Aajol books and stories free download online pdf in Marathi

आजोळ

                                                                                                   आजोळ

  आजोळ म्हटले की प्रत्येकाच्या मनातला एक कोपरा हळुवारपणे उलगडतो. परत ते क्षण जगावेसे वाटतात. मन तरल होऊन सगळ्या आठवणी अवती भवती गोळा होतात. अजूनही आठवतं सुट्ट्या सुरू झाल्या की आमची पोरांची धांदल उडायची. आजी आजोबांकडे जायला मिळणार या आनंदात आई म्हणेल ती प्रत्येक गोष्ट आज्ञाधारकपणे करून मोकळे व्हायचो. आई पण कौतुकाने हसायची. तिच्याही चेहेऱ्यावर माहेरी जायचा आनंद तरळत असायचा. मामा, मावश्या, त्यांची पोरं, काका सगळा गोतावळा सुट्टीमधे एकत्र यायचा. मग काय सगळेच खुष. भाऊ बहिण एकमेकांना भेटणार म्हणून, आजीला लेकी भेटणार म्हणून, जावयांना मानाचा उपभोग मिळणार म्हणून, आणि आम्हा पोरांची तर सगळ्यात धम्माल. सगळ्यांकडून लाडच लाड.

    हिंगोलीला भांडीबाजारात वाडा होता. खाली तीन मोठ्या खोल्या, मधे मोठं मोकळं अंगण, बाजूला दोन खोल्या, मधे जिना, तिथून वर गेलं की लांबचलांब मोठी खोली आणि बाजूला पत्र्याची गच्ची. मधल्या अंगणात मोठा रांजण होता. जमिनीत पुरलेला. त्यांनी किती जणांची तहान भागवली असेल देव जाणे. त्या मोठ्या रांजणातलं पाणी अतिशय थंड आणि मधुर असायचं. अंगणात काही झाडंही उभी होती पण काही खास नव्हती. अशीच वाऱ्यावर डुलत रहायची आणि खाली कचरा करायची. अंगणामध्ये मोठा चुलाणा होता. सकाळी आजी तो चुलाणा पेटवून त्यावर भला मोठा हंडा पाणी भरून तापवायला ठेवायची. मग सगळेच जणं कधी नव्हे ते तोंड धुवायला गरम पाणी, काही खाल्लं की हात धुवायला गरम पाणी, कपडे धुवायला गरम पाणी ज्याच्या त्याच्यासाठी गरम पाणी वापरुन, ते उबदार सुख अनुभवायचे. आम्ही आलो की आजोबा आंब्याच्या पेट्या आणायचे. मग काय सगळेजणं मिळून कितीही खा. आजी आम्हा मुलांकडून आंब्याचा रस काढून त्याच्या पोळ्या टाकायला शिकवायची. ताटलीला तूप लावलेली पोळी कडक उन्हात वाळून दोन तीन तासात अलगद निघून यायची. आम्ही शिकलेल्या त्या पोळ्यांची गोडी अवीट असायची. बहिणी बहिणी जमून त्या त्यांच्यातच गर्क असायच्या. तसच एव्हढ्या सगळ्यांच कामही पुरायचं. त्यामुळे आमच्याकडे लक्ष द्यायला कुणाला वेळ नसायचा. वडील, काका मंडळीही त्यांच्या गप्पांमध्येच असायची. नाही म्हणायला आम्हाला आजोबांचा खूप धाक वाटत असे. हॉलमध्येच त्यांचे देवघर होते. ते तिथे पुजा करायला बसलेले असायचे. हॉलमधून जाताना आम्ही मुलं सुसाट पळायचो. चुकून कुणाला त्यांनी आवाज दिलाच, तर त्याची धास्ती मनात असायची. आणि खरच त्यांनी कुणाला आवाज दिला तर त्या मुलाची छाती धडधडत लागायची. खरं तर ते रागवायचे नाही पण तरीही त्यांच्या आवाजात जी जरब होती त्यामुळे ते साधं जरी बोलले तरी आम्हाला त्याची भिती वाटायची. आजी मोठी सुगरण होती. खूप वेगवेगळे पदार्थ ती करायची. दडपे पोहे खावे तर ते तिच्याच हातचे. केळ्याचे वेफर्स, कुठल्या कुठल्या भाज्यांचे लोणचे, करवंद, पेरू, भोकराचा मुरब्बा, अश्या प्रकारांची चव तिथे चाखायला मिळायची.

     आजोबांच्या वाड्याशेजारीच एक वाडा होता. तिथे मोठी बंगई होती. एकटयानी बसून झोका घेऊ म्हटलं तरी ती हलायची पण नाही. एव्हढी ती जड होती. आठ दहा मुलं त्यावर बसून आमच्या गाण्याच्या भेंड्या चालायच्या. कुणाला तरी लक्ष बनवून चिडवण्याचा कार्यक्रम चालायचा. त्यांच्या घरातला खाऊ वाटून खाणं चालायचं. तो वाडा, ती बंगई एक अखंड रूप असल्यासारखं होतं. त्यावर कुणी ना कुणी तरी सतत बसून झोका घेत असायचं. सकाळी श्लोक म्हणत त्या वाड्यातली विधवा आत्या, नंतर काका पेपर वाचत बसलेले असायचे. मग सगळं आवरून मुलांचा गोंधळ चालायचा. दुपारी एक दोन मुलं त्यावरच झोपून जायची. चार वाजता चहा पित बायका झोक्यावर गप्पा मारत बसायच्या. संध्याकाळी आजोबा पोथी वाचत बसायचे. रात्री चुकून वेळ मिळाला, झोका रिकामा असला तर, एखादी जोडी त्यावर बसून हितगुज करायची. अखंड, प्रत्येकाशी जिव्हाळा असलेलं स्थान ती बंगई सगळ्यांशी नातं टिकवून होती.

     असच नातं, वर पत्रा असलेली गच्ची आणि माडीवरची लांबलचक खोली यांच्याशी होतं. हे आम्हा मुलांचं मोकळं रानं. तिथेच पत्ते, सोंगट्या, सागरगोटे, भातुकली चालायची. त्या खोलीच्या खिडकीतून निळंभोर आकाश, तुरळक चाललेले ढग, शेजारच्या वाड्यातला शेवग्याचा पसारा, पाखरांची उडती कमान. असं काय काय दिसायचं जे त्या वयातही दंग होऊन बघत रहावस वाटायचं. तसच पत्र्याच्या गच्चीचं. तिथे जायला खरं तर भीती वाटायची. त्याचं छप्पर उतरतं होतं. पत्र्यांच्या रेषांमध्ये पाय रोवून चालता चालता आमची फजिती व्हायची. त्याला समोरून छोटा कठडा होता. शिवाय खालून “ कोण आहे रे ?” हाक येईल अशी भिती वाटायची. पण केळ्याचे काप ठेवायला, आंब्याच्या पोळ्या वाळवायला, कुरडया पापड, सांडगे वाळत घालायचे आणि काढायचे या निमित्ताने आमच्या फेऱ्या व्हायच्या. अर्ध वाळवण आमच्याच पोटात जायचं. कधी कधी माकडांच्या टोळ्या यायच्या. मग सगळ्यांचीच धांदल उडायची. धडाधड दारं खिडक्या बंद व्हायच्या. एखादी फट ठेऊन डोकावून बघायचो तर माकडांची फौज उड्या मारताना, कोवळी पानं खाताना दिसायची. आम्हाला सगळ्याचच अप्रूप वाटायचं.

     अजून एक आमचा विरंगुळा म्हणजे घरासमोरचं मारूतीचं मंदिर. त्या मंदिरात खूप खांब होते. तिथे कधीही जावं, खांब खांब खांबोळी खेळावं, तर कधी मारुतीच्या मागे पैसा चिटकवून कोण पुण्यवान, कोण पापी ते बघावं. त्यावरून एकमेकांना चिडवावं. असे आमचे उद्योग चालू असायचे. अशाच गमतीजमती अनुभवत सुट्ट्या संपायच्या. काका, वडीलमंडळी निघण्याची तयारी करू लागायचे. आजी मावशींच्या डोळ्यांना धारा लागलेल्या असायच्या. आम्ही जरा बावरूनच सुट्टीभराचा पसारा, गंमतीजंमती, जमवलेली संपत्ती गोळा करायला लागायचो. शहरापेक्षा भिन्न या गावाच्या वातावरणात सगळ्यांनाच खूप हलकेपणा जाणवत असे. शांत जीवनात कुठेही धावाधाव, कोलाहल नव्हता. पण हे सगळं चार दिवसच बरं वाटतं. तरच त्याची गोडी. आपल्या घरी जाऊन मैत्रिणींना पण ही गंमत सांगायची असते, आणि परत तर यायचच असतं. पुढच्या सुट्टीत वयोमानाप्रमाणे वेगवेगळी गंमत अनुभवायला.

     तरल मनातल्या आठवणी परत हळुवारपणे आपल्या कोपऱ्यात जाऊन दडल्या. आपल्या मनात असे कितीतरी कप्पे असतात, जे आपण पाहिजे तेव्हा उघडू शकतो आणि बंदही करू शकतो. म्हणूनच ते आनंददायी  असावेत.   

                                                                          .................................................