"आज मी तुला असं शेवटचं भेटायला आलीये. "
तिचं हे वाक्य खरंतर माझ्या खूप अंगावर यायला हवं होतं. पण हा परिणाम मला काहीसा अपेक्षित होता.
मी टेकडी मागच्या दगडी खाणीच्या वर एका दगडावर बसून तिची वाट पाहत होतो. "संध्याकाळी टेकडीवर" असा निरोप तिने वहीतून पाठवलेला. मी अकरावीला होतो आणि ती पण. एकाच ट्युशनमध्ये पण शाळा वेगवेगळी असताना नववीत ओळख झाली होती. एकमेकांशी थोडं थोडं बोलणं होत मग त्याची जागा नाजूक भावनेने कधी घेतली आणि तो बंध(?) तयार झाला. मी काही देखणा आणि अति हुशार वैगरे नव्हतो. ती पण अभ्यासात साधारण पण चार चौघीत उठून दिसणाऱ्यातली होती.
पण त्या वयात जो पाहिला कनेक्ट होतो त्याच्यासोबत हे घडणे साहजिक असते. आम्हाला एकाच गोष्टीने जवळ आणले होते ते म्हणजे स्केचिंग चा नाद. ती एकदा ट्युशनला उशिरा आली. मुलींच्या बाकामध्ये जागा संपली होती आणि मी शेवटच्या बाकावर एकटाच होतो. ती माझ्या शेजारी बसली.
गीता.
इंग्लिश सायन्स आणि मॅथ्स शिकवणाऱ्या ट्युशन्स त्यावेळी सर्रास लावल्या जात. मॅथ्स सायन्स ठीके पण इंग्लिश?? मला जराही इंटरेस्ट नव्हता. माझं इंग्लिश वाचून वाचून बरं झालं होतं. फक्त व्याकरण करुन मी पेपरला जायचो आणि फर्स्ट क्लास घ्यायचो. त्यामुळं ट्युशनच्या त्या पिरियड ला मी माझ्या छंदात दंग होत असे.
वहिच्या मागच्या पानावर मी किंगफिशर काढण्यात गुंतलो असताना गीता शेजारी येऊन बसली. आधी तर तिचं लक्ष समोर होतं. पण बिनकामाचा मी काय खरखर करतोय हे तिने बघितलं आणि तीही समोर काय चाललंय त्याच्यापासून डिस्कनेक्ट झाली. आपण कितीही दंग असलो तरी काही वेळाने आपल्यावर सतत रोखलेली नजर आपोआप जाणवू लागतेच. मी डोळे तिरके करुन बघितलं तर गीता माझ्या चित्राकडे पाहत होती.
"मस्त!!"हलकं हसून ती म्हणाली.
तिने तिच्या वहिचं मागचं पाण दाखवलं. वेलबुट्ट्या आणि मोर. हात भारीच वळत होता तिचा. मग मी तिला माझी वही दिली. माकडं, कुत्रे, हत्ती, काही स्वातंत्र्य सैनिकांची स्केचस, फ्रीहॅन्ड ड्रॉईंग्स.. आणि माझ्या काही स्टायलिश स्क्रिप्ट्स हे सगळं पाहून ती इम्प्रेस झाली.
दुसऱ्यादिवशी तिने मला तिची स्केच बुक दिली. तिची चित्र पाहून मग मी तिचं नाव old english font मध्ये लिहून दिलं.
तिला ते जाम आवडलं. अशी आमच्या ओळखीची सुरवात झाली. आम्ही चित्रांबद्दल, चित्रपटांबद्दल किंवा सिनेमांतल्या गाण्यांबद्दल बोलायचो. नट, नट्या किंवा त्यांचे इतर संदर्भ. पण चर्चेत अभ्यासाबद्दल कधीच नाही. मला तसे घट्ट मित्र नव्हतेच त्यामुळं माझं काय चाललंय यात कोणाला फार इंटरेस्ट नव्हता. गीताशी ओळख आणि ओळखीची मैत्री होता होता नववी सरली. दहावीच्या ट्युशनसाथी आम्ही पुन्हा तिथेच आलो. त्यावेळी आम्ही खूप दिवसांनी एकमेकांना पाहिलं आणि तेव्हा जाणवलं की एकनेकांची किती कमतरता जाणवत होती.
तिला टेकडीवर भेटायला बोलवून मी तिच्यापाशी हे सरळपने कबूल केलं की मला तिची खूप आठवण येत होती आणि मला ती खूप आवडते. ती लाजली आणि मान खाली घालून तिने चेहरा झाकला. तेवढ्याने तिच्या भावना मी ओळखल्या आणि स्वतःभोवती गिरकी घेत एक उडीच मारली. ती त्या दिवशी अक्षरशः तिथून पळून गेली.
नंतरच्या भेटीत आम्ही त्याचं जागी तास तास गप्पा मारल्या. हातात हात आणि डोळ्यात डोळे घालून बसलो. कर्षण वाढून आयुष्यातलं पहिलं चुंबन ही तिथेच. तिच्या वॉकमनवर "गारवा आणि सांजगारवा" ची गीते ऐकली आणि गायली सुद्धा. सोळाव्या वर्षातलं पहिलं वहिलं कोवळं प्रेम आम्ही समरसून करत होतो. दहावीचा गंभीरपणा तसा दोघांनाही होता. मार्क्स चांगले पाडायचे. हे मिळून ठरवलेलं.
पेपर्स पार पडले. सुट्ट्या पडल्या ती आठ दहा दिवसांनी गावी गेली. नंतर रिझल्ट्सला परत आली. आम्हाला दोघांनाही Distinction मिळालं होतं. अकरावीला एका कॉलेज मध्ये ऍडमिशन घेतलं. तिथं मात्र एका आठवड्यात सर्वमान्य झालं की आमचं आहे. कारण जिकडे तिकडे आम्ही एकत्रच जात असायचो.
महिन्याभराने तिने मला सांगितलं की माझं सायन्सला मन रमत नाहीये. तिला कला महाविद्यालय जॉईन करायचं म्हणू लागली. कारण तिला फाईन आर्टस् करुन डिजाईन क्षेत्रात काम करायची इच्छा होती. तिचा स्केचिंग चा नाद मला माहित होता. शेवटच्या राऊंडला तिचं ऍडमिशन यादीमध्ये नाव आल्याचं ही तिने कळवलं.
" मस्त यार. तुला जे आवडतंय ते करायला मिळतंय. " मी म्हणालो.
" मला तुला हे सांगायचंय की तू पण चल तिकडे. तुझं टॅलेंट जन्मजात आहे आणि मी प्रॅक्टिस ने कमवलेलं. तू या क्षेत्रात असशील तर काय करू शकशील. शिवाय भविष्यात आपण दोघेही एकाच क्षेत्रात काम करू आणि पुढे जाऊ."ती मला म्हणाली.
ती दोघांसाठी स्वप्नं बघत होती. तर मी माझ्या कौटुंबिक परिस्थितीचा विचार करत होतो. मी साधारण घरातला होतो. जिथे आर्टस् सारखं शिक्षण घेऊन यश मिळण्याची वाट बघणं परवडणारं नव्हतं. साधारण घरातली माणसे धोपट मार्गालाही शॉर्टकट शोधत असतात. तेव्हा अकरावीच शिक्षणही तिथेच थांबवून मी एका मोठ्या कपंनीमध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून सिलेक्ट झालोय असं सांगितलं. राहून खाऊन विद्यावेतनही मिळणारे. तीन वर्षानी पूर्ण पगारी जॉब मिळू शकेल. त्यासाठी मी दहावीच्या रिझल्ट नंतरच अर्ज देऊन परीक्षा आणि मुलाखत दिल्याचं तिला सांगितलं.
"एका शब्दानेही तू माझ्याशी ह्या सगळ्या गोष्टींबाबत बोलला नाहीस?" तिचं खवळणं स्वाभाविक होतं.
"माझ्या नंतर एक भाऊ आहे. एकतर मी नीट शिकेन किंवा तो अशी आमची परिस्थिती असताना मी माझ्या घरच्यांवर माझ्या शिक्षणासाठी दबाव आणू शकत नाही." माझं कारण मी तिच्यासमोर ठेवलं.
"आणि आपलं काय?" तिचा प्रश्न खूप त्रासदायक होता. माझं मौन माझी हतबलता दाखवत होतं.
ती फणकार्याने निघून गेली. खरंतर मला वाटत होतं की तिला म्हणावं. तू त्या मार्गाने पुढे जा मी या मार्गाने जातो. पुढं आपण एकत्र येऊ. पण माझी अशी अपेक्षा आत्मकेंद्रीपणा दाखवणारी होती. तसं म्हणणं मला अचानक चूक वाटलं. मी गप्पच राहिलो.
तिच्या कॉलेजच्या शेवटच्या दिवशी तीने मला टेकडीवर भेटायला बोलवलं.
"आज मी तुला असं शेवटचं भेटायला आलीये." ती म्हणाली.
"मला समजलं होतं." मी म्हणालो.
" तुला आपले रस्ते वेगळे झालेले चालतील असं दिसतंय. हॊ ना?" तिच्या स्वरात रागीट उपहास होता.
" तू महत्वाकांशी आहेस गीतू. तू तशी असण्याची तुला मुभा आहे कारण तसा तुझा सामाजिक स्तर आहे.मला ते परवडणारं नाही. माझी स्वप्नं साधी आहेत. माझ्यातल्या कला मी आयुष्यातला रंजकपणा वाढवण्यासाठी वापरतो. त्याने मी आयुष्यात काही साध्य करेन असं वाटत नाही. माझ्यासाठी माझं साधं आयुष्य ठीक आहे. " मी शेवटचं बोललो.
" ठीके. तुझं ठरलंय तर. तुझं आयुष्य तुला लखलाभ." असं म्हणून ती वळाली आणि काही पावले पुढे गेली. मी तिच्याकडे बघत होतो. ती परत वळाली. माझ्याकडे पळत येऊन मिठीत घुसली. रडत होती. मी फक्त उभा होतो. माझा हक्क संपला होता. तिने तिचे रडवेले डोळे माझ्यावर रोखले.
"तू तुझी नीट काळजी घे." एवढंच बोलली आणि मला सोडून परत निघाली. मी त्या दगडावर जाऊन बसलो. घण दाटले होते. कुंद पावसाला सुरुवात होणार जाणवत होतं. सगळं गच्च झालं होतं. अगदी माझ्या उरासारखं. ती संध्याकाळ न पेलवणारी होती....
आजही ती जीवघेणी संध्याकाळ मनात खोल रुजून बसलेली जाणवते. जेव्हा पावसाळी मळभ चौफेर दाटून येतात आणि स्मरणांच्या पाकोळ्या गलबलत जाग्या होतात. काळजात आजही हलकी कळ जाते आणि मनात जमा झालेले शब्द बोलू लागतात...
उरस्फ़ोट झाल्या काळजागत माझ्या
तुही तसाच बरसलास त्या दिवशी
माझ्या फाटक्या आयुष्यागत असलेली,
माझ्या स्वप्नांची लक्तरे ही भिजवलीस त्या दिवशी...
- शब्दभ्रमर 🍁🍁