वासुनाना गेले... फक्त दोन दिवस हॉस्पिटल मध्यें काढले. आणि अगदी डॉक्टरलासुद्धा प्रयत्न करायची तसदी नं देता हा निरूपद्रवी द्रव वातावरणात विरला. वासुनाना म्हणजे अंतरीक्ष सोसायटीचा प्राण बनलेले. सगळ्यांच्या चौकशा, गप्पा, अडचणीत उपाय सुचवणे आणि उपायात सहभागही घेणे. अगदी कोणाचं मूल काही वेळासाठी सांभाळायचं असू देत किंवा कोणा गृहलक्ष्मीला पेठेतून पूजेचे साहित्य वैगरे आणायला घेऊन जायचं काम असू देत. वासुनाना तत्पर. जणू त्यांनी त्यांचं म्हातारपण त्या सोसायटीसाठी चाफ्याच्या सुगंधासारखं मुक्त उधळलं. वयाची पंचाहत्तरी ओलांडलेला हा माणूस गेली चाळीस वर्ष एकटा राहात होता. पण त्यां चाळीस वर्षातली पंचवीस वर्षे त्यांनी एकांतात कंठली आणि नंतर मात्र तो दुर्दैवाचा फेरा त्यांच्या आयुष्यातून निघाला.
"प्रताप जयवन्त ससाणे." असं भारदस्त नाव असलेला हा मनुष्य वासुनाना कसा बनला त्याची ही कथा आहे. मी त्या कथेचा छोटा पार्ट.. प्रतापला तरी नीट नाही पण वासुनानाला नीट ओळखणारा.
एकेकाळी विकृत म्हणून संभावना केल्या गेलेल्या प्रतापरावांना हा वासू आहे असं सगळे म्हणू लागले आणि मग त्यांना वासूनाना ही उपाधीच मिळाली. ती उपाधीपण त्यांना मिळाली ती माझ्यामुळेच.
मी अंतरीक्ष सोसायटीत फ्लॅट घेतला त्याला आता पंधरा वर्ष झाली. सोसायटी तशी तीस पस्तीस वर्ष जुनी. नव्या बदलासहित नव्याकोर्या सोसायटीत फ्लॅट घेण्याचं माझं मन नव्हतं. मला अशी establishment हवी होती जिथे आधीच सगळं established होतं. म्हणायला हजार square feet चा फ्लॅट, पण पदरी पडणार साडेसातशे असलं नव्या बिल्डर्सच फसवणूक करणारं गणित मला नको होतं. म्हणून मी जुन्या सोसायटीत फ्लॅट घेतला. 1000 sq. Ft. आतला कार्पेट सोडून तीन मोठाल्या गॅलरी. त्याला ऐसपैस असं under roof कार आणि 2 व्हिलर पार्किंग, पहिल्याच मजल्यावरचं असं घर बघून तर आमच्या सौं नी आमचं तिथंच भरगच्च मिठीने कौतुक केलं.
तर तिथे रहायला येऊन तिनेक महिने झाले. घर सजवून झालं. आम्ही स्थिरवलो. ओळखी झाल्या, वाढल्या, खूप लोकांशी ओळखीचं रूपांतर मैत्रीत व्हायला आम्हा दोघांनाही फार काळ लागला नाही. माझा मुलगापण पण मस्त रमला. सकाळी सोसायटीच्या मोठ्या बागेत फिरणे,पळने, व्यायाम करने हे अंगावळणी पडलं. थोडक्यात आम्ही खुश होतो.
सकाळी मी आणि सौं चालायला यायचो तिनेक राऊंड माझ्यासोबत मारून ती जायची. गॅलरीत बसून प्राणायाम, योग वैगरे करायची. मी नंतर धावणे आणि स्ट्रेचिंग करत खाली असायचो. सकाळचे आणखी काही जण असायचे. मग आमच्या गप्पा व्हायच्या. मला एका कोपऱ्यातल्या बाकड्यावर एक साठीतला व्यक्ती बसलेला दिसायचा. जेव्हापासून सकाळी खाली यायला सुरुवात केली तेव्हापासून तो माणूस दिसत होता. तिथे असणाऱ्या ज्येष्ठ लोकांच्या कळपामध्ये पण त्यांना कधी मी बघितले नाही. एकटेच बसलेले असायचे. कधी पेपर वाचायचे तर कधी पुस्तक. कोणाशी हाय हॅलो पण नाही. मी ऑफिसला निघालो की गाडी काढत असताना वर जाताना दिसायचे.
एकदा मी सकाळी सोसायटीतल्या नव्या मित्राला संदिपला विचारलंच त्यांच्याबद्दल.
" अरे वासू आहे तो..वाळीत टाकलंय त्याला." संदीप म्हणाला.
" म्हणजे रे? " मला कळलं नव्हतं.
" अरे.. हा चाळीशीत असताना त्याची बायको त्याला सोडून गेली. मुलबाळ कोणी नाही त्याला. तेव्हापासून एकटा राहतो. तसा त्याचा त्रास नव्हता. पण गेली काही वर्ष. सोसायटीतल्या तरुण बायकांना बघत बसायचा टक लावून. तो D विंग मधला सस्ते.. F विंग मधला जगताप.. त्यांच्या बायकांनी सांगितलं नवऱ्यांना. त्यांनाही ते पटलं. आम्ही पण त्याचं तसलं ते बघणं काही काळ सहन केलं रे पण नंतर जरा बायकांना जास्त uncomfort व्हायला लागलं तसं मग सगळ्यांनी तक्रारी केल्या. त्याला समज दिली. जरासा सुधारला.. पण काही काळाने परत तेच. शेवटी लोकं म्हणाली जाऊदे ... एकटा आहे निराधार.. उगाच त्याला काही करण्यापेक्षा दुर्लक्ष करू..
बसलेला असतो स्वतःची विकृत मनस्थिती घेऊन तिकडं कोपऱ्यात. त्याच्याशी बोलत नाही कोण. तो ही गप्प राहतो. एकदाच कुठंतरी जाऊन येतो आणि नंतर घरात पडलेला असतो. कोणतीच कामवाली बाई घरात कामाला नाही जात याच्या. त्याचं नाव बदनाम असल्यामुळे. असं आहे सगळं. " संदीपने विस्तारित माहिती दिली.
" इन्टेरेस्टिंग आहे हा वासुनाना. " असं मी सहज म्हणून गेलो.
" वाह!! काय टायटल दिलं रे.. वासुनाना!!" असं म्हणतं तो हसू लागला. तेव्हापासून त्यांच्याबद्दल बोलताना त्यांना सगळे वासुनाना म्हणून लागले.
नं जाणो का पण वासुनानांकडे बघताना मला त्यांच्याबद्दल ते विकृत वैगरे असतील असं वाटलं नाही. म्हणजे मी काही त्यांच्या " तशा " वागण्याचे समर्थन करत होतो असं पण नाही. पण काहीतरी वेगळं होतं जे मला त्यांच्याबद्दल विचार करायला भाग पाडत होतं. काय ते माझ्या निरीक्षणाअंती मला सापडलं.
एकदा मी आदल्यादिवशी जास्तच थकल्यामुळे सकाळी उशिरा उठलो. सौं उठून खाली गेल्या असाव्यात असं वाटून मी गॅलरी मध्यें आलो. खाली जरा दुरवर नजर टाकली तर आमच्या सौं कानाला हेडफोन लावून तल्लीन होऊन झपझप चालत होत्या. आणि अचानक ती चालत चालत वासुनाना बसलेल्या बाकड्या समोरून जाऊ लागली. मी वासुनानाकडे पाहिले. पण त्यांची मान पेपरमधून वर एकदाच आली परत पेपर मध्यें. नंतर मागून सौं.ना हाक मारत आमच्या शेजारची उर्मिला तीला जॉईन झाली. बडबड करत चालत त्यांनी परत एकदा वासुनाना गाठले. पण वासुनाना मात्र पेपर मधेच.
"अरेच्या!! माझी बायको सुंदर नाही असं वाटलं की काय याला." या विचाराने खरंतर मीच चपापलो.
काही मिनिटांनी वरच्या मजल्यावरचे पाटील दाम्पत्य खाली आलं आणि चालू लागलं. मी वासू नानाकडे माझा टेलिस्कोप फिरवला. आणि आश्चर्य, वासुनाना पाटील जोडप्याकडे अगदी सुरुवातीपासून ते अर्ध्या राऊंड पर्यंत निरखून बघत होते. मग आले काशीद नवरा बायको. त्यांच्याकडेही तसंच. दोन कॉलेजला जाणाऱ्या मुली रनिंग करत गेल्या, त्याही शॉर्ट्स मध्यें. पण त्यांच्याकडे दुर्लक्ष. पन्नाशीतले भावे नवरा बायको चालत असताना मात्र नजर टक लावून त्यांच्याकडे. सोसायटीची कतरिना कैफ शिखा माधवन. तरुण सुंदर डॉक्टर. tight fitting जिम च्या पेहरावात पळतीये तिच्याकडे दुर्लक्ष, पण जोशी काकू आणि काका चालत जाताना त्यांच्याकडे दीर्घ नजर. मी वासुनानांची ती सर्वजण विकृत समजणारी नजर मोहीम ताडत असताना. माझ्या खांद्यावर मागून हात पडला.
" काय रे!! वासूनाना द जुनिअर नावाचा खिताब मिळवायचाय का तूला? कसं बघतोयस कधीचा उभं राहून इथं सगळ्यांकडे.." सौं बोलत होत्या.
" अं!" उदगारत मी तिच्याकडे पाहिले आणि परत वासुनानांकडे.. ते सोसायटीच्या गाण कोकिळा म्हणवणाऱ्या प्रिया कडे दुर्लक्ष करत आता शिंदे नवरा बायकोकडे बघत होते. आधीच तो शिंदे जाम तापट गडी होता. आधी काही झालं असावं म्हणून त्यांनी काही जास्त वेळ दोघांकडे पाहिले नाही.
" काय चाललंय तुझं अरे!! " सौं म्हणाल्या.
" सौं.. या वसुनानांवर research चालूये माझा. काही observations नोंदवलीत सांगू का?" मी म्हणालो.
" शी!! काय लावलंय सकाळी सकाळी.. वासुनानावर research म्हणे." ती चिडून म्हणाली.
" ये इथे बस... काहीतरी मेख आहे.. वासुनाना दिसतात तसे नाहीत. हे सरळ त्यांच्यावर जे बालन्ट टाकलंय की त्यांना म्हातारचळ वैगरे लागलाय किंवा ते एकटे राहून विकृत बनलेत.. मला त्यात काही खरं वाटत नाही... असं काहीतरी वेगळं जाणवतंय त्यांच्या वागण्यात जे मला शोधावं वाटतंय.
मघापासून मी त्यांच्याकडे बघतोय. त्यांनी तू एकटी चालत होतीस तेव्हाही असं विकृतप्रकारे तुझ्याकडे पाहिलं नाही, उर्मिला तूला जॉईन झाली तेव्हापण नाही. ते कोणाला बघतात माहिते का? जोडप्याला.. त्यात ते फक्त स्त्रियांना बघतात असं नाहीये.. ते पूर्ण जोडप्याला पाहतात.. त्यात विकृती नसते. विषाद असतो.. हे वेगळंय. नेहमीचं नाही.. मला बोलावं वाटतंय त्यांच्याशी.. " मी म्हणालो.
तसं मला मधेच तोडत ती म्हणाली, " उगाच का कशातही पडतोस अरे.. इथे कोणी बोलत नाही त्यां माणसासोबत.. तू बोलशील आणि कोणी तुझ्याबद्दल वाईट मत बनवलं तर. कशाला रे.. "
" सौं.. मी खरं काढल्यावर माझं मत बनवेन.. कोणी म्हणालय म्हणून नाही. शेवटी ते एक माणूस आहे.. शापित जागा नाही की तिकडे धोका आहे म्हणून जाऊ नये. मला काही वेगळं जाणवलं तर कट करेन त्यात काय.. पण मला वाटतंय.. की जाणून घ्यावं. आणि नुसतं मी त्यांच्यशी बोललो म्हणून मला कोणी जज करणारं असेल तर, do hell with them." मी निर्धाराने बोललो.
दुसऱ्यादिवशी शनिवार होता. सकाळी साडे दहाला मी त्यांच्याशी बोलायला त्यांच्या फ्लॅट समोर आलो. त्यांची doorbell वाजवली. पण बंद असावी. वाजली नाही. मग मी दाराची कडी वाजवली. तशी शेजारच्या घरातली सुर्वे बाई दार उघडून माझ्याकडे बघू लागली जणू मी तिचं दार बडवलं होतं. पण वासूनानांच्या घराचं दार कधी ठोठवलं जातं नसेल. म्हणून आश्चर्याने त्या बघायला आल्या असाव्यात. परत आत गेल्या.
विलंब झाला म्हणून आणि एकदा दार वाजवलं. काही सेकंदानी खडखूड आवाज झाला आणि तो बुलंद दरवाजा उघडला. समोर वासुनाना. ते माझ्याकडे बघत होते मी त्यांच्याकडे.
" yes?" त्यांनी विचारले.
" मी शशिकांत जाधव.. बी विंग फर्स्ट फ्लोअर. थोडं बोलायचं होतं." मी म्हणालो.
" नक्की माझ्याशीच? त्यांनी विचारलं.
" हो. " असं म्हणतं मी पुढं सरसावलो.
" बोला." ते म्हणाले.
" इथं दारात?" मी विचारले.
" मग त्याला काय. असही माझ्या बद्दल नको ते उघडं करुन इथे सगळेच बोलत असतात. तेव्हा तुम्ही आणि काय वेगळं बोलणार... बोला. " ते म्हणाले.
एकलकोंडा आणि त्यात दुषणबम्बाळ माणूस असंच sarcasm वापरून बोलणार असं मला वाटलंच होतं. म्हणून मी थोडी तयारी केली होती.
" माफ करा. मला जरा वेगळं बोलायचं आहे.. Rather मला मार्गदर्शन हवंय." मी म्हणालो.
" आत बसुयात का? इथं नाही बोलता यायचं." मी म्हणालो. माझं त्यांच्याकडे यायचं कारण त्यांना वेगळं वाटलं आणि शिवाय मी तक्रार किंवा भांडणं घेऊन आलो नाहीये असं बघून त्यांनी मला आत घेतलं.
त्यांच्या घरात गेलो आणि आश्चर्याचासुखद धक्का बसला. हॉल मधल्या दर्शनी भिंतीत सुंदर असं दीड बाय दीड मिटरचं सरस्वतीचं पी ओ पी मध्ये बनवलेले शिल्प होतं. एका भिंतीवर शिव राजमुद्रेच्या आकाराची शेल्फ होती. मध्यें ती राजमुद्रा तर त्याच्या चहू बाजूनी पुस्तके ठेवायला शेल्फ. घरात सगळीकडे स्वच्छता. घर अगदी लख्ख होते. सोफा, tv unit, dining टेबल सगळं पुसून स्वच्छ होतं. फरशी पुसून चमकत होती. पडदे स्वच्छ आणि धुतलेले होते. विलायची चहाचा सुगन्ध घमघमत होता. रेकॉर्डर वर कुमार गंधर्व "ऋणानुबंधाच्या..." गात होते. घरात उच्च अभिरुचीचं चैतन्य वावरत होतं. प्रसन्नता जाणवत होती.
मी घराकडे नवलाईने पहात होतो. त्यांनी बसा म्हणालेलं पण मी ऐकलं नाही बहुतेक. मग त्यांनी खाकरलं आणि परत बसा म्हणाले.
"अं. हो!!" असं म्हणतं मी त्यांच्या पुस्तकांच्या रॅक कडे पहात म्हणालो.
"बोला काय काम आहे? " त्यांचा प्रश्न आला.
" तुम्ही एकटे राहता? " मी विचारलं.
" आणि कोणी दिसतंय का घरात?" ते म्हणाले.
" नाही... काम असं नव्हतं खरं काही.. पण मला तुमच्याबद्दल काही गोष्टी कळाल्या.. आणि त्यातलं मला बरंच काही पटलं नाही म्हणून मी तुम्हाला भेटायला आलोय. खरं सांगायचं तर मला माझ्या मनातला भ्रम नाहीसा करायचा आहे." मी म्हणालो.
" ओह.. म्हणजे मी खरंच वासू आहे की नाही.. आणि आहे तर कसा आहे हे जाणून घ्यायला?" ते कपाळावर आठी पाडत म्हणाले.
" गैरसमज नका करुन घेऊ. पण मला जे कळलं त्यावर मी पटकन त्यावर विश्वास ठेवला नाही. माणूस जाणून घेतल्याशिवाय मी मत बनवणं योग्य नाही असं मला वाटलं म्हणून मी आलो खरंतर. ते मार्गदर्शन वैगरे बहाणा होता. " मी काय ते खरं सांगून टाकलं.
" गरज काय पण माणूस जाणून घ्यायची आणि मतं बनवण्याची. आपला संबंध नाही काहीही. तुम्ही मला वासू म्हणालात नाही म्हणालात तरी मला काय फरक पडणार. कोणी काहीही बोलले तरी मी काही वाटून घे नाही." ते परखड पणे म्हणाले.
" मला वाटतं नां पण.. माझ्या मनात एखाद्या व्यक्ती बद्दल जर एखादा समज येणार असेल तर तो गैरसमज नसावा असे मला वाटते. आपण एका community चा भाग आहोत. मी तुम्हाला भाग मानतो. इतरांचं मला नाही माहित. तुमच्याबद्दल मला काही जाणवलंय म्हणून मी आलोय." मी म्हणालो.
" काय जाणवलंय? आपण ओळखतही नाही एकमेकांना. " ते म्हणाले.
" इतर लोकं म्हणतात तुम्ही चुकीच्या नजरेने.. म्हणजे स्त्रियांकडे बघता वैगरे... मला असं वाटतं फार जेनेरिक ऑब्जर्वेशन आहे.. आणि त्यामुळं चुकीच्या समजुतीने तुमच्यावर आरोप झाले असं मला म्हणायचंय. " मी म्हणालो.
" असं तुम्हाला का वाटलं? " त्यांची बाजू घेणारा पहिला मीच होतो बहुतेक.
" तुम्ही स्त्रियांकडे तशा नजरेने पाहत नाही. पण तुम्ही जोडप्याकडे पाहता... ती नजरही काही वाईटवकटी नसते. एखाद्या आवडत्या देखाव्याला पाहून त्यातलं काही मर्म बाजूला काढत रंगवणाऱ्या चित्रकाराची नजर वाटते मला ती." मी बोललो आणि मागे रेललो.
" चहा घेणार? " त्यांनी विचारलं.
मी मानेने होकार दिला. त्यांनी दोन कप भरून आणले. एक माझ्या हातात दिला.
" हं.. शशिकांत.. आजवर मला या तर्हेने जोखणारं कोणी मिळालं नाही. तुम्ही पहिले. सर्वसाधारण माझ्यासारख्या एकट्या वयस्कर व्यक्तीला विकृतीचं स्टिकर लावणं साहजिक आहे. पण तुमचा दृष्टिकोन वेगळा असल्या कारणामुळे तुम्ही मला वेगळ्या तर्हेने पाहू शकलात. तुमचा अंदाज बरोबर आहे. मी कबूल करतो की मी जोडपे असेल तरच त्यांच्याकडे बघत असतो.. पण त्याचं कारण माझ्याशीच आहे.
पंधरा वीस वर्षांपूर्वी माझी पत्नी मला सोडून गेली. कारण तिच्या पदरी मी फक्त निराशा देऊ शकलो. लग्नाला दहा वर्षे होऊन पण आम्हाला मुल झालं नाही. आणि तीला तिचा संपूर्ण संसार हवा होता. मी त्यासाठी निष्क्रिय होतो. पण मग तिने केलेली मागणी मी डावलू शकलो नाही... मी तीला मुक्त करणारा वैगरे असं म्हणणार नाही. पण मी माझ्या नात्याचं बंधन तिच्यावर नं लादता तिच्या आयुष्याला सुखकर करण्यासाठी माझ्या नात्यातून वेगळं केलं. आज ती सुखी आहे. तिचा संसार आहे. मुलंबाळं झालीयेत. माझ्या संपर्कात नाही.. कदाचित मला विसरली सुद्धा असेल. पण मी.. माझं काय?
माझी ती फक्त पत्नी नव्हती.. मैत्रीनही होती.. हे घर आम्ही घेतल्यावर इथे घालवलेला काळ तो माझ्या आयुष्यातला परमोच्च सुखाचा काळ होता. तिने त्यावेळी घर जसं सजवलेलं त्यामध्ये काहीही बदल नं करता मी हे तसच्या तसं ठेवतो. न जाणो कधीही ती आलीच परत माझ्यासाठी तर तीला वावरायला सहज जायला हवं. या विचाराने मी घर न कंटाळा करता आवरतो.
हम्म.. आता राहिलं माझं ते जोडप्याकडे तशा पद्धतीने बघणं.. मी प्रेमात असलेले जीव एकमेकांना कसे वागवतात हे विसरू नये म्हणून त्यांची देहबोली निरीक्षत बसलेलो असतो. मी प्रेम करायला विसरायला नकोये.. मी माझ्या माधवीचा तोच प्रताप म्हणून तीला मिळायला हवा.. माझ्या आयुष्यात तिच्यासारखी मैत्रीण कधीच नव्हती.. माझ्या आयुष्यात माझी पत्नी म्हणून फक्त माझ्या माधवीला जागा आहे. त्या जोडप्यामधले पुरुष आपल्या स्त्रीशी कसे बोलतात.. वागतात..त्यांना हसवतात.. लाडवतात.. ते सगळं सगळं मी माझ्यात जिवन्त ठेवायला हवंय.. म्हणून मी एखादं जोडपं पाहिलं की त्यांचं वागणं बघून ते स्वतःत रुजवण्याचा प्रयत्न करतो.. मला तिची आस आहे अजूनही.. ती जर परत आली तर मी तीला प्रेमाने वागवू शकलो पाहिजे. त्या जोडप्यांमध्यें मी आम्हा दोघांना चितारतो.. हे खरंय आणि नेमके तेच भाव तुम्हाला दिसलें शशिकांत.. तेच भाव आहेत ते...मी विकृत आहे का ओ.. प्लिज मला सांगा माझं मलाच कळत नाहीये." असं म्हणून त्यांनी तोंड ओंजळीत लपवलं.
आमचा चहा निवला होता. वासूनानांचं बोलणं संपलं होतं. मला त्यांची कैफियत कळली होती. प्रेमाच्या टीमक्या वाजवणारे आणि नात्याची प्रौढी मिरवणारे किडे या प्रेमाच्या या सूर्यावर थुंकण्याचा न्याय मला पटत नव्हता. त्यांना माणसात आणायला हवं होतं. प्रेम मनात ठेवणं ठीक होतं. पण तेच प्रेम आता त्यांच्या नसानसात भिनून विष बनू लागलं होतं. माझा प्रयत्न असणार होता या प्रेमळ माणसाला माणसांचा सहवास घडवत माणसात आणण्याचा..
****
सर्वप्रथम हे सगळं मी आमच्या हळव्या सौं शी बोललो. तीला अतिशय वाईट वाटलं. मग तिने तिच्या पद्धतीने दोन तीन संवेदनशील मैत्रिणींना समजावून सांगितलं. त्यांनाही हे पटलं.. त्या सर्वानी माझ्याशी बोलून, ठरवून एक उपाय ठरवला.
एका दुपारी त्या तिघी चौघी सरळ त्यांच्या घरी पोहोचल्या. त्यांच्या परवानगीची पर्वा न करता त्यांच्या सोबत गप्पा मारल्या. पुढल्या दिवशी त्यांच्या घरी जेवणाचा बेत केला. पत्त्यांचा अड्डा केला. सकाळी वासूनाना आता त्या तिघी चौघीसोबत चालताना दिसायला लागले. हसू लागले. ते पाहून इतरांची मनं वळू लागली. त्यांच्याशी नमस्कार चमत्कार घडू लागले. सहज एखादीला "आली मोठी शहाणी!!"
म्हणण्यापर्यंत वासुनाना या कळपात मिसळले.
त्यांच्या जीवावर मुलांना टाकून यां मैत्रिणी मुद्दाम program करू लागल्या. मुलांमध्ये वासुनाना प्रसिद्ध झाले. त्यांचं वासुनाना हे नाव त्यांनी आनंदाने स्वीकारलं होतं. मी माझ्या मित्रांना घेऊन त्यांच्या घरी पत्ते आणि कॅरम च्या टूर्नामेंट्स भरवू लागलो. त्यांना स्पेशल पदार्थांचे डबे जाऊ लागले. सुर्वे बाई आता वासुनानांचं दार वाजल्यावर डोकवेनाशा झाल्या.
जूने पिक्चर, गाणी हलक्या फुलक्या पार्ट्या यात त्यांच्यासोबत सगळे रमू लागले. त्यांचा एकांतवास आम्ही सर्वांनी संपवला. वासू नानांनी ते बाकडे सोडले होते. त्यांनी सुद्धा त्यांचे मनं वळवण्यात आम्हा सर्वाना सहकार्य केले आणि अगदी काही महिन्यात वासूनाना सर्वांचे लाडके झाले. अंतरीक्ष सोसायटीच्या कुटुंबाचा एक प्रमुख सदस्य म्हणून सर्वजण त्यांच्याकडे बघू लागले. पंधरावर्षं त्यांनी सोसायटीच्या कमिटीचा कार्यभार सांभाळला. ते स्वतःला गुंतवत राहिले. निवृत्त आयुष्य कसं असावं याचा आदर्श त्यांनी दाखवून दिला.
त्या गुढीपाडव्याच्या दिवशी त्यांना छातीत कळ आली. मला त्यांनी फोन करताच मी धावलो. त्यांना हॉस्पिटल मध्यें नेताना. त्यांनी मला सांगितले.
" शश्या.. माझ्या प्रेमामुळे मी पांगळा झालो होतो रे.. पण तू मला खरं प्रेम आयुष्यावर करावं हे दाखवलंस.. बेटा एकच कर आता. माझं काही बरं वाईट झालं तर.. माझ्या कपाटात ड्रॉवर मध्यें मी विल बनवलीये ती तेवढी माधवीला पाठव. माझं घर तिचंच आहे. तीला लिहून ठेवलंय मी... असू देत तीला... पोहोचवशील ना रे.. एवढं माझं शेवटचं करणं माझ्या प्रेमासाठी.. करशील ना.. शश्या प्रॉमिस कर.."
मी त्यांना आश्वासन दिलं. ते निश्चिन्त झाले. पुढल्या दिवशी त्यांनी श्वास सोडला. आता मला त्यांचं शेवटचं काम करावं लागणार होतं. त्यांच्या प्रेमाला म्हणजे आधीच्या पत्नीला भेटून तीला काय मिळालंय ते सांगायचं होतं. पण खरंतर मला हे सांगावं वाटत होतं की.. माधवी ताई.. तुम्ही काय गमावलंय.. खूप काही गमावलंय..
🍁🍁🍁
- शब्दभ्रमर 🍁🍁