In the Company of Netaji Subhash Chandra Bose books and stories free download online pdf in Marathi

नेताजीचे सहवासात परिचय लेख

नेताजींचे सहवासात

नेताजींची वीर वृत्ती, अभिजात स्वातंत्र्यप्रेम, निष्काम कर्मयोग, नेताजी आणि इतर राजकीय समकालीन नेते, भाषेचा भीषण घोळ, वाद-संवाद माध्यम, पुना ओकांच्या वैयक्तिक संदर्भातील आठवणी, ते वीरश्रीपूर्ण भाषण… वाचा

 

नेताजींचे सहवासात

लेखक -कॅप्टन  पुरुषोत्तम नागेश ओक

नवी दिल्लीतील कर्तव्यपथावर नेताजी सुभाष चंद्र बोस यांची भव्य प्रतिमा विराजमान झाली आहे. त्यानिमित्ताने नेताजींचे काही स्वभाव पैलूंवर प्रकाश

        

कै . पुरुषोत्तम ना. ओकांच्या नेताजींचे सहवासात पुस्तकांचा परिचय करून देताना त्यांचा चुलत पुतण्या म्हणून अभिमान वाटतो.

कै. काकांनी ह्या पुस्तकांतून त्यांच्या व नेताजींच्या सहवासात घडलेल्या घटना आणि त्यातून नेताजींच्या स्वभावाच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकला आहे. स्वातंत्र्यपुर्व काळातील मराठी बाजाने केलेल्या  लिखाणात पुनांच्या वैशिष्ठ्यपूर्ण लेखनपद्धतीचा व शब्दसंचयाचा परिचय मिळतो. त्याचा प्रत्यय म्हणजे पुस्तकाचे शीर्षकः नेताजीं'च्या' ऐवजी त्यानी 'चे' असा प्रत्यय लावला आहे.

पुस्तकात एकंदर १२ प्रकरणे असून शेवटची दोन, २००० सालच्या आवृतिच्या निमित्ताने भर घालून प्रकाशित झाली होती. त्यातील काही वेचक भाग वाचकांना आनंदित करतील म्हणून हे कमलपुष्प २ सादर.

नेताजींची वीरवृत्ती

नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा ईश्वरावर पूर्ण विश्वास होता मानवाने प्रयत्न करायचे सोडू नये, परंतु ईश्वरेच्छेपुढे मानवाचा काही इलाज चालत नाही. परमेश्वरी योजनेने सर्व घटना घडत असतात, परमेश्वराची लीला अगाध व अतर्क्य आहे अशी त्यांच्या मनाची पूर्ण खात्री झालेली होती. वरीलप्रमाणे निष्ठा असणाऱ्या ईश्वरभक्तांचे त्यांच्या स्वभावाप्रमाणे दोन वर्ग पडतात. कोणी "असेल माझा हरी ती खाटल्यावरी" अशा विश्वासाने निवृत्तिमार्ग स्वीकारून “जे जे होईल ते ते पहावे" - मताचे होतात. याचे उलट इतर निष्ठावंत ईश्वरानुयायी- श्रीमद्जगद्गुरु आद्य शंकराचार्य समर्थ रामदास व नेताजी सुभाषचंद्र बोस यांचेसारखे “सामर्थ्य आहे चळवळीचे” अशा निश्चयाचे आटोकाट प्रयत्न करण्याचा प्रवृत्तिमार्ग पत्करतात. यातील दुसरा मार्ग हाच जास्त सयुक्तिक व तर्कशुद्ध आहे; कारण इतर बाबतीत निवृत्तिमार्गाचे समर्थन करणाऱ्यांसही स्वत:च्या शारीरधर्माची काळजी वहावीच लागते. तेथे ईश्वरावर हवाला ठेवून चालत नाही. यशापयशाबद्दल सुखदुःख न मानता “देह जावो अथवा राहो” अशा निश्चयाने सर्व प्रकारची कर्तव्ये अडीअडचणींची पर्वा न करता निर्विकार मनाने पार पाडणे व कुडीत प्राण असेपर्यंत सद्सद्विवेकबुद्धीने दाखवून दिलेल्या मार्गाने अविरत कर्म करीत राहणे हे नेताजींच्या जीवनाचे मूलतत्त्व होते. हेच त्यांच्या वीरवृत्तीचे उगमस्थान होते. ईश्वराचे मनात असेल तोपर्यंत आपण जिवंत राहू. मृत्यू यावयाचाच असला तर त्याचा प्रतिकार करणे मानवास केव्हाही शक्य नाही. अर्थात त्याबद्दल विवंचना अथवा भीति बाळगण्याचे काय कारण? “देव तारी त्याला कोण मारी" अशी खात्री झाल्यामुळे सामान्य लोकांच्या मनात धडकी भरविणाऱ्या प्रसंगास तोंड देताना नेताजींची शांत व निर्विकार वृत्ती ढळत नसे. केवढेही महत्त्वाचे व जबाबदारीचे कार्य अंगावर घेताना ते डगमगत नसत; कारण इतरांप्रमाणे आपल्यातही ईश्वरी अंश आहे, सारासार विचारबुद्धी आहे, ईश्वराची कृपादृष्टी सर्व प्राणीमात्रांवर असते तशी ती आपल्यावरही आहे, आपण जे योग्य तेच करीत आहोत अशी साक्ष आपल्या अंत:करणास पटत असताना मग भिण्याचे कारण काय? असा दांडगा आत्मविश्वास त्यांचे ठायी वसत होता.

अभिजात स्वातंत्र्यप्रेम

नेताजी सुभाषचंद्र बोस व  इतर देशभक्त यांच्यात हाही एक महत्त्वाचा फरक चटकन नजरेत भरतो व तो म्हणजे नेताजींची स्वातंत्र्योर्मी अभिजात होती तशी इतरांची नाही. स्वातंत्र्यप्रेम हा त्यांचा फावल्यावेळचा उद्योग नव्हता. प्रवाहपतिताप्रमाणे ते नकळत राजकारणाच्या काठाला लागले नाहीत. अंतिम उद्देश संतकोटीस पोचण्याचा. परंतु जाता जाता साधल्यास देशकार्यही करावे अशा हेतूने त्यांनी राजकारणाकडे आपली पावले वळविली नाहीत. अलोट संपत्ती तर आहेच, आता त्याच्या जोडीस आयता मान पाहिजे? अशा त-हेची वृत्तिही त्यांनी त्यांनी कधी दाखविली नाही.

 

निष्काम कर्मयोग

रोजचे व्यवहारात व घरादारात वावरताना सूक्ष्मपणे पाहणाऱ्यास नेताजींचे वृत्तीत एक प्रकारचा अलिप्तपणा स्पष्ट दिसून येई. त्यांचे अवतीभवतीचा थाटमाट व व्याप जरी मोठा असला तरी त्यात गुरफटल्यासारखे ते दिसत नसत. “इहलोकीचे कर्तव्य म्हणून या परिवारात मी वावरत आहे; नाही तर माझ्या आवडीनुरूप वातावरण व माझे स्थान अन्य ठिकाणी आहे.” असा ध्वनि त्यांचे हालचालींतून निघे. आंतरराष्ट्रीय गाठीभेटीकरिता सुटबूट घालून विमानातून परदेशी जात असताना, चांदीच्या काट्याचमचांनी मेजाशी बसून पाश्चात्य पद्धतीची मेजवानी झोडीत असताना, आंतरराष्ट्रीय शिष्टाचारास अनुसरून परस्परांचे यशचिंतनाचे वेळी दारूचे घोट घेत असताना अलिप्तपणाची त्यांची वृत्ती केव्हाही भंग पावली नाही. 

"माझे ध्येय ठरलेले आहे.... या ध्येयपूर्तीस्तव जे जे म्हणून करावे लागेल ते सर्व मी छातीठोकपणे करीन, परंतु त्याने माझा आत्मा कदापि मलिन होणार नाही... त्यात तो कधीच गुरफटणार नाही.” अशा प्रकारची त्यांची विचारसरणी होती.

जर्मनीत व अतिपूर्वेत नेताजी सिगारेटही ओढीत असत, पण हे सुद्धा लालसेने नव्हे. सिगारेट असल्याशिवाय काम सुचत नाही, झोप येत नाही अशी त्यांची स्थिती कधीच झाली नाही व पुढेही कधी झाली नसती. जातीच्या सुंदराला सर्वच शोभते अशा अर्थाची आपल्यात एक म्हण आहे तद्वत् ज्यांची बुद्धी स्थिर झाली आहे अशा नेताजींच्या व्यक्तिमत्वाचे वेगळेपण होते.

 

नेताजी आणि इतर राजकीय समकालीन नेते

अतिपूर्वेतच काय परंतु अखिल विश्वातील राजकारणात प्रसिद्ध असलेल्या व्यक्तींची नेताजीशी तुलना केली, तर नेताजींच्या तोलाची, त्यांच्या समकालीन एकही व्यक्ती सापडणे शक्य नाही. बडेजाव, मानमरातब, रिकामपणाचा उद्योग संतपणा, परंपरेने चालत आलेला मान व अधिकार, अधिकारपदास चिकटलेली राजकीय जबाबदारी, जीवनप्रवाहाबरोबर वाहत वाहत राजकारणाच्या काठास लागलेले व अशा अनेक कारणांमुळे राजकीय क्षेत्रात शिरलेले लोकच बहुधा आपणास आजकालच्या राजकारणात दिसतील. लहानपणापासून स्वातंत्र्याची सुसंगत तळमळ लागलेला सुभाषचंद्र बोसांसारखा त्यांचा समकालीन दुसरा कोण आहे? त्यांचा निश्चय, त्यांची सचोटी, त्यांची संन्यस्तवृत्ती, दिवसरात्र काम करण्याची शक्ती, त्यांचे कर्मयोगित्व हे गुण किती राजकारणी व्यक्तीत एकसमयावच्छेदेकरून दिसतात. 

एकदा दुपारचा भीषण हवाई हल्ला चालू असताना इतर सर्व लोक खंदकात  गेले किंवा नाही याचे नेताजींनी निरीक्षण चालविले. डॉक्टर xxx यांनी नेताजीसही खंदकात चलण्याचा आग्रह केला तेव्हा ते म्हणाले, "मला मारू शकणाऱ्या विमानाचा अजून इंग्रज किंवा अमेरिकेस शोध लागलेला नाही म्हणून मी खंदकात गेलो नाही तरी चालण्यासारखे आहे.” एवढा दांडगा आत्मविश्वास व धैर्य त्यांचे अंगी होते.

कसल्याही परिस्थितीत यत्किंचितही न डगमगता त्यातून आपले ध्येय गाठण्याचा मार्ग शोधून काढणे अथवा त्या प्रयत्नात मृत्यू आल्यास तोही आनंदाने पत्करणे हे वीरवृत्तीचे एक महत्त्वाचे अंग आहे. जगातील कोणत्याही वीरपुरुषास ही कसोटी लावून पडावी. अडचणींचा डोंगर दुर्लघ्य समजून ध्येयप्राप्तीबद्दल निराश होईल तो वीर नाहीच. औरंगजेबाच्या कैदेत सापडलेल्या शिवछत्रपतींचे किंवा वन्य पशूप्रमाणे रानोमाळ फिराव्या लागणाऱ्या महाराणा प्रतापचे उज्ज्वल उदाहरण पहा. सर्वस्वाचा होम झाल्यावरही ध्येयप्राप्तीकरिता त्यांचे प्रयत्न चालूच राहिले. इंग्रजांस हैराण करून सोडणाऱ्या फ्रेंच सम्राट नेपोलियनमध्येही आपल्याला हेच स्वभाववैशिष्ट्य प्रामख्याने दिसते. अद्वितीय पराक्रम गाजविणारी झाशीची राणी लक्ष्मीबाई हिच्यातही वीरवृत्तीचे स्पष्टपणे दिसुन येते. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या वीरवृत्तीचे हे अंग स्पष्टपणे आपणास दिसून येते.

 

वाद-संवाद माध्यम

 

नेताजींस बहुधा हिंदुस्थानीतच बोलावयास आवडे. हिंदुस्तानी ज जाणणाऱ्या तामीळ वगैरे स्वदेशी गृहस्थांशी किंवा विदेशी अधिकाऱ्यांशी गत्यंतरच नसल्यामुळे ते इंग्रजीत बोलत, नाहीपेक्षा ते नेहमी हिंदुस्थानीतच संभाषणास सुरवात करीत. स्वदेशाचे स्वातंत्र्य व तदनुषंगिक जितक्या स्वदेशी आचार-विचार-व्यवहार इत्यादि, यांच्याबद्दल नेताजींच्या मनात, कळकळ, आदर व प्रेम असल्यामुळे त्यांच्या तोंडून वा हातून विदेशी गोष्ट अथवा क्रिया घडून येत नसे. हिंदुस्थानातच पहा आपल्या कल्पनेच्या पलिकडे परदास्य आपल्या रोमरोमात शिरलेले आहे. आपल्यातील सुशिक्षित लोक नेहमी की बोलतात, लिहितात, भांडतात, पोषाख अस्सल इंग्रजी पद्धतीचा करतात. स्वदेशी म्हणवून खादी परिधान करणारे लोकही त्या खादीस कोट, विजार, कॉलर, अनेकदा इत्यादींचा आकार देऊन विटाळून टाकतात. अशांनी जरी बाहेरून स्वदेशीचा आव आणला तरी त्यांचे मन विदेशीच असते. राष्ट्रकार्यात उच्च पदवीस पोहोचलेल्या लोकांची राहाणीही अस्सल इंग्रजी पद्धतीची असते. दिल्लीतील राष्ट्रीय सभेची बैठक व लंडनमधील इंग्रजी मंत्रिमंडळाची बैठक यांच्यात तात्त्विक फरक काहीच दिसून येत  नाही. दोन्ही अस्सल इंग्रजी वातावरणातच होतात.

 

एकदा झालेला भाषेचा भीषण घोळ

 

पहाटेच्या सुमारास सतांग नदी पार करून आम्ही त्या नदीच्या दक्षिण तीरावरील जंगलात तळ दिला. आमच्या मागोमाग स्वातंत्र्य सरकारचे दरबारी जपानी वकील श्री. हाचिया हेही आम्हाला येऊन मिळाले. त्यांच्या स्वागतार्थ या परिस्थितीतही नेताजींनी भाताची खीर करविली होती. त्या आधी तेच दिवशी भीषण हवाई हल्ला झाला. हवाई हल्ला संपल्यावर एक देखणा जपानी तरुण, शर्ट व पँट घातलेला असा, नदी पार करून जंगलातून नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा शोध करीत आमच्या छावणीचा पत्ता लावण्याचा प्रयत्न करीत येत होता. तो श्री. हाचिया यांच्या वकिलातीतील एक कार्यकर्ता होता. पीछेहाटीच्या गडबड-गोंधळात व वाटेतील अनेक प्रकारच्या अडीअडचणी व  कामे यामुळे इतरांपासून त्याची फारकत होऊन तो मागे राहिलेला होता. प्रसंग सापडताच तो नदी पार करून आला व त्याला श्री. हाचिया यांचा शोध लावून त्यांचे पुन्हा सामील व्हावयाचे होते. त्यांनी सांगितलेल्या कामाबद्दलही त्याला त्यांच्याशी बोलावयाचे होते. श्री. हाचिया हे नेताजींच्या छावणीतच असावेत असा त्याने तर्क केला. त्या जंगलात हिंदी स्वातंत्र्य सैन्याच्या विमानविरोधक तोफखान्याचा तळ पूर्वीपासून असल्यामुळे या तुकडीचे लोक त्यास त्या जंगलात अधूनमधून भेटले म्हणजे तो जपानी त्यास 'नेताजी कोठे आहेत?' असे इंग्रजीत विचारी. आमच्या या अशिक्षित शिपायास इंग्रजी भाषेची दोनचार वाक्येच येत होती. या जपान्यास तर हिंदुस्थानी भाषा अजिबात येत नव्हती. जपान्यास ज्याप्रमाणे पाश्चात्यांचा गोरा रंग व हिंदी माणसाचा गोरा रंग यातील फरक कळत नसे तद्वतच आमच्या या अशिक्षित हिंदी शिपायास इंग्रजी बोलणाऱ्या गोऱ्यागोमठ्या शर्टपँट घातलेल्या जपान्यात व पाश्चात्यात सहजासहजी भेदाभेद करता येत नसे. ब्रह्मदेशात ते वेळी हेरांचा अतोनात सुळसुळाट झालेला होता. त्यामुळे प्रत्येकाची वृत्ती संशयित झालेली. नेताजींचा तपास करणारा हा कोण गोरा भामटा, असे दोन स्वातंत्र्य-सैनिकास वाटले, परस्परांना एकमेकांच्या भाषा अवगत नसल्यामुळे उपभयपक्षी स्पष्ट विवरण शक्य नव्हते. त्या जपान्याचा इंग्रजीत तोच प्रश्न पुनः पुनः ऐकून त्या हिंदी सैनिकांचा संशय बळावत चालला. त्यांनी त्या जपान्यास पकडण्याचा प्रयत्न केला. मुकाट्याने कोणाचेही कैदी बनणे हे जपानी क्षात्रवृत्तीस लांछनास्पद असल्याचे प्रत्येक जपान्याच्या पूर्णपणे गळी उतरविले गेल्यामुळे तो जपानी त्यांचेपासून लांब पळून जाऊ लागला. त्या दोघांनी त्याला कैद करून नेताजींच्या अथवा श्री. हाचिया यांच्यासमोर न्यावे ही कल्पनाच त्या जपान्यास कशीशी वाटली. “तू सहजासहजी यांचा कैदी होण्यास हातात काय बांगड्या भरल्या होत्यास?" अशीच सर्व कनिष्ठ-वरिष्ठ जपान्यांनी त्याची हेटाळणी केली असती म्हणून तो दूरदूर पळू लागला. यामुळे त्या हिंदी सैनिकांचा संशय अधिकच बळावला. हा आपले हातून पळून निसटून जाणार असे जेंव्हा त्या दोघा सैनिकांनी पाहिले तेव्हा एकाने आपल्या कमरेला लटकाविलेली संगीन या काढून त्या जपान्याचे मागोमाग पळत त्याचेवर एकामागून एक पडतील तसे घाव घालण्यास सुरवात केली. शेवटी तो पळण्यास असमर्थ झाल्यावर त्या म्हणून त्या दोघा स्वातंत्र्य सैनिकांनी उचलून नेताजींच्या समोर आणला. तो हेर नसून श्री. हाचिया यांचा एक सहकारी असल्याचे कळले.

समजुतीच्या घोटाळ्यामुळे उगाच एक जपानी घायाळ झाला होता तो जिवंत राहण्याचीही आशा नव्हती. त्याची ती दशा पाहून नेताजींचे हृदय व्यथित झाले.

 सर्व हकीगत कळाल्यानंतर त्या प्रकरणाची पूर्ण चौकशी होऊन प्रकरणाचा काय तो निकाल लागेपर्यत त्या दोघां हिंदी सैनिकांस अधिक नजरबंद करण्याची आज्ञा दिली. पुढे काही चौकशी झाल्यावर त्या दोघा हिंदी सैनिकांस निर्दोष म्हणून सोडून देण्यात आले. परंतु तेवढ्यापुरती तरी नेताजींची परिस्थिती फार बिकट झाली. हवाई हल्ल्याने जपान्यांच्या तुकडीतील एक तरुण अधिकारी दोन तासांपूर्वीच जायबंदी झाला होता व आता तर या जपान्यास हिंदी शिपायांनी घायाळ केले होते. या दुसऱ्या घटनेचा आंतरराष्ट्रीय घोर परिणाम होण्याची पुष्कळ शक्यता होती. नेताजी अशा तही डगमगले नाहीत. जखमी इसमाबद्दल पूर्ण सहानुभूती दाखवून त्यांनी सैनिकास पुढील चौकशीसाठी अटकेत ठेवले. जपान्यांचेही यामुळे समाधान झाले. याहून आणखी काहीच करणे शक्य नव्हते. नेताजींच्या हृदयातील दुःखाची छाया त्यांचे चेहेऱ्यावर स्पष्टपणे दृग्गोचर होत होती. मात्र कपाळाला हात लावून खिन्न अथवा किंकर्तव्यमूढ होऊन बसण्याची त्यांस सवय नव्हती. जखमी इसमास अखेर प्रेमाचे व धीराचे चार शब्द बोलून त्यांनी त्यास डॉक्टरांच्या स्वाधीन केले व लगेच पुढील कार्याला ते लागले.

पुना ओकांच्या वैयक्तिक संदर्भातील आठवणी.

झाशीची राणी नाटक लेखन

१. जनरल डोईहारा मोटारीत बसून परत गेल्यावर माडीवर जाण्याकरिता म्हणून नेताजी जिन्यापाशी परत आले. मी समोरच खालच्या दिवाणखान्यात बसलो होतो. त्या दिवशीचा समारंभ उत्तम त-हेने पार पडल्यावर सर्वांस भार हलका झाल्यासारखे वाटत होते. थोडे मोकळेपणी बोलण्यास नेताजीस वेळ होता. पिछाडीस दिसणाऱ्या समुद्राच्या अखंड लीलांकडे मी पाहत काहीतरी विचार यात गुंग झालो होतो. मला पाहून नेताजी म्हणाले, “या हो ओक, वर या.” ते वर जाण्यास वळले. त्यांनी परिवेषकास चहा वर घेऊन येण्यास सांगितले. नेताजींचे बोलणे ऐकून मी वर जाण्याकरिता पाठ वळविली, तरी पण नेताजी अगोदरच पायऱ्या चढू लागल्यामुळे मी त्यांचे बोलणे ऐकले किंवा नाही ही शंका त्यांच्या मनात आली व आपल्या चिटणीसास त्यांनी सांगितले, “ओकसाहेबांना वर बोलवा हो!" मी वर जाण्यास निघालोच होतो. त्या दिवशीच्या समारंभास हजर असलेले इतर तीन-चार अधिकारीही आमच्याबरोबर वर जाण्यासाठी जिना चढू लागले. नुकत्याच उरकलेल्या समारंभासंबंधीच आमचे मुख्यत: बोलणे चालले होते. त्या दिवशी माझेही नेताजींशी थोडेसे काम होते. मी जे “झांशीची राणी” ना टक लिहिले होते ते नेताजींना अर्पण केले होते; परंतु ते लिहिले त्या वेळेस नेताजी ब्रह्मदेशातच होते. या खेपेस ते सिंगापुरास १४ डिसेंबर १९४४ रोजी विमानातून सायंकाळी सहा वाजता उतरले व ते दिवशीच ७॥ वाजता म्हणजे अवघ्या दीड तासानंतर “झांशीची राणी” नाटकाचा शेवटचा प्रयोग होता. मी ते दिवशी नेताजींना घ्यावयास विमानतळावर आलो तेव्हाच त्यांना नाटकाबद्दलची एकंदर हकीकत सांगून, त्यांस प्रयोगास उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले होते. सहा वाजता विमानातून उतरल्याबरोबर त्यांस इतर बरीच महत्त्वाची कामे होती ती सर्व कामे उरकून ते आठ वाजता नाट्यगृहात आले. ते आल्याबरोबर प्रयोगास सुरवात झाली. ते नाटक त्यास फार आवडले. त्या प्रयोगानंतर जनरल डोईहारांस दिलेला भोजनसमारंभ झाला. भोजनसमारंभानंतर नेताजी सापडेल तेवढ्यात, मी लिहून त्यास अर्पण केलेल्या नाटकाच्या प्रतीत्ंना सादर कराव्या असे मी माझ्या मनाशी ठरविले होते व त्याच तयारीने मी ते दिवशी त्यांचे भोजन समारंभासंबंधीच्या गोष्टी जेव्हा ओसरू लागल्या तेव्हा मी पुढे होऊन "झांशीची राणी या इंग्रजी, हिंदी व मराठी भाषेतील प्रत्येकी एक एक प्रत अशा तीन प्रती नेताजींस सादर केल्या. ते माझ्या समोरच्याच कोचावर बसले होते. त्यांनी नाटकही दिवशी पाहिलेलेच होते. या प्रसंगी मी तीन प्रती देताच त्यांनी इंग्रजी, हिन्दी प्रत चाळून पाहिल्यानंतर त्या प्रती शेजारच्या तिपाइवर ठेवून त्यांनी सिगारेटचा झुरकाओढीत मला विचारले. "किती उत्पन्न झाले या नाटकाचे?" मी म्हटले सत्तर हजार डॉलर्स (सव्वा लाख रुपये).” आणि लगेच त्या रकमेची थैली त्यांच्या हातात मी ठेवली. नेताजींच्या स्वातंत्र्ययुद्धफंडास हे उत्पन्न देत असल्याचे मी त्यांस सांगितले नंतर अधूनमधून त्या नाटकासंबंधी त्यांनी मला काही प्रश्न विचारले.

…सिंगापुरातील हिंदी स्वातंत्र्यसंघाच्या सर्वोच्च मध्यवर्ती कचेरीत नेता सकाळा सुमारे १० वाजल्यापासन दुपारी १।। वाजेपर्यंत बसत असत... पुष्कळशी मंडळी अवतीभवती असताना नेताजी प्रत्येकाशी थोड्या वेळाने एक एक वाक्य बोलत असत. एका विशिष्ट व्यक्तीशीच एका विषयावर बोलत राहून तिच्या विषयाचा निकाल लावावयाचा अशी नेताजींची सवय नसे. त्यामुळे त्यांनी कोणाला तरी एखादा प्रश्न विचारावा, थोडा वेळ शांत रहावे, मग लगेच दुसरा कोणत्या तरी विषयावर दुसऱ्याला काही प्रश्न विचारावा, पुन्हा इतर पुष्कळशा विषयांवर इतरांशी काही प्रश्नोत्तरे झाल्यावर त्यांनी पहिल्या व्यक्तीस पूर्वीच्या विषयावर पुन्हा एखादा प्रश्न विचारावा असे चाले. यामुळे त्यांच्याशी गप्पा मारणाऱ्या चारपाच मंडळींची मोठीच पंचाईत होत असे. मागील प्रश्नाच्या अनुरोधाने नेताजी आमच्या एका विषयावर विचार करीत असावेत असे समजावे तोच अगदी निराळ्या विषयावर त्यांनी एकदम एखादा प्रश्न विचारावा असे होई. यामुळे उत्तर देणाऱ्याचा त्या अनपेक्षित प्रश्नाने थोडा गोंधळ उडत असे; कारण तो समजे की आता एखादा प्रश्न विचारून विषय बदलल्यावर आता या विषयावर पुन्हा काही बोलणे निघणार नाही; हा विषय संपला…

...

 

जुलै 1943 मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी 'झांसी की रानी' रेजिमेंटची स्थापना केली, ज्यामध्ये सुमारे 170 महिलांचा समावेश होता. झाशीची राणी रेजिमेंट ही भारतीय नॅशनल आर्मीची एक महिला रेजिमेंट होती, जी 1942 मध्ये दक्षिणपूर्व आशियातील भारतीय राष्ट्रवाद्यांनी स्थापन केलेली सशस्त्र सेना वसाहती भारतात जपानी मदतीने ब्रिटिश राजाचा पाडाव करण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आली होती.

२ कठीण प्रसगी मला निवडले म्हणून अभिमान वाटला...

 नेताजींनी मला बोलाविणे पाठविल्याचे वर सांगितलेच आहे. मी येथे येऊन पोहोचल्याचे त्यांनी पाहिले व सुमारे अर्धापाऊण तासानंतर हे प्रकरण मिटल्यावर ते माझ्याशी बोलू लागले. तेच दिवशी रात्री दोन वाजण्याचे सुमाराला झांशीराणी पथकाच्या पंचेचाळीस स्त्री-सैनिकांची एक तुकडी नदी पार करून येणार होती. पुढील वाहनांची वगैरे व्यवस्था न लागल्यामुळे सतांग नदीच्याच दक्षिण तीरावर दोनतीन दिवस रहावे लागण्याचा संभव होता. आम्ही ज्या ठिकाणी तळ दिला होता ते ठिकाण सुरक्षित नव्हते हे त्या दिवशीच्या भयानक हवाई हल्ल्यावरून सिद्ध झालेच होते. अर्थात येणाऱ्या झाशीराणी पथकाच्या स्त्री-सैनिकांनी कोठेतरी जवळपास राहण्याची व जेवणाची व्यवस्था करणे भाग होते. तेथून सुमारे चार मैलांवर असलेल्या एका खेडेगावी हिंदी स्वातंत्र्य-संघाचे काम बघणारे एक बंगाली गृहस्थ नेताजीस भेटण्याकरिता तेथे आलेले होते. झांशीराणी पथकाच्या छावणीकरिता शेजारच्या खेड्यापाड्यात एखादी सुरक्षित जागा शोधून तेथे रात्री दोन वाजण्याचे आत पंचेचाळीस स्त्री-सैनिकांस राहण्याजोगी छावणी तयार करण्याचे काम त्यांनी माझ्यावर सोपविले. रंगूनहून निघाल्यापासून मलेरियाचा आजार, सामान पाठीवर घेऊन रातोरात चालण्याचे श्रम, औषध नाही, पौष्टिक आहार नाही, विश्रांती नाही व त्या दिवशीच्या हवाई हल्ल्यानंतर झालेली धावपळ यामुळे मला इतका थकवा आलेला होता की, रात्र पडून आपल्याला विश्रांती केव्हा मिळेल याच विवंचनेत मी होतो. अशा परिस्थितीत अंगावर आलेले हे काम बिकटच होते. आधी आपले सर्व सामान डोक्यावर घेऊन  चार मैलांवरच्या त्या खेड्यात जावयाचे, तेथे सर्व प्रदेशाची पहाणी योग्य आणि सुरक्षित ठिकाण कोणते हे ठरवायचे, त्यानंतर कुदळी, चटया, लाकडे, फळ्या, खिळे इत्यादि सामान जमवून माणसे गोळा करून रात्री दोनच्याआत छावणी उभारण्याचे काम म्हणजे एक अरिष्टच होते. परंतु एखाद्या नि:स्वार्थी नेत्याने आपणाकडे सोपविलेल्या कामगिरीस नाही म्हणणे कोणाही माणसास शक्यच नसते. उलट अशा नेत्याने आपणावर काम सोपविल्याबद्दल विश्वासास आपण पात्र असल्याबद्दल तशा परिस्थितीतही आनंदच वाटतो. एवढे इतर अधिकारी उपलब्ध असताना आपल्यालाच या कामाकरिता निवडले अशाबद्दल अभिमान वाटतो. शारीरिक सहनशीलतेची परिसीमा झाली असताना देखील वर वर्णिल्याप्रमाणे माझ्या भावना असल्यामुळे मी निघालो, अंगीकृत कार्यातील अडचणी डोळ्यापुढे काजव्याप्रमाणे चमकत होत्या तरी केवळ नेताजींवरील निष्ठेने मी निघालो व रात्री दोनवाजेपर्यंत खरोखरच सर्व कार्य पूर्ण झाले.

सैनिकांविषयी भोजन आस्था

नेताजी व आम्ही सुमारे चारशे लोक होतो. या प्रवासाचा उल्लेख पुढेही येईलच. परंतु येथे सांगावयाचे एवढेच की, पीछेहाटीत आम्हाला सर्वांना स्वत:चे सामान डोईवर घेऊन दरमजल दरकूच करीत चालण्याचे अनेक प्रसंग आले, त्यात दर मुक्कामास सर्व सैनिकांनी काय काय खाल्ले या गोष्टीकडे नेताजी बारकाईने लक्ष देत असत. हवाईहल्ल्यामुळे दिवसा जंगलात तळ द्यावयाचा व रात्री वाट क्रमावयाची असा आमचा क्रम होता. वाटेत एके ठिकाणी सकाळी सात वाजण्याच्या सुमाराला पाचचार झोपड्याच्या समीप झाडीत आम्ही सर्वांनी मुक्काम केला. एका आंब्याच्या झाडाखाली नेताजींकरिता एक चटई टाकण्यात आली. इतरांनी आपापले सोईप्रमाणे आजुबाजुस मुक्काम ठाकला नेताजींची आता झोपण्याची वेळ होती. प्रवासात त्यांच्या दुय्यम आधिकाऱ्यांचे, चिटणिसाचे वगैरे काम करण्याचे प्रसंग माझ्यावरच अनेकवार आले. कामे करणारे त्यांचे नेहमीचे सहाय्यक अधिकारी इतर तुकड्यांबरोबर इतर विभागले जाऊन कोणी पुढे तर कोणी मागे असत. नेताजींनी मला बोलावून आमचेबरोबर सर्व तुकड्यातील एकूण एक सैनिकांस त्या मुक्कामापुरता सकाळचा चहा, दुपारी ११ वाजता एक जेवण व सायंकाळी पुढे कूच करण्यास निघण्याचे अगोदर सुमारास एक जेवण एवढे तरी मिळावेच असे सांगून या कामावर व त्याबाबत योग्य ती व्यवस्था करण्यास मला सांगितले. दर जेवणात फोडणीचे वरण दोन भाज्या व भात एवढे तरी असावेच असे ते म्हणाले. एवढे सांगून ते झोपी गेले. सर्व तुकड्यांच्या मुख्य अधिकाऱ्यांना त्याबाबत योग्य त्या सूचना देऊन डाळ, भाजी, तांदूळ इत्यादी काय काय पदार्थ आसपास मिळतात ते तपासण्यास सैनिक पाठविले. थोड्याच वेळात भाजीकरिता कच्चे फणस, नारळ,गूळ, दूध वगैरे माल तेथे आला. मी पैसे देऊन तो माल विकत घेतला व सर्व वाटून दिला. सैनिकांना अमक्याच वेळी जेवावयास मिळाले पाहिजे व परिस्थिती अनुरूप त्यात इतके पदार्थ असावेच याची नेहमी नेताजी फार दक्षता बाळगीत. वरील गोष्टीवरून सहज निदर्शनास येण्यासारखे आहे.

खडतर प्रवास संपवून आम्ही बँकॉक शहरी येऊन पोचलो तो सर्व सैनिक, रात्रीची जायणे. प्रवासाचा शीण, अनियमित राहणी, घाणेरडे हवापाणी, पौष्टिक अन्नाचा अभाव, औषधांचा तुटवडा यांमुळे अशक्त होऊन फिक्के पडलेले होते. बँकॉक ही सयामची राजधानी असून सयाम युद्धाच्या वावटळीतून सुरक्षित राहिल्यामुळे सयामला त्या मानाने अनधान्य, दूधदुभते इत्यादींची रेलचेल होती. मलायात व विशेषत: ब्रह्मदेशात यातले काहीच उपलब्ध नसे. बँकॉकला आल्याबरोबर नेताजींनी हुकूम सोडला की, ब्रह्मदेशातून आलेल्या प्रत्येक सैनिकास रोज पाऊण शेर दूध मिळावे. सयाममध्ये दुधाचा व्यापार आपल्या युक्तप्रांतीय गवळ्यांच्या ताब्यातच असलेमुळे त्यांचेकडील सर्व दूध स्वातंत्र्य-सैनिकांचेकरिता घेण्यास काहीच त्रास पडला नाही. रोज प्रत्येक सैनिक पाऊण शेर निभेळ दूध पिऊ लागला. अवघ्या दीड महिन्यात सर्व सैनिकांची प्रकृती सुधारली. भारतीयांची शारीरिक अवनती होत असेल तर ती निर्भेळ दूध पुरेसे न पिण्यामुळे, नियमित व्यायाम न घेतल्यामुळे व चहा, कॉफी, तंबाखू आदि अपायकारक पदार्थांचे सेवनामुळे. वरीलपैकी दोन अथवा तीन कारणे एकत्रित झाली म्हणजे केवढे घोर परिणाम ओढवत असतील याची ज्याची त्याने कल्पना केलेली बरी.

आपल्या सैनिकांनी पराक्रम गाजवावा अशी इच्छा असे खाण्यापिण्याकडे कसोशीने लक्ष द्यावयास हवे असे फ्रान्स देशात नेपोलियन याने म्हटलेले आहे. नेताजीही हिंदी स्वातंत्र्य-सैनिकांचे दक्षता बाळगीत. अधूनमधून, ते जेव्हा आघाडीवरील अथवा पिछाडी छावण्यांची पहाणी करण्यास जात तेव्हा इतर गोष्टींबरोबर मुख्यत: सैनिकासी कशा प्रकारचे मिळते याबद्दल ते विशेष कसोशीने चौकशी करीत. ते स्वत: सैनिकों अन्न चाखून पाहत व अनेक वेळा त्यांचेबरोबर भोजनास बसत. त्यांचे निवासस्थानी मात्र आंतरराष्ट्रीय व हिंदी पाहुणे बहुधा नेहमी जेवणास हजर असल्यामुळे भात, दोनतीन भाज्या, फोडणीचे वरण, अंड्यांचे सांबारे, तळलेले मासे अथवा मासे घातलेली आमटी, कोंबडीच्या किंवा बकऱ्याच्या मांसाची आमटी, अंड्याचा खरवस किंवा रसगुल्ले वगैरेंसारखा एखादा गोड पदार्थ ह्यांचा रोजचे भोजनात अंतर्भाव होत असे. नेताजींचे निवासस्थानी रोजची जेवणारी माणसे व एखादा आला-गेला मिळून पन्नाससाठ माणसे तर रोज सहजच जेवून जात. एवढ्या लोकांना पुरावे म्हणूनही पुष्कळसे पदार्थ जरूर होते. आठवड्यातून एक दिवस म्हणजे दर बुधवारी मात्र, नेताजी दुपारचे वेळी एकच संमिश्र असा पदार्थ खात असत. रणांगणावर किंवा आघाडीवर कूच करीत असताना भांडी व इतर वस्तू शक्य तितक्या कमी असाव्यात याबद्दल दक्षता बाळगावी लागते. वेळेचे महत्त्व वगैरे गोष्टी लक्षात घेऊन तीन धोंड्यांच्या चुलीवर

ठेवून त्यात तांदूळ असले तर तांदूळ, डाळ असली तर डाळ, भाजी, मीठ गूळ इत्यादि ज्या काही खाद्य वस्तू मिळतील त्या एकात शिजवून ते खावे लागते. प्रत्येक वस्तू निराळी शिजविण्यास वेळही नाही आणि भांडीही. बरे भात तर भातच किंवा फार तर खिचडी शिजवून खाल्ली तर, शरीरपोषणास आवश्यक अशी भाजीपाल्यांतील जीवनसत्त्वे शरीरास मिळणार नाहीत.

आज मिळत असलेली भाजी, शिजविण्याचे सोडून खाल्ली नाही तर उद्या ती मिळेल की नाही याचा नेम नसतो म्हणून आघाडीवर अथवा कूच करताना, गूळ, साखर, पालेभाजी, फळभाजी असे जेवढे पदार्थ मिळतील तेवढे शिजवून खाणे जरूर असते. अशा आहाराचीही सवय असावी म्हणून नेताजींनी बुधवारी सर्व पदार्थ एकत्र शिजवून खाण्याची प्रथा ठेविलेली होती.

ज्या दिवशी बाहेरील पाहुणे-मंडळी नसत त्या दिवशी आपले बंगल्यातील शक्य तितक्या अधिकाऱ्यांस स्वत:चे बरोबर भोजनास ते बोलावीत. एरव्ही सातआठ माणसांपेक्षा अधिक माणसे एकाच वेळी त्या मेजाशी भोजनास बसत. अधिकारी वर्गातील माणसे नेताजींचे बरोबर त्यांचे मेजाशी भोजनास बसत. परंतु पहाऱ्यावरील शिपाई व इतर नोकर-चाकर यांचेशी आपला संबंध तुटू नये, आपण कोणी शिष्ट आहो असा स्वत:चा व इतरांचाही भ्रम होऊ नये म्हणून ते दोन-चार महिन्यांनी एखादे दिवशी आपले बंगल्यातील सर्व मंडळीस बरोबर घेऊन खाली सतरंज्या आंथरून त्यावर सर्वांशी मोकळेपणी गप्पा मारीत भोजनास बसत. त्या दिवशी भजी, शिरा असे. काही पदार्थ मुद्दाम केले जात.

विशेष अडीअडचणीच्या प्रसंगी, जीवावरील व राष्ट्रावरील संकटाचे वेळी माणसाने खाण्यापिण्याबाबतची सनातनी बंधने खुशाल सैल करावीत, एवढेच नव्हे तर अशी बंधने झुगारून देणे हे त्याचे कर्तव्य ठरेल असे नेताजींचे मत असे.

 

 

 

चेष्टेचा प्रसंग

सिंगापुरात आझाद हिंद सरकार स्थापन झाल्याचे दुसरे दिवशी म्हणजे इ. स. १९४३ चे ऑक्टोबर महिन्याच्या २२ तारखेस हिंदी स्वातंत्र्य सरकारतर्फे आंतरराष्ट्रीय अधिकाऱ्यांस व प्रतिष्ठित स्थानिक लोकांस सिंगापूर क्रिकेट क्लबचे इमारतीत मध्यान्हीस एक थाटाचा खाना दण्यात आला....

... जेवताना बहुधा इकडच्या तिकडच्या गोष्टी निघत. हाँगकाँगला एक कृ--- नावाचे गृहस्थ होते. गृहस्यांचा स्वभाव काहीसा तऱ्हेवाईक होता. अतिपूर्वेतील इतर प्रमाणे ते ही स्वातंत्र्यचळवळीत सामील झाले असून हाँगकाँगच्या हिंदी अध्यक्ष होते. नेताजी अतिपूर्वेत येऊन त्यांनी हिंदी स्वातंत्र्यचळवळीचे नेतृत्व हाती घेतल्यापासून ह्या गृहस्थांनी प्रसंगाप्रसंगाने नेताजीस अनेक तऱ्हेवाईक पत्रे पाठवण्याचा सपाटा लावला होता. एका पत्रात या गृहस्थांनी नेताजींस लिहिले -

सुभाषचंद्र बोस यांस 'जयहिंद'.  तुम्ही अतिपूर्वेत येऊन या चळवळीचे नेतृत्व स्वःकडे घेतले हे ठीकच झाले, परंतु तुम्ही स्वत:च्या हिकमतीवरच अवलंबून न राहणे चांगले. भारतीय युद्धात धनुर्धारी अर्जुनाला श्रीकृष्णाची मदत व उपदेश घ्यावाच लागला. प्रस्तुतच्या आपल्या स्वातंत्र्ययुद्धात तुम्ही अर्जुनाच्या जागी आहात व मी कृष्ण आहे. मी तुमचे सारथ्य करीन व तुम्ही नेहमी माझ्या सल्ल्याने वागावे. अशी कृष्णार्जुनांची जोडी जमल्यावर शत्रूवर विजय मिळविण्यास काय उशीर! जय हा ठेवलेलाच...' हे पत्र अणि अशा तऱ्हेची यापुढील पत्रे मिळाली म्हणजे क्वचित् भोजनसमयी ह्यासंबंधी गोष्टी निघून हशा पिकावयाचा. इसवी सन १९४४ च्या डिसेंबर महिन्यात नेताजी सिंगापुरास आले असताना हे गृहस्थही काही कामानिमित्त हाँगकाँगहून सिंगापुरास आले. त्यांची व नेताजींची ओळख करून देण्यात आली. हाँगकाँगहून 'कृ--- या नावाने ज्यांच्याकडून मला पत्रे येत ते गृहस्थ हेच तर! असा विचार नेताजांच्या मनात आला. त्या दिवशी रात्री कर्मधर्मसंयोगाने त्यांच्या निवासस्थानी भोजनसमयी मी उपस्थित होतो. सहज बोलता बोलता नेताजींनी श्री. अय्यर यास प्रश्न केला “का हो अय्यर हॉंगकाँगहून मला

त-हेवाईक पत्र लिहिणारे गृहस्थ तुम्हीच ना?" श्री. अय्यर यांनी होकाराथीं मान हलविली…!

 

सुभाषचंद्र बोस यांचे भावपूर्ण अश्रू

 

स्वातंत्र्य सरकारस्थापनेचा प्रसंग हा त्यांच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा प्रसंग होता. त्यांच्या जीवनकमानीचा हा अत्युच्च बिंदू होता. आपले मंत्रिमंडळ घोषित करून नंतर स्वतंत्र सरकारचे राष्ट्रपती या नात्याने अधिकारग्रहणापूर्वीची स्वत:ची शपथ घेण्यास त्यांनी सुरवात केली. शपथेच्या मसुद्याचा कागद त्यांचे हातात होता. त्यांनी शपथ वाचण्यास प्रारंभ केला. "मी ईश्वरास साक्ष ठेवून अशी शपथ घेतो की, माझ्या ३८ कोटी हिंदी बांधवांचा मी आजन्म सेवक राहीन. त्यांचे स्वातंत्र्य त्यास परत मिळवून देण्याच्या प्रयत्नात मी यत्किचितही कसूर करणार नाही व या ध्येयपूर्तीस्तव प्राणार्पण करण्यासही मी मागेपुढे पाहणार नाही...” ही शपथ घेताना "माझे ३८ कोटी हे शब्द उच्चारताच त्यांचे डोळ्यात अश्रू उभे राहिले, कंठ सद्गदित होऊन स्वर गदगद झाला. हिंदी जनतेच्या करुणाजनक परिस्थितीचे दारुण चित्र त्यांचे समोर उभे राहिले. हजारो लोक भिकेस लागले; लाखो भुकेने तडफडून मेले; अवधी रोज अपमान, छळ, व जुलूम सहन करीत कसेतरी जीवन कंठीत असतात हे चित्र नेताजींच्या डोळ्यासमोर उभे राहिले. या काटेरी विचारकाहुराने त्यांचे अंत:करण रक्तबंबाळ झाले व अश्रूरूपाने ते रक्त बाहेर आले. शपथेतील सुरवातीची एक-दोन वाक्ये उच्चारल्यावर डोळ्यात उभे राहिलेले अश्रू व भरून आलेला कंठ यामुळे पुढील शब्द दिसणे अथवा वाचणे अशक्य झाले. शपथ घेता-घेता मध्येच पंधरा-वीस क्षणांचा अवधी गेला. हदयात थरारणाऱ्या भावनांमुळे त्यांचा स्वर व शपथेचा कागद असलेला डावा हात या दोन्हीस तेवढ्या वेळेपुरता कंप सुटलेला होता. त्या वेळी तेथे हजर असलेले सर्व लोक तटस्थ व निश्चल बसले होते. जिकडे तिकडे पूर्ण स्तब्धता व शांतता होती. नेताजीचे कष्टी व व्यथित झालेले हृदय पाहून इतर पुष्कळांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. त्या वेळी नेताजीकडे पाहण्याचा कोणास धीर होईना. तो क्षण युगाप्रमाणे भासू लागला. हा कष्टमय कालखंड जितका लवकर संपेल तितका बरा असेच सर्वांस वाटू लागले. नेताजीचे शेजारी जपानी राष्ट्राचे प्रतिनिधी जनरल थामामॉटो बसलेले होते. निस्सीम देशभक्तीच्या गंगोत्रीतून अगदी अनपेक्षितपणे प्रगट झालेली ही अश्रुरूप स्वातंत्र्यगंगा पाहून त्यासही आश्चर्याचा धक्का बसला असल्यास नवल नाही. उत्कट देशभक्तीचे दृश्यस्वरूप पाहण्याचे भाग्य सर्वांस लाभत नसते. भावनांच्या वादळाने सुटलेला मनाचा तोल नेताजींनी दहा-पंधरा क्षणांनी कसाबसा सावरला. काही काल हरपलेले देहभान पुन्हा देशकाल परिस्थितीच्या स्मरणाने जागृत झाल्यावर, त्यांनी महत्प्रयासाने हृदयातील भावनांचा कल्लोळ आतल्या आत दडपला. या प्रयत्नात दोन-चार हुदके त्यांस आलेच. उजव्या हाताने ब्रीचेसच्या खिशातील रुमाल काढून, नेताजींनी ओघळलेले अश्रू पुसले व तेवढ्या वेळात आपल्या भावनांवर ताबा मिळवून त्यांनी रापथ पूर्ण केली.

अशाच एका दुसऱ्या महत्त्वाच्या प्रसंगी नेताजींस भावनांचा उद्वेग थोपवून धरणे कठीण झाले. सिंगापुर शहरी हिंदी स्वातंत्र्य सरकार स्थापन झाल्यावर, नेताजी सुभाषचंद्र बोस इतर चार सहकाऱ्यांसह टोकियो येथे भरणाऱ्या अतिपूर्वेतील सर्वराष्ट्रीय परिषदेकरिता गेले. या परिषदेत ब्रह्मदेशाचे अधिपती डॉक्टर बा माँ यांनी "अतिपुर्वेतील नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे नेतृत्वाखाली सुरू असलेल्या हिंदी स्वातंत्र्ययुद्धास तनमनधनाने मदत करावी" असा ठराव मांडला. हा ठराव सर्वानुमते संमत झाल्यावर नेताजी आभारप्रदर्शक भाषण करण्यासाठी म्हणून उठले. ते म्हणाले, "हिंदी जनतेची व भारताची करुणाजनक परिस्थिती लक्षात घेऊन आपण या अभागी देशास जी अमोल मदत करण्याचे अभिवचन दिलेले आहे त्याबद्दल आम्ही सर्वजण आपले अत्यंत आभारी आहो. वास्तविक ४० कोटी जनतेच्या, एके काळी संस्कृतीच्या अत्युच्च शिखरावर पोचलेल्या या अवाढव्य देशावर सर्वांचे मदतीची याचना करण्याचा हा दीनवाणा प्रसंग यावयास नको होता, परंतु तो आला आहे हे खरे. त्याला काही इलाज नाही...” या प्रसंगीही निर्बल, निःशस्त्र, निष्कांचन, अज्ञानी, अस्थिपंजर झालेल्या व सर्वस्वी पिळून नागवलेल्या आपल्या असंख्य बांधवांचे जीवनचित्र तेथे जमलेल्या सर्व आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींसमोर रेखाटताना नेताजींचे डोळे पाण्याने भरून आले. “एवढे सांगितले हे तर काहीच नाही; याहून आमच्या लोकांची परिस्थिती शतपटीने बिकट आहे असेच जणु काय त्यांचा गदगद स्वर त्या प्रतिनिधींस सांगत होता. श्रोतृवृंदातील सर्व लोकांस तो प्रसंग अपूर्व असाच होता. नेताजींच्या हृदयातील आत्यंतिक राष्ट्रीय कळकळीचे उदात्त

स्वरूप त्यांच्या अश्रूंत पूर्णपणे प्रतिबिंबित झालेले होते. जपानमधील सर्व वृत्तपत्रांनी या प्रसंगाचा गौरवपूर्ण उल्लेख करून नेताजींच्या निस्सीम देशभक्तीची मुक्तकंठाने प्रशंसा केली.

 

 

सुभाषचंद्र बोस यांचे ते वीरश्रीपूर्ण भाषण

 

महायुद्ध संपल्यावर केंव्हा एकदा घरी जाऊन पडतो असे सर्व सैनिकांस वाटू लागते. युद्धकालात लोकशाही राष्ट्रे सुद्धा सुलतानशाही गाजवून स्वतःचे सैनिकास व नागरिकांस मारून मुटकून युद्धासाठी कंबर बांधावयाला लावतात. स्वतःची घरेदारे सोडून परप्रांती हाल अपेष्टात व प्रत्यक्ष मृत्यूच्या दाढेत जीवन कंठणारे शिपाई युद्ध संपताच स्वगृही परतण्यास अधीर होतात अशा पराजयाची मानसिकता असलेल्यांच्या समोर नेताजींनी केलेले ओजस्वी भाषण प्रेरणादायी आहे.

“हे युद्ध आता जरी लवकर संपणार असे वाटत असले तरी स्वातंत्र्य प्राप्तीची वेळ निघुन गेली असे मात्र समजू नका.

युद्धोत्तर नव्या संधीचा योग्य उपयोग करून घेण्याची तयारी करा.... कसल्याही परिस्थितीत जिवात जीव असेतोवर आपण लढत राहू, शरण जाणार नाही किंवा हताशही होणार नाही हे लक्षात ठेवा..." असे नेताजींनी सर्व हिंदी लोकांस बजाविले. सामान्यजनास अत्यंत निराशाजनक वाटणाऱ्या परिस्थितीत नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे ते वीरश्रीपूर्ण भाषण ऐकून सर्व श्रोतृवृंद आश्चर्यान थक्क झाला. एखादा पहाड खालून कोणी पोखरावा व आता अंगावर ढासळणारच अशा भावनेने भोवतालच्या लोकांनी त्याकडे पाहत रहावे; एवढ्यात कोणी त्याला आपल्या करांगुलीच्या आधाराने थोपवून धरावे, इतका आश्चर्यकारक आधार नेताजींच्या वीरवृत्तीने सर्व लोकांस मिळाला. तानाजीच्या मृत्यूने धीर सोडून सैरावैरा पळू लागलेले मराठे ज्याप्रमाणे सूर्याजीच्या निर्वाणीच्या उद्गगारांनी भानावर येऊन चेवाने लढण्यास पुढे सरसावले, त्याचप्रमाणे आपला पराजय झाला असे समजून रणांगणातून पळू पाहणाऱ्या हिंदी लोकांस नेताजींच्या शब्दांनी पुन्हा परत फिरविले. “तुमचा पराजय झालेला नाही. कोण म्हणतो तुम्ही पराजित आहा म्हणून?" असा सरळ सवाल नेताजींनी सर्व हिंदी लोकांचे समोर टाकल्याबरोबर या सर्व लोकांनी सर्व परिस्थितीचे या नव्या दृष्टीने परीक्षण करण्याचे ठरविले. नेताजींच्या धीरोदात्त संदेशाने त्या सर्वांस दिव्य दृष्टी प्राप्त करून दिलेली होती. या दिशेने जो जो विचार करावा तो तो खरोखरच प्रत्येकास असे वाटू लागले, “अरेच्च्या... खरेच की!

आपला पराजय झाला असे आपण समजत होतो, पण कोणी आपल्याला पराजित केले? आणि कधी केले पारजित? छे:! आपल्याला काही भ्रम झाला असावा किंवा स्वप्न पडले असावे. बरे झाले नेताजींनी आपल्याला वेळीच जागे केले म्हणून, नाही तर आपण खुळचटासारखे स्वातंत्र्यरण सोडून, पाठ फिरवून अगदी पळ काढण्याच्या विचारात होतो.” “चला, परत फिरू या...” असाच सर्व हिंदी लोकांनी तेथल्या तेथे निग्रह केला.

 

नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा परिवार

 

पु. ना. ओक यांचा परिवार

वडील -  नागेश कृष्ण ओक

आई -    जानकी

पत्नी  -   साधना

मुलगा  - संतोष

मुली - १. मधुबाला जोशी. २. जयश्री वैद्य

दि ८ सप्टेंबर २०२२ रोजी नवी दिल्ली येथे  नेताजींच्या मूर्तीच्या अनावरण कार्यक्रमास विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित परिवार सदस्य 

डावी कडून -  पणती - अनन्या जोशी,  नात - आदिती जोशी,  मुलगी - जयश्री वैद्य

 

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या स्वाक्षरी सह

अखिल भारतीय आझाद हिंद परिषदेनिमित्त आठवण  भेट