Sutradhar - 3 books and stories free download online pdf in Marathi

सूत्रधार - भाग ३


"नाही फार कही सीरियस नाहीये,फक्त थोडा मूका मार लागलाय आणि थोडं खरचटलंय त्यांना..." डॉक्टरांचा आवाज त्याच्या कानावर पडत होता.
शिव ने हळूवार डोळे उघडले.पहिल्याच क्षणी ठणकणारं शरीर आणि मऊ हाताचा स्पर्श त्याला जाणवला.
"अहो..."
वैदही त्याचा हात अजूनच घट्ट पकडत म्हणाली.
तिच्या लाल झालेल्या डोळ्यातून गालावरून ओघळणारे तिचे अश्रू नजाणो किती वेळापासून बेडवर पडत होते.
शिव मात्र अजून भानावर आलाच न्हवता पुन्हा तेच दृश्य त्याच्या डोळ्यांसमोर तरळलं , बाईकखाली निपचित पडलेला रक्ताने माखलेला अनिश....
एखादा विजेचा झटका बसावा त्या प्रमाणे शिव भानावर आला.
"अनिश...अनिश कुठे आहे...? कसा आहे तो..? मला त्याला भेटायचंय..."
शिव ताडकन उठत बोलला,इतक्यात त्याच्या पाठीतून एक जोरदार सनक गेली.
"आईगं..." तो कळवळला.
"अहो..,झोपा बरं आधी."
वैदही शिवला आधार देत म्हणाली.
"हे बघा मिस्टर पटवर्धन,तुम्हाला सध्या आरामाची खूप गरज आहे.दुखापत जरी किरकोळ असली तरी आठवडाभर आराम हवाच."
डॉक्टर शांतपणे म्हणाले.
"पण डॉक्टर माझ्यासोबत माझा मित्र अनिशही होता तो कसा आहे?"
"त्यांनाही जनरल वार्डला शिफ्ट केलं जाईल संध्याकाळ पर्यंत. सध्या धोक्याच्या बाहेर आहेत ते.आणि तुमच्या डोक्याला हेल्मेट होतं म्हणून बरं झालं त्यामुळे तुम्हाला गंभीर अशी दुखापत नाही झाली. बरं दिलेली औषधे वेळेवर घ्या आणि काही त्रास झालं तर नर्स ला कळवा ओके? आणि हो, उद्या डिस्चार्ज मिळेल तुम्हाला. टेक केअर."
शिवच्या जीवात आता कुठे जीव आला.
"Ok doctor thank you so much."
डॉक्टर आपल्या पुढच्या पेशंटकडे वळले.
वैदही अजूनही डोळ्यात अश्रू आणि खूप सारे प्रश्न घेऊन शिव कडे पाहत होती.शिव ने तिच्याकडे पाहिलं.
"अगं रडतीयेस काय वेडे? अं..?काही नाही झालेलं मला. उद्यापर्यंतच अगदी ठणठणीत बरा होऊन उड्या मारतो की नाही बघ."
शिव तिचे अश्रू पुसत म्हणाला.
"आणि काय गं चिऊ कुठे आहे?"
शिव ने हळूहळू उठत विचारलं.
" अहो तीला आसावरी वाहीनिंकडेच सोडून आले.ती तर रडायलाच लागलेली बाबांना लागलंय म्हणल्यावर , आणि बाबांकडे जायचयं म्हणून रडून रडून अख्खं घर डोक्यावर घेतलेलं तिने ,शेवटी कशीबशी मानली ती."
वैदही त्याच्या पाठीशी उशी ठेवत म्हणाली.
"मग,माझी लेक आहेच गुणाची."
"हो का? पण सकाळी तर म्हणत होता की सगळे गूण आईचे उचळलेत म्हणून."
वैदहीने भुवई उंचावत हळूच टोमणा मारला.
"नाही,म्हणजे ते तर आहेच पण तिच्यातले चांगले गूण तर माझ्याकडून मिळालेत ना तिला?"
शिव सुद्धा पलटवार करत म्हणाला.
"म्हणजे तुम्हाला नक्की म्हणायचं काय आहे?"
वैदही हनुवटीला हाताचा टेकू देऊन, चेहऱ्यावर खोटा खोटा राग आणत म्हणाली.
"मला म्हणायचं तर बरच काही आहे..,पण समझदारोंको इशारा काफी है।"
शिव गालातल्या गालात हसत म्हणाला.
"ब...रं...,नाही , तुम्ही उद्या डिस्चार्ज घेऊन घरी चला, मग बघते तुम्हाला"
वैदही सुद्धा गालातल्या गालात हसत म्हणाली.
"ए बाई मी हात जोडतो, सध्या मी खीळखीळा झालोय अक्षरशः. त्यात तू आणि थर्ड डीग्री दिलीस तर हाडं फेविकॉल ने जोडावी लागतील मला."
शिव ने खरंच हात जोडले.
"तुम्ही पण ना, ती चिऊ तुमच्यामूळेच इतकी आगाऊ झालीये."
वैदही हसत म्हणाली, आणि शिव ही हसायला लागला.

"हॅलो! काम झालं?"
"हो...,हो...सर"
"दोघेही जिवंत आहेत?"
"हो सर."
"कोणाला काही संशय?"
"नाही सर, मी धडक दिल्यानंतर लगेच परत आलो, आणि हो, ती खोटी नंबर प्लेट ही बदललीये.आ...आणि बाकी..."
"बास्स... जेवढं भुंकायाला सांगितलंय तेवढच भूंकायचं फालतूची बडबड नकोय."
"ठीक आहे सर. सॉरी सर."
"तुला तुझे पैसे मिळालेत, आता लगच्या लगेच शहरातून गायब व्हायचं."
"हो सर."
"आणि जर स्वप्नात सुद्धा कुठे तोंड उचकटायचा विचार केलास, तर तुझ्या घरी दोन मूलं आणि तुझी बायको आहे हे लक्षात ठेव,आणि मी काय करू शकतो याचा एव्हाना तूला अंदाज अलाच असेल."
"ना...नाही सर आईशप्पथ! मी कुणालाही काहीही सांगणार नाही अगदी जीव गेला तरी."
" ह्म्म्म्म्म्म... गूड."
पलिकडच्या राक्षसाने गालातल्या गालात हसत फोन कट केला...
फोन कधीच कट झाला होता पण त्याच्या पांढऱ्या फटक पडलेल्या चेहऱ्यावर अजून ही घामाचे ओघळ वाहत होते,घसा कोरडा पडला होता आणि काळजातली भीती डोळ्यात स्पष्टपणे तरळली होती.काहीही करून त्याला त्याच्या कुटुंबासोबत लवकरात लवकर त्या राक्षसापासून जितकं होईल तितकं दूर जायचं होतं कायमचं...

*** दोन दिवसानंतर***

"हो सर.आणि ज्यांची नावे रेड लिस्ट मध्ये आहेत त्यांच्या सेक्युरिटी मध्ये वाढ करा.आणि आज तो त्याचा दुसरा बळी घेईल हा निव्वळ अंदाज आहे, पण आपण रिस्क घेऊ शकत नसल्यामुळे आपण अलर्ट रहायलाच हवं...
नाही नाही , माझी तब्येत अगदी ठीक आहे सर. तुम्ही नका काळजी करू...हो ... हो...मी पोहोचतोय तिथे थोड्या वेळात...ठीक आहे सर."
खांदा आणि कानाच्या मध्ये फोन ठेऊन बेल्टची क्लिप लावत त्याने फोन कट केला.
आज मंगळवार होता.तो मर्डरर आज खून करेल याची फारशी शक्यता शिव ला वाटत नव्हती,पण काही गोष्टी अशा नक्कीच होत्या ज्या या संशयाला दुजोरा देत होत्या त्या मर्डररचं शनिवारीच पोलिसांना पुढच्या खुनाची चाहूल देणं हे एक त्यातलं मोठं कारण होतं.
"अहो! मी काय म्हणतीये आज खरंच जाणं गरजेचं आहे का? अजून नीट बरे सुद्धा झाला नाही आहात तुम्ही.ऐका ना माझं आज नका ना जाऊ अनिश भावोजीही आज सोबत नाहीयेत तुमच्या."
वैदहीची काळजी तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती.
शिव वैदहीकडे वळला.
"असं काय करतीयेस वैदही? काल समजावलंय ना तुला? अगं अगदी ठणठणीत आहे मी."
"पण..."
"आता पण नाही आणि बिन नाही. अजिबात घाबरु नकोस मी ठीक आहे ok?"
शिव वैदहीचा चेहरा ओंजळीत घेत म्हणाला.
"पण मी दर तासाने फोन करेन विसरू नका."
"नाही विसरणार."
शिव अलगद तिच्या कपाळाचे चुंबन घेत बोलला.
"चल येतो मी. Bye."
"ऐका. ना."
शिव दरवाजापर्यंत पोहचला होता इतक्यात वैदहीने त्याला आवाज दिला.
"हा बोल ना."
शिव मागे वळत म्हणाला.
" लवकर या."
शिव ने स्माईल दिली आणि तो घराबाहेर पडला.
"सॉरी सर! थोडा लेट झाला.ते actually ऑटो मिळत नव्हती." शिव पोलिस स्टेशनच्या बाहेर उभ्या असलेल्या इन्स्पेक्टर सरनाईकांकडे येत म्हणाला.
"नाही, काही हरकत नाही.आता तब्येत कशी आहे तुमची?"
इन्स्पेक्टर सरनाईकांनी हात मागे घेत विचारलं.
"उत्तम आहे सर." शिव ने स्मित केले.
"आणि मिस्टर देशमुख ? ते कसे आहेत?"
" तो ही ठीक आहे. डॉक्टर म्हणालेत महिन्याभरात होईल कव्हर तो."
"ठीक आहे. चला आपल्याला तातडीने निघायला हवं ."
इन्स्पेक्टर सरनाईक गाडीचा दरवाजा उघडत म्हणाले."
"का? म्हणजे तुम्ही काही बोलला नाहीत मला मघाशी फोनवर."
शिव बुचकळ्यात पडत म्हणाला.
"बसा सांगतो."
इन्स्पेक्टर सरनाईक शांतपणे उद्गारले.
शिवही घाईने गाडीत बसला सोबत अजून काही पोलिस बसले आणि आणि तीन गाड्या पोलिस स्टेशनच्या गेटबाहेर पडल्या.
"थोड्याच वेळापूर्वी त्या मार्डररचा पुन्हा फोन आला होता." इन्स्पेक्टर सरनाईकांनी बोलायला सूरवात केली.
"काय म्हणाला तो?"
शिव कान देऊन ऐकत होता.
"आगामी निवडणुकीच्या प्रचारारर्थ मा.पर्यावरण व विकास मंत्री विलासराव सावंत बिंदू चौकात प्रचारसभा घेणार आहेत तिथेच त्यांचा काटा काढणार असल्याची धमकी त्याने दिलीय."
इन्स्पेक्टर सरनाईक गंभीरपणे म्हणाले.
"याचा अर्थ हा माथेफिरू सत्ताधारी आणि विरोधी दोन्ही पक्षाच्या नेत्यांना टार्गेट करतोय तर." शिव स्वतःशीच म्हणाला.
"पण मग तुम्ही त्यांना प्रचारसभा रद्द करायला सांगितली नाही का?"
"अहो ऐकतील ते मंत्री कसले? त्यांचं म्हणणं आहे की हा विरोधी पक्षाचा डाव आहे प्रचारसभा रद्द करण्याचा.त्यांना धोक्याची पूर्वसूचना दिली तर ते म्हणतात 'तुम्ही काय मग फक्त हातावर हात ठेऊन बसण्यासाठी पगार घेता काय मग सरकारकडून?'"
इन्स्पेक्टर सरनाईक हताशपणे थोड्याशा वैतागलेल्या सुरात म्हणाले.
गाडीमधून झाली उतरताच शिव ने चारी दिशांना नजर फिरवली.सभेची पूर्वतयारी चालली होती कार्यकर्ते तयारीच्या लगबगीत होते साऊंड सिस्टीम वर पक्षाची गाणी वाजवली जात होती.पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात होता. बॉम्बशोधक पथक,श्वान पथक ही मंडळीसुद्धा आपापलं काम करीत होती.
सभेची वेळ झाली मंत्री महोदयांची गाडी फटाक्यांच्या दूधी धुराला चिरत स्टेज जवळ आली. त्यांचं स्वागत, घोषणा, आमदारांचं स्वागत इत्यादी सोपस्कार पूर्ण झाले आणि नेत्यांच्या जोशपूर्ण भाषणांना सूरवात झाली. मोठ मोठी आश्वासनं,विरोधी पक्षाची खरडपट्टी, विरोधी नेत्यांची मापं काढणी ,झालेल्या विकासकामांची मांडणी आदी रितीरिवाज यशस्वीपणे पार पडत होते.
शिवला यामध्ये काडीचा रस नव्हता.तो सावधपणे प्रत्येक गोष्टीचं निरीक्षण करत होता पण अद्याप काहीच घडलं नव्हतं...इतक्यात बंदुकीच्या गोळीचा आवाज झाला आणि प्रचंड गदारोळ,पळापळ,गोंधळ उडाला लोक दिसेल त्या दिशेने धावायला लागले.सुदैवाने त्याचा नेम चुकला होता.गोळी मंत्री महोदयांच्या बाजूला डागली गेली होती.त्यांच्या अंगरक्षकांनी त्यांना घेरून सुखरूप बाहेर नेलं.पोलिस त्या हल्लेखोराला पकडणार इतक्यात त्याने एका १२ -१३ वर्षाच्या मुलाच्या कानशिलावर बंदूक ताणली.
"खबरदार जर पुढे याल तर याच्या डोक्याच्या चिंधड्या उडवेन."
तो हल्लेखोर जोराने ओरडत धमकी देत होता.तो मुलगा अर्थातच प्रचंड भेदरला होता.
"हे बघ, त्याला सोडून दे त्याला ओलीस धरून काहीही फायदा नाहीये तुला पळून जायला कोणताही मार्ग नाहीये." एक अधिकारी त्याच्यावर बंदूक ताणून बोलत होते.
"मी शेवटचं सांगतोय दूर व्हा गन्स खाली करा जर याचा जीव गेला तर त्याला फक्त तुम्ही जबाबदार असाल."
त्याने पुन्हा धमकी दिली.
"गन्स खाली करा." अधिकाऱ्यांनी सगळ्यांना सूचना केली.सगळ्यानी गन्स खाली केल्या.
"कोणतीही चालाखी नाही चालणार.मागे व्हा... मागे व्हा म्हटलं ना?... व्हा मागे..."
तो जोर जोरात ओरडत होता.अशावेळी कोणालाही जोखीम पत्करून चालणार नव्हती कारण एक लहानशी चूक ही त्या बिचाऱ्या मुलाच्या जीवावर बेतली असती.
"ए... मागे व्हा म्हटलेलं कळत नाही का तुम्हाला? मागे व्हा..."अजून एक जण ओरडत बंदूक पोलिसांवर ताणत पुढे आला आणि त्या हल्लेखोराच्या शेजारी जाऊन थांबला. त्याला पाहून इन्स्पेक्टर सरनाईक गोंधळात पडले कारण तो दुसरा मनुष्य दुसरा तिसरा कुणी नसून प्रायव्हेट डीटेक्टिव्ह शिव पटवर्धन होता पण तो नक्की करत काय होता ? शिव ला अचानक आलेलं पाहून हल्लेखोर स्वतः गोंधळात पडला होता. शिव अगदी त्याच्या जवळ आला होता आणि हल्लेखोराचं लक्षं पुढे होतं इतक्यात क्षणाचाही विलंब न लावता शिव ने त्याच्या हातातली बंदूक हिस्कावली.आणि त्याच्यावर विजेच्या चपळाईने झडप घालून त्याला खाली पाडलं.हे सगळं इतक्या अनपेक्षितपणे आणि वेगाने झालं की कुणाला विचार करायला वेळच मिळाला नाही.काही क्षणांत ७-८ पोलिस त्यांच्याकडे धावले आणि हल्लेखोराला ताब्यात घेतलं बाकीच्यांनी मुलाला ताब्यात घेतलं. सारं... सारं १०ते १५सेकंदात झालं.एवढ्या वेळात शिव त्या हल्लेखोराजवळ गेला काय,त्याची बंदुक हिसकावली काय,नी त्याला खाली पाडलं काय.सगळं इतक्या पटकन झालं होतं.परिस्थिती हळूहळू नियंत्रणात आली.
"Well Done मिस्टर पटवर्धन!" खरंच कमाल केली तुम्ही पोलिस अधीक्षक शिव सोबत handshake करत म्हणाले. ते घाईत होते पण जाता जाता त्यांनी शिवचं कौतुक केलंच.

आपण त्या माथेफिरुचा डाव उलथवून लावला याचा त्याला आनंद झाला.

"Thank you so much मिस्टर पटवर्धन. आज तुमच्यामुळे खूप मोठा अनर्थ टळला." पोलिस स्टेशन मध्ये इन्स्पेक्टर सरनाईक चहाचे घोट घेत शिवचं तोंड भरून कौतुक करत होते."पण मला एक कळालं नाही पटवर्धन, तुम्ही त्याच्या जवळ गेल्यानंतर त्याने तुमच्यावर विश्वास कसा ठेवला?" इन्स्पेक्टर सरनाईकांनी आपली शंका बोलून दाखवली.
"अहो, त्याने विश्वास ठेवलाच कुठे होता? तो तर विचारच करत होता की नक्की काय करावं?मी खरंच त्याला साथ द्यायला आलोय की त्याच्यावर चाल करायला आलोय हेच त्याला समजत नव्हतं.जितके तुम्ही सगळे त्या गडबडीत इतक्या गोंधळात होतात तितकाच तो पण होता त्यात तो घाबरलेला आणि प्लॅन बिघडल्यामुळे अस्थिर होता.त्याच्या याच गोंघाळाचाआणि चलबिचलतेचा मी फायदा घेतला ,आणि त्याने काही निर्णय घेण्याअगोदर त्याचावर झडप घातली."
शिव चहाचा घोट घेत म्हणाला.
"बरं आता घाई करायला हवी या कटामध्ये जे जे कोणी शमील होते त्यांची चौकशी वैगरे करायला सुरवात करायला हवी यामध्ये तो एकटा नक्कीच नव्हता."
शिव शेवटचा घोट घेत म्हणाला.
" नक्कीच आता मला तुमची आधीपेक्षाही जास्त गरज लागेल." इन्स्पेक्टर सरनाईक रुमालाला तोंड पुसत म्हणाले.
"नक्कीच सर."
इतक्यात इन्स्पेक्टर सरानाइकांचा फोन खणानला.
"एक मिनिट.." ते फोन उचलत म्हणाले.
"हॅलो"
ककाय? बरं बरं मी पोहोचतोय तिकडे.हा ठीक आहे."
त्यांनी फोन ठेवला त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव आता पूर्णपणे बदलले होते. चेहऱ्यावर काळजीचं मळभ पुन्हा दाटून आलं होतं.
"काय झालं सर? Anything serious?"
शिव ने चिंतित सरनाईकांना विचारलं.
"जनताशक्ती पक्षप्रमुखांची गोळ्या झाडून हत्या झालीये."
इन्स्पेक्टर सरनाईक कपाळावरचा घाम पुसत म्हणाले.
आपण हरलो, असं दाखून पडद्यामागचा सूत्रधार एक मोठी चाल जिंकला होता.हा त्याच्या खेळाचा अंत होता की नुकत्याच सुरू केलेल्या खेळाची पहिली चाल हे येणारा काळच ठरवणार होता...
क्रमशः