आज एक बातमी वाचली… आणि मन शांत बसलंच नाही.
एक तीस वर्षांचा तरुण—न्यायाधीश. समाजात उच्च पदावर असलेला, जबाबदारी असलेला, बुद्धिमान व्यक्ती. बाहेरून पाहिलं तर त्याचं आयुष्य स्थिर, यशस्वी आणि आदर्श वाटेल. पण अचानक बातमी आली—त्याने आत्महत्या केली.
तो माझ्या ओळखीचा नव्हता. मी त्याला कधी पाहिलं नव्हतं. आमच्यात काहीच नातं नव्हतं.आमचं. शहर. पण एक नव्हतं . दूर दूर पर्यंत त्याचा आणि माझं काही नात नव्हतं पण तरीही त्याची ही बातमी मनात खोलवर जाऊन बसली. जगात अनेक वृत्ती होतात आत्महत्या होतात अपघात होतात पण ही बातमी माहीत नाही मनावर कुठेतरी खोल तळ्यात जाऊन विचार करायला लावणारी आहे.
का?
कारण ही फक्त त्याची कथा नाही… ही अनेक पुरुषांची न बोललेली कहाणी आहे.
आपण नेहमी म्हणतो—पुरुष मजबूत असतात. त्यांना रडायचं नसतं. त्यांना सहन करायचं असतं. घर चालवायचं असतं. जबाबदाऱ्या पेलायच्या असतात. पण कुणी कधी विचार केलाय का, या “मजबूत” शब्दाच्या मागे किती तुटलेपण लपलेलं असतं मजुबत हया शब्दामागे किती वेदना असतात.
पुरुषांनाही त्रास होतो. त्यांनाही अपयश जाणवतं. त्यांनाही नात्यांमध्ये वेदना होतात. त्यांनाही मानसिक ताण येतो. पण त्यांना बोलायला जागा मिळत नाही.कारण तों पुरुष?
लहानपणापासून त्यांना शिकवलं जातं— “रडू नकोस.” “कमजोर दिसू नकोस.” “पुरुष आहेस तू.”
आणि हळूहळू हे शब्द त्यांच्या मनात अशी भिंत उभी करतात, की ते स्वतःच्या वेदनाही कोणाला सांगू शकत नाहीत.
कधी कधी ते हसत असतात, काम करत असतात, जबाबदाऱ्या पार पाडत असतात… पण आतून मात्र ते तुटत असतात.
ही तूट हळूहळू वाढत जाते… आणि एक दिवस ती इतकी मोठी होते की, माणूस शांतपणे सगळं सोडून निघून जातो.
हीच खरी शोकांतिका आहे.
आज गरज आहे ती एका मोठ्या बदलाची.
आपल्याला हे मान्य करावं लागेल की— पुरुषही माणूस आहेत. त्यांनाही भावना आहेत. त्यांनाही आधाराची गरज आहे.
त्यांच्यासाठीही मानसिक आरोग्याबद्दल खुलेपणाने बोलण्याची जागा असायला हवी. त्यांना न्याय न करता ऐकणारे लोक हवे. त्यांना “तू मजबूत आहेस” ऐवजी “तू बोलू शकतोस” असं सांगणारे हवे.
आणि सर्वात महत्वाचं— पुरुषांसाठी स्वतंत्र आणि प्रभावी मानसिक आरोग्य हेल्पलाइन अधिक मजबूत व्हायला हव्यात.
आज काही हेल्पलाइन आहेत—जसे की मानसिक आरोग्य सहाय्य सेवा, समुपदेशन केंद्रे—पण अनेक पुरुष अजूनही तिथपर्यंत पोहोचत नाहीत. कारण त्यांना अजूनही वाटतं की “मला मदत मागणं म्हणजे कमजोरी आहे.”
हे बदलायला हवं.
मदत मागणं ही कमजोरी नाही… ती जगण्याची ताकद आहे.
त्या अनोळखी तरुणाची बातमी मला एक प्रश्न विचारून गेली— आपण अजून किती वेळ “तो मजबूत होता” असं म्हणत राहणार, आणि त्याच्या आतल्या तुटण्याकडे दुर्लक्ष करणार?
जर त्याला कुणीतरी ऐकलं असतं… जर त्याला कुणीतरी समजून घेतलं असतं… तर कदाचित ही वेळ आली नसती.
आज गरज आहे ती सहानुभूतीची, संवादाची आणि ऐकण्याची.
कारण शेवटी एकच सत्य आहे— माणूस वाचवायचा असेल तर त्याला ऐकणं शिकावं लागतं.
ज्याप्रमाणे स्त्रियांना कायदे आहे. स्त्री पुरुष समानता म्हटलं तरी पुरुषांच्या बाबतीत कुठेतरी या वेदना अजूनही मागे आहे. आधार असतो, तसं पुरुषांसाठीही असायला हवं. त्यांच्यासाठीही हेल्पलाइन असायला हव्यात. त्यांनाही कुणीतरी विचारायला हवं— “तू ठीक आहेस ना?”
कारण प्रत्येक वेळी आत्महत्या ही कमकुवतपणाची नाही, तर ती एक न ऐकलेल्या वेदनेची शेवटची किंकाळी असते.
“शिक्षण आणि संस्कार…
आता दोन वेगळ्या वाटा झाल्या आहेत.”
आज माणूस खूप शिकतोय…
पदवी मिळवतोय, करिअर घडवतोय, पैसा कमावतोय…
पण त्याच वेळी काहीतरी हरवत चाललंय—
संस्कार.
पुस्तकातलं ज्ञान वाढतंय,
पण मनाचं भान कमी होतंय.
मोठ्या पदावर पोहोचतोय,
पण माणुसकीत मात्र कमी पडतोय.
आज शिक्षण आपल्याला “यशस्वी” बनवतंय,
पण संस्कारच आपल्याला “माणूस” बनवतात.
घरात संवाद कमी झालाय,
भावना व्यक्त करणं कमी झालंय,
आणि म्हणूनच—
मनातल्या गोष्टी मनातच साचत चालल्या आहेत.
पुरुष असो किंवा स्त्री—
दोघांनाही आधाराची गरज असते.
पण “तू मजबूत आहेस” या नावाखाली
आजही कित्येक पुरुष गप्प राहतात…
आणि हळूहळू आतून तुटत जातात.
म्हणूनच आज पुन्हा गरज आहे—
फक्त शिक्षणाची नाही,
तर संस्कारांची, समजुतीची आणि ऐकण्याची.
कारण…
“डिग्री आयुष्य घडवते,
पण संस्कार आयुष्य वाचवतात.”
“पुरुषांनाही वेदना असतात…
त्यांनाही आधाराची गरज असते…
आणि हो—त्यांनाही ‘हेल्पलाइन’ हवीच असते.”
पुरुष म्हणजे फक्त जबाबदारी उचलणारा नाही,
तोही एक मन असलेला माणूस आहे.
त्यालाही ताण येतो,
त्यालाही अपयश टोचतं,
त्यालाही नात्यांमध्ये तुटणं सहन करावं लागतं…
पण तरीही त्याला सांगितलं जातं—
“मजबूत राहा… गप्प राहा…”
आणि हीच गप्पी…
कधी कधी त्याच्या आयुष्यावरच पडदा टाकते.
आज गरज आहे—
पुरुषांनीही बोलायला शिकण्याची…
आणि समाजाने त्यांना ऐकण्याची.
कारण—
“Help मागणं ही कमजोरी नाही,
ती जगण्याची ताकद आहे.”एक हेल्प लाईन हवी.
सौ तृप्ती देव
भिलाई