prarthna in Marathi Moral Stories by Trupti Deo books and stories PDF | आहॆ का अशी कोणती प्रार्थना

Featured Books
Categories
Share

आहॆ का अशी कोणती प्रार्थना

"आहॆ अशी कोणती प्रार्थना , जी अपघात थांबवेल?"


देव दरवेळी वाचवेलच असं नाही…
पण आपणच थोडं जागं राहिलो,
तर देवाला वाचवायची वेळच येणार नाही.
"आहॆ का अशी कोणती प्रार्थना आहे?"
"आहॆ का असा कोणता नवस आहे?"
"आहॆ असा कोणता देव आहे?"
"आहॆ अशी कोणती पूजा, असा एखादा मंत्र, आहॆ अशी कोणती शक्ती, तंत्र, विद्या आहे का –
ज्याने अपघातांचं प्रमाण कमी होईल आणि जीव वाचतील?" आहे का कोणत असं तंत्रज्ञान?आहॆ कोणी खरा ज्योतिषी ? जो आधीच अवगत करेल.
हा प्रश्न फक्त शब्द नाही…
तो एक आक्रोश आहे.
रस्त्यावर रोज सांडणाऱ्या रक्ताचा,
चिरडल्या जाणाऱ्या स्वप्नांचा,
आणि अर्धवट थांबलेल्या आयुष्यांचा.
दररोज हजारो माणसं घरातून निघतात…
काही आपल्या माणसांकडे परत येतात,
आणि काहींच्या वाटा कायमच्या हरवतात.
दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रात दोन ओळी येतात –
"अपघातात ठार…"
"वेगावर नियंत्रण नसल्याने…"
"हेल्मेट नव्हतं…"
"मोबाईलवर बोलत होता…"
पण या ओळी नसतात –
त्या कोणाच्यातरी आयुष्याच्या शेवटच्या रेषा असतात.
खरंच… आहे का उपाय?
हो… आहे.
पण तो देवळात नाही,
तो आपल्या हातात आहे.
प्रत्येक वाहनचालकाच्या हातात.
आपण ठरवतो –
आपण ‘देव’ बनणार की ‘यमदूत’.
सिग्नल तोडायचा की थांबायचं,
हेल्मेट घालायचं की नाही,
मोबाईल उचलायचा की दुर्लक्ष करायचं –
हे निर्णयच आयुष्य आणि मृत्यू यांच्यातली रेषा ठरवतात.
खरी प्रार्थना काय आहे?
हेल्मेट – फक्त नियम नाही,
तर घरात वाट पाहणाऱ्या डोळ्यांची सुरक्षा आहे.
सीट बेल्ट – एक पट्टा नाही,
तर अख्ख्या संसाराची दोरी आहे.
मोबाईल – एक कॉल नाही,
तर एका श्वासाची किंमत आहे.
वेग – एक थरार नाही,
तर विनाशाचं निमंत्रण आहे.
सिग्नल – एक दिवा नाही,
तर थांबून जगण्याची संधी आहे.
पण आज आपण इतके असंवेदनशील झालोय,
की अपघात झाला तरी मदत करण्याऐवजी
मोबाईल काढतो… व्हिडिओ बनवतो…
एक जीव तडफडत असतो,
आणि आपण "स्टेटस" अपडेट करत असतो.
हा प्रगतीचा मार्ग आहे का?
की माणुसकी हरवण्याचा?
एकदा तरी स्वतःला विचारा –
तो रस्त्यावर पडलेला माणूस
आपलाच असता तर?
आपण अजूनही व्हिडिओ काढला असता का?
की त्याचा हात धरून धाव घेतली असती?
सत्य हे आहे –
अपघात रस्त्यावर होतात,
पण त्याची सुरुवात आपल्या विचारांत होते.
जेव्हा आपण नियम मोडतो,
तेव्हा आपण फक्त कायदा मोडत नाही,
तर कोणाचं तरी आयुष्य धोक्यात टाकतो.
आपण देवाला हात जोडतो…
पण गाडी चालवताना हात मोकळे ठेवत नाही.
एक हात स्टीअरिंगवर,
आणि दुसरा मोबाईलवर…
अशा वेळी देवही असहाय होतो.
कधी कधी असं वाटतं…
आपण अपघात बघतो, काही क्षण हेलावतो…
आणि मग पुन्हा सगळं विसरतो.
दुसऱ्या दिवशी पुन्हा तीच घाई,
तोच वेग,
तोच निष्काळजीपणा…
म्हणजे अपघात फक्त रस्त्यावर होत नाहीत,
ते आपल्या सवयींमध्येही रुजलेले असतात.
आपण म्हणतो – "नशिबात असेल तर होणारच!"
पण खरंच सगळं नशिबावर सोडून चालतं का?
जर नशिबच सगळं ठरवत असतं,
तर हेल्मेट घातलेल्या आणि न घातलेल्या माणसात फरक का पडतो?
म्हणजेच…
नशिब नाही,
आपल्या सवयीचं भविष्य ठरवत असतात.
अपघात अचानक होतो,
पण त्यामागची चूक अचानक नसते.
ती तयार होते –
आपल्या बेफिकीरीतून,
आपल्या "मला काही होणार नाही" या अहंकारातून.
आज जर आपण थांबलो नाही,
तर उद्या कुणीतरी कायमचं थांबेल…
आज जर आपण नियम पाळले नाहीत,
तर उद्या कुणाचं घर कायमचं रिकामं होईल…
आणि सगळ्यात वेदनादायक गोष्ट म्हणजे –
अपघात झाल्यावर आपण देवाला विचारतो – "का?"
पण देव कदाचित आपल्यालाच विचारत असेल 
"मी तुला बुद्धी दिली होती, तू वापरलीस का?"
म्हणून…
खरी प्रार्थना ही शब्दांत नसते,
ती कृतीत असते.
गाडी सुरू करताना मनात एकच विचार असावा 
"देवा, माझ्या चुकीमुळे आज कुणाचा संसार उद्ध्वस्त होऊ नये."
कारण…
"जगवणं हाच खरा धर्म आहे."
गाडी चालवणं ही केवळ प्रवासाची सुरुवात नसते,
ती एक जबाबदारीची परीक्षा असते.
जिथे प्रत्येक सुरक्षित प्रवास म्हणजे
एखादा अपघात टळलेला असतो.
"अशी कोणती प्रार्थना आहे?"
तीच…
जी आपण रोज आपल्या कृतीतून म्हणतो.
"असा कोणता देव आहे?"
तोच…
जो आपल्या विवेकात, संयमात आणि ब्रेकमध्ये आहे.
देव दरवेळी वाचवेलच असं नाही…
पण आपणच थोडं जागं राहिलो,
तर देवाला वाचवायची वेळच येणार नाही.
कधी कधी चूक आपलीच असते…
पण ती आपल्याला कळत नाही –
आणि तेव्हाच अपघात घडतो. म्हणून तर कळकळीची विनंती आहॆ. नियम आणि शिस्त  पाळावेच लागणार.शेवटी जिवा पेक्षा किंमती काहीच नाही.
✍️ – सौ. तृप्ती देव
भिलाई, छत्तीसगड