Bhetli tu Punha - 10 books and stories free download online pdf in Marathi

भेटली तू पुन्हा... - भाग 10





आदिने आजोबांसाठी शुगर फ्री गुलाबजाम आणले. हे पाहुन आजोबा खुश झाले. आजी ही हसत व खुश होत त्याच्याकडे प्रेमाने पाहत होती. अन्वी मात्र थोडी सॅड होती. कारण ती आदिला पसंद करू लागली होती. आणि तिला अस वाटत होते की तो ही तिला पसंद करत आहे. पण आज दुपारी जेव्हा त्याच्या रूममध्ये गेली होती तेव्हा तिथे एका मुलीचा फोटो तिने पहिला होता , त्या फोटो मागे त्याने माय लव्ह असे लिहिले होते.

आता पुढे....

आजोबा गुलाबजाम खात अन्वीकडे पाहत होते. जी आदिला पाहत होती. आजोबांनी आजीला खुणावले की त्या दोघांकडे बघ. आजी पाहते तर ते दोघे एकमेकांमध्ये हरवले होते.

"बेटा अन्वी चल स्वयंपाक करू, हे आहेत सीए साहेबांसोबत बसतील गप्पा करत" आजी सोफ्यावरून उठत बोलली.

"अ....अ..हो आई चल" अन्वी गोंधळली व पटकन तिथून निघून आत गेली.

हॉलमध्ये आता आदि व आजोबा बसले होते. त्यांच्या गप्पा रंगल्या. किचनमध्ये आजी व अन्वी काम करत होत्या. नेहमी बडबड करणारी अन्वी आज शांतपणे काम करत होती. हे पाहून आजी विचारात पडली.

"अनु, बेटा काही झाले आहे का? कोणी काही बोलले का तुला?" आजी काळजीने तिला विचारत होती.

"अ...नाही आजी थोडं डोकं दुखत आहे बस" ती विषय टाळण्यासाठी काही तरी सांगते.

पण तीच डोकं दुखत आहे हे समजल्यावर आजी जास्त काळजी करू लागली.

"खूप दुखतंय का ग?, कुठे दुखत दाखव मला" आजी काळजीने तिच्या जवळ येत बोलली.

"आई, इतकं ही दुखत नाहीये, तू नको लगेच इतकं टेन्शन घेऊ ग होईल कमी" अन्वी आजीच्या खांद्यावर हात ठेवून बोलली.

"नक्की ना ग " आजीच्या डोळ्यात खुपच काळजी दाटून आली होती.

अन्वीला आजीची अवस्था पाहून स्वतःचाच राग आला. ती मनातच स्वतःला कोसु लागली, "मला काय त्रास होतो आहे हे मलाच समजत नाहीये पण डोकेदुखीच कारण सांगितले की आईला टेन्शन आलं. मी आईचा विचारच केला नाही किती स्वार्थी आहे मी"

ती आपल्या विचारातच काम करत होती. आजीच अजून ही लक्ष तीच्यवर होत. काही वेळात स्वयंपाक आवरलं तश्या दोघीही हॉल मध्ये आल्या.

हॉलमध्ये आजोबा व आदि जोर जोरात हसत होते. त्या दोघांना अस फ्रेंडली बोलताना, हसताना पाहून अन्वी मनातून सुखावली. आजीच्या डोळ्यातही आनंद दिसत होता. जणू काही खूप काळापासून त्यांचा हरवलेला आनंद आज त्यांना मिळाला आहे.

"मग आदित्यराव, जेवण तयार आहे वाटते लगेच जेवायचं का?" आजोबा त्या दोघींना बाहेर आलेले पाहून बोलले.

"लगेच कसले जेवताय, थांबा ना थोडा वेळ ; आता आलो ना आम्ही आवरून... तुमच्या गप्पा झाल्या आता मला ही सीए साहेबांसोबत बोलायचे आहे ना" आजी आदिच्या बाजूला येत बोलली.

"हो का नाही आई ...आय मिन आजी " आदि आपली चूक सुधारत बोलला.

"हे बघ बाळ, तू ना मला आईच म्हण जशी अन्वी म्हणते, मला आवडेल" आजी प्रेमाने त्याला म्हणाली.

"हो आणि मला ही बाबा म्हण मला ही आवडेल" आजोबा ही हसत बोलले.

"हो आई बाबा" आदि ही खुश होत बोलला.

आदीला असा मनमोकळ्यापणे आई बाबांसोबत बोलताना पाहून अन्वीला खूप छान वाटत होतं. असच आपण नेहमी एकत्र असायला हवं असं तिला नकळतपणे मनात वाटून गेलं. पण पुढच्याच क्षणी तिला तो फोटो आठवला व तिचा चेहरा पुन्हा निस्तेज झाला.

आदिचे लक्ष तिच्याकडे गेले. ती शांतपणे त्यालाच पाहत होती. तो आपल्याला पाहत आहे हे लक्ष्यात येतांच तिने आपली नजर चोरली.

"मॅडम तुम्ही का शांत आहात? तुम्ही ही बोलु शकता की" आदि चेष्टेच्या सुरात बोलला.

ती आईकडे पाहते जी तिलाच काळजीने बघत होती. आईची काळजी बघून ती नॉर्मल होत बोलली.

"हो, पण तुम्ही बोलू दिलं तर बोलेन ना काही" ती जबरदस्ती हसत बोलली.

अशीच काही वेळ त्यांची तू तू मैं मैं सुरू होती. आजी आजोबा त्यानाच कौतुकाने पाहत होते. आजोबा मधेच बोलले.

"काय आहे नेहमी ती बडबड करत असते घरात पण आज तिच्यापेक्षा जास्त बडबड करणारी व्यक्ती घरी आली आहे म्हणून तिने मौन धारण केल आहे" आजोबा तिला उगीच डिवचत बोलले.

"हो का, पण ते फक्त काही तासांसाठी आहेत इथे, ते गेले की मीच आहे इथे समजलं ना" अन्वी ठसक्यात बोलली.

"हो बाबा, हे पण बरोबर आहे हा, पण मी जोपर्यंत आहे तोपर्यंत मीच राजा" आदि ही तिला खिजवत बोलला.

"तुम्ही आणि राजा...हुंम... आधी पासून मीच इथे आहे आणि मीच राहणार" अन्वी रागाने बोलली.

"हो पण कधी तरी जाशीलच ना लग्न करून तुझ्या राजाच्या घरी" आजोबा हसत बोलले.

आजोबांनी आदिला टाळी दिली. लग्न करून जाणार हे ऐकून अन्वी खूपच दुखी झाली. पटकन तिचे डोळे पाणावले व ती तिथून उठून आपल्या रूमकडे गेली.

"बघा, विनाकारण पोरीला रडवल ना तुम्ही दोघांनी" आजी आजोबांना रागवत बोलली.

"आदित्यराव जावा अन घेऊन या तुमच्या राणीला" आजोबा सहज बोलुन गेले.

पण आजोबांचे बोलणे ऐकून आदि चकित झाला.

"बाबा काय म्हणालात तुम्ही?" तो अविश्वासाने बोलला.

"अहो मस्करी केली, जावा तिला समजावून घेऊन या" आजोबा त्यांच्या खांद्यावर थोपटत बोलले.

"पण मी...कस जाऊ त्यांच्या रूममध्ये" आदि अवघडून बोलला.

"अहो आम्ही सांगतो आहे ना जा" आजोबा हूकमी आवाजात बोलले.

आता आदिचा नाईलाज झाला व तो उठला. त्याला अन्वीच्या रूमकडे जाताना पाहून आजी बोलली.

"अहो तरणी पोर अन अस कस तुम्ही त्याला आत पाठवले" आजी थोडी नाराजीनेच बोलली.

"अहो राणी सरकार हे केस उन्हात पांढरे नाहीत केले, काही तरी समजत म्हणूनच त्याला तिच्याकडे पाठवले ना" आजोबा कोड्यात बोलत होते.

आजीला मात्र आजोबांचे बोलणे समजले नाही. त्याना अस विचारात हरवलेलं पाहून आजोबा हसले व म्हणाले.

"नको त्या बिचाऱ्या मेंदूवर इतका लोड देऊ वेळ आलं की सगळं समजेल"

आजी अजून ही शांतच होती.