Power of Attorney - 2 books and stories free download online pdf in Marathi

पॉवर ऑफ अटर्नी - भाग 2

पॉवर ऑफ अटर्नी   भाग  2

भाग १ वरुन पुढे  वाचा

“विभावरी तू थांब जरा, मला बोलू दे.” काकांनी विभावरीला समजावलं.  

“किशोर साहेब, असं बघा, तुमच्या जवळ ते अधिकार पत्र आणि घराची सेल डिड असेलच ना ? तर दाखवता का जरा ?” काकांनी विचारलं.

“मूळ पेपर बँकेत जमा केले आहेत. झेरॉक्स आहेत. एक मिनीट थांबा दाखवतो.” किशोर म्हणाला

काकांनी कागद पत्रे पाहिली आणि मान हलवली. मग किशोरला म्हणाले

“तुम्ही पैसे कोणाला दिले ?”

“बँकेने सानिका मॅडम च्या नावाने पे ऑर्डर काढला होता. अधिकार पत्रात तसं स्पष्ट लिहिलं आहे की पैसे सानिका ला द्यावेत आणि ते मला मिळाले असे समजावे. Deemed to be received by me. म्हणून. तुम्ही पण तो क्लॉज वाचलाच असेल ना ?” किशोर ने माहिती पुरवली.

“अहो काका माझा फ्लॅट गेला आहे. मी बेघर झाली आहे आणि तुम्ही कसली माहिती गोळा करत बसला आहात ?” विभावरी चा आता तोल सुटला होता. आणि सहाजिकच होतं ते.

“विभावरी, अग शांत हो.” काका म्हणाले. “जे काही कागद पत्र यांनी दाखवले आहेत त्यावरुन एक गोष्ट मला दिसते आहे, ती ही की, तुझ्या मैत्रिणीनी तुम्हा दोघांना गंडा घातला आहे. तिने खोटं अधिकार पत्र तयार केलेलं दिसतंय. मला असं सांग या अधिकारपत्रावर जी तारीख आहे त्या वेळेला तू अमेरिकेत होतीस ना ?”

“काय तारीख आहे ?” – विभावरी.

“२३ एप्रिल २०११” – काका.

“हो. मी तिथेच होती.” विभावरी बोलली.

“अधिकार पत्र नंदुरबार ला केलं आहे. तू कधी  नंदुरबार ला गेली होतीस का ?”–काका.

“छे, कधीच नाही. मला बघू द्या.” – विभावरी.  

विभावरीनी ती power of attorney बघितली आणि ती जवळ जवळ किंचाळीच.

“अग काय झालं ?” काकांनी विचारलं.

“काका हा फोटो बघा. नाव माझंच आहे पण फोटो भलताच आहे.” – विभावरी.

काकांनी पण फोटो बघितला. म्हणाले

“अग हो खरंच की. किशोर साहेब, याच्यावर भलत्याच मुलीचा फोटो आहे हे तुमच्या लक्षात आलं नाही का ?”

“मला कसं कळणार ? मी विभावरी मॅडम ला आजच पाहिलं. या तरी खऱ्या आहेत का ?” किशोर म्हणाला.

विभावरी संतापली. “काय बोलता आहात तुम्ही, मी काय वेडी आहे का? एवढं सामान सुमान घेऊन अमेरिकेतून थेट इथे यायला? या सुलभा काकू इथेच आहेत त्यांना विचारा. त्या सांगतील मी खरी की, त्या फोटोतली मुलगी खरी ते.”

सुलभा काकूंनी मान  हलवली आणि म्हणाल्या

“आम्ही विभावरीला, तिने हा फ्लॅट घेतला तेव्हापासून ओळखतो आहे.”

मग काका म्हणाले

“प्रकरण गंभीर आहे. तूच खरी विभावरी आहे, याचा पुरावा तुला द्यावा लागेल. म्हणजे आपोआपच ते अधिकार पत्र खोटं आहे हे सिद्ध होईल. आपल्याला ताबडतोब पोलीसांकडे जायला हवं. काय किशोर साहेब, तुमचं काय म्हणण आहे यावर ?”

“एकदम बरोबर आहे काका. चला आत्ताच निघू.” किशोरनी ताबडतोब होकार भरला.

“पण असं केल्याने काय होईल ?” – विभावरी.

“पोलिस सानिकाला शोधून काढतील. तिच्या आर्थिक व्यवहाराची माहिती घेतील आणि शिल्लक असलेले पैसे जप्त करतील.” – काका.

“पण यांनी काय होईल ?” – विभावरी.  

“हे बघ जितक्या लवकर पोलिसांना ती सापडेल, तेवढी  जास्त रक्कम वसूल होईल.” काका म्हणाले.   

“पण माझ्या फ्लॅट चं काय ?” विभावरी.  

“जर हे अधिकार पत्र खोटं आहे असं सिद्ध झालं तर हा सगळा व्यवहारच रद्द होईल आणि तुला फ्लॅट वापस मिळेल. पण या सगळ्या गोष्टी चट चट होत नसतात. यात किती वर्ष जातील हे वकिलच सांगू शकेल.” – काका बोलले.

“पण मग मी राहू कुठे ?” – विभावरीला आता प्रश्न पडला.

“सध्या तर आमच्या कडे चल. मग बघू.” – काका.  

“हं, असंच करावं लागणार आहे असं दिसतंय.” विभावरीने परिस्थितीशी समझोता केला.

“चला police complaint करणं जरुरीचं आहे.” असं किशोर म्हणाला आणि मग सगळेच बाहेर पडले.

पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली आणि सांगितलं की ते शक्य ते सर्व प्रयत्न करून सानिकाला शोधून काढतील.

एवढं सगळं झाल्यावर सर्व जण पुन्हा फ्लॅट वर आले आणि विभावरीचं सामान घेऊन काका आणि विभावरी त्यांच्या घरी गेली. किशोर नी आपल्या आईला सगळा वृत्तांत दिला. त्या माऊलीला बिचारीला काहीच कळलं नाही पण आत्ता ताबडतोब आपल्याला घर सोडायचं नाही हे ऐकून तिचा जीव भांड्यात पडला.

दुसऱ्या दिवशी किशोर ने आपल्या मॅनेजर ला ही माहिती दिली. मॅनेजर हे ऐकून वेडाच झाला. त्यांनीच कर्ज पास केलं होतं आणि आता जे कळलं त्यामुळे त्यांच्या गळ्याला फास लागणार होता. तो म्हणाला

“या बदललेल्या परिस्थितीत मला सविस्तर रिपोर्ट हेड ऑफिस ला द्यावा लागणार आहे. There is every chance that your loan will be called off. And you will have to pay back in one stroke.”

“सर, काय सांगता आहात तुम्ही ? इतके पैसे मी कुठून आणणार मी ? माझ्या जवळ एवढे पैसे असते तर लोन कशाला घेतलं असतं ?” किशोर घाबरून म्हणाला.

“मी फक्त शक्यता सांगितली. तुला कर्ज दिल्या मुळे माझ्या गळ्याला पण फास लागणार आहे तो वेगळाच, कदाचित माझं डीमोशन पण होऊ शकतं, याची तुला कल्पना आहे का ?” – साहेब.

“मी काय करू आता ?” किशोर न राहवून बोलला.

“आपल्या दोघांच्याही बाबतीत जे  काही करायचं ते हेड ऑफिसच करेल. आपण, जो काही निर्णय होईल त्याला मान तुकवायची एवढंच करू शकतो.” – साहेब.

“नोकरीवरून काढून टाकतील का ?” किशोर आता खरंच घाबरला होता.

“काहीही घडू शकतं. मी आत्ता या क्षणी काहीच अंदाज बांधू शकत नाहीये.” – साहेब.

किशोर मॅनेजरच्या  केबिन च्या बाहेर आला आणि त्याच्या भोवती लोकं गोळा झाली. आता पर्यन्त पूर्ण बँकेत बातमी पसरली होती. श्रीनिवासन यूनियन लीडर होता. तो जवळ आला. तो आला तसे बाकीचे बाजूला झाले. तो म्हणाला

“किशोर तू काळजी करू नकोस. मी तुझी केस वर पाठवतो. आपले सेक्रेटरी काही ना काही करतीलच या सर्व व्यवहारात तुझी काहीच चूक नाहीये. You are a victim. We will try to save you. Don’t worry.”

श्रीनिवासन च्या आश्वासना मुळे किशोर ला जरा बरं वाटलं. पण मनावर नोकरी जाण्याची धास्ती होतीच. आणि वरतून २० लाख कसे फेडायचे हा ही प्रश्न भेडसावत होता.

आठ  दिवसांनंतर किशोर पोलिस स्टेशन वर गेला.

“साहेब, मी किशोर. आम्ही सानिका बद्दल तक्रार नोंदवलेली होती. काय झालं पुढे काही तपास लागला का ?”

“अहो साहेब, कालच ती मुलगी येऊन गेली. काय तिचं नाव ?” – पोलिस.

“विभावरी.” - किशोर.  

“हां तीच, आज तुम्ही आलात. अहो तपास सुरू आहे. काही कळलं की तुम्हाला सांगूच आम्ही. तुम्ही अशी सारखी सारखी चौकशी केल्याने ती लवकर थोडीच सापडणार आहे ?” पोलिस म्हणाला.

“पण साहेब, लाखों रुपयांचा प्रश्न आहे. उद्या बँकेनी सगळं घेतलेलं कर्ज वापस करा असं म्हंटलं तर आम्ही काय करायचं ? कुठून आणायचे एवढे पैसे ?” किशोरनी आपली व्यथा सांगितली.

“खरय साहेब तुमचं म्हणण, पण ती मुलगी फरार आहे. शोधायला थोडा वेळ तर लागणारच. जर काही प्रगती झाली तर ताबडतोब आम्ही तुम्हाला कळवू. चिंता करू नका.” पोलिसांनी तेच पुन्हा सांगितलं.  

किशोर वैतागला. काहीच प्रगती दिसत नव्हती. तो घरी गेल्यावर आईने विचारलेच

“काय रे गेला होतास का पोलिस स्टेशन मधे ?”

“हो आई, गेलो होतो.” – किशोर.  

“मग काही प्रगती ?” – आई.

“काहीही नाही. “तपास सुरू आहे त्या मुलीचा पत्ता लागला तर आम्ही कळवू” असं म्हणाले.” किशोरनी सांगितलं.

“अरे पण अशी टांगती तलवार मानेवर घेऊन किती दिवस काढायचे ?” – आईचा प्रश्न.

“नशीब आपलं अजून काय म्हणायचं ?” – किशोर हताश स्वरात म्हणाला.

आठ दहा दिवस तसेच गेले. पोलीसांकडून काहीच बातमी आली नाही. एक दिवस लंच टाइम मध्ये किशोर ला काय वाटलं कुणास ठाऊक त्यांनी विभावरीला फोन लावला.

“हॅलो मी किशोर बोलतोय.”

“नंबर save केला आहे तुमचा. बोला. काही कळलं का ?” – विभावरी.

“नाही. कालच गेलो होतो. मला म्हणाले काही प्रगती झाली तर कळवू. सारखे सारखे येऊ नका. आदल्याच दिवशी तुम्ही पण आला होता असं म्हणाले.” – किशोर.  

“हो मला पण तुमच्या सारखंच उत्तर मिळालं. काय करायचं ?” – विभावरी.

“आपण भेटूया का ? अर्थात तुम्हाला जर वेळ असेल तरच.” – किशोर.  

“भेटून काय करणार ?” विभावरीने उलट विचारलं.

क्रमश: ..........

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com

धन्यवाद.