swtla hi jpa in Marathi Women Focused by Trupti Deo books and stories PDF | स्वतःलाही जपा

Featured Books
Categories
Share

स्वतःलाही जपा



“स्वतःलाही जपा…” ❤️
सकाळची ती घाईघाईची वेळ असते... मुलांचे डबे, नवऱ्याचा नाश्ता, आणि सकाळची सगळी कामे आटोपून जरा कुठे चहाचा कप हातात येतो. घराची सगळी धावपळ थांबलेली असते आणि आपण सुटकेचा श्वास टाकत विरंगुळा म्हणून सोफ्यावर बसून हातात मोबाईल घेतो. फेसबुक उघडलं की, 'आजची रेसिपी' म्हणून एक व्हिडिओ अगदी न चुकता समोर येतो. मनात कसं असतं, 'उद्या सकाळी नाश्त्याला काय करायचं?' ही काळजी गृहिणीला चोवीस तास लागलेलीच असते, त्यामुळे आपणही जशी एखादी आवडीची सिरीयल बघावी, तसा तो व्हिडिओ अगदी मन लावून बघायला लागतो. तेवढेच कोणत्या नवीन आयडिया मिळतील.

आणि आपल्याला कधी कधी स्वतःला कामाचा कमालीचा कंटाळा आलेला असतो, पण तिचा तो व्हिडिओ बघताना मनाला एक वेगळीच हुरहूर लागून राहते. 'बापरे, ही ताई रोज कशी काय न चुकता इतक्या उत्साहाने हजर असते?' असं वाटायला लागतं. ती रोज एक नवीन रेसिपी शिकवत असते... कधी उद्याच्या नाश्त्याचा छानसा पदार्थ, कधी दुपारच्या भाज्यांचे प्रकार, तर कधी रात्रीच्या जेवणाचे बेत! त्या सगळ्यामध्ये पदार्थाची चव वाढवण्यासाठी ती रेसिपीच्या काही खास टिप्सही देत असते—तृप्ती देव 
भिलाई 

"बघा हं बायकांनो, कोथिंबीर आणि पुदिना जर असा व्यवस्थित निवडून, साफ करून डब्यात भरून ठेवला ना, तर २० दिवस अगदी ताजातवाना राहतो! आणि आल्या-मिरच्यांचं आयुष्य वाढवायचं असेल, तर ही ट्रिक नक्की वापरा..." तिच्याकडे विविध प्रकारच्या नवीन नवीन टिप्स असतात.

तिची ती रोजची मेहनत, तो हसरा चेहरा आणि नवीन काहीतरी शिकवण्याची चिकाटी बघून खरोखर कौतुक वाटतं. पण... तो व्हिडिओ संपतो, मोबाईलची स्क्रीन बंद होते आणि आपण पुन्हा जेव्हा एका सुस्कारा सोडून स्वतःच्या स्वयंपाकघरातल्या ओट्यासमोर येऊन उभे राहतो... समोर दुपारच्या जेवणाची तीच जुनी चिंता आपली वाट पाहत असते. नेमक्या याच वेळी, मनाच्या एका अत्यंत हळव्या कोपऱ्यात एक वेगळाच विचार डोकावून जातो. आपण नकळत मनातल्या मनात विचारतो—

"अगं बाई! हे सगळं तर ठीक आहे गं... तू रोज नवीन पदार्थ शिकवतेस, कोथिंबीर-मिरच्या कशा ताज्या ठेवायच्या याच्या टिप्सही देतेस. पण रोज रोज त्याच स्वयंपाकघरात तेच ते काम करून आणि पोळ्या लाटून आम्ही ज्या कंटाळून गेलोय, स्वतःला कसं ताजं ठेवायचं? यावर काही टिप्स आहेत का तुझ्याकडे? कोथिंबीर सुकली तर बाजारात शंभर वेळा नवीन मिळेल, आलं-मिरच्या संपल्या तर परत आणता येतील... पण रोजच्या या चक्रात, घर आणि संसार सांभाळताना एका गृहिणीची स्वतःची जी ‘ताजगी’ हरवत चाललीय, ती कुठल्या मार्केटमध्ये मिळणार गं?"

खरंच, किती मनाला भिडणारा आणि प्रत्येक साध्या गृहिणीच्या मनात रोज येणारा हा विचार आहे ना? सकाळी उठल्यापासून ते रात्री सगळ्यांच्या शेवटी झोपण्यापर्यंत गृहिणीची ड्युटी २४ तास सुरू असते. फ्रिजमध्ये ठेवलेली भाजी ताजी राहते, पण घरातली ही मुख्य माणसं मात्र रोजच्या दगदगीने कोमेजून जाते. स्वयंपाकघरातल्या वस्तू ताज्या कशा ठेवायच्या याच्या हजारो टिप्स सोशल मीडियावर रोज मिळतील, पण ती वस्तू रोज फ्रेश ठेवणारी ‘ती’ स्वतः कशी ताजी आणि आनंदी राहील, यावर फारसं कोणी बोलतच नाही.

चला तर मग, आज स्वयंपाकघरातल्या भाज्यांच्या टिप्स थोड्या बाजूला ठेवूया... आणि रोजच्या या चक्रातून स्वतःला कसं नेहमी फ्रेश, आनंदी आणि जिवंत ठेवायचं, याच्या काही अगदी साध्या, सोप्या गोष्टींवर गप्पा मारूया.

सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे सकाळच्या त्या चहाच्या वेळेला 'स्वतःचा' वेळ बनवा. घरातल्या सगळ्यांना गरम गरम चहा आणि नाश्ता वाढून झाल्यावर, जेव्हा तुम्ही चहा प्यायला बसाल, तेव्हा किमान १५ मिनिटांसाठी फोन आणि पुढच्या कामांची चिंता बाजूला ठेवा. खिडकीत किंवा बाल्कनीत शांतपणे बसा आणि तो चहा मनापासून एन्जॉय करा. तो वेळ फक्त आणि फक्त तुमचा असेल, ज्यामध्ये फक्त तुम्ही आणि तुमचे विचार असतील.

दुसरी गोष्ट म्हणजे स्वयंपाक करताना आवडीचं संगीत सोबतीला ठेवा. भांड्यांचा कटकट आवाज आणि कुकरच्या सतत होणाऱ्या शिट्ट्यांच्या मागे स्वतःचा आनंद हरवून देऊ नका. दुपारचा स्वयंपाक करताना बाजूला मोबाईलवर तुमची आवडीची गाणी, एखादं हलकं-फुलकं पॉडकास्ट किंवा जुनी भावगीतं लावून ठेवा. बघा, गाण्याच्या सुरांसोबत हाताखालचं काम कसं पटापट होईल आणि मनावर आलेला थकवा कधी पळून जाईल हे तुमचं तुम्हालाच कळणार नाही.

तिसरी आणि मनाला शांत करणारी गोष्ट म्हणजे 'परफेक्ट' असण्याचा हट्ट आता सोडून द्या. रोज रोज काहीतरी ५ स्टार जेवण झालंच पाहिजे, घर नेहमी अगदी चकचकीत काचेसारखं असलंच पाहिजे हा अट्टाहास कधीकधी बाजूला ठेवायला शिका. एखाद्या दिवशी खूप कंटाळा आला असेल, शरीर थकलेलं असेल, तर हक्काने सांगा की आज जेवणात साधं वरण-भात किंवा खिचडी असेल. मशीनलाही विश्रांती लागते, तुम्ही तर माणूस आहात! स्वतःवर थोडी दया दाखवा.

या सगळ्या धावपळीत, जरा मागे वळून बघा... तुमचा तो जुना छंद कुठे हरवलाय का? लग्नाआधी किंवा मुलांच्या जन्माआधी तुम्हाला काय करायला आवडायचं? एखादं पुस्तक वाचणं, मेहंदी काढणं, गाणं गाणं की फक्त जुन्या मैत्रिणीशी फोनवर तासभर मनमोकळ्या गप्पा मारणं? आठवड्यातून किमान एक-दोन तास तरी तुमच्या त्या जुन्या छंदासाठी नक्की काढा. जेव्हा आपण आपल्या आवडीचं काहीतरी करतो, तेव्हा मनाला मिळणारी ऊर्जा काही वेगळीच असते.

शेवटची आणि सगळ्यात सुंदर गोष्ट म्हणजे निसर्गाशी नातं जोडा. दिवसभर घरातल्या चार भिंती आणि स्वयंपाकघर यातच आपला सगळा वेळ जातो. संध्याकाळी किंवा सकाळी थोडा वेळ का होईना, घराबाहेर पाऊल टाका. बागेतल्या झाडांना पाणी घालताना त्या ओल्या मातीचा सुगंध घ्या. कधी मस्त पाऊस पडत असेल, तर खिडकी उघडून दोन मिनिटं शांतपणे तो पाऊस डोळे भरून अनुभवा. निसर्गात मन शांत करण्याची एक अद्भूत शक्ती असते.

शेवटी एवढंच म्हणावंसं वाटतं की, फ्रिजमध्ये कढीपत्ता आणि कोथिंबीर डब्यात व्यवस्थित साठवून ठेवण्यापेक्षा, स्वतःच्या मनातल्या आनंदाचा डबा नेहमी कसा भरलेला ठेवायचा आणि उत्साह कसा टिकवायचा हे जास्त महत्त्वाचं आहे. हे संपूर्ण घर तुमच्या एकाच्या जिवावर चालतं. ते घर तेव्हाच हसतं-खेळतं आणि आनंदी राहील, जेव्हा तुम्ही मनातून ताज्या, तृप्त आणि मनापासून समाधानी असाल!

काय मग... पटतंय ना? पुढच्या वेळी स्वयंपाकघरात जाताना कोथिंबीर साफ करायच्या आधी आणि आल्या-मिरच्यांचे देठ तोडण्यापूर्वी, स्वतःच्या चेहऱ्यावर एक छानसं आणि ताजं हसू ठेवायला अजिबात विसरू नका! 😊 


सौ तृप्ती देव 
भिलाई छत्तीसगड 
@copy right