"हणमंता कुठं निघाला? चल की जेवायला."
जेवणाची सुट्टी झाली आणि आम्ही वर्गातून बाहेर आलो तसं मी माझ्या मित्राला हाक मारून बोलवायला लागलो. त्याच्या हातात डबा तर होता. पण तो शाळेच्या गेटकडे चालला होता. शाळा सुरु होऊन एकच आठवडा झाला होता. हनुमंत माझा मित्र पहिल्यापासून शाळेत माझ्यासोबतच जेवायचा. अष्टगंध लावलेला हनुमंता अभंग फार सुरेख गायचा. पाणीदार डोळ्याचा सडसडीत हनुमंता कधी कोणाशी भांडायचा नाही की कोणाच्या वाटेला जायचा नाही.
आम्ही सातवीतून आठवीत आलो होतो. तो एक गाव सोडून पुढल्या गावातून शाळेत यायचा. त्याला रोज सहा किलोमीटर पायी चालावं लागत असे. गेले दोन तीन दिवस हा सुट्टी झाली की डबा घेऊन गेटच्या बाहेर का जातो? मला कळत नव्हतं. काहीतरी आहे जे हा लपवतोय? हा प्रश्न मला त्रास देत होता. म्हणून मी एकदा ठरवलं त्याचा पिच्छा करायचा.
पुढल्या आठवड्यात सोमवारी मी त्याला जेवण्यासाठी हाक मारली. त्याने हातानेच "थांब थांब! तू जेव. मी येतो." असं हातानेच दर्शवीत धूम ठोकली. आता ह्याला पकडायचा. असं मी ठरवलं. दुसऱ्या दिवशी जशी सुटी झाली तसं हनुमंताच्या आधीच गेटपाशी पोहोचलो. एका झाडामागे लपत मी त्याला शोधू लागलो. तो आला. आजूबाजूला पाहत लगबगीने चालला होता. गेट मधून बाहेर पडत त्याने डावीकडचं वळण घेतलं. मीही तसा त्याच्या मागावर निघालो.
मला आश्चर्य वाटलं हनुमंता वडापावच्या टपरीकडे चालला होता. म्हणजे हा रोज तिथे जाऊन वडापाव, भजीपाव असं चमचमीत खातो. म्हणून आपल्याला टाळतो, असं मला कळलं. कधी कधी वडील घायला आले तर मी त्यांच्या मागे लागून हा हट्ट पुरवून घेतला होता. इथे हनुमंताची तर रोजच चैन चालली होती. त्या काळी हे नवं पेव फुटलं होतं. शहरातलं हे वेड तालुक्याच्या गावाला यायला फार काळ लागला नव्हता. हनुमंताकडे पैसेही असतात.हे सगळं करायला. याचाही मला धक्का बसला होता.
मी त्याच्या मागे जात पाहिलं की तो टपरीच्या मागे जात आहे. मला कळलं नाही नेमकं काय ते. तो टपरी मागे गेला तसा मी पण गेलो. हळूच एका भिंतीमागे लपलो. समोरचं दृश्य पाहून मला पुढचा धक्का बसला. तिथं एक मोरी होती. त्यात वडापाव खाल्लेल्या उष्ट्या डिश होत्या, चहाचे काचेचे ग्लास होते. आणखी काही भांडीही होती. त्या गराड्यात हनुमंता बसला होता आणि तो त्या घासत धुवत होता. विसेक मिनिट त्याचं ते भांडी घासणे आणि धुणे चालले होते. ते झाल्यावर मोरीतल्याच एका फडक्याला त्याने हात पुसले. बाहेर आला. मोरीच्या कट्ट्यावरचा डबा घेतला. टपरीकडे जात त्याने तिथं असलेल्या एका माणसाला मोरीकडे बोटं दाखवत कामं झाल्याचे सांगितले. तसं त्या माणसाने दोन वडापाव त्याच्या डब्यात भरून दिले.
हनुमंता मोरीजवळच्याच एका दगडावर बसून त्यातला एक वडापाव घेऊन खाऊ लागला.
"हनुमंता? काये हे सगळं?" मी त्याला खांद्यावर हात ठेवत विचारले. तसा तो दचकला.
"तू काय करतोय इथं? " त्याने विचारले.
"मी तुला बघायला आलोय. मला टाळून रोज इथं हे खायला येतो ते पण असले कामं करुन?का?" त्याला विचारले.
"सदा.. उन्हाळ्याच्या सुट्टीत बरंच काय घडलं रे घरात. अप्पा ट्रक चालवतात माझे माहिते ना तुला. त्यादिवशी हायवेला टायर बदलताना ज्याक निघाला आणि ट्रकच्या टायरखाली त्यांचा पाय गेला. त्यांना झालेली जखम नीट औषधपाणी नाय झाल्यामुळं सडली. त्यामुळं पायच कापावा लागला. एका पायानी अधू झालेत. आता कुठलं ड्रायविंग आणि काय. मोठा भाऊ आणि आई भाजी विकायला लागलेत. भावाची दहावी झालीये पुढं नको म्हणतोय तो शिकायला. अप्पा आता घरीच असतेत. त्यांना टीबी पण झालाय. खोकला लय उसळून यतो त्यांना. त्यांचं औषधपाणी, घरखर्च माझी शाळा. सगळं कसं परवडणार.
एक टाईम तरी मी माझं भागवावं, असं मनात आणलं आणि मग मी ह्या हरी काकांशी बोललो. ते मला दोन वडापाव देतात. एक मी आत्ता खातो आणि एक घरी जाऊन कारण चालत जाऊन खूप भूक लागते. बदल्यात मी त्यांची भांडी धुवून देतो. असं आहे हे सगळं." तो बोलला.
" अर्रर्र... तू मला का नाही बोललास हे सगळं. ते काही नाही तू हे कामं करायचं नाही. मी तुलापण डबा आणत जाईन. तू माझ्या डब्यात जेवत जा. " मी बोललो. मला हणमंतांची दशा पाहून खूप गलबलून आलं होत.
" सदा... तू मला डबा आणशील. पण ज्या दिवशी तू नसशील त्या दिवशी मी काय करणारे. माझी माई म्हणली की आता आपल्यासमोर लढाया उभ्या राहिल्यात. इतके दिवस अप्पानी लढली आपल्यासाठी आता आपण आपल्या लढायच्या. कशा ते तुम्ही डोकं लावून ठरवा. तिला हे मी जे करतो ते माहिते. तुझ्यावर अवलंबून राहून मी माझं इथलं कामं सोडणं, मला परवडणार नाही रे." त्याचं उत्तर ऐकून मी मलूल झालो. ते त्यानं पाहिलं.
"पण सदा.. तू माझ्यावर आलेली परिस्थिती ओळखून माझ्याबरबर किती मायेनी वागतोय. हे मी कधी विसरणार नाही रे! तू माझा खरा मित्र आहेस." हनुमंता मला तसं म्हणालेला अजूनही आठवतो.
****
"जन्माला घातलेल्या स्वतःच्या पोरानी अंगावर हात टाकायच्या आत गावाला आलो हे खरंतर बरंच केलं मी. किती नकोसा झालो होतो मी त्याला आणि सुनबाईला. सतत अपमान, दुर्लक्ष आणि घृणास्पद दृष्टी मरणप्राय झाली होती. असो.. चाळीस पंचेचाळीस वर्ष झाले गाव सोडून. पण इथं घर तरी आहे माझं. नशीब!.. .पण एकटा कसा राहू? मागल्यावर्षी ही गेली आणि हालचं सुरु झाले. हा अलझायमर नावाचा आजार ही मलाच व्हायचा होता. ही होती तोवर ती सांभाळत होती मला. पण माझ्या आधीच मुक्काम गाठला तिने. आता माझी अवस्था कन तुटलेल्या पतंगीगत झालीये. घराच्या आसपासच सगळं लक्षात ठेवावं लागणारे. कसं होईल देव जाने. पण करणं तर भाग आहे.
बराच वेळ झाला की आपण इथं बसलोय. घरी निघायला हवंय. अंधार पडेल मग रस्ता सुचायचा नाही.
अं!.. हा.. ह्या रस्त्याने सरळ मग पुढल्या उजव्या अंगाने जात डावीकडचं पाचवं घर आपलं. डावीकडे की.. उजवीकडे.. घर उजवीकडे की वळण डावीकडे... काय करावं? आपल्या घराचा नेमका पत्ता.. तो ही आठवतं नाही.. कोणाला विचारू? इथं सगळे नवे लोकं राहायला आलेत.. देवा!!. आता रे?
कसं शोधणार.. हा.. जाऊन पाहू.. उजवीकडं वळू.. पाचवं पाचवं.. न.. नाही हे नाही.. उलट्या दिशेला.. गेलो. की... हा मिळेल... बघू बरं... इथे तर दुकानें दिसतायत.. कुठं आलोय मी घरी कसा जाणारं.. ही आजारामुळं आलेली बधिरता.. काय आठवत नाहीये.. कसं जाऊ मी घरी?"
"सदा??"
कोणी मारली ही हाक.. माझ्या ह्या नावाने मला माझे जुने जवळचे लोकंच हाक मारतात. ते सगळे एकेमागे एक गेले की.. आता कोण उरलंय आणि? अष्टगन्ध.. किती दिवसात हा वास आला नव्हता.
"सदा!! सदा.. अरे सदाच न तू?"
"कोण तू.. तुम्ही?"
"सदा अरे मी हनुमंता.. हनुमंता तुझा मित्र.. ओळखलस की नाही?"
"हनुमंता.. हनुमंता... अरे तू... तू देवासारखा आलास रे.. संकटमोचन बनून आलास. घरी ने रे मला.. घरी ने.. काही आठवत नाहीये आता मला. तू.. तू तेवढा लक्ख आहेस.. बाकी सगळं विरळ."
तुझ्या घराच्या शेजारी सांगून ठेवलं होत. इथे कोणीही राहायला आलं तर मला कळवा. तुझ्या शेजार्यांनी फोन केला की तू आलायस. तु घरी सापडला नाहीस मग शोधत इथवर आलो. चल चल घरी चल सदा. मी आलोय ना.. तुला शेवट्पर्यंत सोडणार नाही. तुझ्या शेजाऱ्याकडून समजलं मला सगळं. मी आहे तुझ्यासोबत सदा. जसा तू होतास माझ्यासाठी. मी आहे.
****
नक्षत्रांचे देणे म्हणू वा
म्हणू प्रेमवत छाया,
स्नेह देई तो स्नेही असा की,
जणू आईची आभाळमाया...
- शब्दभ्रमर