World Breastfeeding Week 2023 books and stories free download online pdf in Marathi

World Breastfeeding Week 2023

'जागतिक स्तनपान सप्ताह' 2023

दरवर्षी ऑगस्टचा पहिला आठवडा म्हणजेच 1 ते 7 ऑगस्ट 'जागतिक स्तनपान सप्ताह' म्हणुन साजरा केला जातो. 'जागतिक स्तनपान सप्ताह' हा आई आणि मूल दोघांसाठीही खूप महत्त्वाचा असतो. हा विशेष आठवडा लोकांना स्तनपानाचे फायदे आणि गरजेबद्दल जागरूक करण्यासाठी साजरा केला जातो. या कार्यक्रमात, बाळाच्या सर्वांगीण वाढीसाठी स्तनपान किती महत्त्वाचे आहे हे सांगितले जाते.

बाळाच्या जन्मानंतर 6 महिने स्तनपान करणे खूप महत्वाचे आहे. भारतीयांना तर 'आईच्या दुधा'चं माहात्म्य अनेक चित्रपट, मालिका, पुस्तक आणि बऱ्याच वेगवेगळ्या माध्यमांतून सांगितलं जातं. नुकत्याच जन्मलेल्या बाळासाठी तर आईचं दूध अमृताहूनही जास्त गरजेचं असतं. वैद्यकीय तज्ज्ञांनी तर असं सांगितलंय की बाळ जन्माला आल्यानंतर पहिले सहा महिने बाळाला आईच्या दुधाशिवाय इतर कशाचीही गरज नसते, अगदी पाण्याचीही नाही. आईचं दूध बाळासाठी तर महत्वाचं आहेच पण त्या बाळाच्या माध्यमातून मातृत्वाचा सुंदर अनुभव घेणाऱ्या आईसाठी देखील स्तनपान तेवढंच महत्वाचं आहे.

स्तनपान आई आणि बाळाचं नातं अधिकाधिक दृढ करतं. बाळाला लागणारे उष्मांक, जीवनसत्व, अँटी बॉडीज, लॅक्टोफेरॉन, इम्युनोग्लोब्लिन्स ही सत्वं बाळाची रोग प्रतिकारकशक्ती वाढवत असतात. बाळाच्या मानसिक, भावनिक आणि शारीरिक विकासासाठी स्तनपान अत्यंत गरजेचं आहे. तसेच स्तनपानामुळे बाळाला ऍलर्जी, अस्थमा, श्वसनाचे विकार आणि पोटाच्या विकारांचा धोकाही कमी होतो.

पहिलं स्तनपान प्रसूतीनंतर लगेच द्यायला हवं. बाळाचा जन्म झाल्यानंतर 20 मिनिटांच्या आत बाळाला आईचं दूध मिळालं पाहिजे. पहिलं स्तनपान करत बाळाला आईच्या शरीरावर पालथं ठेवावं लागत आणि आईच्या शरीराला बाळाच्या शरीराचा स्पर्श झाला की आईला पान्हा फुटतो. बाळ स्वतः स्तन शोधतं आणि ते दूध पिऊ लागतं. याचं पद्धतीला ‘कांगारू केअर मेथड’ असंही म्हणतात. या पद्धतीत आईच्या छातीवर बाळाला कपडे न घालता उघडं ठेवावं लागतं जेणेकरून आई आणि बाळाच्या त्वचेचा स्पर्श झाला की, बाळाची रोगप्रतिकारशक्ती वाढते.

पहिल्या स्तनपानाला कोलॉस्ट्रम (Colostrum) असं म्हणतात. बाळाच्या जन्मानंतरचं पहिलं लसीकरण हे स्तनपानच आहे.

 

 

 

जागतिक स्तनपान सप्ताहाचा इतिहास

सन १९९१ मध्ये स्तनपानाला समर्थन आणि प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने वर्ल्ड अलायन्स फॉर ब्रेस्टफीडिंग अॅक्शनची स्थापना करण्यात आली. ज्यांच्या सुरुवातीच्या निर्णयात स्तनपान हा विशेष दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. पण त्याचा उद्देश आणि महत्त्व समजून घेऊन तो विशेष दिवस न ठेवता विशेष सप्ताह म्हणून साजरा करण्याचा निर्णय नंतर घेण्यात आला. त्यानंतर १९९२ मध्ये जगात प्रथमच जागतिक स्तनपान सप्ताह साजरा करण्यात आला. जो ऑगस्टच्या पहिल्या तारखेपासून पुढच्या एका आठवड्यापर्यंत म्हणजेच ७ ऑगस्टपर्यंत साजरा करण्यात आला. त्या वर्षी 70 देशांनी नवीन उपक्रम साजरा केला. आता यात 170 देशांचा सहभाग आहे.

 

जागतिक स्तनपान सप्ताहची थीम

दरवर्षी या विशेष सप्ताहासाठी वेगळी थीम ठेवली जाते. वर्ष २०२३ मध्ये जागतिक स्तनपान सप्ताहाची थीम ' इनेबल ब्रेस्टफीडिंग- मेकिंग अ डिफ्रन्स फॉर वर्किंग वूमेन' अशी आहे. म्हणजे ज्या महिला नोकरी करतात आणि प्रसूती रजेनंतर कार्यालयात यावे लागते, अशा महिलांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी स्तनपानाची सोय उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

 

स्तनपानाचे फायदे 

बाळांना स्तनपानाचे फायदे 

जी मुले आपल्या आईचे दूध दीर्घकाळ पितात, त्यांची रोगप्रतिकारशक्ती खूप मजबूत असते. आणि ते सर्व प्रकारच्या रोगांशी सहज लढण्यास सक्षम असतात.

अतिसार, बद्धकोष्ठता, गॅस्ट्रोएन्टेरिटिस, गॅस्ट्रोएसोफेजल रिफ्लक्स प्रतिबंधित करते

सर्दी आणि श्वसनासंबंधी रोग जसे की न्यूमोनिया, रेस्पिरेटरी सिन्सीटियल व्हायरस आणि डांग्या खोकला प्रतिबंध

स्तनपान करणारी बालके एकंदरीत कमी रडतात, आणि लहानपणी आजारपणाचे प्रमाण कमी असते.

बॅक्टेरियाच्या मेंदुच्या वेष्टनाचा दाह विरुद्ध संरक्षण.

चांगली दृष्टी.

बालमृत्यू दरात घट.

ऍलर्जी, एक्जिमा आणि दमा पासून प्रतिबंध.

नंतर बालपणात लठ्ठ होण्याची शक्यता कमी होते.

चांगले मेंदू परिपक्वता

सडन इन्फंट डेथ सिंड्रोम (SIDS) चे कमी दर

एकूणच कमी आजार आणि कमी हॉस्पिटलायझेशन.

हे अतिसार आणि तीव्र श्वसन संक्रमणासारख्या संक्रमणास प्रतिबंध करते. तसेच यामुळे बालमृत्यूचे प्रमाण कमी होते.

 

आईसाठी स्तनपानाचे आरोग्य फायदे 

जन्मानंतर जलद वजन कमी करण्यास प्रोत्साहन देते.

गर्भाशयाला संकुचित होण्यास आणि सामान्य आकारात परत येण्यास उत्तेजित करते.

प्रसूतीनंतर रक्तस्त्राव कमी होतो.

मूत्रमार्गाच्या संसर्गापासून बचाव.

अशक्तपणाची शक्यता कमी

पोस्टपर्टम डिप्रेशनचा कमी धोका.

स्तनपानामुळे नैसर्गिकरित्या ऑक्सिटोसिन आणि प्रोलॅक्टिन हे सुखदायक संप्रेरक तयार होतात जे आईमध्ये तणाव कमी करण्यास आणि सकारात्मक भावनांना प्रोत्साहन देतात.

आत्मविश्वास आणि आत्मसन्मान वाढेल.

स्तनपान संपूर्ण कुटुंबासाठी शरीर, मन आणि आत्मिक आरोग्यास समर्थन देऊ शकते.

स्तनपानामुळे प्रवास सुलभ होतो. आईचे दूध नेहमी स्वच्छ आणि योग्य तापमानाचे असते.

आई आणि मुलामधील शारीरिक/भावनिक बंध वाढवते.

स्तनपान करणाऱ्या माता त्यांच्या बाळाचे संकेत वाचण्यास शिकतात.

ज्या स्त्रिया स्तनपान करतात त्यांना मासिक पाळी येण्याची शक्यता कमी असते. 

स्तनपानामुळे मधुमेह आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो.

असे मानले जाते की स्तनपानामुळे आईमध्ये स्तनाचा कर्करोग, गर्भाशयाचा कर्करोग, टाइप 2 मधुमेह आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो. 

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या आकडेवारीनुसार स्तनपान वाढवून दरवर्षी स्तनाच्या कर्करोगामुळे होणारे 20,000 माता मृत्यू टाळता येऊ शकतात असा अंदाज आहे..... 

नोकरी असलेल्या आईसाठी स्तनपानाचे नियोजन 

प्रसूतीनंतर पहिले तीन महिने प्रसूती रजा मिळते. आजकाल सहा महिन्यांसाठी लॅक्टेशन लिव्ह म्हणजे स्तनपानासाठी रजा मिळण्याचीसुद्धा तरतूद करण्यात आलेली आहे. महिलांनी बाळाच्या योग्य पोषणासाठी सहा महिने रजा घेऊन बाळाचे स्तनपान केलं पाहिजे. जर कामाला जावंच लागत असेल आणि ऑफिस घरापासून जवळ असेल तर दिवसातून दोन वेळा घरी येऊन स्तनपान करायला हवं. जर ते जमत नसेल तर कुटुंबीय बाळाला आईकडे घेऊन येऊ शकतात. ऑफिसजवळ पाळणाघर असेल तर तिथेही बाळाला ठेवून स्तनपानाची सोय केली जाऊ शकते. यामुळे स्तनपानात खंड पडत नाही आणि आईला दूध येत राहतं. स्तनपानात खंड पडला की आईचं दूधच बंद होतं आणि मी मग बाळाला स्तनपान देता येत नाही. आईचं घरी येऊन बाळाला स्तनपान करणं शक्य नसेल तर अशा परिस्थितीत Expressed Breast Milkचा पर्याय वापरता येऊ शकतो.

आई बऱ्याच दिवसांसाठी बाळाला सोडून जाणार असेल आणि दूध जास्त प्रमाणात हवं असेल तर अशावेळी इलेक्ट्रिक ब्रेस्ट पंपचा वापर केला पाहिजे. साधारण तापमानात ब्रेस्टमिल्क आठ तासापर्यंत चांगलं राहतं, त्याला काहीच करायची गरज नसते. बाळाला ते दूध पाजताना एका चमच्याने ते दूध ढवळावं लागतं. आईचं दूध फ्रिजमध्ये ठेवलं तर किमान 24 तासांसाठी ते दूध चांगलं राहतं. फ्रिजमधलं थंड दूध काढून बाळासाठी कोमट करत असतांना गॅस किंवा मायक्रोवेव्हचा वापर करू नये अशावेळी दुधाचं भांडं गरम पाण्यात ठेवू

न ते दूध कोमट केल्यास ते बाळाला पिण्यायोग्य होतं.