Bhagy Dile tu Mala - 38 books and stories free download online pdf in Marathi

भाग्य दिले तू मला - भाग ३८

तेरा होणेसेही डर लगता है मुझे
सोचो, इजहार करोगे तो कैसा तुफान आयेगा??

पुन्हा एक सुंदर सकाळ. आयुष्यात एक नवीन सकाळ कायमच येत असते. त्यात नवीन काही नसतं पण स्वराच्या आयुष्यात अलीकडे प्रत्येक सकाळ ही काहीतरी घेऊन येत होती. कदाचित तिच्या अपेक्षेपेक्षा जास्त. तिने ह्या काही दिवसात ज्या गोष्टी विचार केल्या सुद्धा नव्हत्या त्या अचानक पूर्ण व्हायला लागल्या होत्या. तिला ती देवाची कृपा वाटत होती पण तिला त्यामागच खर कारण माहिती नव्हत. अन्वयला सर्वच माहिती होत पण त्याला तिच्या आनंदासमोर काहीच नको होतं. कदाचित त्याला तिच्यासमोर व्यक्तही व्हायचं नव्हतं. तो फक्त तीच हसू ओठांवर परत आल्याने खुश होता.

आज स्वरा लवकरच उठून तयार झाली आणि आपल्या नेहमीच्या वेळेवर ऑफिसकडे जाऊ लागली. तिच्या चेहऱ्यावर आज नेहमीपेक्षा जास्तच आनंद होता आणि तो तिच्या चेहऱ्यावर प्रत्यक्ष दिसत होता. ती वसई स्टेशनला पोहोचली. समोर तिला माधुरी दिसली आणि तिला मिठी मारतच स्वरा म्हणाली, " गुड मॉर्निंग मधू! "

माधुरी स्वरा स्टेशनवर आल्यापासून तिच्याकडेच बघत होती. आज तिचा हसण्याचा आवाज इतका मोठा होता की सर्वाना ऐकू जात होता तरीही तिने स्वतःला अडवलं नव्हतं. माधुरी तिला काही क्षण बघतच होती आणि हळूच म्हणाली, " ताई आज काही खास आहे का? नाही म्हणजे इतका आनंद मी तुझ्या चेहऱ्यावर कधी बघितला नाही म्हणून म्हणते आहे?"

स्वराच्या हसण्याचा आवाज अजूनही येतच होता. ती क्षणात हसत म्हणाली," मधू ट्रेन आली आहे."

स्वराच्या शब्दाने तीच लक्ष ट्रेनकडे गेलं आणि दोघीही आता ट्रेन येण्याची वाट पाहू लागल्या. काहीच क्षणात ट्रेन आली आणि दोघीही धावतच चढल्या. स्वराला आता ह्याची सवय झाली होती. स्वरा ट्रेनमध्ये चढली तरीही तिच्या हसण्याचे हलकेसे आवाज माधुरीला येत होते आणि माधुरी म्हणाली," ताई आता सांग काय झालं?"

स्वरा माधुरीचा खांदा पकडत म्हणाली, " मधू मी मुक्त झाले. मी मुक्त झाले!! "

माधुरी क्षणभर तिच्याकडे बघतच होती. तिला स्वरा नक्की काय म्हणतेय ते कळत नव्हतं आणि प्रश्नार्थक नजरेने तिने स्वराला विचारले," कशातून?"

स्वरा आनंदातच म्हणाली," माझ्या आयुष्यातून, रोजच्या जगण्यातून, ऑफिसच्या त्या केबिनमधुन. जिथे रोज कैद्यासारखं जीवन जगाव लागत होतं. कुणी माझ्याशी बोलत नव्हतं पण आता सर्व बदललं मधु मी मुक्त झाले. खरच खूप म्हणजे खूप आनंद होतोय मला."

तीच बोलणं ऐकून माधुरीलाही फारच आनंद झाला होता आणि ती स्वराचा हात हातात घेत म्हणाली," यु डिजर्व धीस ताई!! आता तुझ्या आयुष्यात सर्व काही बदलत चाललं आहें ह्याचा आनंद होतोय. खरच खूप सुंदर बातमी दिली आहेस तू पण मला एक सांग आजपर्यंत ते तुझ्याशी साधं बोलत नव्हते मग अचानक हे सर्व कस घडलं?"

स्वरा हसतच उत्तरली, " माहिती नाही मधू पण मी खूप खुश आहे. "

माधुरी, स्वरा काही क्षण हसतच होत्या. जवळपास वर्षभरानंतर माधुरीला तिच्या चेहऱ्यावर तो आनंद दिसला होता म्हणून तिला आणखि प्रश्न विचारून त्रास द्यायचा नव्हता. जगात प्रत्येक व्यक्तीला वेगवेगळ्या कारणांनी आनंद होतो पण स्वराला मुक्त होण्यातून आनंद मिळत होता मुळात. तो तिचा अधिकार होता तरीही तो तिला दुसर्याकडून मिळवावा लागला होता ह्याच माधुरीला वाईटही वाटत होतं. किती वाईट स्थिती असेल तिची की ती मुक्त झाली म्हणून आनंद साजरा करत होती. आज कितीतरी दिवसाने तीच खळखळून हसन बघून ती आनंदीही झाली होती. स्वरा हसता-हसता काही क्षण शांत झाली आणि विचार करत म्हणाली, " मधू काल मला प्रश्न नाही पडला पण आज लक्षात येतंय. काल ना अन्वय सरांचा वाढदिवस होता. सर्व त्यांचा वाढदिवस साजरा करायला गोळा झाले होते. मी माझ्या केबिनमधून सर्व बघत होते. सर्व काही छान चाललं होतं पण अचानक सर रागावून बाहेर गेले. मला काही कळलं नाही त्यांच्यात काय झालं ते पण मी निवांत बसले आणि काहीच क्षणात सर्व माझ्या केबिननध्ये आले आणि माझी माफी मागू लागले. सडनली कुणीतरी माझा डेस्क बाहेर हलविला. त्यावेळी ते सर्व बघून मी इतकी खुश होते की काही लक्षात आलं नाही."

माधुरी आतां हसतच उत्तरली, " म्हणजे हे सर्व सरांनी केलंय तर?"

माधुरी हसत होती तर स्वरा विचार करत म्हणाली," पण ते का करतील? मला तर ते नीट ओळखतही नाहीत? मग का करतील ते माझ्यासाठी काही? "

स्वराचा गोंधळ उडाला होता तर माधुरी हसतच उत्तरली , "कदाचित प्रेम!! " स्वरा रागाने तिच्याकडे बघतच होती की माधुरी पुन्हा म्हणाली," कदाचित माणुसकी!! "

स्वराकडे त्या एकाही प्रश्नाचं उत्तर नव्हतं पण माधुरीला सर्व कळलं होतं आणि ती हसतच उत्तरली, " मला नाही माहीत ताई सरांनी का केलं ते पण एक सांगेन जो तुला ओळखत नाही, ज्याला तुझ्याशी घेणं देणं नाही तो जर विना सांगता तुझ्यासाठी काहीतरी करत असेल म्हणजे तो मनाने खरच छान आहे. ताई त्याने ते माणुसकीने केलेलं असो की इतर कोणत्या कारणाने पण मी सांगेन तुला की त्याला आयुष्यातून जाऊ देऊ नकोस. अटलिस्ट एक मित्र म्हणून तरी कायम जवळ ठेव त्यांना. काही दिवसापासून मी बघते आहे तुझ्यात बरेच बदल झाले आहेत मला वाटत तेही सरांमुळेच असावेत. काहीतरी आहे सरांमध्ये की त्यांनी तुझ्याही नकळत तुझ्या आयुष्यात आनंदाचे रंग भरले आहेत. मी तुझ्या जागी असते ना तर कदाचित त्यांची मैत्री कधीच सोडली नसती. "

माधुरी बोलत होती तर स्वरा कसलातरी विचार करत बसली होती. तिच्या डोक्यात नक्की काय सुरू आहे हे माधुरीला कळत नव्हतं आणि माधुरीनेही तिला ते विचारलं नाही कदाचित स्वरा आपल्या काही प्रश्नांची उत्तरे शोधत होती. हीच गोष्ट तिलाही जाणवली म्हणून माधुरीने तिला त्रास दिला नाही. आतापर्यन्त हसत असणारी स्वरा अचानक एका विचारात हरवली. ही अन्वयकडे ओढत जाण्याची वेळ तर नव्हती ना?

असाच शांत शांत असण्यात त्यांचा प्रवास सर झाला. माधुरी आपल्या ऑफिसला गेली होती तर स्वरा आपल्या ऑफिसला पोहोचली. विचारात तिचं ऑफिस केव्हा आलं तिचं तिलाही कळलं नाही. ऑफिसला पोहोचताच तिची नजर गेली ती अन्वयच्या केबिनवर. तिला तो कुठेच दिसला नाही आणि तिचा मूडही गेला. गेले कित्येक दिवस त्याला गुड मॉर्निंग म्हणूनच तिच्या दिवसाची सुरुवात होत असे पण आज तो आला नाही आणि तिची सकाळही अपूर्णच असल्याच तिला जाणवू लागल. काहीच क्षण गेले. ती आतमध्ये पोहोंचली. आज सर्वांनी स्वरा आल्यापासून तिला " गुड मॉर्निंग "विश करायला सुरुवात केली. दीपिका, पल्लवीने तिला तर घट्ट मिठी मारली होती म्हणून ती खूप खुश झाली होती. आज पहिल्यांदा तिला सन्मान मिळाला होता ज्याची ती कितीतरी दिवस वाट पाहत होती पण इतका आनंदाचा दिवस असूनही स्वरा फक्त क्षणभर हसली होती. ती सर्वाना " गुड मॉर्निंग " विश करत डेस्कवर पोहोचली. नेहमीप्रमाणे बाप्पाच्या मूर्तीला डोळे मिटून नमस्कार केला. तिने डोळे उघडलेच होते की काकांनी तिच्या समोर कॉफी ठेवली. स्वरा त्यांची काळजी बघून क्षणभर आनंदून गेली. काका परत जाणारच तेवढ्यात तिने विचारले," काका सर नाही आले ना अजून? "

काका क्षणभर उदास होत म्हणाले, " स्वरा मॅडम, सर आज सुट्टीवर आहेत त्यांची तब्येत बरी नाहीये. "

काकांच्या तोंडून उत्तर ऐकताच स्वरा जरा शांत झाली. काकासुद्धा आपल्या कामाला लागले. स्वरा विचार करतच होती की ११ वाजले असल्याचे तिच्या लक्षात आले आणि ती काम करू लागली.

आज स्वरा काम तर करत होती पण तीच लक्ष कामात नव्हतं. ऑफिसचा पहिला दिवस होता जेव्हा तीच कामात मन लागत नव्हत. मधल्या काळात तिने स्वतःला अस सावरलं की त्यानंतर तिला कधीच कुणाचा त्रास झाला नाही पण नेमकी आज तीच स्थिती तिच्यासमोर उभी होती. तिला त्याच कारण कळत नव्हतं तरीही कामात मन लावायचा प्रयत्न करत होती. सकाळची दुपार होऊन गेली पण स्वराचे काम आज नीट होत नव्हते. दुपारची वेळ होती स्वरा आपल्याच विचारात हरवली असताना दीपिका म्हणाली, " स्वरा चल ना जेवण करून घेऊ. "

स्वराला आज भूक तर खूप होती पण जेवण करायची इच्छा नव्हती त्यामुळे ती हळूच म्हणाली," दीपिका आज भूक नाहीये. तू जाऊन करून घे जेवण. "

दीपिका जेवायला गेली तर ती अजूनही तिथेच बसून होती. तिने पुन्हा एक कॉफी मागवली आणि शांत बसून राहिली. लॅपटॉप कदाचित बंद झाला होता पण स्वराचे विचार अजून काही थांबले नव्हते. आज पूर्ण दिवसच तिचा विचार करण्यात जात होता. आज तिलाही बर वाटत नव्हतं. ती बराच वेळ एकटीच विचार करत बसली होती तेवढ्यात दीपिका जेवण करून परतली. स्वराला शांत बघून ती उत्तरली, " स्वरा काय झालं ग केव्हाची अशीच बसून आहेस?"

दीपिकाच्या बोलण्याने स्वराच लक्ष तिच्यावर गेलं. आतापर्यंत तिच्या डोक्यात एक प्रश्न होता आणि दीपिकाला बघताच तिचा चेहरा जरा खुलला होता. दीपिका खुर्चीवर बसलीच होती की स्वरा तिच्याकडे बघत म्हणाली, " दीपिका ताई मला सांग, काल सर रागावून बाहेर गेले तेव्हा काय घडलं होत? "

दीपिका क्षणभर तिच्याकडे बघत म्हणाली, " काही नाही सरांनी आमची चूक आमच्या लक्षात आणून दिली. ते म्हणाले की स्वरा इतके दिवस तुमच्यात आहे तरीही तिच्या भावना समजून घेऊ शकत नाही आणि एका नवीन व्यक्तीसाठी एवढं सर्व करत आहात? हेच आहे का तुमचं प्रेम? ते खूप रागावले हा विचार करून की आम्ही तुला फक्त चेहऱ्यावरून जज केलं. सॉरी स्वरा खरच चुकलो आम्ही. पुन्हा एकदा माफ कर. सर नसते ना तर कदाचित तर आम्हीं ही बंधने कधीच मोडली नसती!!"

दीपिकाच्या उत्तराने स्वराचे विचार हलवून सोडले. तिच्या डोक्यात आता एकच विचार होता," म्हणजे माधुरी खर म्हणाली होती हे सर्व सरांनी केलंय पण का प्रेम की माणुसकी?"

स्वरा आज विचित्र कोड्यात अडकली होती. विचार करून करून आज तीच डोकं काम करत नव्हत. तिला काम करणं असह्य होऊ लागलं आणि आज ती दुपारीच
हाफ डे घेऊन घराकडे निघाली. ती घरीही पोहोचली तेव्हा तो विचार तिच्या डोक्यातून गेला नव्हता. स्वराच्या आयुष्यात पुन्हा एकदा प्रेम हा शब्द आला आणि ती कोलमळली. ते प्रेमच होत ज्याने स्वराच आयुष्य उध्वस्त केलं होतं तेव्हा हाच शब्द पुन्हा तिच्या आयुष्यात येताच स्वराला घाम सुटला. स्वरा घरी तर आली होती पण आज तीच मन स्वस्थ नव्हतं. आज एकच दिवस असा होता जेव्हा ती आनंदीही होती आणि दुखीही. स्वराला कुठल्याही स्थितीत उत्तर हवं होतं नाही तर कदाचित तिला आज झोप लागणार नव्हती.

रात्रीचे ११ वाजले होते. स्वरा अजूनही विचारात हरवली होती. ती बेचैन झाली होती. तिला काय करू काय नाही अस वाटत होतं तेव्हाच तिने बाजूला पडलेला फोन हातात घेतला आणि एक मॅसेज टाइप केला. " मधू जागी असशील तर कॉल करू का प्लिज? "

स्वरा रिप्लायची वाट पाहत होती पण तिला काही रिप्लाय येत नव्हता. आता १० मिनिट झाले होते. स्वराला रिप्लाय येण्याची काही चिन्हे दिसेना म्हणून तिने मोबाइल बाजूलाच फेकून दिला तेव्हाच तिचा फोन वाजला. माधुरीचा समोरून कॉल येताच स्वराचा चेहरा उजळून निघाला. तिने पटकन मोबाइल हातात घेत कॉल रिसिव्ह केला आणि पटकन बोलून गेली, " इतका उशीर का मधू? "

माधुरीही हळुवार आवजात बोलून गेली," अग टेरिसवर आलेय बोलायला. एवढ्या रात्री कॉल काही झालय का ताई? तू ठीक तर आहेस ना? "

स्वरा घाबरतच म्हणाली, " नाहीये मी ठीक. बेचैन वाटत आहे खूप. झोप लागत नाहीये की काही नाही."

स्वराच्या आवाजात भीती जाणवत होती शिवाय तिचा आवाज भीतीने कापू लागला होता म्हणून माधुरी घाबरतच म्हणाली," काय झालंय ताई? काही सिरीयस आहे का? "

स्वरा अडखळत बोलून गेली, " मधू तू म्हटलं ते खरं होत!! हे सर्व सरांनीच केलं. मला जेव्हापासून हे समजलं तेव्हापासून भीती वाटतेय खूप. एक प्रश्न सतत त्रास देतोय."

माधुरी हळुवार स्वरात उत्तरली," कुठला प्रश्न?"

स्वराही हळुवार आवाजात उत्तरली," त्यांनी हे माणुसकीच्या नात्याने केलं की प्रेम? माणुसकीच्या नात्याने केलं असेल तर ठीक आहे पण प्रेम?? "

ती क्षणभर शांत झाली. तिचा श्वास लागला होता. तरीही स्वतःच्या आवाजावर नियंत्रण आणत ती म्हणाली, " मधू नाहीये माझ्यात हिम्मत प्रेम करण्याची. आयुष्यात प्रेमामुळे इतकं काही गमावल आहे की आता तो विचारही नकोसा होऊन जातो. नकोय मला हे प्रेम मधू!! नकोय मला खूप भीती वाटते प्रेमाची. "

माधुरी क्षणभर विचारच करत होती. तिला नक्की काय बोलू तेच कळत नव्हतं तरीही स्वतःला सावरत ती म्हणाली, " ताई मग तुला फोर्स कोण करत आहेत? त्याने तुला विचारलं सुद्धा नाहीये अजून. तू खूप पुढचा विचार करत आहेस ताई आणि समजा विचारल तरीही तू नकार देऊ शकतेस त्याला."

स्वरा घाबरतच उत्तरली, " मी नकार दिला आणि त्यानेही राज सारख काही केलं म्हणजे?"

स्वराचा हा असा एक प्रश्न होता त्याच उत्तर कुणाकडेच नव्हतं तर मग एवढ्या लहान माधुरीकडे कस असणार? ती काही वेळ शांत होती. स्वरा तिकडे घाबरली होती म्हणून माधुरीला तिला समजावीने गरजेचे होते आणि माधुरी हळुवार आवजात उत्तरली," ताई प्रत्येक व्यक्ती नसतो ग तसा!! त्याला जर तुझ्यासोबत वाईट करायचं असत तर त्याने तुझ्यासाठी एवढं चांगलं केलंच नसत तेही अपेक्षेविना! कळत आहे का तुला मी का म्हणतंय?"

स्वरा घाबरतच उत्तरली, " राजनेही विना सांगताच सर्व केलं होतं मधू म्हणून जरा भीती वाटतेय. जरा नाही खूप भीती वाटतेय!!"

स्वराने माधुरी समोर असा एक प्रश्न उपस्थित केला होता ज्याच उत्तरं देणं शक्यच नव्हतं. स्वरा घाबरत होती आणि इकडे माधुरीचे हात पाय थरथर कापू लागले होते. काही क्षण सर्व शांत झाल होत. वर असलेलं निरभ्र आकाश, वाहणारी हवा आणि गाड्यांचे कर्कश आवाज. फक्त वाहत होते ते विचार आणि माधुरी हळुवार आवाजात उत्तरली," ताई ह्याच उत्तर माझ्याकडे देखील नाही पण मला एक गोष्टीचा विश्वास आहे की माझी ताई आता कुणासमोर हार मानणार नाही. ती अशा हजारो मुलांना लोळवू शकते. हो ना ताई?"

स्वराच्या तोंडून कसतरी हो निघालं पण तो विचार तिच्या मनातून काही निघणार नव्हता. बऱ्याच वेळपर्यंत त्यांचं बोलणं सुरू होत शेवटी त्यांनी फोन ठेवला. आज इकडे माधुरी झोपली नव्हती तर दुसरीकडे स्वराही झोपली नव्हती. स्वराच्या मनात काही प्रश्न होते," अन्वय नक्की कसा आहे? तोही तसाच तर नाही ना? अगदी राज सारखा? आणि महत्त्वाचं माझ्याही नकळत माझ्यासाठी तो सर्व का करतोय? त्यालाही राजसारखं मला मिळवायच नाही ना? आणि माझी इच्छा नसेल तर? पुन्हा एक नकार आणि नकारातून तेच झालं तर? नाही नाही!! आता माझ्यात हिंमत नाहीये काहिच सहन करायची. खूप केलंय सहन. अन्वय सर का करत आहात तुम्ही हे सर्व?"

पुन्हा एक गजबजलेलं शहर आणि नकळत रोडवर ओरडताना ती स्वतालाच पाहत होती. मनात भीती होती आणि डोळ्यात तो क्षण आणि ओठी एक वाक्य, " माझी काय चूक?? "

हजारो बंदीशो से
एक सजा मेहंगी है
प्यार करणेसे जिंदगी मे
क्या इतनी उलझने मिलनी है?

क्रमशा ....


Share

NEW REALESED