Devayani Vikas and the Key - Episode 42 (Final Episode) books and stories free download online pdf in Marathi

देवयानी विकास आणि किल्ली - भाग ४२ (अंतिम भाग)

       देवयानी विकास आणि किल्ली.

पात्र परिचय

 

विकास                          नायक

देवयानी                         नायिका  

सुप्रिया                         देवयानीची मैत्रीण

लक्ष्मी                          सुप्रियाची रूम पार्टनर.

राजू                           सुप्रियाचा मित्र

शीतोळे                         पोलिस इंस्पेक्टर

भय्या                          विकासचा मोठा भाऊ.

अश्विनी                         विकासची वाहिनी, भैय्याची बायको

भगवानराव                       विकासचे बाबा

यमुना बाई                      विकासची  आई

गोविंद राव                      देवयानीचे बाबा

कावेरी बाई                      देवयानीची आई.

मावशी आणि काका               देवयानीची मावशी आणि तिचे मिस्टर

मनीषा                         विकासची बहिण

अंकुश                          मनीषाचा नवरा.

सुरेश                           देवयानीचा भाऊ.

विश्राम                         देवयानीचा चुलत भाऊ.

विनोद                          विकास चा चुलत भाऊ

प्रिया                           विकासची चुलत बहीण.

सेजल                          देवयानीची अमेरिकेतली रूम मेट.

पूर्णिमा                          देवयानीची अमेरिकेतली रूम मेट.

राजेश                          विकासचा मित्र.

 

 

 

 

  भाग   ४२           

भाग  ४१ वरून  पुढे  वाचा ......

“तिचा चारदा फोन आला होता पण मला इतका राग  आला होता की नंतर मी तिच्याशी बोललेच नाही. मैत्रीण अशी असते का ? आणि तू पण पाघळलास. खरं म्हणजे मला तुझा पण तेवढाच राग आला होता, पण काय करू, तुझ्या शिवाय मला जगताच आलं नसतं. काही अर्थच नव्हता. म्हणून सोडून दिलं. पण तू काय म्हणत होतास ? मला काय माहीत नाही ?” देवयानी म्हणाली.

“अग ते एक prank  होतं. आम्ही दोघांनी मिळून तुझी थोडी गंमत केली. मुद्दाम तुला चिडवायला. या पलीकडे काही नाही.” – विकास.

“खरं सांगतो आहेस तू ?” – देवयानी.

“देवा शपथ.” – विकास.

“पण तू सुप्रियाला कधी भेटलास आणि हे केंव्हा ठरवलं ?” – देवयानीनी आता गोंधळून विचारलं.

“अग, त्या दिवशी मला खूपच कंटाळा आला होता म्हणून सिनेमाला गेलो होतो. तिथे मला सुप्रिया आणि लक्ष्मी दोघी भेटल्या. सुप्रियानी  सांगितलं की लक्ष्मीचं लग्न ठरलंय. आणि ती कोईमतूर ला जाणार आहे म्हणून. मग मी सहज म्हंटलं की लक्ष्मी तुझ्याकडून आम्हाला पार्टी हवी. आणि ती ही मच्छी करी ची. मी आपलं सहज म्हंटलं होतं. पण त्या शनिवारी लक्ष्मीचा फोन आला, घरीच जेवायला बोलावत होती. तिच्या हातची मच्छी करी खायला. मी गेलो होतो आणि त्याच दिवशी बोलता बोलता ही आयडिया निघाली आणि जरा तुला jealous करायचं ठरलं. बस एवढंच. यांच्या पलीकडे काही नाही.” विकासनी सविस्तर स्पष्टीकरण दिलं.

आता खजील व्हायची पाळी  देवयानीची होती, पण तिच्या जवळ एक अत्यंत प्रभावी अस्त्र  होतं. तिने विकास च्या गळ्यात हात टाकले, आणि असा एक कटाक्ष टाकला की विकास जगालाच  विसरूनच गेला.

पण देवयानी भानावर होती. अस्त्र वापरून झालं होतं. उपयोग झाला होता. काम झालं होतं. कुठल्याही क्षणी, यमुना बाई येण्याची शक्यता होती. ती विकासला म्हणाली की “चहा प्यायला बाहेरच टेबल वर चलतोस का ?”

“तू आधार देशील तर येतो. खूप थकवा आहे ग अजून.” विकासनी तयारी दर्शवली.

“चल. आता २४ तास मी तुझ्या बरोबर असणार आहे. No worries.” – देवयानी.

दोघं जणं डायनिंग टेबल येऊन बसले. टेबला वर भैय्या, बाबा, आणि आई बसले होते. या दोघांना पाहून त्यांनी टाळ्या वाजवल्या. वेल्कम विकास , वेल्कम देवयानी. विकासला बसवून देवयानी किचन मध्ये गेली. किचन मध्ये अश्विनी होती.

“वहिनी, आले बरं का मी, आता तुम्हाला आराम करायला वेळ मिळेल.”

“डाऊट फूल आहे.” – अश्विनी. 

“का हो असं म्हणता ?” देवयानीनी विचारलं.

“अग तू तुझ्या नवऱ्यामध्येच इतकी अडकणार आहेस की आमच्या कडे बघायला तुला फुरसतच मिळणार नाही.” – अश्विनी.

“वहिनी, अजून लेबल लागलं नाहीये, त्यामुळे अडकायला वेळ आहे. तो पर्यन्त तुम्हीच बॉस.” – देवयानीनी हसत हसत म्हंटलं.

“घे. चहा घेऊन जा. तिकडे डब्या मध्ये बिस्किटे आहेत, ती पण घेऊन जा. मी ब्रेक फास्ट ला काय करायचं ते बघते.” – अश्विनी पण हसली आणि म्हणाली.

“तुम्ही नाही येणार चहा घ्यायला ?” – देवयानी.

“हा काय कप आहेच हातात. चल.” – अश्विनी. 

“अरे वा, नव्या सुनबाईंनी चार्ज घेतला वाटतं.” – बाबा. 

“बाबा, ती काय म्हणते माहीत आहे का ?” अश्विनी बोलली.

“काय ?” – बाबा.

“ती म्हणते की” अश्विनी म्हणाली  “अजून लेबल लागलं नाहीये तो पर्यन्त वहिनी, तुम्हीच बॉस.”

“अरे वा. काय विकास, तुझं रिजर्वेशन वेटिंग लिस्ट वर गेलेलं दिसतंय.” – बाबा. 

“बाबा, मला नवीन आहे, पण पुरूषांची  काय किंमत असते घरात ते आता हळू हळू कळतंय.” – विकास खोट्या गंभीर पणे म्हणाला.

“चांगलं आहे. आयुष्याची सुरवात ज्ञान साधनेने होते आहे म्हंटल्यांवर चांगलंच आहे.” – बाबा. 

“अहो काय शिकवता आहात तुम्ही त्याला ?” आता यामुनाबाई उसळल्या. “मी काय तुमच्या वर जुलूम करते ?”

“नाही, नाही. मी कुठे असं म्हंटलं. आता जर मी म्हंटलं की बटाटे वडे होऊन जाऊ द्या तर तू नक्कीच करशील, मला खात्री आहे. काय, भैय्या ?” – बाबा, हसत हसत म्हणाले.

“हो. हो. मस्त आयडिया. देवयानी, होऊन जाऊ दे.” – भैय्या.

तिघी बायकांनी कपाळाला हात लावला. “खाण्या शिवाय दुसरं काही सुचतच नाही या लोकांना” यमुना बाई पुटपुटल्या. पुरुषांनी अर्थातच तिकडे लक्ष  दिलं नाही.

“चला. मिशन बटाटावडा.” अश्विनी बोलली. “चल देवयानी. आरामाचे दिवस संपले तुझे.”

असेच हसत खेळत दिवस चालले होते. विकासची तब्येत झपाट्याने सुधारत होती.

देवयानी त्याची पूर्ण काळजी घेत होती. सगळेच देवयानीवर खुश होते.

महिना दीड महिना उलटला. देवयानीची सुट्टी संपत आली होती. आता दोन चार दिवसांत तिला कामावर जॉइन व्हायचं होतं. विकास जवळ जवळ पूर्व पदावर आला होता. त्याच्याकडे लक्ष द्यायची जरूर नव्हती. एक दिवस देवयानीनी  संध्याकाळी चहा च्या टेबलावर हा विषय काढला. म्हणाली-

“वर्क फ्रॉम होम असलं तरी दिवस भर लॅपटॉप वर बसावं लागणार आहे. पण ब्रेक मध्ये मी वहिनींना मदत करू शकेन, आणि संध्याकाळची जबाबदारी पूर्ण सांभाळीन. चालेल ना.”

सगळ्यांनी माना डोलावल्या.

देवयानीचं ऑफिस चं रुटीन सुरू झालं. ती दिवसभर बिझी असायची पण संध्याकाळची, म्हंटल्या प्रमाणे सगळी जबाबदारी देवयानीनीच उचलली होती. विकास पण आता एकदम फीट  झाला होता. त्याला ऑफिस मध्ये जॉइन होण्याचे वेध लागले होते. त्याचंही सध्या वर्क फ्रॉम होम सुरू झालं होतं. अजून महिनाभर तरी ऑफिस सुरू होणार नव्हतं. सगळं का व्यवस्थेशिर झालं होतं. आता कोणाच्याच चेहऱ्यावर काळजी नव्हती.

बघता बघता नोव्हेंबर उजाडला. देवयानीच्या बाबांचं आणि भगवानरावांच बोलणं होत होतं आणि लग्नाची तारीख पक्की करण्याचं चाललं होतं. लॉक डाऊन जरी नसला, तरी ५० लोकांची मर्यादा असल्याने आता लग्न नागपूरलाच करायचं असं ठरलं होतं. डिसेंबर चा मुहूर्त पण पक्का झाला.

अशातच एक दिवस सेजल चा देवयानीला फोन आला.

“देवयानी, राजेश त्याच्या मित्राशी बोलत होता तेंव्हा कळलं की त्यांच्या कंपनीत काही जागा भरायच्या आहेत. राजेश नी पूर्णिमाला विचारलं की नागपूरला जायला तयार आहेस का म्हणून. तर ती हो म्हणाली. जर तिथे नोकरी पक्की झाली तर तू तिथे एखाद्या चांगल्या विमेन हॉस्टेल मध्ये तिची सोय करशील का ?”

“अग हो, काहीच प्रॉब्लेम नाहीये मी विकास ला सांगते. तो करेल सगळी व्यवस्था. पूर्णिमाला सांग, काळजी करू नकोस. आणि आम्ही नसलो तरी माझ्या घरचे आहेतच इथे.”

लग्नाला जेमतेम आठवडा उरला होता आणि पूर्णिमाचा फोन आला.

“देवयानी, माझी नोकरी तिथे फिक्स झाली आहे. डिसेंबर च्या थर्ड वीक मध्ये जॉइन व्हायला सांगितलं आहे.”

“अपॉईंटमेंट ऑर्डर मिळाली ?” – देवयानी. .

“हो. परवाच मिळाली.” 

“अभिनंदन. पूर्णिमा. मग केंव्हा येते आहेस ? माझं लग्न आहे ८ तारखेला, तुला माहितीच आहे, त्याच्या अगोदर ये.” – देवयानी. 

“आम्हाला  २ तारखेचं बूकिंग मिळालं आहे. ३ तारखेला आम्ही पोचतो आहे.” – पूर्णिमा. 

“आम्ही ?” – देवयानी.

“अग म्हणजे मी, सेजल आणि राजेश तिघंही येतो आहोत. सेजल आणि राजेश लग्न करूनच वापस जातील. आम्हाला नागपूरची माहिती नाहीये पण राजेश बरोबर असल्याने काळजी नाही.” – पूर्णिमा.

“एवढं सगळं ठरलं, मला काहीच कल्पना नाही. Any way पुन्हा एकदा अभिनंदन.”

जेवण्याच्या टेबल वर ही बातमी देवयानीने सगळ्यांना दिली. देवयानीच्या मैत्रिणी आणि विकास चा मित्र येणार म्हंटल्यांवर सगळ्यांनाच आनंद झाला. देवयानीनी सुप्रियाला आधीच आमंत्रण दिलं होतं, ती पण येणार होती.

देवयानी, भगवान राव म्हणाले, “नाही तरी तू एक तारखे पासून सुट्टीवरच आहेस, तर तुझ्या मैत्रिणींना पण इथेच बोलावून घे. सुप्रिया पण इथेच येणार असेल ना?

साखर पुड्याला आली होती, तीच न ?”

“हो बाबा.” – देवयानी.

“मग मैत्रिणी असल्या की तुला पण एंजॉय करता येईल” – बाबा. 

खरंच सेजल आणि पूर्णिमाला बोलावून घेऊ ? आणि तिने विकास कडे पाहीलं. विकास ने मान हलवून होकार दिला.

तीन तारखेला पूर्णिमा, सेजल, चार तारखेला देवयानीच्या घरचे मावशी, काका सकट सगळे, आले. सुप्रिया, आणि विकासचे काका, काकू, मुलं सगळे पांच तारखेला आले. अंकुश आणि मनीषा आधीच आले होते. घर एकदम भरून गेलं. लग्नघर वाटायला लागलं. मांडव पण पडला होता. संपूर्ण घरावर रोषणाई केली होती. सगळी धाव पळ चालली होती. लग्नाच्या चार दिवस आधीच सर्व पाहुणे, रावळे  जमा झाले होते. नुसता धुमाकूळ चालला होता. बेळगाव करांनी साखर पुड्याला हा सगळा  गोंधळ अनुभवला असल्याने ते लोकं सुद्धा सरावल्या सारखे वावरत होते. गटा गटांनी गप्पा रंगत होत्या. सतत खाण्या पिण्याच्या  बशा लोकांमध्ये फिरत होत्या. सगळी कशी रेलचेल होती. कुठेही काही कमी पडत नव्हतं. नागपूरातली लग्न अशीच असतात आणि त्याची सगळ्यांना सवय होती. असं नसतं तरच कुजबुज झाली असती.

या सगळ्याच्या मागे ठाम पणे उभी होती अश्विनी. सगळ्या व्यवस्थे कडे ती आणि भैय्या बारीक लक्ष ठेवून होते. काहीही कमी पडायला नको यांची काळजी घेत होते. सगळ्यांनी मिळून एक निर्णय घेतला होता. तो म्हणजे लग्न घरीच लावायचं. बाहेरून येणारे निमंत्रित फक्त राजेश आणि त्याची फॅमिली एवढेच असणार होते. ५० चा नियम होता ना.

मैत्रिणी आल्या मुळे देवयानी खुश होती. आई, बाबांशी सुद्धा बोलायला तिला वेळ मिळाला नाही. पण एकंदरीत सगळेच मजेत होते.

लग्नाचा दिवस उजाडला आणि सगळ्यांना एकदम साखर पुड्याची आठवण झाली. पण गुरुजी वेळेवर आले आणि ती चिंता पण निमाली.

लग्न लागलं आणि एकदम जल्लोष सुरू झाला. Band, आतिषबाजी सुरू झाली. मुलं सगळी नाचण्यात दंग होती. देवयानी आणि विकास पण सामील झाले. देवयानीला आणि तिच्या मैत्रिणींना सवय नव्हती पण त्या पण सर्व विसरून नाचल्या.

लग्न पार पडलं. गृह प्रवेश झाला. देवयानी officially विकासच्या घरात माप ओलांडून प्रवेश करती झाली. लक्ष्मी पूजन झालं आणि लग्नाची सांगता झाली. दीड वर्ष वाट पाहून अखेर देवयानी आणि विकासचं  लग्न लागलं एकदाचं. या चार दिवसांत सगळ्यांची एकमेकांशी छान ओळख झाली होती. काही जणांची जरा जास्तच छान ओळख झाली होती. म्हणजे विनोद आणि पूर्णिमा जवळ जवळ सततच बरोबर दिसत होते. राजेशच्या आईने एकदा राजेशला विचारलं सुद्धा.

“ही विनोद च्या बरोबर सारखी असते  ती कोण आहे ? त्याची बहीण असल्यासारखी वाटत नाहीये आणि आम्ही त्यांच्या सगळ्या खानदाना ला  ओळखतो, मग ही

कोण आहे.” 

“अग ही पूर्णिमा. सेजल आणि देवयानीची ची पार्टनर.” राजेशनी सांगितलं.

“असं होय ? गव्हाळी रंगाची आहे, पण किती सुंदर आहे. जोडा कसा छान दिसतो आहे.” – राजेशच आई. 

“आई, अग कुठल्या कुठे पोचलीस तू. फक्त दोन दिवस झालेत त्यांच्या ओळखीला. दोस्ती जमली आहे इतकंच.” – राजेश. 

तू काही सांगू नकोस. आमची अनुभवी नजर आहे. नक्की ते प्रेमात पडले आहेत.

कळेलच आता पूर्णिमा इथेच राहणार आहे. तेंव्हा कळेलच. राजेश म्हणाला.

बघच तू, मी म्हणते आहे तसंच होणार.” राजेशची आई. 

“नाही. इतकं सोपं नाहीये ते. विकास शी  बोलावं लागणार आहे. या बाबतीत.” असं राजेश म्हणाला आणि  तो विषय तिथेच थांबला.

वर्क फ्रॉम होम ला देवयानी आणि विकासला फेब्रुवारी पर्यन्त एक्सटेन्शन मिळालं.

त्यामुळे त्यांना सध्या काहीच फरक पडला नाही. त्यांचं रेग्युलर रुटीन सुरू झालं. दुकानं सुद्धा आता उघडायला सिग्नल मिळाला होता. त्यामुळे अर्धा दिवस का होईना भैय्या आणि बाबा दुकानात जायला लागले होते.

यमुनाबाईंना पूर्णिमाचा स्वभाव खूपच आवडला होता. लग्नाच्या कामामधे  तीचा खूप हात भार लागला होता. पूर्णिमा सेजल बरोबर चार दिवसांसाठी तिच्याकडे गेली होती. हे साधून यमुना बाईनी देवयानी बरोबर तीचा विषय काढला. देवयानीनी तिचा सगळा  इतिहास सांगीतला. पण हे ही सांगितलं की तिने राजूवर मनापासून प्रेम केलं होतं आणि राजूनी तिला लग्नाचं वचन दिलं होत, पण नंतर फसवलं. हे ऐकल्यावर यमुना बाई म्हणाल्या की

“अशा कंडिशन मध्ये ती आपल्या घरी राहिली तर protected राहील. तुला काय वाटतं ?” यमुनाबाई.

“आई, पूर्णिमा एकदा फसली, नाही हे चुकच आहे. खरं तर ती फसवल्या गेली. मी तिला सावध करण्याचा प्रयत्न पण केला होता. पण तिने माझं ऐकलं नाही इतकी ती राजूच्या प्रेमात आकंठ बुडाली होती.” – देवयानी.

तू असं काय सांगीतलस तिला सावध करायला ?

मग देवयानीनी, राजूनी तिच्या बरोबर कसा अति प्रसंग केला होता त्या बद्दल सविस्तर सांगितलं.

“अग तू एवढं क्लियर सांगितलं तरी तिने ऐकलं नाही ?” - यमुनाबाई.

“आई, प्रेमात माणूस वेडा आणि आंधळा होतो. इतरांचं काहीच चालत नाही. आता माझच बघाना, मागच्या वर्षी मी नव्हते का आले एकटीच नागपूरला. नवीन माणसं नवीन शहर पण समोर फक्त विकास दिसत होता. तुम्ही लोकं जसे आहात, तसे नसता तर काय झालं असतं ?” – देवयानी.

“हो खरं आहे बाई तुझं म्हणण. मग काय करायचं ? ठेवूया आपल्या घरी ?” आईंनी मुद्दा पुढे रेटला.

“आई, तुम्ही ठरवा. तुम्हाला जगाचा अनुभव आहे. मला नाही. आणि मला असं वाटतं की एकदा सगळ्यांशी बोलून त्यांचा पण विचार घ्यावा. नाही तरी सध्या पूर्णिमा दोन चार दिवस राजेश कडेच राहायला गेली आहे. त्यामुळे जेवणाच्या वेळी बोलायला हरकत नाहीये.” – देवयानी. 

“ठीक आहे असच करू.” – आई.

 

शेवटी, पूर्णिमा यमुना बाईंच्या सांगण्यावरून त्यांच्याच घरी राहायला आली. विकासला त्यांच्या ऑफिस मध्ये महिना अखेरीस जॉइन व्हा, असा मेसेज आला होता. त्यामुळे विकास आणि देवयानी आधीच पुण्याला शिफ्ट झाले. फ्लॅट सजवणे, जरुरीचं सगळं सामान आणून काम सुरू व्हायच्या अगोदर सगळी व्यवस्था पूर्ण व्हायला हवी होती. आता खरा सर्व अडथळ्यांना पार करून, नवपरिणीत दांपत्याचा संसार सुरू झाला. त्यांना शुभेच्छा देऊया  “ enjoy the married life .”

 

मालिका समाप्त.

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com

धन्यवाद.