Bhagy Dile tu Mala - 20 books and stories free download online pdf in Marathi

भाग्य दिले तू मला - भाग २०

जो तूट गये है उन्हे क्यू जोडना
जो रुठ गये है उन्हे क्यू मनाना
अगर साथ नही दे सकते मुश्किल हालात में
तो हमको फिकर है आपकी ये फिर कभी ना केहना…

आयुष्यात संघर्ष प्रत्येकाच्या वाट्याला येतो. जो हा संघर्ष सोडून दूर पळायचा विचार करेल तो कधीच यशस्वी होत नाही. एक वेळ दुःखांना हिमतीने तोंड देणारी स्वरा आज स्वतःच हरली होती. स्वरा उठून उभी राहू शकत होती पण का कळेना तिने स्वतःलाच अपंग बनवून घेतलं होतं. कधीही लोकांच्या शब्दांकडे लक्ष न देणाऱ्या स्वराला आता लोकांचे शब्द घायाळ करून जात होते. ती स्वतःच हिम्मत हरली होती. तिच्या आयुष्यातला एक एक दिवस, एक एक व्यक्ती असा येत होता जो तिलाच चुकीचं ठरवत होता आणि स्वरा या सर्वात स्वतालाच दोषी समजत होती. कधीतरी आई-वडिलांची स्वप्नं पूर्ण करण्यासाठी धडपड करणारी स्वरा आज एका घरात कैद झाली होती आणि तिला विविध विचारांनी ग्रासलं होतं. तिची सहन करण्याची शक्ती आता नाहीशी होऊ लागली आणि ती हळूहळू एका निर्णयावर पोहोचू लागली होती. ज्याबद्दल कुणाच्याच मनात तीळ मात्र शंका आली नव्हती.

दिवस बदलायला वेळ लागत नाही. एक वेळ अशी होती जेव्हा तिला दया दाखवणाऱ्याची कमी नव्हती. तेव्हा तिला होणाऱ्या त्रासाशी कुणाला काही घेणं देणं नव्हतं. अगदी प्रत्येक सेकंदाला कॉल्स यायचे नंतर अशी एक वेळ आली की जेव्हा तिला सर्वात जास्त मदतीची गरज होती तेव्हाच सर्वांनी पाठ फिरवली. मग मित्र मंडळी असो, महिला शक्ती मोर्चा असो की जगातले इतर लोक. सर्वच तिला सोडून, आपापल्या कामात बिझी झाले आणि स्वरा हे नाव, स्वरा हा किस्सा त्यांच्यासाठी भूतकाळात जमा झाला. पूजा तशी कॉल करायची पण नेहमी तिलाही कॉल करण जमत नसे. आई-वडील आधीच दुःखी असल्याने तिला आपल दुःख त्यांच्यासोबत शेअर करणं देखील जमत नव्हतं म्हणून ती एकटीच बसून राहायची. एकटी बसून बसून तिचं डोकं शैतानाच घर बनलं होतं, ज्यात कितीतरी विचार येत होते आणि ते विचार आता तिच्या मनावर हावी होऊ लागले. तिला माहिती होत हे विचार चुकीचे आहेत पण तिचं डोकं आता सकारात्मक विचार करण्याच्या पलीकडे जाऊ लागलं होतं. तिचं मन आणि मेंदू ह्यात युद्ध सुरू झालं. मन म्हणायचं की हे चुकीचं आहे तर मेंदू म्हणायचा हेच बरोबर आहे. तिने ह्यावेळी मेंदूची बाजू ऐकायचा निर्णय घेतला होता. आधीच मनाचं ऐकून कितीतरी निर्णय तिचे फसले होते म्हणून ती काहीतरी वेगळं करण्यास तयार झाली. काहीतरी वेगळं म्हणजे???

क्यूँ धुंडते हो तुम मुझे,
समशान की राख मे ए गालिब
मेरा वजूद तो तुमने,
हर साँस के साथ दफन किया है…

एक महिना होऊन गेला होता. ती घराच्या बाहेर निघाली नव्हती. तिचा चेहरा तिच्यासाठी श्राप बनला होता, त्यामुळे त्या चेहऱ्याला तिने बंदिस्त ठेवण्याचा विचार केला होता. स्वराला लोकांचे शब्द असे जिव्हारी लागले होते की तिने त्यानंतर घराच्या बाहेर पाऊलच टाकले नव्हते. तिचे स्वतःशीच युद्ध सुरू होते तर तिला असं बघून आई-वडील मनातून तुटू लागले होते.

ती सकाळची वेळ होती. स्वराच्या आईने तिला लवकर उठवले. ती खूप दिवसांपासून घरातच बसून होती. आज तिने थोडं बाहेर फिरून यावं म्हणून आईने तिला पहाटे पहाटेच उठवले होते पण स्वराची त्या सर्वांना फेस करायची अजिबात इच्छा नव्हती. बाहेर जायचं म्हणजे लोकांच्या शब्दांना तोंड द्यावं लागेल म्हणून ती नकार देत होती. पण आज स्वराची आई सुद्धा तिचं काहीच ऐकणार नव्हती. शेवटी नाईलाजाने का होईना स्वरा जायला तयार झाली आणि तिने स्कार्फ सोबत घेतला. स्कार्फ म्हणजे अलीकडे तिच्या जीवनाची एक महत्त्वपूर्ण गोष्टच जणू. त्याच्याविना जायचं हा विचारही ती करू शकत नव्हती. पण तिची आई आज वेगळ्याच विचारात होती आणि आईने तोही स्कार्फ तिच्या हातून काढून घेतला. आता विना स्कार्फशिवाय बाहेर जाण्याशिवाय तिच्याकडे दुसरा काहीच पर्याय नव्हता. घरातून तिची बाहेर पडण्याची हिम्मत होत नव्हती तरीही ती निघाली, मनावर दगड ठेवून.

ते उन्हाळ्याचे दिवस होते. वेळ जवळपास सकाळचे साडे पाच वाजले होते. फार गर्दी नव्हती. कुणी सकाळी सकाळीच आपल्या शेतीच्या कामाला निघाले होते तर स्त्रिया आपली सर्व काम आवरत होत्या. त्यामुळे स्वराकडे बघायला कुणाकडेच वेळ नव्हता. लोक आपल्याकडे बघत नाहीत म्हणून ती क्षणभर सुखावली आणि आजूबाजूला बघत, एक एक पाऊल पुढे टाकत ती चालू लागली. एक तर तिला बघायला कुणी नाही आणि बाहेरचं जग बघणे ह्यामुळे तिचा उदासीच्या छायेत लपलेल्या चेहऱ्यावर सहज तेस पसरलं. खूप दिवसाने आज ती बाहेर निघाली होती म्हणून तिचा मूड जरा फ्रेश झाला होता. सूर्यकिरणे हळुवार येऊन तिच्या चेहऱ्याला स्पर्श करू लागली. गावाकडील वातावरण शांत असल्याने थंड वारा कायमच वाहत असे. त्या वाऱ्यांच्या स्पर्शाने तिचं तन, मन खुलवायला सुरुवात केली. एक वेळ अशी होती ती बाहेर यायला नकार देत होती पण आता हेच सर्व तिला आल्हाददायक वाटत होतं. तिला हे सर्व इतकं सुंदर वाटत होतं की तिला समोर चालण्याचा मोह आवरला नाही. काही अंतर समोरच एक ओढा होता. ओढ्यावर चबुतरा बनवला होता, त्यावर ती जाऊन मटकन बसली. क्षणातच पाण्याचा खळखळ करणारा आवाज तिच्या मनाला शांत करू लागला आणि ती त्या प्रवाहाकडे पाहू लागली. स्वराला कायमच निसर्गात राहायला आवडायचं, त्यामुळे हे क्षण तिच्यासाठी खूप खास होते. ती कितीतरी वेळ त्या पाण्याकडेच बघत राहिली, त्यामुळे दिवस उगवून केव्हा लोक रस्त्यावर येऊ लागले तिलाही कळलं नाही.

आता लोकांची रस्त्यावर वर्दळ होऊ लागली आणि स्वराला ते फेस करायच नव्हतं म्हणून ती पटापट पावले टाकत घराकडे निघाली. आतापर्यंत तिचा मूड खूप छान होता पण परत जाताना तो अचानक खराब झाला. कारण तिचा चेंहरा पाहून जवळपास सर्वच तिच्यापासून दूर पळत होते. लहान मुलांनी तर भूत म्हणून इकडे तिकडे पळायला सुरुवात केली. आज पहिल्यांदाच ते तिचा चेहरा बघत होते आणि त्यांना तिचा वीट येऊ लागला. काही लोक तिच्याकडे काळजीने पाहत होते तर काही लोक तिच्यावर जाणून हसत होते. स्वराला ते आता फेस करणं कठीण होत म्हणून ती धावतच घरात शिरली. आईला आपली स्थिती कळू नये म्हणून आजही तिने डोळ्यांतून अश्रू काढले नव्हते, उलट आपण आनंदी आहोत अस दाखवून ती सर्व काम करू लागली.

१२ च्या आसपासची वेळ असेल. स्वराचे बाबा तिला बघून कामावर गेले होते. आई आपले काम आवरत होती तर स्वरा बेडरूममध्ये बसून विचार करत होती. आजपर्यंत तिच्या डोक्यात काही विचार अस्पष्टपणे घर करून होते पण आज जेव्हा ती बाहेरच्या जगात गेली, लोक आपल्याला बघून कसे वागतात हे तिने जेव्हा प्रत्यक्ष पाहिलं तेव्हा त्या अस्पष्ट विचारांना अचानक वाट मिळाली. आजपर्यंत तिला त्या गोष्टीचा विचार करूनही भीती वाटत होती पण आज तोच विचार तिच्या मनाने पक्का करत असताना ती क्षणभर घाबरली नव्हती. उलट तिने हसून ते सर्व स्वीकारलं होतं. आपण जगाला नकोसे झालोय ही भावना तिच्या मनात घट्ट रुजली होती. तिच्यामुळेच लोक तिच्या आई वडिलांना बोलत होते. तिच्यामुळे त्यांना शिक्षा का मिळतेय हा विचार तिच्या मनाला त्रास देऊ लागला म्हणून ह्या सर्वाचा एकच निष्कर्ष तिने काढला होता. तो म्हणजे एकच निर्णय..!!

स्वरा नेहमीप्रमाणे एकटीच बेडरूममध्ये बसून होती. तिच्या आईला तिची कायम काळजी वाटत असे त्यामुळे त्या तिला क्षणभर नजरेपासून दूर करत नव्हत्या. आताही स्वरा काय करतेय म्हणून आई तिला बघू लागल्या. आज स्वराच्या चेहऱ्यावर विलक्षण आनंद होता. आईने तिला ह्याआधी असं कधीच बघितलं नव्हतं. स्वरा आज स्वतःच हिरहिरीने सर्व काम आवरत होती. तिला बघून आईला वाटलं की आज बाहेर फिरून आल्याने तिचा मूड छान झाला आहे म्हणून एक नजर तिच्यावर टाकत त्या घराच्या बाहेर पडल्या. त्या आज बाहेर पडणार तेव्हा त्यांना स्वरा नक्की काय विचार करते आहे ह्याची भनकसुद्धा लागली नव्हती. म्हणून त्या बाहेर निघाल्या होत्या तर स्वराने त्यांना एकदा डोळे भरून बघितलं. तिच्या चेहऱ्यावर आतापर्यंत आनंद होता पण तो आनंद केव्हा अश्रुत परावर्तित झाला ते कळलंच नाही. कदाचित ती त्यांना शेवटच बघतेय हा विचार करूनच तिच्या डोळ्यात अश्रू आले होते.

आई बाहेर जाताच स्वराने घरभर, अंगणात नजर टाकली. तिला आई कुठेच दिसली नाही आणि स्वरा मनाशी ठरवून सावकाश पावले टाकत बेडरूमकडे येऊ लागली. आतमध्ये जाताना तिने आईबाबांच्या फोटोवर नजर टाकली आणि भरलेल्या डोळ्यांनी फोटोला हात लावत म्हणाल , "सॉरी आई, माहिती आहे तुला मी जे करतेय ते आवडणार नाही पण तुम्हाला माझ्या त्रासातून, माझ्या जबाबदारीतून अशीच सुटका मिळू शकते. तुला त्रास होतो हे तू कधीच सांगणार नाहीस पण मी एवढीही निर्लज्ज नाही की आई वडिलांवर आयुष्यभर ओझं बनून राहील. तुम्ही मला मुलगी म्हणून खूप काही दिलं. मी कदाचित काहीच देऊ शकले नाही ह्याची खंत कायम राहील. पण तुमचं उरलेल आयुष्य समाधानाने जगण्यासाठी मी तुम्हाला सोडून जात आहे. मला माफ करशील ना आई? माझा नाईलाज आहे. "

तिने क्षणभर फोटोवर नजर टाकली आणि बेडरूममध्ये पोहोचली. कपाटात असलेली आईची साडी तिने हातात घेतली आणि वर पंख्याला घट्ट बांधली. बेडवर खुर्ची ठेवत तिने पुन्हा एकदा आपल्या आई-वडिलांच्या फोटोवर नजर टाकली आणि क्षणभरही विचार न करता तिने गळ्यात फंदा टाकला. काहीच क्षणात गळ्यावर प्रेशर पडल्याने स्वराचा श्वास जाऊ लागला आणि तिने खुर्चीला लाथ मारली. ती आता फॅनला अडकून झुलत होती. तिचं शरीर तडफडत होतं आणि फक्त काही सेकंद उरले होते तिच्या आयुष्याला, तिच्या यातनामय प्रवासाला. तिचा श्वास जरी जाऊ लागला होता तरीही तिच्या चेहऱ्यावर मरणाची भीती नव्हती. एक एक सेकंद तिला जास्त वाटत होता. ती तिच्या आवडत्या देवाकडे जायला सज्ज झाली होती अगदी काही सेकंदच बाकी होते तेवढ्यात आई बाहेरून आल्या. स्वरा त्यांना कुठेच हॉल मध्ये दिसली नाही म्हणून त्यांनी बेडरूममध्ये प्रवेश केला. बेडरूममध्ये प्रवेश करताच त्यांना वर तडफडणारी स्वरा दिसली. काही क्षण त्यांना तिला बघून डोळ्यासमोर अंधारी आली. स्वराचं तडफडणार शरीर बघून त्यांना घाम फुटला होता आणि त्यांनी तिच्या पायांना घट्ट धरले. आईने स्वराचे पाय घट्ट धरल्याने स्वराचं शरीर स्थिर झालं. तिचे श्वास वाढले होते पण असंच जास्त वेळ तिला धरून ठेवण शक्य नव्हतं त्यामुळे एका हाताने पूर्ण जोर लावून त्यांनी तिचे पाय धरले व आपल्या पायाने खुर्चीला सरळ करु लागल्या. काहीच क्षणात त्यांनी एका हाताने खुर्ची सरळ करण्याचा प्रयत्न केला. तशी स्वरा पुन्हा एकदा तडफडू लागली. आईला पुन्हा काहीच सुचत नव्हतं. त्यांनी पटकन खुर्ची सरळ केली आणि स्वराच्या पायांना त्यावर स्थिर केले. स्वराचे पाय खुर्चीला टेकताच गळ्यावरच प्रेशर कमी झालं. स्वराच्या आईने पटकन दुसरी खुर्ची बेडवर ठेवत उभ्या झाल्या आणि गळ्यातली साडीची गाठ उघडली. गाठ उघडताच स्वरा अलगद बेडवर पडली. तिचे श्वास चालत होते पण तिची संवेदना हरवली होती. डोळे उघडे होते त्यातून तिला आपल्या आईचा चेहरा दिसला, त्यात अश्रू दिसले तरीही ती काहीच बोलली नाही. जिवाच्या आकांताने काही क्षण ती श्वास घेत होती. जेव्हा ती वर अडकली होती तेव्हाही तिला त्रास होत नव्हता. पण आता तिचा चेहरा पिवळा पडला होता. तिने काहीच क्षणात मरण अनुभवलं होतं म्हणून समोरच तिला काहीच स्पष्ट दिसत नव्हतं. काही क्षण तर ती फक्त श्वास घेत होती. आई तिच्याकडे तसंच बघत राहिल्या. स्वराचा जीव वर खाली होताना बघून आई पुरत्या घाबरून गेल्या होत्या. काही क्षण तसेच गेले. स्वरा आता शांत वाटत होती. आईनी तिला पाण्याचा ग्लास हातात आणून दिला. तिनेही क्षणात पाण्याचा ग्लास रिकामा केला. आईने ग्लास बाजूला ठेवला आणि स्वरा नजर चोरून आईला बघू लागली. तेवढ्यात आईने सटकन तिच्या कानाखाली आवाज काढला. आईचा हात इतका जोराने लागला होता की तिच्या गालावर व्रण आले होते. स्वरा आपल्या गालाला हात लावून आईकडे बघत होती तर आपल्याच मुलीला स्वतःच मारून तिची आई स्वतःच रडू लागली. स्वरा आता काहीच बोलत नव्हती आणि आई रडत रडतच म्हणाली, " स्वरा हेच बघायला तुला जन्म दिला होता का? तुला काय वाटत आहे त्रास फक्त तुलाच होतोय आम्हाला नाही? लोक काय काय ते आम्हाला बोलत आहे, आमच्या संस्कारावर, आम्ही तुला दिलेल्या स्वातंत्र्यावर बोट उचलत आहेत. पण तुला एकदाही आम्ही काही बोललो आहे का? कारण आम्हाला माहिती आहे की आमची मुलगी चुकीची नाहीये म्हणून जगाशी तोंड देतोय आणि तू आम्हाला इतकी मोठी शिक्षा देणार होतीस. तू एकदा तरी विचार केलास का तुझ्याशिवाय आमचं कोण आहे? तुला लोकांची मत इतकी महत्त्वाची झाली आहेत का की तुला त्यासमोर तुझ्या आई वडिलांचा संघर्षच दिसत नाहीये. तू सांग ना कुठे चुकलो आम्ही? काय चुका केल्या आम्ही की अशी आम्हाला एकटीच सोडून जात होतीस?"

आई रागात बोलत होती आणि स्वरा रडतच तिच्या कुशीत शिरत म्हणाली, "सॉरी आई, मला नव्हतं सुचत काय करू ते. इतक्या कमी दिवसात इतकं सर्व घडलं की माझं डोकंच काम करत नाहीये. काय योग्य, काय चूक नाही कळत आहे मला. आई आता मी तुमची आधीची स्वरा नाही जी तुम्हाला सांभाळून घेत होती. जी तुमची स्वप्न पूर्ण करणार होती. जी तुमची परिस्थिती बदलणार होती. आता ही स्वरा उरली आहे ती हरलेली, लोकांना क्षणभरही नकोशी झालेली. कुणासाठी माकड, कुणासाठी भूत तर कुणासाठी काय आणि काय…!! आता काहीच राहीलं नाही आधीसारखं. मी तर ओझं झाले आहे तुमच्यावर आणि हे ओझं तुम्ही केव्हांपर्यंत वाहणार ना..!! लोक तुम्हाला काही बाही बोलतात ते नाही ऐकवत मला. आई मी इतकी पण निर्लज्ज नाही की तुम्हाला बोलणं खायला घालेन आणि स्वतः मात्र निवांत बसून राहील म्हणून जात होते हे जग सोडून. गेले असते ना तर जगापासून सुटका मिळाली असती आणि तुमचं आयुष्य छान झालं असतं. तुमच्या आयुष्यात हा डाग राहिला नसता. असा डाग जो कितीही प्रयत्न केला तरी पुसला जाणार नाही. "

तिचं रडणं ऐकून स्वराची आई आता जरा शांत वाटत होती आणि त्यांनी तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवत म्हटले, "आज शेवटच सांगतेय तुला. तू आमच्यावर ओझं नाहीस तर अभिमान आहेस आमचा. तुझ्या येण्याआधी आमची जगात कुठेच ओळख नव्हती. तू आलीस आणि सर्वच बदललं स्वरा. असं म्हणतात की आई-वडिलांमुळे मुलांना ओळख मिळते पण तू तर आम्हाला ओळख दिलीस मग तू आमच्यावर ओझं कसं? मला मातृत्व दिलंस आणि आम्हाला जगण्याची आशा. काही स्वप्नं दिलीस जी तू पूर्ण करणार आहेस. स्वरा आजही आम्हाला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तुझा चेहरा खराब झालाय, जिद्द नाही. मला माहित आहे तू ह्यातून बाहेर निघशील. तू ना त्याला कानफाटात घालून चूक नाही केलीस पण आज जर हे जग सोडून गेली असतीस तर कदाचित हेच सिद्ध झालं असत की चूक तुझी होती. खरंच वाटतं तुला की ह्यात तुझी चूक आहे? आज तू आहेस म्हणून जगाला आम्ही तोंड देतोय पण तू गेल्यावर जेव्हा तुला जग चुकीचं समजेल तेव्हा आम्ही जिवंतपणी मेलो असतो बाळा. माहिती आहे तुला सावरायला वेळ लागेल म्हणून तुला काही म्हणत नाहीये पण मला माहित आहे माझं बाळ इतकं कमजोर होऊ शकत नाही. स्वरा शेवटच सांगतेय की टाकीचे घाव सोसल्याशिवाय जसं दगडाला देवपण येत नाही तसंच जीवन जगताना संघर्ष अटळ आहे. कदाचित तुझ्या आयुष्यात जास्त संघर्ष आहे पण लोकांना दाखवून दे की तू काही चुकीचं केलं नाहीस. तू अजून हरली नाहीस. राज सारख्या पुरुषांना जितके दुःख द्यायचे असेल ते देऊ दे पण माझी स्वरा खंबीर राहून सर्वाना तोंड देईल. कारण आमची स्वरा आमचा अभिमान आहे आणि कायम राहील. तुला नाही विश्वास माझ्या विश्वासावर?"

स्वरा आईला हळूच म्हणाली, "आई चुकले मी..!! काही काळासाठी स्वार्थी बनले होते. नक्की काय करतेय कळत नव्हतं पण आता आलंय माझं डोकं ठिकाणावर. आई मला फक्त थोडा वेळ दे. मी वचन देते तुला की आयुष्यात काहीतरी नक्की करेन आणि असं काही करेन की लोकांना माझ्या चेहऱ्याने फरक पडणार नाही. वचन आहे माझं. "

आईने स्वरावर एकदा नजर टाकली. तिच्या डोळ्यात भीती नक्कीच नव्हती, होता तो विश्वास. आईला पुन्हा एकदा तिच्यात ती आधीचीच स्वरा दिसत होती, जी कुणाला घाबरत नव्हती. तोंडाला तोंड देऊन स्वतःचं स्वातंत्र्य जपत होती. त्यामुळे पुढेे काहीच न बोलता आई आपलं काम आवरायला बाहेर पडल्या. आई बाहेर जात होत्या तर स्वरा आईकडे बघत राहिली होती. एका अशिक्षित आईने तिला जगण्याचा एक मंत्र दिला होता. जो तो आता कुणीच तिच्यापासून हिरावून घेऊ शकणार नव्हते. आई गेल्या आणि तिच्या मनात एकच वाक्य दरवळत राहील, "टाकीचे घाव सोसल्याशिवाय दगडाला देवपण येत नाही."

राख सेही जन्मी हुँ,
राख मेही मिल जाऊंगी…
राख सेही जन्मी हुँ
राख मेही मिल जाऊंगी…

पर उससे पेहले

लिखुंगी एक ऐसा इतिहास के
दुनिया फिर मेरे मोहब्बत में पड जायेगी…

क्रमशः .....