मला स्पेस हवी भाग १३
मागील भागात आपण बघीतलं की नेहा ऋषीला लगेच फोन ठेवायला सांगते. हाॅटेलवर पोचल्यावर ऋषीचा फोन आला तर व्यवस्थीत बोलायचं असं नेहा मनाशी ठरवते.आता बघू नेहा तशी वागते का?
बंगलोरला बस पोचली. नेहाने बॅगा घेतल्यानंतर त्या ट्रॅव्हलच्या ऑफीसमध्ये थांबून हाॅटेलला जायला कॅब बुक केली आणि कॅबची वाट बघत तिथे येणाऱ्या बस आणि त्यातून उतरणारे प्रवासी त्यांची बाॅडी लॅंग्वेज बघत होती. त्यांचे संवाद ऐकत होती. यात वेळ कसा निघून गेला नेहाला कळलं नाही.
नेहाची कॅब आली. नेहाने दोन्ही बॅगा कॅबच्या डिकीत ठेऊन कॅबमध्ये बसली आणि कॅब ड्रायव्हरला ओटीपी सांगीतला. कॅब सुरू झाली. कॅबच्या खिडकीतून बाहेर बघत नेहा बंगलोर शहर नजरेखालून घालत होती पण तिच्या डोक्यात मात्र वेगळेच विचार फेर धरून नाचत होते.
विचार कोणते तर तेच तिचा निर्णय ऐकल्यावर जे पडसाद तिच्या अवतीभवती उमटले . त्यावर इतरांनी दिलेल्या प्रतिक्रिया नेहाला आठवल्या तसा तिने स्वतःलाच प्रश्न केला. आपला निर्णय खरोखरच चुकला आहे का? आपण स्वार्थी झालो का? आपला निर्णय का लोकांना पटला नाही.
तिचं दुसरं मन म्हणालं ,
"तुझा हा निर्णय प्रस्थापित वाटेवरून जाणारा नाही. त्यामुळे सहाजिकच सगळे तुझा निर्णय ऐकून अचंबीत झाले. असा निर्णय घेण्याचा विचार तुझ्या आजूबाजूला राहणाऱ्या व्यक्तिंच्या मनातही येणार नसल्याने ते दिग:मूढ झाले आहेत.फार विचार करू नकोस.तुला जे योग्य वाटतं ते कर."
हा निर्णय घेण्यामागची माझी भूमिका म्हणूनच कोणी समजून घेत नाहीत. माझी भूमिका पूर्ण पणे चुकीची आहे की इतर लोक माझा निर्णय समजून घ्यायला कमी पडतात आहे? नेमकं काय होतंय?
मी हा निर्णय घेतल्याबरोबर सुधीर,त्यांचे आईवडील माझी आई,भाऊ वहिनी सगळ्यांनी मला कटघ-यात उभं केलं एक आरोपी म्हणून.का? प्रत्येक व्यक्तीला तिचं आयुष्य कसं जगायचं हे ठरविण्याचा अधिकार नाही का? समाजाने काही बंधनं टाकली आहेत. कारण समाजातील वातावरण चांगलं रहावं.समाजात अंदाधुंदी माजू नये.
पण जर हीच बंधन माणसाच्या आयुष्यात उलथापालथ घडवत असतील तर ! ही गोष्ट समाज कधीच लक्षात का घेत नाही? प्रचलीत रितीरिवाज मोडणा-यांना समाज लगेच परखडपणे प्रश्न करतो. का? हा निर्णय का? घेतला. आपलं आयुष्य आपल्या टर्मस् वर जगावंस वाटलं तर त्यात काय गैर आहे? नेहा अजून कितीतरी वेळ याच प्रश्नाच्या फे-यात अडकली असती पण तेवढ्यात कॅबवाला म्हणाला
" मॅडम तुमचं हाॅटेल आलं."
कॅबवाल्याच्या बोलण्याने नेहाची तंद्री तुटली.
नेहा बॅगा घेऊन हाॅटेलमध्ये शिरली. हाॅटेलचं प्रथमदर्शनी रूप मोहात पाडणारं होतं. कृत्रीम वेलींना आणि फुलांना हाॅटेलच्या मुख्य दारावर सोडलं होतं. कृत्रिम फुलं असली तरी हिरव्या रंगाच्या पानाला पिवळ्या आणि लाल रंगाच्या फुलांचं काॅम्बिनेशन डोळ्याला सुखावणारं होतं.
हिरव्या पानांमुळे थंडगार वातावरण असल्याचं वाटत होतं.
नेहा आत शिरल्यावर सरळ रिसेप्शन काऊंटरवर गेली.
" मॅडम आमच्या हाॅटेल पॅराडाईज मध्ये तुमचं स्वागत आहे."
काऊंटरवरची मुलगी पाठ केलेलं वाक्य न चुकता म्हणाली.
" थॅंक्यू. माझं बुकिंग झालं आहे."
" नाव सांगता का?"
" हो. नेहा सुधीर आठवले."
" हं. तुमचं आधार कार्ड ."
नेहाने काउंटरवर आपलं आधार कार्ड दिलं.
" मॅडम तुमचा रूम नंबर दोनशे तीन आहे. भास्कर मॅडम चं सामान रुममध्ये घेऊन जा."
" हो. रम नंबर?" भास्करने ओ देत काऊंटरवर येत विचारलं.
" दोनशे तीन. ही घे चाबी."
भास्कर रूमची चाबी आणि नेहाचं सामान घेऊन निघाला. नेहाही त्याच्यापाठोपाठ निघाली.
भास्करने रूम उघडून सामान आत ठेवलं आणि निघताना म्हणाला,
" मॅडम तुम्हाला नाश्ता ,जेवण ऑर्डर करायचं असेल तर नऊ नंबर डायल करा."
" हो. ठीक आहे."
भास्कर गेल्यावर नेहाने रूमचं दार बंद केलं आणि ती आपली रूम बघू लागली. रुमच्या तीन भिंती छान लाईट शेडमध्ये पेंट केल्या होत्या. एका भिंतीवर छान सीनरीचा वाॅल पेपर लावलेला होता. एसी रूम होती. रूमच्या एका बाजूला मोठी खिडकी होती पण एसी रूम असल्याने ती बंद होती. खिडकीला लावलेला झुळझुळीत पडदा भिंतीच्या रंगाला मॅच होईल असा होता.
नेहाने हळूच खिडकीचा पडदा बाजूला करून खिडकीबाहेर बघीतलं. छान हिरवीगार झाडं होती. मधे स्विमींग पूल होता. काहीजण स्विमींगचा आनंद घेत होती. सकाळची प्रसन्न वेळ असल्याने सुर्याची दाहकता नव्हती त्यामुळे सगळे मजेत स्विमींग करत होते.
जरा वेळाने नेहा फ्रेश झाली आणि तिने नाश्त्यासाठी ऑर्डर दिली.
बंगलोरच्या ऑफीसमधील कलीग सरीता काळे हिचा नंबर नेहाकडे होता.नेहाने तिला व्हाॅट्स ॲप वर मेसेज केला.
'गुड मॉर्निंग. मी नेहा आठवले. मी आज बंगलोरच्या ब्रॅंचला जाॅईन होतेय. मी बंगलोरला पोचले. हाॅटेलमध्ये आले आहे. ऑफिसचा पत्ता मेसेज कर म्हणजे मला येता येईल.'
नेहाच्या मेसेजला रिप्लाय आला. तो बघून नेहाने उरलेला नाश्ता संपवला आणि ती ऑफीसमध्ये जाण्याची तयारी करायला लागली.
****
नेहा बंगलोरला असणाऱ्या स्वस्तिक टूर्स अँड ट्रॅव्हलच्या ऑफीसमध्ये शिरली. समोरच रिसेप्शन काऊंटरवर तिने आपली ओळख दिली.
" गुडमाॅर्निंग मॅडम तुमचं या शाखेत स्वागत आहे."
" थॅंक्यू."
"मॅडम मी तुम्हाला सरांच्या केबीनमध्ये घेऊन चलते."
" ओके."
नेहा त्या रिसेप्शनीस्टच्या मागे निघाली.नेहाला हिचं नाव कळलं नव्हतं. ब्रॅन्च मॅनेजरच्या केबीनजवळ दोघी आल्या.
" मे आय कम इन सर ?"
" यस.कम इन."
रिसेप्शनीस्ट नेहाला घेऊन आत गेली.
" सर या नेहा आठवले आपल्या बंगलोर ब्रॅंचला आज जाॅईन होतात आहे. नेहा मॅडम हे अवधूत ताम्हणे आपले इन्चार्ज."
" नमस्कार सर."
" नमस्कार. बसा. गीता नेहा मॅडमसाठी चहा आणा."
रिसेप्शनीस्टचं नाव गीता आहे हे नेहाला कळलं.
" ओके सर."
" सर माझा चहा झालाय."
नेहा संकोचून म्हणाली.
" मॅडम हा चहा तुमचं स्वागत करण्यासाठी आहे. त्यामुळे तो नाकारुन कसं चालेल? "
या आपल्या वाक्यावर ताम्हाणे साहेब गदागदा हसले. नेहालाही नाईलाजाने हसावं लागलं. तिला या वाक्यावर हसण्यासारखं काही दिसलं नाही.
" मॅडम आमच्या शाखेत तुमचं स्वागत आहे."
" थॅंक्यू सर."
" वेलकम. तुम्ही या आधी कधी बंगलोरला आला होता का?"
" नाही. तसा योग अजूनपर्यंत आला नव्हता."
" या प्रमोशनच्या निमीत्ताने बंगलोरला येणं झालं."
" हो."
" तुमच्याकडे टूर मॅनेजमेंट डिपार्टमेंट आणि जाहीरात डिपार्टमेंट दिलंय. तेव्हा या दोन विभागाच्या लोकांशी तुमची ओळख करून देतो."
" ठिक आहे."
नेहा म्हणाली.
चपराशी चहाचा ट्रे घेऊन आत आला.
" गोविंद अजून दोन कप चहा घेऊन ये. अमिता मॅडम आणि राजेश सरांना सांग मी केबीनमध्ये बोलावलंय. गोविंद या आपल्या ऑफीसमध्ये आज जाॅईन होतात आहे.नेहा आठवले मॅडम."
" नमस्कार मॅडम. आमच्या ऑफिसमध्ये तुमचं स्वागत आहे."
गोविंद असं म्हणाला याचं नेहाला आश्चर्य वाटलं.
" थॅंक्यू " नेहा म्हणाली.
" नेहा मॅडम हा चपराशी असला तरी फार हुरहन्नरी माणूस आहे. कळेलच तुम्हाला."
गोविंद हलकसं हसत म्हणाले.
" मॅडम, साहेब माझी उगीच स्तुती करतात पण इतकं काही नाही."
"कळेल मॅडमना. हा बारावी पास झाला आहे. परीस्थितीमुळे पुढे शिकू शकला नाही."
" अच्छा. गोविंद आता कधी संधी मिळाली तर नक्की शीक. आजकाल डिस्टन्स लर्निग ची सोय आहे."
" हो मॅडम. मी नक्की शिकणार आहे."
एवढं बोलून गोविंद केबीनबाहेर गेला.
" मी तुमची राजेश आणि अपर्णाशी ओळख करून देतो मग तुम्ही तुमची मिटींग करून ठरवा."
" हो सर."
नेहा हे म्हणतच होती.
" मे आय कम इन सर?"
हे मंजूळ आवाजातील शब्द नेहाच्या कानी पडले तसं नेहाने झटकन मागे वळून बघितलं. एक नाजूक बाहुलीच वाटली तिला.
" या मॅडम. या नेहा आठवले मॅडम आहेत.आजच जाॅईन झाल्या आपल्या शाखेत.
" नमस्कार मॅडम."
" नमस्कार."
नेहानेही हात जोडून म्हटलं.
" अपर्णा राजेश कुठे आहे?"
" सर त्यांची क्लायंट बरोबर मिटींग चालू आहे."
" ठीक आहे. नंतर भेटेल तो नेहा मॅडमना. अपर्णा तू नेहा मॅडमना त्यांची केबीन दाखव."
" हो सर."
तेवढ्यात गोविंद चहा घेऊन येतो.
" अपर्णा मॅडम चहा घेऊन जा. गोविंद राजेश साहेबांकडे क्लायंट बसले आहेत.ते गेले की साहेबांना हा चहा दे पण गरम करून दे."
" हो "
गोविंद चहाचा एक कप परत घेऊन गेला. अपर्णाने ही चहा संपवला आणि ती नेहाला घेऊन तिची केबीन दाखवायला घेऊन गेली.
"या मॅडम. ही तुमची बसण्याची जागा."
"जागा छान आहे. आटोपशीर आहे. इथून मला सगळे दिसतात."
नेहा स्मितहास्य करत म्हणाली.
"हो मॅडम आपल्या ताम्हणे सरांची ही कल्पना आहे. सगळ्यांना सगळे दिसले पाहिजे म्हणजे काम करताना एकटं वाटत नाही."
"अगदी खरं "
"राजेश सरांकडचा क्लायंट गेला की आपण भेटू शकतो."
'हे चालेल. काही हरकत नाही."
" बाकी कामाच्या फाईल्स इथे ठेवल्या आहेत.लंचटाईम नंतर आपण मिटींग करूया का?"
"मला केव्हाही चालेल आज मी फ्री आहे.आज सगळं
,काम समजलं की ऊद्यापासून फुरसत मिळणार नाही."
"खरय."
"तुम्हाला भेटून छान वाटलं अपर्णा मॅडम."
"मलासुद्धा. मी येऊ मॅडम."
"हो.हो "
अपर्णा आपल्या जागेकडे गेली. नेहाने समोरच्या फाईल्स बघायला सुरुवात केली. या फाईल्स बघतांना कुठे वेळ गेला नेहाला कळलं नाही.
पुण्याच्या ऑफीसमध्ये नेहाकढे फक्त टूरप्लॅनींगचं काम होतं. तिला जाहिरात विभाग पण फार आवडायचा.तसं तिने ही गोष्ट पुण्याच्या माळुंजेकर साहेबांना बोलून दाखवली होती. साहेबांना हिच्यातील क्रियेटीव्हीटी माहिती असल्याने त्यांनी प्रमोशन देताना वरच्या लेव्हल वर हिची क्षमता कळवली आणि टूरप्लॅनींगबरोबर नेहावर जाहिरात विभाग पण सोपवावं असं कळवलं
लंचटाईम पर्यंत नेहाने वाट बघायचं ठरवलं. तेवढ्यात नेहाचा फोन वाजतो. फोनवर सुधीरच्या बाबांचं नाव झळकलं. नेहा विचार करुं लागली की काय विचारतील सुधीरचे बाबा. तिचा फोन घ्यायला धीर होत नव्हता.
_________________________________
पुढील भागात पाहू की नेहा सुधीरच्या बाबांशी बोलेल का?