College and fun books and stories free download online pdf in Marathi

कॉलेज आणि गमतीजमती

इंजिनीअरिंग मध्ये परीक्षा आणि लेक्चर्स पेक्षा दोस्तांसोबतची धमाल जास्त लक्षात राहते, हेच खरं!
मुंबईतल्या माटुंगा परिसरात व्हीजेटीआय कॉलेजच्या समोर आमचं आयसीटी कॉलेज होतं. टॅक्सी वाल्याला सुद्धा व्हीजेटीआय च्या समोर आणि डॉन बॉस्को च्या बाजूला असाच पत्ता सांगावा लागायचा. मुकेश अंबानी आमचे माजी विद्यार्थी असं आम्ही अभिमानाने सांगायचो पण हॉस्टेल रूम मध्ये जिओ ला नेटवर्क ही यायचं नाही.

‘मुन्ना’ कॅन्टीन वर आमची मित्रमंडळी पडीक असायची.
हे कॅन्टीन मुन्नानी साधारण ५० वर्षापूर्वी सुरू केलं होतं. आता ते मुन्ना आजोबा झाले होते आणि त्यांची मुलं नातवंडं धंदा पुढे चालवत होते. परिसरातलं वडाचं झाड आणि मुन्ना यांनी किती बॅचेस निघताना पाहिल्या असतील! असो.

आमची छीछोरे टोळी अशीच एकदा मुंबईत नव्या नव्या बनलेल्या मेट्रोने वर्सोवाला गेली होती. १५ च्या आसपास लोक होते. गर्दी गडबडीत ७-८ लोक एका तिकीट काउंटर ला गेले आणि उरलेले लोक दुसऱ्या !! आता आमच्या कडे ३० तिकीटं होती आणि लोक १५!! इतक्या तिकीटांचं करायचं काय असा सर्वाँनाच प्रश्न पडला! मग तिकिटाच्या रांगेत उभे असणाऱ्या प्रत्येकाला आम्ही जास्तीची तिकीटे विकण्यास सुरुवात केली. वर्सोवा हा शेवटचा स्टॉप असल्याने, लोक घ्यायला तयार होईनात! अथक प्रयत्नांनंतर तोट्यात का होईना पण आम्ही सगलीच्या सगळी तिकीटे विकली!! तिकीट काउंटर वरची माणसं देखील आमच्याकडे अगदी कुतूहलाने बघत होती. आजही हा प्रसंग आठवून आम्ही पोट धरून हसतो!

कॉलेज मधले फेस्ट म्हणजे दिवाळी सारखा आनंद असायचा. सगळ्या कॅम्पसभर दिव्यांची माळ, पोस्टर्स, आर्ट क्लब ने बनवलेले वेगवेगळे नमुने, अगदी देखणा दिसायचा आमचा कॅम्पस! गणेशोत्सव, दसरा, दिवाळी सगळे सण हॉस्टेल क्र. ५ मध्ये अगदी धमाक्यात साजरे व्हायचे. हॉस्टेल क्र. ५ हे मुलांचं हॉस्टेल होतं. याच हॉस्टेलच्या शेवटच्या मजल्यावर काही प्राध्यापकही त्यांच्या कुटुंबासोबत राहायचे. या हॉस्टेल ची लिफ्ट हा एक नमुनाच होता. ही लिफ्ट फक्त ५ व्या मजल्यावर थांब्यायची. पण, मुलं शक्ती वापरत त्यांचा मजला आला की हाताने लिफ्ट चा दरवाजा उघडायची!!

आर्ट क्लब सोबत स्पोर्ट्स क्लब, मराठी सांस्कृतिक क्लब, इंग्रजी आणि हिंदी नाटक क्लब असे अनेक क्लब आमच्या कॉलेज मध्ये होते. परीक्षा आणि क्लब चे इव्हेंटस् ह्या दोन्ही गोष्टी एकमेकांशी वर्षभर खो - खो खेळायच्या! एक झालं की एक! कायम चालूच असायचं. ह्या सगळ्यातून दिवसा नाटकाची तालीम, डान्स, गाण्याची प्रॅक्टिस करत रात्र जागून अभ्यास करणी मंडळी होती. अरे हा तर सगळ्यात भाग घेतो तरीही याचा पॉइंटर १० कसा, हा प्रश्न अनेकांना अनेकांबद्दल पडायचा.

अर्थात पदवीदान समारंभाला सुद्धा ही माझ्या वर्गात होती? हेही व्हायचं. आता पदवीदान सोहळ्याला दीक्षांत समारंभ म्हटलं की असं वाटतं कॉलेज आमच्याकडून दक्षिणा म्हणून अंगठा वगरे घेतंय की काय!!

कॉलेज कॅम्पस सोबतच माटुंगा परिसर देखील खूप सुंदर होता! मुंबईत राहण्याची उत्तम जागा वरळी, दादर, साऊथ बॉम्बे नसून माटुंगा आहे हे आमचं ठाम मत असायचं.

दाक्षिणात्य पद्धतीचं मंदिर, देरासर, सुगंधी फुलांचा बाजार, आणि दक्षिण भारतात सुद्धा मिळणार नाही अशी स्वादिष्ट पोडी इडली, तुप्पा डोसा आणि फिल्टर कॉफी हे माटुंग्याचं वैभव होतं, आहे. नर्मदा पार्क हे फ्लायओव्हर खाली चालण्यासाठी बांधलेलं उद्यानही फार सुंदर आहे. नर्मदा नदीच्या आकाराप्रमाणे त्याचा ट्रॅक बनवलाय.
कोलार इराणी कॅफे मध्ये अनेकदा मालिका, सिनेमाचं शूटिंग व्हायचं पण कुठल्याही कलाकाराला पाहणं आमच्या नशिबात नव्हतं.

कॉव्हिड मुळे आमची दोन वर्षे वाया गेली त्याचं दुःख नेहमी आमच्या मनात राहीलच पण जो काही काळ आम्ही सोबत घालवला, त्या असंख्य आठवणी अगदी जन्मभर पुरण्यासारख्या आहेत!
माझ्या मते कॉलेज म्हणजे आयुष्यातला सगळ्यात हॅपनिंग काळ आहे. जॉब आणि जबाबदारी चालू होण्याआधीचा जीवनातला सगळ्यात महत्त्वाचा टप्पा!

मग रूटीन ची सवय लागून जाते पण मध्येच कधीतरी वाटतं, ‘वो दिन भी क्या दिन थे...’!