Mala Space havi parv 1 - 5 books and stories free download online pdf in Marathi

मला स्पेस हवी पर्व १ - भाग ५

मला स्पेस हवी भाग ५

मागील भागात आपण बघीतलं की नेहा रंजनाला सांगते की नेहा तिच्या आईला सांगणं जरूरी समजत नाही. पण उगीच आईचा गैरसमज होऊ नये म्हणून ती सांगायचं ठरवते. नेहाने आईला सांगीतल्यावर बघू काय होईल.

नेहा घरी आईला फोन करते. प्रमोशन घेतलं ते सांगते

" अगं प्रमोशन घेतलंस म्हणजे किती दिवस राहावं लागेल?

"दोन वर्ष तरी रहावं लागेल."

"दोन वर्ष ? ऋषीला घेऊन जातेय नं?"

"नाही."

नेहाचं थंड स्वरातील ऊत्तर ऐकून तिची आई चमकली.

"नाही! अगं तो तुझ्याशिवाय कसा राहील?"

"सुरवातीला देईल त्रास मग सवय होईल त्याला."

"अगं काय बोलणं आहे हे? सुरवातीला त्रास देईल म्हणजे? तो लहान आहे त्याला आईची गरज भासणार नाही का ? विचार कर परत एकदा. सोपं नाही ग बेटा. नेहा सगळा संसार मागे सोडून करीयरच्या मागे धावू नकोस."

'आई माझं ठरलंय. मी फक्त तुला सांगायला फोन केला. तुझी मतं ऐकायला नाही.चल ठेवते फोन."

नेहाने फोन ठेवल्यावर नेहाच्या आईला तिचं बोलणं विचीत्र वाटलं.पाचवर्षाच्या मुलाला सोडून कोणती आई जाऊ शकेल ?

नेहाच्या आईने लगेच अक्षयला म्हणजे त्यांच्या मुलाला, नेहाच्या भावाला फोन लावला.

आईचा फोन आलेला बघून अक्षयला आश्चर्य वाटलं.

" हॅलो. काय ग तू कसा काय फोन केला? बरी आहेस नं?"

" अरे मी बरी आहे.आत्ताच नेहाचा फोन येऊन गेला. ती प्रमोशन घेऊन बंगलोरला चालली आहे दोन वर्षांसाठी तेही एकटीच"

" काय? असा निर्णय का घेतला तिने?"

"काय माहीत रे असा निर्णय का घेतला.‌तू जरा सुधीरशी बोल बरं. मला ऋषीची काळजी वाटतेय. किती लहान आहे तो."

नेहाच्या आईच्या आवाजात चीड आणि काळजी दोन्हींचा मिश्रण होतं.

" हे बघ आई तू काळजी करू नकोस.मी आत्ताच सुधीरशी बोलतो आणि घरी आल्यावर सुधीरशी काय बोलणं झालं ते सांगीन. तू परत नेहाला फोन करू नकोस."

" अरे मी तिला म्हटलं असा निर्णय घेण्याआधी पुन्हा विचार कर. तर मला म्हणाली मी तुला सांगायला फोन केला आहे तुझं मत विचारायला नाही. अशी विचित्र बोलली ती मला."

" हे फार झालं. तू आता तिला पुन्हा समजवायला जाउ नकोस. मी सुधीरशी बोलतो. ठिक आहे.आता फार विचार करू नकोस. ठेव फोन."

" अरे नाही करत विचार. पण विचार करायचा नाही असं म्हणून विचार यायचे थोडीच थांबतात. माझा जीव त्या लहानग्या ऋषीमध्ये अडकला आहे."

" हो मला कळतंय. मला पण हे विचित्र वाटतंय.पण तू आता काही बोलू नको. नेहा अजून काही विचित्र बोलली तुला तर त्याचा तुला त्रास होईल. तुला माहीत आहे नं तुला बीपीचा त्रास आहे का विसरलीस?"

" नाही रे विसरेन कशी.रोज गोळी घेते नं."

" मग फार विचार करू नकोस. शांत रहा. विचार यायला लागले तर तुझी आवडती भजनं म्हण. त्याची तरी प्रॅक्टिस होईल. नवरात्र जवळ आलंय. तुमच्या भजनी मंडळाचे कार्यक्रम असतात नं ! मग बिपी वाढून कसं चालेल?"

"नाहीरे बाबा बिपी नको वाढायला. पहिल्या रांगेत बाईंच्या बाजूला बसते मी. माझा आवाज मोकळा आणि ठणठणीत आहे म्हणून त्याच मला त्यांच्या जवळ बसवून घेतात."

" होना. मग आता शांत रहा. चल ठेव फोन."

अक्षय फोन ठेवतो आणि कपाळावर हात मारतो. मनातच म्हणतो.

"या नेहाने आता काय स्टंट केला वेड्यासारखा. काही दिवसांपासून मला जरा विचित्र वाटत होतं तिचं वागणं बोलणं पण हा असा काही निर्णय घेईल असं वाटलं नव्हतं. कोणी बायका प्रमोशन घेऊन बदली वर जात नाही असं नाही पण हिची एवढी मोठी पोस्ट नाही. टूर्स ॲण्ड ट्रॅव्हल कंपनीत आहे खूप मोठ्या एम.एन.सी कंपनीत असती तर करीयरच्या प्रश्न आहे म्हणून ॲडजेस्ट केलं असतं सगळ्यांनी पण एवढ्या छोट्याश्या नोकरीसाठी हा निर्णय घेणं काही पटत नाही. कितीतरी मुली प्रमोशन नाकारून आपल्या मुलांकडे लक्ष देतात. नेहा आईला जे बोलली तेपण विचित्र वाटतंय. सुधीरला फोन करून विचारलंच पाहिजे."

अक्षय विचारात बुडला असताना चपराशी सांगत आला

," साहेब तुम्हाला मोठ्या साहेबांनी बोलावलंय."

" होका.तू जा मी येतो."

चपराशी निघून गेला अक्षय साहेबांच्या केबिनमध्ये गेला.

***

लंचटाईम मध्ये अक्षयने सुधीरला फोन लावला.

"हॅलो"

"सुधीर मी अक्षय बोलतोय. मघाशी मला आईने सांगितलं की नेहा प्रमोशन घेऊन बंगलोरला चालली आहे."

"हो."

"तीही एकटीच जातेय."

"हो."

"अरे ऋषी किती लहान आहे! त्यांचा विचार केला नाही का नेहाने?"

"हो ऋषी लहान आहे पण तिला जायचयं."

"जायचयं म्हणजे काय? तिने सारासार विचार केलाय का?"

"तिने म्हटलं मी सगळा विचार करूनच प्रमोशन घेतेय."

"सुधीर अरे इतक्या तटस्थपणे ती काय म्हणाली हे कसं सांगू शकतो?'

"मग काय करू?"

अरे तिला अडवलं का नाही?"

"मी अडवून ती थांबणार नाही हे माझ्या लक्षात आलं."

"ऋषीचं काय?"

"तो इथे राहील. आम्ही आहोत सगळे."

"अरे तुम्ही आहात पण एवढ्या लहान मुलाला आई लागते.'

"हे बघ अक्षय नेहाने निर्णय घेतला आहे. तिच्या दृष्टीने ऋषी समजूतदार आणि मोठा झाला आहे तेव्हा त्याची काळजी नाही. म्हणून ती प्रमोशन घेऊन जाणार आहे."

"सुधीर नेहाने हे म्हटलं आणि तू मान्य केलंस?"

"मी काय करू शकतो?"

"तिला अडवू शकत होतास."

"अक्षय तुला वेळ असेल तर आपण भेटू. फोनवर या गोष्टीवर चर्चा करणं अवघड आहे. भेटशील.?"

"अरे विचारतोस काय? कधी भेटायचं सांग."

"मी तुला थोड्यावेळाने सांगतो.आज संध्याकाळी जमलं तर …!"

" आलो असतो पण आज साहेबांनी ऑफिसनौतर मिटींग ठेवली आहे. ऊद्या भेटायचं का? येईन मी. कुठे भेटायचं ते सांग."

"कळवतो."

"ठीक आहे.ठेवतो फोन."

"हे ठेव."

***
फोन ठेवल्यावर सुधीरच्या मनात आलं की सगळ्यांना कळतंय की ऋषीला एकटं सोडून नेहाने बंगलोरला जाऊ नये मग नेहाला का कळत नाही. तिला फक्त स्पेस हवी आहे की माझ्या पासून सुटका हवी आहे? तसं असेल तर तिने सांगावं.

बंगलोरला गेल्यावर ती सांगेल का?

विचार करून सुधीर थकला. नेहाला आपल्या पासून सुटका हवी आहे का हा विचार मनात येताच सुधीर धसकला. त्याच्या मनात आलं जर नेहाने असं पाऊल उचललं तर आपण ते सहन करू शकू? आपण तेवढे धीट आहोत का? ऋषी कसा सहन करेल?

आपल्याला नेहाची किती सवय झाली आहे. तिने नुसतं आपल्या कडे बघितलं तरी तिच्या नजरेने आपल्या मनात आणि शरीरात मधाळ रोमांच उठतो. लग्नाला सात वर्ष झाली तरी हा रोमांच येतोच.मग मी कसा सहन करेन तिचा दुरावा?

नेहाच्या मनावर आणि शरीरावर माझ्या बघण्याने असा रोमांच उठत नसेल का? नेहा इतकी कोरडी झाली असेल. पण असं का व्हावं? मी माझ्या बाजुने तिच्या मनाचा नव-यापेक्षा एक मित्र म्हणून आजपर्यंत विचार करत आलो. एखाद्या वेळी मी चुकलोही असेन. मी एक सामान्य माणूस आहे. नोकरीच्या धकाधकीत एखाद्या वेळी तिच्या मनासारखं मी नसेन वागलो म्हणून ही एवढी मोठी शिक्षा नेहा मला देईल?

सुधीरला काही दिवसांपूर्वी नेहा जे बोलली ते आठवलं,

" सुधीर आमच्या डिपार्टमेंटमध्ये स्वाती म्हणून आहे ती माहीत आहे तुला. एक दिवस तू मला ऑफिसमध्ये घ्यायला आला होता तेव्हा तुझी ओळख करून दिली होती."

" हो आठवलं.तिचं काय? ती येणार आहे का आपल्या घरी?"

" नाही रे. ती आत्ताच आपल्या नव-यापासून वेगळी झाली."

" का?"
सुधीरने विचारलं.

" विचित्र होता म्हणे तिचा नवरा."

" विचित्र म्हणजे तो काय मारपीट करायचा तिला?"

" नाही. दोघांची जीवनशैलीच वेगळी होती.दोघांच्या आवडी निवडी पासून सगळंच वेगळं होतं."

" ते तर प्रत्येक घरी असतं. तुझ्या माझ्या आवडी. कुठे जुळतात! पण आपला संसार छान चालू आहे नं? थोडी ॲडजेस्टमेंट तर प्रत्येकालाच करावी लागते. नाही केली तर संसार चालेल कसा?"

" सुधीर मला तिचा निर्णय पटला."

" काय?"

आश्चर्याने सुधीरने विचारलं.

" हो. घुसमट सहन करण्यापेक्षा वेगळं झालेलं बरं. स्वतःची स्पेस असतें की नाही! ती जपायला हवीच."

" अरे बापरे! हे असे विचार कधी आले तुझ्या डोक्यात? तुझा पण विचार आहे का?"

" काहीतरी काय विचारतोस? तिला खूपच त्रास होता म्हणून मी म्हटलं."

आत्ता सुधीरच्या मनात आलं की त्यादिवशी नेहाने आपल्याला हइंट दिली होती का? आपणच ती समजू शकलो नाही.

विचाराने सुधीरचं डोकं गरगरायला लागलं.
.
" देवा हे सगळं कठीण आहे. पण आता माझ्या मनावरचं ओझं वाढत चाललंय.कोणाशीतरी बोलून मोकळं व्हायला हवं नाहीतर मला वेड लागेल."

सुधीर निशांतला भेटून सगळं बोलून मनावरचा ताण कमी करायचा ठरवतो.

सुधीर निशांतला मेसेज करतो. निशांत मेसेज वाचून सुधीरकडे बघतो आणि खुणेनेच हो सांगतो.
सुधीरच्या चेहऱ्यावर हास्य येतं.

__________________________________
सुधीर निशांतला सगळं सांगितल्यावर निशांत काय म्हणतो बघू पुढील भागात.