जया देव तारी - भाग ५
प्रतिवार्षिक रिवाजा प्रमाणे पुराण संपले आणि ‘पार्वतीपते हर हर महादेव’ असा उद्घोष करीत जोशीबुवानी मानकरी दात्यांकडे कटाक्ष टाकला. दात्यानी शंभू देसायांकडे मोहरा वळवून त्याना खूण केली. इशारा ओळखून देसाई उठले. त्यानी बुक्क्याचे ताम्हन उचलले. गाभाऱ्याच्या दिशेने बुक्क्याची चिमूट उधळून ते जोशीबुवांच्या समोर गेले. चिंतू जोशी म्हणजे हळयातले ‘किटाळ’ म्हणून ओळखले जात. गावात तंटा बखेडा झाला नी न्यायसभा भरली तर दात्ये, म्हाजन यांच्या बरोबरीने पंच म्हणून चिंतूकाका जोशी , माधवराव दांडेकर आणि विठू घाडी या तीन असामीना बोलावायचा रिवाज होता.
शंभू ताम्हन घेवून जोशीबुवांच्या समोर उभा राहिल्यावर त्याच्याकडे जळजळीत कटाक्ष टाकीत जोशीबुवा गरजले, “ कोण रे तू सोकाजी? आम्हांस बुक्का लावायचा मान पूर्वसत्तेचे अधिकारी प्रभु मिराशी अणि राजसत्तेचे अधिकारी दात्ये यांस आहे...... तू कोण कुठचा भडभुंजा मिराशाचा वारसदार हयात असताना त्यास आबधाकाने हटवून त्याचा अधिकार कब्जात घ्यायचे धाडस तरी तूज कसे झाले? मी तूज ओळखीत नाय....खोताच्या वाड्यावर कबजा करून तू भुजंगा सारखी फणा काढून बसला आहेस , इथपर्यंत ठीक आहे त्याचे पारिपत्या मी करूशकत नाही.... मुळात खोतानी मागचा पुढचा विचार न करता तुज्या कच्छपि लागून चुड दाखवून वाघ घरात घालावा त्या न्यायाने तुला वाड्यात थारा दिला. पण हे देवस्थान आहे. इथे तुला रिगाव नाही करता यायचा. इथे सुखासुखी अधिकार मिळत नसतो. तो वंशपरंपरेने किंवा गावची रयत मान्यता देईल तेंव्हाच मिळतो. ते ताम्हन खाली ठेव नी हो बाजूला, आला मोठा मानकरी माझा बहुमान करायला.... ” शंभू देसाई ताम्हन खाली ठेवून बाजुला झाला. मग यशवंताकडे मोहरा वळवीत जोशीबुवा गरजले, “ अहो यशवंतराव, असे पुढे या, ते ताम्हन उचला नी आमच्या कपाळास बुक्का लावा.” बिचारा यशवंता कावरा बावरा होवून बघित राहिला. तो साधा नी छक्के पंजे करण्याची नी ओळखण्याची कुवत नसलेला होता तरीही जोशी बुवानी केलेल्या खडसावणीचा मतितार्थ त्यालाही पुरता उमगला होता. मग दात्ये उठले. त्यानी जवळ जावून त्याचा हात धरून पुढे नेत ताम्हन त्याच्या हाती दिले आणि सांगितले, “जोशीबुवाना बुक्का लावा ” त्याने जोशी बुवाना बुक्का लावला. बुवानी त्याच्या माथ्यावर बुक्क्याचे बोट टेकवले. एवढे रामायण घडेपर्यंन्त शंभू अवाक् होवून बघितच राहिलेला होता. हर हर महादेव घोष करीत बुवा उठल्यावर तो भानावर आला नी मान खाली घालून मंदिरा बाहेर पडला.
त्या घटनेपासून मरेपर्यंत शंभूने कधिही ईश्वराच्या देवळात पाऊल ठेवले नाही. मात्र त्याने येशालाही कधी देवळात जावू दिले नाही. त्या नंतर शिमग्याचा सण आला. गावहोळी तोडून ती वाजवीत गाजवीत मांडावर आणल्यावर प्रभुमिराशी खोताने तिच्यावर गंधफुल घालून पुजा केली की मग नारळ ठेवल्यावर होळी उभी केली जात असे. दाजी खोत हयात असताना शंभू त्यांच्या बरोबर कैक वेळा गेलेला होता. देवळातल्या अनुभवामुळे त्याने मांडावर जाणे टाळले होते. होळी मांडावर आली तेंव्हा खोत हजर नाहीतसे दिसल्यावर घाड्याने त्याना बोलावण्यासाठी माणूस धाडले. त्यानी वाड्यावर जावून निरोप सांगितल्यावर येशाला घेवून शंभू देसाई मांडावर गेले. योजलेले असूनही येशाला डावलून आपण पुढे होवून होळीची पुजा करायचे धाडस त्याना झाले नाही. मात्र नारळ ठेवून झाल्यावर खिशातून सव्वाअकरा रुपये काढून त्यानी मानकरी विठू घाडी याच्या हातात दिले. त्याने खुश होत शंभू देसायाना नमस्कार केला.
गावात जनलोकात आबधाक ठेवायचा, मानमरातब मिळवायचा तर एखादे देवस्थान हातात असायला हवे हे शंभूने ओळखलेले होते . गावात पावणाई, विठोबा, रवळनाथ. मारुती या देवांची देवळे होती. पण तिथेही क्वचित एखादं वार्षिक होई तेंव्हा मानकरी ठरलेले होते. त्या ठिकाणी तो हटकून हजेरी लावायचा. अकरा, एकवीस रुपये अशी त्याकाळी मोठी रक्कम द्यायचा. त्यामुळे तो गेला की इतर समाज ‘देसाय भाऊ इले’ म्हणून गोंडा घोळीत आगत स्वागत करीत. पण त्या पलिकडे काही शिरकाव करायची संधी त्याला मिळाली नाही. उलट येशा खुळा असूनही एरव्ही त्याची टिंगल टवाळी करणारे लोक गाविक कार्यात त्याला खोत म्हणून आदर देत. त्याला मानाचा नारळ दिला जात असे. अगदी घरगुती कार्यक्रमातही आमंत्रणाचा नारळ येशाला द्यायची रूढ गोरगरीब लोकसुद्धा कटाक्षाने पाळीत असत. खूप विचार करून एखादे नव्याने सुरू करून तिथे आपले मानाचे स्थान प्रस्थापित करायचा त्याचा मनसुबा होता. पण विचाराला नेमकी दिशा मिळत नव्हती.
पाच सहा वर्षात खोताच्या कारभारातून त्याने चांगलीच माया जमा केली. गडी गोखमे , ग्रामस्थ यांच्याशी तो अदबीने वागायचा. लग्नकार्य, पुजा अशा कौटुंबिक कार्याना जाणूवपूर्वक हजेरी लावून मोठ्या रकमेचा आहेर करायचा. अडी नडीला कोणा कोणाला उसनवारीने अल्प व्याजाने, तर माणूस बघून बिनव्याजूही कर्जावू रकमा द्यायचा त्यामुळे बरेच लोक त्याचे मिंधे झालेले होते. येशाला मात्र तो गड्यासारखा वागवीत असे . शेण- गोठा, माडापोफळीचे शिंपणे, बेण-बेणणावळ अशी हलकी सलकी कामे त्याला करायला लावायचा. सुरवाती सुरूवातीला तो नी त्याचा मुलगा अनंता त्याला मारझोडही करीत . त्यामुळे तोंडावर बोलले नाहीत तरी माघारी बहुजन समाज शंभू देसायाची निंदा नालस्तीच करीत. या गोष्टींची गावभर चर्चा व्हायला लागली नी लोकांची नाराजी बायकोच्या कानी आल्यावर तिने शंभूला सावध केले नी हे प्रकार बंद झाले. (क्रमश;)