्नाटकातले दांडेली जंगलातले गेस्ट हाऊस. ‘दांडेली मिस्ट’ मडगावपासून साधारण तीन तासांवर असलेलं ते ठिकाण.

     शनिवारी निघालो. शहर संपल्यावर जंगलातला वळणदार रस्ता सुरू झाला. घनदाट जंगलातल्या झाडांची नावं महित नसलेल्या अनोळखी वृक्षराजींना बघत, एखादा प्राणी दृष्टीस पडला की तो न्याहाळत रस्ता कटत होता. मधूनच माकडांच्या झुंडी येत. दात विचकून एकमेकांकडे बघत पळून जात, नाहीतर शांतपणे येणाऱ्या जाणाऱ्याकडे बघत बसत. हळूहळू जंगल दाट होऊ लागलं. जमिनीवर पडलेली काळी पिवळी नक्षी दाट होऊ लागली. लवकरच दांडेली मिस्टचा बोर्ड दिसला. आतमध्ये गेल्यावर एका एकरात वसलेलं ते ठिकाण नजरेत भरलं. चारही बाजूंनी मातीच्या खोल्या, त्यांना मातीचा लाल रंग कालवून त्याने रंगरंगोटी केली होती. त्यावर वारली पेंटिंगची रेखाटणं. गेट समोरच वेलींची कमान करून ऑफिसपर्यंतचा मार्ग सुशोभित केला होता. प्रोसिजर पुर्ण करून, दिलेल्या रूमकडे वळलो. मुख्य रस्त्याला छोट्या रस्तांनी विभागून तो मार्ग खोल्यांकडे वळवला होता. बॉयने रूम उघडून दिली व सामान ठेऊन दिले. लाकडाचा वापर करून अत्याधुनिक रूम बनवली होती. कलात्मकतेने सुखसोई सुविधा केल्या होत्या. समोरच्या ओट्यावर लाकडी बेंच होता व मागच्या बाजूला झुलती लाकडी खुर्ची ठेवलेली. मागची बाजू पुर्ण मोठ मोठ्या झाडांनी वेढलेली होती. त्यामधून एक कालवा वहात होता. झाडांवर वेगवेगळे पक्षी अधुनमधून ये जा करत होते. पाण्यात डुबकी घेत होते. रूममधून बाहेर आलो. पुर्ण परिसरात अश्या १५/२० आरामदायी कुटी बांधलेल्या होत्या. समोरच्या बाजूला केळीच्या बागा, भाज्यांचे वाफे दिसत होते. एका बाजूला बैल, घोडे बांधलेले. मध्यभागी एक मोठा गोल करून ती जागा नाष्टा, जेवण यासाठी बनवली होती. लाकडाच्या फळ्यांनी वरचा पुर्ण भाग घुमटासारखा आच्छादला होता. काही जंगलातले पेंटिंग, परंपरागत शेतीची अवजारे, पुरातन काळातले जुने स्वैपाकाचे भांडे, बंब, असे मांडून ठेवले होते. एका बाजूला टेबल टेनिसचे टेबल, कॅरमबोर्ड, बॅडमिंटन, चेस, क्रिकेट सेट ठेवले होते. ज्याला जे पाहिजे ते घेऊन खेळत होते. नव्याने आलेल्यांचे ग्रुप जमत होते. नवदाम्पत्यांनी मात्र आपापले कोपरे पकडले. चहा बिस्किट खाता खाता सगळ्यांच्या गप्पा सुरू झाल्या. जंगलात फिरून आलेल्यांचे आपापले अनुभव कथन सुरू झाले. एका साइड टेबलवर प्राणी पक्ष्यांची माहितीपूर्ण पुस्तके रचली होती, ती चाळून आम्ही आवारात फिरायला निघालो. हळूहळू निसर्ग आमच्या तनामनात मुरत होता. रात्री ८ वाजता जंगल सफारी होती. एका उघड्या जीपमधे आम्ही सर्व बसलो.

     सावकाश जीप जात होती. वाटाड्याने माहिती सांगायला सुरवात केली. रात्री जंगलातला दिवस सुरू होतो. प्राण्यांचा वावर जाणवू लागतो, पण प्राणी इतके आत असतील की जीपच्या किंवा मानवी टप्प्यात ते शक्यतो फिरकतही नसतील. एकतर रात्रीच्या अंधारात काही दिसतही नव्हतं. फक्त जाणवत होती ती एक गूढ शांतता, निःस्तब्ध रानवारा, मनातल्या भुतांची भीती, झाडांची सळसळ, चंद्र चांदण्यांचा खेळ, मध्येच एखाद्या जिवाणूची चाहूल, ड्राइव्हरनी दाखवलेल्या आदिमानवाची भीती, आवाज न करण्याची ताकद, आणि त्यातून आलेली एक भयाण शांतता, आणि सतत कुठे काही दिसतय का याचा शोध आणि त्यातून होणारे भास. रस्त्यावरून सरपटत गेलेल्या सापाशिवाय आम्हाला काहीही दिसले नाही. रस्त्याच्या दोन्ही बाजूनी कमरे एव्हढे वारूळं दिसत होती. त्यात कुठल्या ताकदीचे साप नाग रहात असतील या विचारानेच अंगावर काटा आला. मन कसं असतं, त्याला एक दिशा दिली की प्राणी पहायचे आहेत, की ते त्याच दिशेने धावायला लागतं. त्या धावण्यात आताचा क्षण निघून जातो. त्या क्षणात जंगलातली सुंदर काळी रात्र न अनुभवता ते फक्त धावतच रहातं आणि हाती काहीच येत नाही. हे लक्षात आल्यावर मन आहे त्या गोष्टीकडे बारकाईने बघायला लागलं. त्यातून मग उलगडत गेल्या जंगलातल्या वाटा, झाडांच्या फांद्यां वेलींमधून झिरपणारं चंद्र चांदणं, रातकिडयांची किरकिर. लवकरच एक अनुपम दृश्य समोर आलं. वाटेने जाताना आम्हाला एखाद दुसरे काजवे दिसत होते. जंगलात शिरल्यावर त्यांची झगमग वाढलेली दिसू लागली. मग आमच्या अंगावर, केसात सर्वत्र काजवेच काजवे, त्यांच्या पंखांच्या उघडमिट मधुन लुकलुकणारे प्रकाशबिंदू सगळीकडे चमचमत होते. अनोखा नजारा. अपूर्व सोहळा. काजव्यांच्या दुनियेत आम्ही प्रवेश केला होता. अंगा खांद्यावर बसून त्यांनी आम्हालाही त्यांच्या सृष्टीचा भाग बनवून टाकले. कितीतरी वेळ आम्ही त्यांच्या दुनियेत होतो. पण निघायची वेळ झाली. ड्राइव्हरला दुसरी ट्रीप घेऊन परत या दुनियेत यायचे होते. लवकरच आम्ही गेस्ट हाऊसला परतलो. जेवणं करून रूम गाठली. सकाळी सहा वाजता चहा पिऊन जंगल भ्रमंतीचा कार्यक्रम होता. सकाळी पक्षी खूप दिसतात असे आम्हाला सांगण्यात आले होते. आवरून झोपण्यासाठी लाइट बंद केला, तशी जंगलातली ती रात्र अंगभर पसरली. मागून वहाणारा पाण्याचा नाद जोजावत होता. झाडांची सळसळ वारा घालत होती. हलकेच स्वप्नांच्या दुनियेत प्रवेश झाला आणि वास्तवाशी संबंध सुटला.

     पहाटेच जाग आली तर क्षणभर कळेचना आपण कुठे आहोत ते. नंतर नाजुकशी किलबिल ऐकू येऊ लागली. खोलीच्या मागून जो कालवा जात होता त्या झाडांवरून हलकीशी कुजबूज चालू होती. जणू पिल्लांचे आई बाबा कामावर जाण्यासाठी तयारी करत होते, आणि पिल्लं आपल्या चोची मऊ पोटात खुपसून निवांत झोपले होते. अजून त्यांना दुनियेची फिकीर नव्हती. हळुहळू पहाट ओसरत गेली. गार वाऱ्याच्या झुळकी आल्हाददायकपणे विहरत होत्या. दोघेही तयार होऊन बाहेर पडलो. टेबलावर आलं घातलेला गरम चहा आणि बिस्किटं ठेवली होती. चहापान झाल्यावर गाईड बरोबर आमचा दहा जणांचा ग्रुप निघाला.

    चालता चालता गाईड बरच काही सांगत होता. रस्ता ओलांडून आम्ही जंगलाच्या हद्दीत प्रवेश केला. दाट झाडांच्या पहार्यामुळे, सूर्यकिरण खाली येताना त्यांची नजर चुकवून येत होते. त्यामुळे जे किरण येऊ शकत होते त्यांची पिवळी व झाडाची काळी अशी नक्षी सर्वत्र पसरली होती. वृक्षांना लडिवाळपणे लपेटून वेली झुलत होत्या. जंगलाला आपला एक नाद असतो. झाडांची सळसळ, जमिनीवरून सरपटून गेलेला एखादा प्राणी, वाऱ्याने उडून परत गिरकी घेत जमिनीवर पहुडणारा पालापाचोळा, पक्षांचा किलबिलाट, एखादया दुरवर वाहणाऱ्या झऱ्याचा नाद, चरणारी जनावरं, त्यांच्या पावलांनी चुरणाऱ्या पानांचा आवाज अश्या अनेक आवाजातून आम्ही पुढे जात होतो.

    एव्हढ्यात झाडामधून कोकिळेची साद घुमली, या दिवसात कोकिळला कंठ फुटतो. एकटाच तो साद घुमवत होता. मग त्याच्या जोडीला अजून एक आवाज घुमायला लागला. तो पहा तांबट पक्षी, गाईडने केलेल्या इशाऱ्याकडे बघितले तर एका फांदीवर लाल मोठा कुंकवासारखा टिळा मिरवणारा तांबट दिसला. न थकता तो दुपारपर्यंत पुकपुकत रहातो. झाडांवर आता माकडांनी हजेरी लावली. आमच्याकडे बघत, कुणाच्या हातात काही आहे का ? याचे निरीक्षण केले. मग काही लाभ नाही असे दिसल्यावर दोन चार जणं आले तसेच निघून गेले. लाल तोंडाची माकडे होती ती. लवकरच आम्ही जंगलाच्या अंतरंगात शिरलो. आता वातावरणाला एक प्रकारची नीरवता, निस्तब्धता लाभली होती. दाट झाडोर्यांमध्ये विविध पक्ष्यांचं दर्शन होऊ लागलं. चिमण्यांच्या जोड्या इकडून तिकडे लगबगीने उडत, चिमणा नर गळ्यात चॉकलेटी बो घालून तिच्यावर हुकूमत गाजवत होता. कावळे आपले एकांडी, झपकन कुठूनतरी येत आणि कावकाव करून निघून जात. पोपटांचा थवा आकाशात उडताना दिसला, उडताना ते कर्कश्य आवाज करत ओरडत होते. मग एका झाडावर झेपावून, इकडे तिकडे जागा पकडल्यावर परत एकमेकांशी बोलू लागले. बहुतेक वाटेतल्या कहाण्या सांगणं चालू असावं. हिरव्या रंगातल्या झाडवरचे पोपटी पोपट म्हणजे गोष्टीतलं बोलकं झाडच वाटू लागलं. जंगलभर कसली कसली फुलं फुलली होती. फुलं आहे म्हणजे मध आहे. मध आहे तिथे फुलपाखरं, छोटे पक्षी, कीटक सगळेच आले. पिवळ्या रंगातली फुलपाखरं या फुलांवरून त्या फुलांवर उडत, फुलांवर बसलं की पंख मिटून तल्लीनतेने मध चाखत होती. एकीकडून एक छोटा, काळ्या अंगावर पांढरे पट्टे असलेला पक्षी उडत आला आणि फुलात आपली चोच खुपसून नंतर माखल्या चोचेने इकडे तिकडे बघू लागला. “ हा दयाळ पक्षी. याचा आवाज खुप छान असतो.” मोठ मोठ्या झाडांवर बसलेले पक्षी दाखवत गाईड एक एक नावं घेऊ लागला. सुभग, बुलबुल, खाटीक सारिका, गुलाबी मैना, जंगली मैना, वटवट्या, शिंजिर, नाचण, चातक, नीलकंठ, शंकर, अशी त्यांनी कितीतरी माहितीची आणि न महित असलेल्या पक्ष्यांची नावे घेतली. सगळे इथे नाहीत पण जंगलात हे पक्षी बरेचदा दिसतात. मग जो पक्षी दिसेल तो दाखवून, त्याचे वर्णन गाईड करू लागला. आम्ही बारकाईने न्याहाळायला लागलो.

      लाल रंगाचा तुरा गोलाकार रेखून असलेला नारद बुलबुल आणि खाली बुडाशी लाल रंगात माखलेला लालबुड्या बुलबुल, यातला फरक गाईड सांगत होता. तेव्हढ्यात छोटासा पिवळा धमक चश्मेवाला पक्षी, आपली नक्षी चितारून गेला. हिरवा पिवळा सुभग फांदीवर बसून सर्वत्र आवाज देत होता. त्याला प्रतिसाद मिळत नव्हता. आपल्या तुरेदार शेपटीचा पसारा फुलवून नाचण ओरडला. गंमत म्हणजे आवाज द्यायच्यावेळी त्याच्या शेपटीचा पिसारा फुलायचा आणि साद देऊन झाली की तो मिटायचा. चातक पक्षी हे जरा मोठे, पांढरेशुभ्र पोट व गळा  असलेले आणि पंखांच्या व लांब शेपटीच्या टोकावर पांढऱ्या पट्टयांव्यतिरिक्त संपूर्ण काळे होते. त्याच्या डोक्यावर छोटा तुरा होता. नावं महित असलेले पक्षी त्यातले काही प्रत्यक्ष पहात होतो. डोक्यावरून लाल चोच व पोटावर उभ्या रेषा असा पक्षी गेला त्याचे नाव हळद्या असे कळाले. मधुनच आपल्या निळ्या रंगाची लखलख करत खंड्या उडाला. त्याचा हा निळा रंग फारच लोभस दिसतो. आम्ही आलो तो हंगाम एप्रिलचा होता. चैत्र पालवीने नव्या कोवळ्या पोपटी पानांच्या कळ्या झाडाझाडांवर दिसत होत्या. जुनी गर्द हिरवी पाने, गळतीची पिवळी पाने, आणि नव्या नवलाईची पोपटी अश्या हिरवाईने जंगल नटले होते. झाडांच्या पायथ्याशी तपकिरी पानांचा सडा पडलेला. या दिवसात पाखरं घरटी बांधायच्या उद्योगात असतात. मध्येच झाडावरून टोकटोक असा आवाज येऊ लागला. आपल्या बाकदार टोचेनी सुतार पक्षी तासत होता. भारद्वाजचे घुमणे कुठेतरी सुरू झाले. हा पक्षी फार गर्द झाडांमध्ये बसतो व तिथूनच आवाज देत रहातो त्यामुळे याला शोधून काढावे लागते. काळ्या भरजरी राजवर्णी तपकिरी पंख असलेला हा पक्षी गर्भश्रीमंत दिसतो. वेलींवर झोके घेत देवचिमण्या बसलेल्या दिसल्या. आपली पिवळी पोटं, काळी पाठ लवलवत छोट्या चोचीने फुलातला मध खात होत्या.चालता चालता किती पुढे आलो हे कळायला मार्गच नव्हता. एका गर्द बाजूला वटवाघुळे लटकलेली होती. आपले पाय फांदीवर रोवून, पंख पसरवून कसे उलटे झोपत असतील हे ? देवानी पण प्रत्येकाला किती वेगवेगळ्या खुबी दिल्या आहेत. मधेच निळ्या आभाळात घार संथपणे फिरताना दिसत होती.

     हे सगळं पहात ऐकत आम्ही पुढे पुढे जात होतो. पुढे जावं तितका जंगलाचा दाटपणा जाणवत होता. आता तर सापांचही भय आम्हाला जाणवू लागलं. सूर्याची तिरपी किरणं आता अदृश्य झाली होती. एका वळणानंतर समोर एक तळे दिसू लागले. पशु पक्ष्यांची पाणी प्यायची जागा. पाणथळ. पाणकोंबड्या, बदकं, बगळे, यांची तिथे हजेरी लागलेली. त्यांना पहात पहात आमचा मोर्चा गेस्ट हाऊसकडे वळला. कितीतरी फोटो काढले. प्राणी तर काही दिसले नाही. पण पक्ष्यांनी मात्र मन तृप्त केले. थोडे पुढे गेल्यावर एक फार छान दृश्य समोर आले. नदीची एक धार वहात होती. तिच्या दोन्ही काठावरून जाळीदार मोठी झाडे लवून त्याचा घुमट झाला होता. त्या झाडांच्या पानांमधून तिरपे किरण पाण्यावर पडुन चमकत होते. त्या घुमटातल्या एका फांदीवर मोर आपला पिसारा खाली सोडून बसला होता. अप्रतिम दृश्य होते ते. कितीतरी वेळ बघत राहिलो नंतर मोराला आमची चाहूल लागली आणि तो आमच्या समोरून आपला बहारदार पिसारा सांभाळत उडून गेला. काहींची कुठलीही कृती सुंदरच भासते. तो उडाला तरी, बसला तरी, चालला तरी, नाचला तरी, सुंदरच.

    मोगऱ्याच्या फुलांचा सुगंध मनात कसा दरवळत रहातो तशा या आठवणी मनात रहाणार होत्या. गेस्ट हाऊसवर आलो. जेवून चेक आऊट करायचं होतं. रूमवर येऊन सामान आवरलं, बॅग घेऊनच जेवायला गेलो. नंतर प्रोसिजर पुर्ण करून परत सिमेंटच्या जंगलाकडे निघालो.

                                                                                  .................................................