Maharani Durgabai books and stories free download online pdf in Marathi

महाराणी दुर्गाबाई

महाराणी दुर्गाबाईलाही विसरुन चालणार नाही.

हे स्वराज्य फुकट झाले नाही. या स्वराज्याच्या निर्मीतीसाठी कितीतरी लोकांनी कार्य केले. त्यात येशूबाई, ताराबाई व्यतिरीक्त दुर्गाबाईचेही योगदान मोलाचे आहे. आपल्याला येशूबाई माहीत आहे. ताराबाई माहीत आहे. परंतु दुर्गाबाई म्हटलं तर विचार येतो की ही दुर्गाबाई कोण असावी? तसं पाहता दुर्गाबाई बद्दल वाटतं की इतिहास हा दुर्गाबाईबद्दल बागुलबुवा तर करीत नाही? खरंच होती का दुर्गाबाई की ते पात्र उभं केलं गेलं? असाही खेळ दुर्गाबाईच्या अस्तीत्वाबाबत खेळला जातो.
नाही. दुर्गाबाईबद्दल इतिहास बागुलबुवा करीत नाही. दुर्गाबाई अस्तीत्वात होती हे त्या काळातील संबंधीत कागदपत्रावरुन सिद्ध होतं. आता दुर्गाबाई कोण? असा आपल्याला प्रश्न पडलाच असेल.
दुर्गाबाईही रुस्तमराव यशवंतराव जाधवांची मुलगी. तिचा विवाह सन १६७५ ते १६७८ दरम्यान. जन्माची नोंद नाही व मृत्यूच्याही नोंदी नाहीत
संदर्भ ग्रंथावरुन जाणवतं की दुर्गाबाईचा विवाह राजे संभाजीशी झाला. त्यानंतर ते व येशूबाई श्रृंगारपुरात सन १६७८ ला गेले. त्यावेळेस शिवाजी महाराज जिंजीच्या मोहिमेवर होतं. म्हणतात की त्याचवेळेस दुर्गाबाई गरोदर होती. म्हणूनच जिंजी मोहिमेवर असतांना शिवाजी महाराजांनी दुर्गाबाई व संभाजीला जिंजी मोहिमेवर नेले नाही.
शिवरायांनी मुळातच संभाजी राजांना व महाराणी येशूबाई व दुर्गाबाईला रायगडावर न ठेवता जिंजी मोहिमेवर का आणलं? त्याचंही एक कारण आहे.
ज्यावेळेस शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि जिजाबाईचा मृत्यू झाला. त्यावेळेस शिवाजीची पत्नी सोयराबाई या राजमाता बनल्या. परंतु युवराज पदाबाबत वाद सुरु झाला. त्यावेळेस पुत्रलालसेने सोयराबाई आपल्या मुलाला म्हणजे राजारामास युवराज बनवावे अशी म्हणत होती. तर खुद्द शिवाजी महाराज संभाजी जेष्ठ असल्यानं संभाजी महाराजांना युवराज बनविण्याचे स्वप्न पाहात होते. असा हा गादीचा वादनव्हे तर गादीच्या वारसाबद्दल शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर निर्माण झालेला प्रश्न. त्यावर उपाय म्हणून शिवाजी महाराजांनी नवीन राजधानी निर्माण करायचे ठरवले. त्यातूनच ते संभाजी महाराज व त्यांच्या दोन्ही पत्नींना घेवून जिंजीकडे निघाले. त्यातच दुर्गाबाई गरोदर राहिल्यानं व त्या मोहिमेत सुरक्षीतता नसल्यानं शिवाजी महाराजांनी दुर्गाबाई व येशूबाईस येशूबाईच्या माहेरी ठेवलं आणि त्यांची काळजी घ्यायला संभाजीलाही ठेवलं.
स्वराज्यात निर्माण झालेला तो गादीचा वाद. तो वाद औरंगजेबाचा सरदार दिलेरखानासही माहीत होता. तसे संभाजी राजे त्या वादानं निराशच होते. तसे शिवाजी महाराज जिंजीला जाताच त्याच वादाचा फायदा घेवून दिलेरखानानं संभाजीशी संधान साधलं व संभाजीला हुल देवून त्यांनी संभाजीला आपल्याकडं वळवलं व संभाजीही त्याच दुर्गाबाईच्या गरोदर पणातच दिलेरखाला जावून मिळाले. पुढे जेव्हा शिवाजी महाराज मरण पावले. तेव्हा परत गादीचा प्रश्न उफाळून आला. त्यावेळेस राजाराम लहान असल्यानं स्वराज्यात राजगादीवर कोणाला बसवावं? असा तो प्रश्न. शेवटी मराठे सरदारांनी संगनमत करुन संभाजीला तशी सुचना पाठवली व सूचनेनुसार संभाजी शिताफीनं दिलेरखान छावणीतून परत आले. परंतु त्यावेळेस संभाजी समोर प्रश्न होता की आपल्या गरोदर पत्नीला कसं आणायचं? कारण दिलेरखान छावणीत सक्त पहारा होता व त्यांनी दुर्गाबाईला तशा अवस्थेत आणायचं टाळलं. कदाचीत त्यांना वाटत असेल की मी शिताफीनं निसटून जावू शकेल. परंतु जर पत्नीला नेलं तर कदाचीत सापडून जाईल व मलाही शिताफीनं निसटता येणार नाही.
संभाजीचा तो विचार..... त्यातच पुढं मागं मी माझ्या या दुर्गाबाईला मुघलांच्या कैदेतून बाहेर काढेल. असा विचार करुन संभाजीनं दुर्गाबाईला तिथंच ठेवलं व ती मुघलांच्या कैदेत पडली. त्यानंतर संभाजीनं तिची कैदेतून मुक्ती करण्यासाठी बरेच प्रयत्न केले. परंतु त्यात त्यांना यश आले नाही. त्यानंतर संभाजीची हत्या झाली व ती हत्या होताच दुर्गाबाईकडं कोणीही लक्ष दिलं नाही. ती शेवटपर्यंत कैदेतच राहिली.
स्वराज्य निर्माण करतांना शिवरायांना जेवढा त्रास झाला असेल, त्याही पेक्षा कितीतरी जास्त प्रमाणात त्रास स्वराज्य टिकवितांना त्यांच्या वंशजांना झाला. बिचा-यांनी आपल्या रक्ताचं पाणी पाणी केलं होतं हे स्वराज्य टिकवितांना.
या स्वराज्य स्थापन करण्याच्या काळात एवढी मातब्बर मंडळी मरण पावत होती की त्यांची गणतीच करता येत नाही. सामान्य लोकांची तर नाहीच नाही. सामान्य मंडळी ही तर कच-यासारखी मरण पावत होती. तेच पाहिलं शिवरायांनी आणि त्याच आधारावर शिवरायांनी स्वराज्य स्थापन केलेलं होतं. या स्वराज्याला केवळ आदिलशाही, निजामशाही आणि मुघलशाहीनंच त्रास दिला नाही तर पुढं इंग्रजांनीही त्रासच दिला. तसं पाहता इंग्रजांच्या काळातही माणसं किड्यामुंग्यासारखी मारली गेली होती. यात स्वराज्यासाठी लोकं परकीय सत्तांशी लढले व मरण पावत गेले किड्यामुंग्यांसारखी.
आज विचार करता लोकांना त्या बलिदानाचा विचार येत नाही. त्यांनी केलेले कार्यही यांना आज आवडत नाही. तसंच आजची परिस्थिती पाहता असं वाटायला लागतं की लोकं त्यांचे बलिदान विसरले आहेत आणि विसरले आहेत संभाजी, राजाराम आणि त्यांच्या वंशजांचं बलिदान. तसेच विसरले ते शाहू, येशूबाई, दुर्गाबाई व शाही परीवारांची कैद की ज्यांनी स्वराज्य अबाधीत ठेवण्यासाठी नाही तर लोकांना स्वराज्यासाठी वा आपल्या हक्कास लढण्यासाठी तशा हालअपेष्टा सहन केल्या. आपल्याला प्रेरणा दिली.
येशूबाई मरण पावली. त्यानंतर काही दिवसानं ताराबाईही. तसा तो शाही परीवारही. आज त्यांचा शाही परीवार जीवंत नाही. परंतु त्यांनी केलेलं कार्य आजही जीवंत आहे. येशूबाई व ताराबाई या दोघ्याही जणी आजही स्मृतीत आहेत लोकांच्या. कारण त्यांच्या पाऊलखुणा आजही ऐतिहासिक लिखाणाच्या स्वरुपात, दस्तावेजाच्या स्वरुपात वा ते त्यांच्या समाधीच्या अवशेषाच्या स्वरुपात जीवंत आहेत. तशी दुर्गाबाईही मरण पावली. परंतु ती आज विस्मृतीत गेली आहे. ती इतिहासकाराच्या लिखाणाच्या स्वरुपानंही मागं आहे आणि अवशेषांच्या रुपानं मागं आहे. कारण तिच्या अस्तित्वात असल्याचं लिखाण आज जास्त प्रमाणात उपलब्ध नाही वा तिची समाधीही आजपर्यंत अस्तित्वात असलेली आढळली नाही वा कोणी तिची समाधी शोधण्याचा प्रयत्नही केला नाही. जशी महाराणी येशूबाईची समाधी आजपर्यंत दिसत नव्हती तशी. यावरुन तिच्या कर्तृत्वाची किंमत कमी होत नाही. तिनं जरी स्वराज्यासाठी काही जरी केलं नसेल, तरी तिनं स्वराज्यासाठी शोषलेला तब्बल एकोणचाळीस वर्षाचा तुरुंगवास आजही महत्वाचा वाटतो. तीच बाजू हेरुन आगामी काळात येणा-या वा जन्म घेणा-या इतिहासकारांना आमची विनंती आहे की जशी आपण आज महाराणी येशूबाईची समाधी आजच्या इतिहासकारांनी शोधली. तशी आगामी काळात आपणही दुर्गाबाईची समाधी शोधावी. जेणेकरुन तिच्याही अस्तित्वाची साक्ष पटेल.
महाराणी येशूबाई, महाराणी ताराबाई व महाराणी दुर्गाबाई या हिंदवी स्वराज्याला लाभलेल्या अनमोल ऐतिहासिक स्रियांपैकीच एक होत्या. काळानं त्यावर पडदा टाकला व त्यांना झाकून ठेवलं आहे. तोच पडदा आपल्याला काढायचा आहे व अंधारात बरबटलेल्या या डोळ्यांना त्यांचं अस्तित्व दाखवायचं आहे. जेणेकरुन त्यांच्या या अस्तित्वावरुन आपल्यालाच नाही तर इतरांनाही प्रेरणा मिळेल. हे तेवढंच खरं.

अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३४५९४५०