पहिला कोंबडा झालाआणि सनई चौघडा सुरु झाला. तशी आचाऱ्यांची लगबग सुरु झाली . जनूभटाने मोठा टोप भरून पाणी तापत लावले आणि बरोबरच्या पोराना हाकारायला लागला. “पद्या, सख्या, हऱ्या , भिक्या चला पट पट आंघोळी करून घ्या नी रांधपाला लागा. ” त्याचे बरोबरच होते. पाच गावचे हजार दीड हजार माणूस लोटणार होते. वरण भात,पाच भाज्या, खीर, जिलेबी , मसाले भात , साखर भात असा जंगी बेत आखलेला होता. त्यात बोंबडोजीने बजावून सांगितलेले होते. पाच पक्वान्नांपैकी कोण काय मागेल ते ते त्याला मिळायला हवे. रवा नी गुळाच्या पाकातले बुंदी लाडू अगोदर करून ठेवलेले होते पण खीर जिलबी नी साखरभात आजच ताजोताज रांधायचा होता. घटका भरातच आन्हिक आवरून जनूचे सोबती चट चट कामाला लागले. एरवी गावातले ताशे ढोल यांच वाजपअसायचं पण बोंबडोजीने आच-याच्या गुरवांचे सनई चौघड्याचे वाजप एकावन्न रुपयाची सुपारी देऊन आणले. भाज्या चिरायला , नारळ खोवायला वाडीतल्या वाणीणी कोरेकद नेसून आल्या. भटांकडे लग़्नमुंजी सारख्या कार्यात भट मुकटे नेसूनभटणी कद नेसून सोवळ्यात वावरताना बोंबडोजीने बघितलेले . म्हणून आपल्या घर प्रवेशाला त्याने मुंबयसून वीस कद म्हणजे सोवळ्याची लुगडी आणि बापयांसाठी पंचवीस मुकटे मुद्दॎम आणवूनघेतले.
धडा धडा नारळ फुटत होते नी चिरलेल्या बटाटे वांगी यांचे ढिग साठत होते. तास दोन तास झाले . बाया माणसांपैकी कोण कोण बहिर्दिशेला जावून यायला लागल्या. सोवळी नेसायची नक्कल सोपी पण त्यांची पाळणूक कोणाला दख़ल. दोघीजणी पितळी तांब्ये घेवून संडासला गेल्या. त्या परत आल्या त्यावेळी नेमकी बर्वीण काकू तिथे आलेली. संडासला जावून आलेल्या बाया पाय धुवून आल्या मात्र नी उगवतच्या भटणीने जो तोंडपट्टा सुरु केला, “शिव ss शिव ss शिव, ग्ये ss लांबडेकी, ग्ये ss सुमा ..... मेल्यानो तुमका काय अक्कल हा की नाय? शिरा ईली नाय ती तुमच्या तोंडार..... गो सोवळ्याचो कद न्हेसून कशो झाड्याक ग्येलास .... तो सोडून ठेवायाचो नी इल्यावर न्हावचा नी मगे सोवळा न्हेसोचा.... तुमी भष्टाकार करशा अशानी... आदी सोवळी पान्या सून काढा नी तुमी दुकू न्हावन मगे कामाक येवा. ” पुढे कितीतरी वर्षे परबीणी कद नेसूनच कश्या संडासला गेल्यातो किस्सा आठवून आठवून लोक हसत.
सातआठ वर्षं मुंबयला कमाई करून गावात आल्यावर त्याने खोताच्या वाड्यासारखं टोलेजंग चिरेबंदी घर उभं केलं . पैशाची काय कमतरता नव्हती. जग दुनियेचे डोळे दिपतीलअसा घर प्रवेशाचा दणका उडवून दिला. अकरा वाजता जेवणावळी सुरु झाल्या.सुरुवातीला दोन पंक्ती भटांच्या उरकल्या नी मग जमलेल्या इतर जातीच्या लोकांची एकच झुंबड उडाली. काळवं पडे पर्यंत पंक्ती झडल्या. सगळे मनमुराद जेवले. कोणी कोणी जेवून झाल्यावर त्याच पत्रावळी त लाडू, जिलब्या बांधून घरी नेल्या. जनू भटाने दिला शब्द पुरा केला. कुठला जिन्नस मनी पडू दिला नाही. रात्री वेळावारीच भजनाची पहिली बारी प्रिंदावणच्या लहू पुजाऱ्याची सुरु झाली. मध्यानरात्री पर्यंत लहूच्यानी गावातल्या मोतीराम मिर्जुले बुवाच्या दोन दोन बाऱ्या आटोपल्या नी घरभरणीचा कार्यक्रम पार पडला. उरलेले अन्न रात्री ओसरी वर झाकून ठेवलेले होते ते दुसऱ्या दिवशी वाडीतल्या बापये , बाया, पोरानी संपवले. गोडाचे जिन्नस लोकानी बांधून घरी नेले. वाडकऱ्यानी अन्नाचा कणही वाया जावू दिला नाही .
पाच चेडवांच्या पाठीवर सात वर्षानी नवसा सायासाने रत्न्या परबाला झालेला पोर .... भिणभिणताना पार्वतीच्या पोटात दुखायला लागले. वाडीतलीच लक्षुमी बर्वीण सुईणपण करायची. आवाठात उगवतच्या दिशेला तिचे घर म्हणून लोक तिला उगवत करीण किंवा उगवतची भटीण म्हणायचे. तिच्या माहेरी दांडेआडोमात तिचा बाप दत्तु भट नी चुलता म्हादू भट दोघेही वैद्यकी करायचे. त्या घराण्यातच त्तीन पिढ्या परंपरेने वैद्यकी चालत आलेली. रखमा लहान असतानाच बापाच्या हाताखाली नाडी परीक्षा शिकलेली. बाप अडलेल्या बाळंतिणींची सोडवणूक करी ते कसब ही ती शिकली. ती स्वभावत: परोपकारी नी दयाळू म्हणून तेचाहात गुणही यशॎत्री झालेला. वेळ वखत न म्हणता लांब लांब तंगड्या तोडीत जावून ती अडलेल्या बाळंतीणींची दोन जीवे सुखरूप सुटका करून द्यायची. तिच्या सोबत जाणा-या रमा परबीण, बाया पाडावीण नी अक्का घाडीण ह्या गावातल्या तिघी बायाही सुवीणपण करायला शिकल्या. हल्ली वयोमानामुळे फार लांबच्या ठिकाणी जाणे भटीण टाळायची . आपल्या ऐवजी ती तिच्या हाताखाली शिकलेल्या तिघींपैकी कोणाला तरी धाडायची.
पार्वतीच्या पोटात दुखायला लागल्यावर भटणी सोबत वाडीतली रमा पण आलेली. बाळतीची चलचलणूकपाहता हिला मुलगा होईल नी दुपार नंतर प्रसूती होईल असाअंदाज तिने रमाला बोलून दाखवला . म्हणून रमाला तिथे बसवून भटीण घरी गेली. गुरांचे गवत पाणी, देवपूजा , रांधप करून भटणीने वाटेल्याचे पान वाढून दिले. मग आपण जेवली नी घटकाभर वामकुक्षी झाली तरीही पार्वती बाळंत झाल्याची वार्ता आली नाही तेंव्हा मात्र मगिलदारी माडाजवळ लावलेले सुलभ प्रसूती करणारे आंगळभर पाळ खणून घेवून ती पार्वती वाणीणीच्या घरी गेली. गेल्या गेल्या रमाला पाळ उजळायला बसविले. निम्मे पाळ झरल्यावर ते पाण्यात खलून बाळंतिणीला पाजले. औषध पोटात गेल्यावर साधारण अडीच तासात त्याचा प्रभाव दिसणार हे तिला अनुभवाने माहिती झाले होते. त्या प्रमाणे उन्हे कलंडली आणि पाच वाजायच्या सुमाराला पार्वती बाळंत झाली. पिंड मोठा होता म्हणून सुटका व्हायला पुरा दिवस गेला.
बाळंतपणाने पार्वती एवढी हरंबळली की तिला मानेखाली हात घालून दुस-याने उठवून बसती करावी लागे. पोर दांडगादुंडगा नी आयशीच्या अंगावर दूधाचा थेंबा मिळायची भ्रांत.... पोराची आबाळ होणार हे उगवतकरणीने ओळखले. तिच्या माहेरी चांगला गाईंचा जथा, तिच्या पहिल्या बाळंतपणात तिच्या बापाने उत्तम वाणाची गाय लेकीला दिला. तिची जायपीपुढे वाढली. उगवतच्या भटणी कडे कायम तीन चार दुभत्या गायी असायच्या. गावातअडिनडिला कुठच्याही भटाला दुभत्याला ती गायी द्यायची. शेती करणा-या कुडवाळ्यानासुद्धा मोफत पाडे द्यायची.अट फक्त एवढीच की जनावर थकले तर माझे मी परत आणीन नी माझ्याकडून न्हेलेल्या गाय- बैलाचा विक्रा करायचा नाही. (क्रमश:)