vaja mas in Marathi Moral Stories by Trupti Deo books and stories PDF | कॅलेंडर मधली क्रांती..जेव्हा सासू ने सुरु केला वजा मास.

Featured Books
Categories
Share

कॅलेंडर मधली क्रांती..जेव्हा सासू ने सुरु केला वजा मास.

कॅलेंडरमधली क्रांती... जेव्हा सासूने सुरू केला 'वजा मास'!
सध्या सगळीकडे तीन वर्षांनी येणाऱ्या पारंपारिक अधिक मासाची, म्हणजेच धोंड्याच्या महिन्याची जोरदार रेलचेल सुरू आहे. मुली-जावयांना हक्काने घरी बोलवणं, चांदीच्या ताटात पुरणपोळीचं सुग्रास जेवण देणं, आणि ते ३३ अनरसे देऊन जावयाला 'लक्ष्मी-नारायण' मानून त्याचे लाड पुरवणं सुरू आहे.

 परवा दुपारी मी सुद्धा माझ्या घराच्या सोफ्यावर बसून जावयाला काय काय खरेदी करायची, याची मोठी यादी करत होते. माझा नवरा नेहमीप्रमाणे कोपऱ्यात बसून अगदी शांतपणे वर्तमानपत्र वाचत होते. बदल हवा असं त्यांना कधी वाटत नाही. बदल केला तर नक्कीच तो चांगला असं असं वाटतं.

जावयाच्या खरेदीची यादी बनवता बनवता अचानक माझ्या डोक्यात एक विचार चमकला. मी हातातली लेखणी बाजूला ठेवली आणि नवऱ्यालाम्हटलं, "अहो ऐकलंत का? जावई दुसऱ्याच्या घरातून आपल्याकडे दोन दिवस पाहुणा म्हणून येतो, तर आपण त्याला देव मानून त्याचे एवढे लाड करतो. पण जी मुलगी तिचं हसतं-खेळतं माहेर सोडून, स्वतःचं आडनाव बदलून, आपलं घर साभाळायला 'सून' म्हणून येते... तिच्यासाठी कॅलेंडरमध्ये असा एकही महिना का नसावा? म्हणून मी ठरवलंय, या अधिक मासाला छेद देत मी माझ्या सुनेसाठी कॅलेंडरमध्ये एक नवीनच सण सुरू करणार आहे— ज्याचं नाव असेल 'वजा मास'!"
माझं हे बोलणं ऐकून नवऱ्यानी वर्तमानपत्र खाली ठेवलं, चष्मा नाकावर सरकवला आणि आश्चर्याने म्हणाले, "हा कुठला नवीन मास? कॅलेंडरमध्ये जेमतेम १२ महिने असतात, १३ वा अधिक मास असतो. हा 'वजा मास' कुठून टपकला?"
मी त्यांना हसून समजावून सांगितलं की, 'वजा' म्हणजे वजाबाकी नाही, तर सुनेच्या डोक्यावरचा घरचा, स्वयंपाकघराचा आणि जबाबदाऱ्यांचा सगळा ताण महिनाभरासाठी 'वजा' करणे! हा संपूर्ण महिना तिने फक्त तिचं आयुष्य बिंधास्त आणि आनंदाने जगायचं.
तेवढ्यात माझा मुलगा आणि सून दिवसभराचं काम आटपून घरात आले. सुनेच्या एका हातात कष्टाची पिशवी होती आणि दुसऱ्या हातात बाजाराची भाजी. तिची ती दमलेली अवस्था बघून मी लगेच तिच्या हातातली भाजीची पिशवी बाजूला घेतली आणि तिला प्रेमाने पाटावर बसवलं. मी घरात जाहीर केलं की, आजपासून या घरात माझ्या सुनेसाठी 'वजा मास' लागू झाला आहे!
सुनेने आश्चर्याने विचारलं, "वजा मास? आई, म्हणजे नक्की काय?"
मी तिला सांगितलं की, या संपूर्ण महिन्यात तुला स्वयंपाकघरात पाऊल ठेवायला सक्त मनाई असेल. जावयाला ५६ भोग चालतात ना? मग माझ्या सुनेला महिनाभर तिच्या आवडीचे पुरणपोळी, श्रीखंड-पूरी आणि सुग्रास जेवण तिची सासू स्वतःच्या हाताने बनवून भरवणार! सकाळी उठल्यापासून ते रात्रीपर्यंत तिने फक्त सुखात बसायचं. "रात्री जेवणात काय बनवू?" हा प्रश्न तिच्या आयुष्यातून महिनाभरासाठी वजा केला जाईल.
मुलाने मध्येच विचारलं, "बरं, आणि हिची हौसमौज?" त्यावर मी मुलाला फर्मान सोडलं की, या महिन्यात सुनेला तिच्या मैत्रिणींसोबत फिरायला, बाजारात जाऊन हवी ती खरेदी करायला घरची तिजोरी खुली असेल! तिच्या आनंदावर आणि खर्चावर घरातून एकही प्रश्न विचारला जाणार नाही. साडी नेसण्याची किंवा घरकामाची अजिबात सक्ती नाही, अगदी सुती आणि सुटसुटीत कपड्यांमध्ये तिने फिरावं. रात्री हवं तितकं जागावं आणि सकाळी मनासारखं उशिरा उठावं, हिला घरात कोणीही उठवणार नाही!
माझा हा मराठमोळा आणि कल्पक विचार ऐकून सुनेच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. ती गदगद होऊन म्हणाली, "आई... खरंच? आजपर्यंत सासरी आल्यावर फक्त जबाबदाऱ्या वाढतात हेच ऐकलं होतं. पण सासू आपल्यासाठी असा विचार करू शकते, यावर माझा विश्वासच बसत नाहीये!"
मी तिचे डोळे पुसले आणि म्हटलं, "विश्वास ठेव बाळा! जावयाला आपण विष्णू रूप मानतो, पण सून तर साक्षात चालती-बोलती गृहलक्ष्मी असते. या वजा मासाच्या शेवटच्या दिवशी मी तुझी चांदीच्या ताटात ओवाळणी करणार आणि जावयाच्या ३३ अनरशांच्या ऐवजी, तुला तुझ्या आवडीच्या ३३ सुंदर वस्तू सासरकडून वाण म्हणून मिळणार!"
हे सगळं ऐकून माझे कारभारीही हळवे झाले. त्यांनी वर्तमानपत्र बाजूला ठेवलं आणि मुलाला म्हणाले, "बाळा, काढ घरची तिजोरी आणि दे हिच्या हातात... आजपासून घरात वजा मास लागू! आजपर्यंत आम्ही पुरुषांनी फक्त जुन्या परंपरा पाळल्या, पण नात्याला इतकं मायेचं आणि सुंदर रूप देता येतं, हे तुझ्या आईकडून शिकायला मिळालं." मुलानेही हसत हसत आईच्या या निर्णयाला होकार दिला.
सुनेने जेव्हा मला प्रेमाने मिठी मारली, तेव्हा मला जाणवलं की, परंपरा फक्त जुन्या चौकटीत जगण्यात नसते, तर नव्या पिढीला पोटच्या मुलीसारखं समजून घेऊन नात्यांना नवा श्वास देण्यात असते. जर प्रत्येक सासूने सुनेला अशी मायेची सुट्टी दिली आणि स्त्रीने स्त्रीचा असा आदर केला, तर महाराष्ट्रातलं प्रत्येक घर स्वर्गासारखं सुंदर होईल.
मी तर माझ्या कॅलेंडरमध्ये 'वजा मास' लिहून ठेवलाय, आणि माझी सून सासरी यायला आता रडत नाही, तर हसत हसत येणार आहे!
जावई हा केवळ पाहुणा असतो, पण सून ही नव्या पिढीला आणि वंशाला जन्म देणारी, संपूर्ण घराला उजळवून टाकणारी साक्षात महालक्ष्मी असते!"

त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात अधिक मासाचे अनरसे जावयाला भरवताना, आपल्या घरच्या लक्ष्मीच्या सुट्टीचा 'वजा मास' ठरवायला विसरू नका. सासूबाईंनो, कंबर कसा आणि कामाला लागा; कारण सुनेचा चेहरा खुलला की संपूर्ण घर कसं कडाडून हसतं!तृप्ती देव 

बाकी, आमचा हा 'वजा मास' तुम्हाला कसा वाटला? तुमच्या घरातल्या सुनेला हा सुखद धक्का कधी देताय? चला, गुपचूप सांगा बघू कमेंट्समध्ये आणि ज्या सासूबाईंना हा नवा सण मंजूर आहे, त्यांनी खाली एक कडक लाईक ठोकून द्या!

सौ तृप्ती देव 
भिलाई छत्तीसगड
@copyright