मला स्पेस हवी पर्व १ भाग १७
मागील भागात आपण बघीतलं की सुधीरला नेहा बद्दल विचारायचं ठरवतात त्यांचे आईबाबा पण विचारू शकत नाही. या भागात बघू विचारू शकतात का?
सुधीर जेऊन हात धुवून आल्यावर त्यांचे बाबा त्याला म्हणाले,
" सुधीर जरा बस इथे माझ्या जवळ. मला एक गोष्ट विचारायची आहे."
" विचारा."
सुधीर बाबांजवळ बसत म्हणाला. मघापेक्षा त्याचा आवाज बराच नाॅर्मल वाटला.
" सुधीर नेहा अचानक बंगलोरला गेली. तुझी फार इच्छा नव्हती. आम्हाला वाटलं ती प्रमोशन घेऊन तिकडे गेली आहे. तुला प्रमोशन घेतलेलं आवडलं नाही की नेहा बंगलोरला गेलेली आवडलं नाही?"
सुधीर क्षणभर काहीच बोलला नाही. शेवटी आईनेच विचारलंं,
" सुधीर तुमच्यात काही वाजलं का? कारण प्रमोशन मिळू शकतं असं नेहा बोलली नव्हती. अचानक जातेय म्हणून सांगीतलं."
" हे बघ सुधीर आपल्या पुरूषांना बरेचदा स्त्रीचं मन कळत नाही पण त्यावरून एकदम तिने ऋषी लहान असताना एवढ्या लांब जायचा निर्णय का घेतला."
" असं काही नाही. तिला प्रमोशन मिळालं म्हणून ती गेली. आमच्यात काहीच वाद झालेले नाहीत."
सुधीर इकडे तिकडे बघत बोलला.
" मी त्या दिवशी तुला काहीतरी विचारण्यासाठी तुझ्या कडे आलो तेव्हा तू तुझ्या कोणत्या तरी मित्राला म्हणालास की नेहा आमच्या संसारात परत आली नाही तर अवघड होईल. या वाक्याचा अर्थ काय आहे? मला सांगशील?"
सुधीर बाबांचं बोलणं ऐकून चमकला. त्याला कल्पनाच नव्हती की त्यादिवशी तो निशांतला फोनवर जे बोलला ते बाबांनी ऐकलं असेल. त्यांची चाहूल सुद्धा आपल्याला कशी आली नाही याचं त्याला आश्चर्य वाटलं.
" आईबाबा मी तुम्हाला नेहाचं प्रमोशन घेण्यामागची कारण कधीच सांगणार नव्हतो."
" का? असं काय कारण आहे? मी म्हणूनच तुला विचारलं की तुमच्यात काही वाद झाले का?"
आईने सुधीरला विचारलं.
" आई आजपर्यंत सात वर्षांत आमच्यात खूप मोठा वाद कधीच झाला नाही. तिने जेव्हा ती प्रमोशन का घेतेय या मागचं कारण सांगितलं तेव्हा मी कोलमडलो. माझं डोकं काम करेनासं झालं. नेहाच्या मनात असे काही विचार फिरत असतील असं मला चुकूनही वाटलं नाही."
एवढं बोलून सुधीरने एक दीर्घ उसासा सोडला.
" नेहाचं काही बाहेर अफेअर आहे का?"
बाबांनी सरळच विचारलं.
" नाही. नेहाचं बाहेर कुठे काही नाही. तिला आता तिच्या आयुष्यात स्पेस हवी होती."
" स्पेस?"
आईबाबा दोघांनीही एकदमच विचारलं.
" स्पेस म्हणजे तिला काय हवं होतं?"
" आई तिला आता फक्त स्वतःला वेळ द्यायचा होता. स्वत: साठीच जगायचं होतं."
" अरे मग ती ही स्पेस इथे राहूनही घेउ शकली असती."
"बाबा सगळ्यांमध्ये राहून नेहाला जशी हवी तशी स्पेस कशी मिळाली असती? तिला तिच्या आजूबाजूला असलेल्या नात्यांचा गोतावळाच नको होता."
" म्हणजे काय? तिला तिचा मुलगा पण नको होता?"
" नाही."
सुधीरने स्पष्ट सांगितलं.
" नेहाच्या माहेरी हे माहिती आहे?"
बाबांनी आईकडे बघत सुधीरला विचारलं. कारण सुधीर अजूनही मान खाली घालूनच बोलत होता. बोलताना आपला दु:खाने विदिर्ण झालेला आपला चेहरा आईबाबांना दिसू नये हाच उद्देश होता.
" सुधीर माझ्याकडे बघून बोल. "
सुधीरने बाबा असं म्हणाले तरीही त्यांच्याकडे बघितलं नाही.
" अरे लग्नानंतर एवढ्या वर्षांनी स्त्री आपल्या संसारात, आपल्या घरच्या लोकांमध्ये दुधात साखर मिसळावी तशी मिसळून जाते. हं काही अपवाद असतात याला पण आपल्या घरी तर तिला सगळ्याची मोकळीक होती मग असा विचार तिच्या मनात कसा काय आला?"
आईला नेहाच्या या विचारांचं आश्चर्य वाटलं.
" सुधीर एकवेळ ती आम्ही तिघं वेगळं राहतो म्हणाली असती नं तरी आम्ही ते मान्य केलं असतं पण आपल्या लहान मुलाला मागे ठेवून स्वतः साठी स्पेस घेणं हे मला जरा विचित्र वाटतंय. तिचं खरच बाहेर कुठे अफेअर नाही नं? नीट चवकशी केलीस?"
" हो बाबा. नेहाचं बाहेर कोणाशी काही नाही."
" मग एकदम का तिने हा निर्णय घेतला किंवा तिला हा निर्णय घेण्याची इतकी निकड का वाटली असावी हे कोडं मला काही उलगडत नाही."
आई म्हणाली.
"आई तिच्या डोक्यात दोन तीन वर्षांपासून ही गोष्ट आहे. ती म्हणाली मी खूप ॲडजेस्ट करण्याचा प्रयत्न केला पण आता माझ्या मनाची रस्सीखेच होतेय. मी स्वतःसाठी वेळच देऊ शकत नाही. ती स्पष्ट म्हणाली ऋषी जवळ तुम्ही तिघं आहात प्रमोशनच्या कारणाने मला बंगलोरला जायला मिळतंय. तिथे माझी स्पेस मला मिळेल."
" म्हणजे दोन वर्षांनी ती परत येईल."
बाबा म्हणाले.
" सांगता नाही येत."
सुधीरच्या या वाक्यावर आईला धक्का बसला.
" हे काय बोलतोय तू? आत्ताच सांग ती इथे येणारच नाही का? म्हणजे आमच्या मनाची तयारी करायला. मुळात आपल्या लहान मुलाला सोडून या स्पेसच्या मागे तिचं धावणं मला पटलेलं नाही."
" हे बघ. नेहा ही सुधीरची बायको असली आणि आपली सून असली तरी तिच्यावर आपली मतं आपण लादू शकत नाही. कळलं?"
बाबांचा आवाज जरा कठोर झाला.
" अहो इथे माझी मतं नेहावर लादण्याचा प्रश्न येतो कुठे? आजवर कोणत्याही गोष्टीसाठी मी तिच्यावर माझे विचार लादले का? तुम्ही बघीतलं का? आम्हा सासू सुनेचं छान गुळपीठ होतं. पण दोन महिन्यांपासून मला तिच्या वागण्यात तुटकपणा आल्याचं जाणवत होतं. मी इतकी वर्ष तिचा हा तुटकपणा कधीच बघीतला नाही म्हणून मला आश्चर्य वाटत होतं."
एवढं बोलून आईला धाप लागली. कारण त्यांना पण तिच्या अचानक जाण्याने करमत नव्हतं. त्या प्रियंकाला जेवढं प्रेम देत होत्या तेवढंच प्रेम त्या नेहाला पण द्यायच्या म्हणूनच आत्ता त्यांना नेहाच्या जाण्यामागचं कारण ऐकून धक्का बसला आणि त्या विषण्ण झाल्या.
सुधीर खाली मान घालून म्हणाला,
" आई बाबा मी नेहाला समजावण्याचा खूप प्रयत्न केला. ऋषीचं कारण दिलं पण ती नाही थांबली. तिचा जाण्याचा निर्धार पक्का होता. म्हणून मी गप्प बसलो. पण हे कारण तुम्हाला सांगण्याची माझ्यात हिंमत नव्हती. नेहा जाण्याआधी घरी लवकर यावं वाटेना तिला समोर बघितल्यावर मला त्रास व्हायचा. ती गेल्यावर तुम्ही रोज नाहीतर कधीतरी तिचा विषय काढणारच म्हणून मी घरी लवकर यायचो नाही."
त्याच्या पाठीवरून हात फिरवत आईने काळजीने विचारलं,
" बेटा मग कुठे जायचा ?"
" असाच बगीच्यात बसून राह्यचो. बगीचा बंद झाला की कुठल्यातरी टपरीवर बसायचो. तुमची झोपायची वेळ होईपर्यंत वाट बघत वेड्यासारखा रस्त्यावर फिरायचो मग घरी यायचो."
सुधीरचं हे ऐकून कधी नव्हे ते बाबांच्या डोळ्यातून पाणी येऊ लागलं. किती तरी वेळ कोणीच बोललं नाही. बराच वेळाने बाबांनी आपले डोळे पुसत म्हटलं,
" सुधीर आम्ही नेहमी तुझ्या पाठीशी आहोत याची तुला खात्री आहे नं?"
" हो बाबा."
" मग आत्ताही नसू का आम्ही तुझ्या पाठीशी? एकदा बोलून तर बघायचं! "
" बाबा मी चुकलो. मी खरंतर मुळापासून हादरलो होतो नेहाचा चेहरा बघून. त्यात तुम्हाला दु: ख द्यावं असं मला वाटलं नाही. म्हणून मी"
सुधीर यापुढे बोलूच शकला नाही. तो आपल्या हाताच्या ओंजळीत चेहरा झाकून रडायला लागला. आई त्याला शांत करत होती. बराच वेळाने त्याचा आवेग शांत झाला डोळे पुसत सुधीर आई बाबांना म्हणाला,
" तुम्ही काळजी करू नका. मी काही नितीन सारखं जिवाचं वेडंवाकडं करणार नाही. तुम्ही माझ्या बरोबर आहात हेच माझं मोठंं सामर्थ्य आहे. दोन वर्षांनी नेहा परत येईल की नाही याचा विचार आता मी करणार नाही. आपण तिघं ऋषीची काळजी घेऊ. "
" नक्की. तू हसत रहा घरी वेळेवर येत जा. ऋषी वाट बघत असतो तुझी. त्याच्याबरोबर वेळ घालवत जा. त्याचा अभ्यास घे. सुधीर यामुळे तुम्हा दोघांमध्ये खूप छान बाॅंडींग तयार होईल."
" हो आई तू बोलतेस ते बरोबर आहे."
" कधी ताण जाणवला तर बाहेर फिरत न बसता घरी येऊन आमच्याशी बोलत जा. दु:ख वाटून घ्यावं म्हणजे कमी होतं. कळलं?"
"हो. बाबा आज तुम्ही मला विचारलं फार बरं झालं. आज मला खूप शांत झोप लागेल. गेले कित्येक दिवस माझ्या डोळ्यातील झोप उडाली आहे."
आईबाबांकडे बघून सुधीरने स्मितहास्य केलं आईबाबांना पण त्याच्या चेहऱ्यावर हास्य बघून बरं वाटलं. आई म्हणाली,
" आज आम्हाला पण शांत झोप लागेल. आमचा मुलगा आज आम्हाला सापडला."
" मी झोपतो. तुम्हीही झोपा."
सुधीर झोपायला गेला. आईबाबापण उठले. पण आज त्यांना नेहाच्या जाण्यामागचं कारण कळल्याने थोडा थकवा जाणवत होता पण मुलगा वेळेवारी ताणातून बाहेर आला म्हणून बरं वाटलं.
__________________________________
बघू पुढील भागात आणखी काय घडतं?