Mala Space havi parv 1 - 20 in Marathi Moral Stories by Meenakshi Vaidya books and stories PDF | मला स्पेस हवी पर्व १ - भाग २०

Featured Books
Categories
Share

मला स्पेस हवी पर्व १ - भाग २०

मला स्पेस हवी पर्व १ भाग २०

मागील भागात आपण बघीतलं की नेहा टूर आणि जाहीरात यासंबंधी आपले नवीन प्लॅन सांगते यामुळे राजेश आणि अपर्णा दोघंही इम्प्रेस होतात. आता पुढे बघू काय होईल.


स्वस्तिक टूर्स अँड ट्रॅव्हल चं हे बंगलोरचं ऑफीस आहे. या ब्रॅन्च चे मॅनेजर ताम्हणे आपल्या कामात बिझी असतात. त्यांना इंटरकाॅम वरून फोन येतो.

" हॅलो"

"सर मी नेहा बोलतेय."

"हो.बोला'

"तुम्हाला जर दहा मिनिटे वेळ असेल तर मला तुमच्याशी बोलायचं होतं."

"हो वेळ आहे. पण पाच मिनिटांत मी हे हातातील काम संपवतो आणि तुम्हाला काॅल करतो.ठीआहे?"

"हो सर चालेल."

नेहा फोन ठेवते तेवढ्यात तिच्या वहिनीचा प्रणालीचा फोन येतो.

"हॅलो बोल प्रणाली"

"थॅंक गाॅड माझा फोन ऊचललास."

"म्हणजे काय? असं का बोलतेय?"

"काल तू आईंचा फोन ऊचलला नाहीस. त्यांनी खूप वेळा तुला फोन केला होता."

"अगं मी मिटींगमध्ये होते म्हणून आईचा फोन घेतला नाही."

"अगं एकदा तर उचलायचा"

"अगं जवळपास एक तास मिटींग चालली आणि आईला कळू नाही का की मी ज्याअर्थी फोन उचलत नाही त्याअर्थी मी बिझी असणार."

"अगं त्यांना नाही कळलं पण तू एक मेसेज टाकला असतास तर त्यांनी इतक्यांदा फोन केला नसता. त्यामुळे त्यांना वाटलं तुला त्यांच्याशी बोलायचच नाही."

"हे काहीतरीच असतं आईचं."

"आणि तुझं पण."

"माझं काय चुकलं?"

"बंगलोरला गेल्यापासून तू कधीच आम्हाला फोन करून तू कशी आहेस हे सांगीतलं नाही. मग आईंना वाटणारच."

"प्रणाली मला कोणाशी फार बोलायला आजकाल आवडत नाही."

"का?"

"मी त्याच त्याच गोष्टींना कंटाळले आहे."

"कोणत्या गोष्टींना?"

"हेच ग प्रत्येक वेळी प्रत्येकाला माझ्या वागण्यामागची सफाई देत राह्यची. का असं मी करायचं?"

"अगं सगळे तुझ्या जवळचे आहेत म्हणून तुला तुझ्या वागण्यामागचं कारण विचारतात. त्यात सगळ्यांचं काय चुकतंय?"

"आईला कधी कोणी विचारलय मला सतत बोलण्यामागचं कारण?'

"अगं ती आई आहे तुझी."

"मग मी तिची मुलगी आहे नं. मग जर मी तिला तिच्या एखाद्या कृतीमागचं कारण विचारलं तर ती चिडते का? वरून मी ऊद्धट झाले आहे असं म्हणते. प्रणाली हे तुला पटतं?"

"तुला जे खटकतय ते मी नाकारत नाही पण काही नाती निभवायची असतात."

"का निभवायची? मला त्या निभावण्याने जे वळ मनावर उमटतात तेच नकोसे झाले आहेत. म्हणून कोणतंही नातं मला निभवावसं वाटतं नाही."

"नेहा तुझ्या मनामध्ये सध्या या नात्यांबद्दलची चीड निर्माण झाली आहे ती मी समजू शकते. पण आपल्या आयुष्यात कोणतंही नातं आलं किंवा आपण नव्याने निर्माण केलं तरी ते नातंही काही दिवसांनी निभवावंच लागतं. निभावणं आवडतं नाही म्हणून तू किती नाती तोडशील?"

"प्रणाली मला याचं प्रश्न उत्तरांचा कंटाळा आला आहे. प्रत्येक वेळी आई का माझी ऊलट तपासणी घेते. हे ती माझ्या बरोबर माझ्या लहानपणापासून करत आली आहे. अक्षयची कधी तिने अशी उलटतपासणी घेतली नाही. का? तो लाडका आणि मी दोडकी आहे का?"

नेहाच्या स्वरात चीड भरलेली होती.

"अगं असं काही नाही नेहा. आईला तिची सगळी मुलं सारखीच असतात."

"मला हा सारखेपणा कधीच जाणवलं नाही. अक्षयच्या प्रत्येक निर्णयाला हिचा पाठींबा असायचा आणि माझ्या निर्णयात किती चुका दिसायच्या. वैतागले होते मी. माझं लग्न झालं तरी तिचं हे वागणं संपलं नाही. कधीपर्यंत हे मी सहन करू? मी बंगलोरला त्यामुळेच आले.पण इथे येतानाही तिने माझ्या निर्णयात चूक काढलीच."

"ऋषी लहान असल्यामुळे त्यांनी तुला म्हटलं. त्यांचही बरोबरच होतं नं."

"आता या वेळी मी कोणाचंच काहीच ऐकायचं नाही असं ठरवलं होतं. इतकी वर्ष मी कंटाळले सगळ्यांचे माझ्या आयुष्याबद्दलचे निर्णय ऐकताना. प्रणाली तू मला समजवायचा प्रयत्न करू नकोस."

तेव्हाच इंटरकाॅम वाजला ते बघून नेहा म्हणाली,

"प्रणाली माझ्या बाॅसचा फोन आला आहे मी फोन घेते एक मिनीट होल्ड कर."

" हो करते"

प्रणाली म्हणाली.

"हॅलो सर"

"माझं काम आटोपलं आहे. तुम्ही येऊ शकता."

"पाच मिनिटांत येते."

"ठीक आहे."

नेहा फोन ठेवून म्हणाली,

"प्रणाली साहेबांनी बोलावलं आहे.ठेऊ फोन?"

"तू आईंशी एकदा बोल."

"ती फोनवर मला झापेल आणि फक्त प्रश्नच विचारेल.जे मला ऐकायचे नाहीत. तू सांग तिला. जर ती माझ्याशी बोलणार असेल तर फोन कर. ज्या क्षणी माझ्या लक्षात येईल की माझी ऊलट तपासणी घेतेय मी फोन ठेवून देईन.कळलं?"

"हो सांगते आईंना."

"ठीक आहे ठेव."

प्रणालीने फोन ठेवला. नेहा फोन ठेवून साहेबांच्या केबिनमध्ये जायला उठली.

****

'आता येऊ सर?"

"हो या.बसा."

नेहा समोरच्या खुर्चीवर बसली.

"बोला मॅडम."

"सर माझ्या डोक्यात अशी कल्पना आली आहे की जाहीरात लिहिणारी व्यक्ती जरा आऊट ऑफ द बाक्स जाऊन विचार करणारी असेल तर आपल्या ट्रॅव्हल च्या जाहिराती जरा हटके होतील ज्यामुळे प्रवाशांचं लक्ष जाईल. मग ती जाहिरात लिखीत असो किंवा व्हिडिओ."

"मग यासाठी काय करायचा विचार आहे?"

"मला एक छोटीशी स्पर्धा घ्यावी असं वाटतं.स्पर्धेसाठी चार पाच विषय द्यावे.काही नियम ठेवावे या स्पर्धेसाठी. आणि स्पर्धकांकडून मेलवर त्यांची लिखीत जाहिरात मागवून घ्यावी."

"अच्छा मग याला बक्षीस ठेवावे लागेल."

"हो सर ते किती ठेवायचं ते तुम्ही ठरवा."

"ठीक आहे.अजून काही सांगायचं आहे?"

"हो. मला यावर्षीच्या जाहिराती सेलिब्रिटींकडून नाही करायच्या "

"का?"

"एकतर त्यांच्या वेळेनुसार ॲडजेस्ट करण्यात आपला वेळ जातो शिवाय हे सेलीब्रिटी लाखाच्या जवळपास पैसे घेतात. त्यापेक्षा आपण जर आपल्या टूरबरोबर बरेचदा गेलेल्या व्यक्तींकडूनच जर जाहिराती केल्या तर सर्वसामान्य लोकांना ती जाहीरात पटकन रूचेल."

"तुम्हाला यांची किती टक्के खात्री वाटते."

"सर नव्व्याणव पाॅंईट नउ नउ नउ इतकी समजा."

"हं. तुमची कल्पना विचारात घेण्यासारखी आहे. मी संचालक मंडळातील सगळ्यांसमोर तुमची ही कल्पना ठेवतो. त्यांना कितपत पटेल त्यावर मग काय करायचं ते ठरवू."

"ठीक आहे सर. पुढच्या महिन्यात दिवाळी आहे नंतर ख्रिसमस आहे नंतर उन्हाळ्याची मोठी सुट्टी आहे. या सगळ्याच्या जाहीराती शूट करायच्या असतील तर लवकर निर्णय घ्यायला हवा."

"हो तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. मी ऊद्याच संचालक मंडळासमोर ठेवतो. अनायसे ऊद्या मिटींग आहे.तर ऐनवेळी आलेला विषय या अंतर्गत तो मांडीन. बघू मग जर त्यांना हा विचार पटला आणि ते या विचारावरच एक सविस्तर मिटींग घेऊ म्हणाले तर तेव्हा तुम्हाला मिटींग हजर रहावं लागेल."

"हो राहीन सर. सर आणखी एक विचार मांडायचा होता."

"कोणता? सांगा."

"सर उन्हाळ्यात आपण फक्त मोठे टूर घेतो त्या ऐवजी दोन किंवा तीन दिवसांचे टूर जर ठेवले तर पन्नास वर्षापुढील प्रवासी येतील. कारण पन्नास वर्षापुढील प्रवाशांना दोन किंवा तीन दिवसांचा टूर उन्हाळ्यात चालेल पण ते आठदिवसासाठी नाही येणार. खरतर या वयातील प्रवासी आपल्याला वर्षभर बुकींग देऊ शकतात.ते मधून मधून या छोट्याशा ट्रीपला येतील त्यात आपण जर दहा जणांच्या किंवा पाच जणांच्या गृपला सवलत दिली तर हे प्रवासी वर्षभर आपल्या ट्रॅव्हल बरोबर येणार. त्यासाठी मला आपल्या प्रवाशांपैकी कोणीतरी ही जाहिरात करायला हवी. कारण जाहिरातीतील व्यक्तीला आपल्या टूरबरोबर जाणारे इतर प्रवासी लगेच ओळखतील. कारण कधी ना कधी हे एकमेकांना भेटले असतील. त्यामुळे ते प्रवासी ही जाहिरात बघून आपल्या टूरबरोबर येतील."

"याची किती टक्के खात्री आहे तुम्हाला?"

"सर यांची पण मला तेवढीच खात्री आहे."

नेहा हसत म्हणाली.

"ठीक आहे मी हेपण ठेवतो संचालक मंडळासमोर.
आणखी काही? "

"नाही. याच तीन गोष्टी मला तुमच्या समोर मांडायच्या होत्या. जर संचालक मंडळाने स्पर्धा घ्यायला होकार दिला तर तशी जाहीरात आपल्याला पेपरमध्ये द्यावी लागेल. ती जाहीरात खूपच एनर्जीटिक देणा-या शब्दांत असायला हवी. तरच ती आर्टिस्ट लोकांपर्यंत पोहोचायला मदत होईल. ती एरवी जशी टूरसंबंधीची जाहिरात असते तशी नको वाटायला.चॅलेंजीग आणि क्रिएटिव्ह असायला हवी."

"तुमचं म्हणणं बरोबर आहे."

" सर बक्षिसाची रक्कम संचालक मंडळाच्या एकमताने ठरवावी लागेल."

"हो. मी लगेच उद्याच्या मिटींग मध्ये हे मांडतो.मला तुमची कल्पना आवडली आहे.ऊन्हाळ्यात आम्ही हे कमी दिवसांचे टूर काढण्याचा प्रयत्न केला पण ते काही जमलं नाही."

"सर मला वाटतं नुसतं टूर प्लॅन करून होत नाही त्याची जाहिरात कशी होते आणि ती किती वेळा टिव्हीवर दिसते? तसंच पेपरमध्ये कितीवेळा दिसते? याला महत्त्व आहे. टीव्हीवर जर प्राईम स्लाॅट घेतला तर आपल्याला खूप फायदा होईल."

"प्राईम स्लाॅटचे रेटपण खूप असतात मॅडम."

"हो सर मला कल्पना आहे त्याची. पण जर त्या प्राईम स्लाॅटमध्ये स्वस्तिक टूर्स अँड ट्रॅव्हल ची जाहिरात हिट झाली तर आपले सगळे टूर बुक होतीलच शिवाय जास्तीचे टूर करावे लागू शकतात. सर जर असं झालं तर जाहीरातीचा बराचसा खर्च निघून येईल."

"हं. एकदम करेक्ट. ऊद्या मिटींग झाल्यावर आपण बोलू."

"ठीक आहे.मी निघू सर."

"हो यस."

सरांना तिची कल्पना आवडली आहे याचा आनंद नेहाच्या चेहे-यावर झळकत होता.

—--------------------------------------------------
नेहाने सुचविलेली कल्पना संचालक मंडळाला आवडते का बघू पुढील भागात.