shri Gajanan Vijay in Marathi Book Reviews by गिरीश books and stories PDF | श्री गजानन विजय

Featured Books
Categories
Share

श्री गजानन विजय

श्री गणेशाय नमः:
श्री गजानन महाराज की जय
श्री गजानन विजय
श्री दासगणू महाराज म्हणतात, हे गणपती गौरी पुत्र मयुरेश्वरा, कार्यारंभ करताना सर्व लोक, विद्वान, साधुसंत, सत्पुरुष तुझे स्मरण करतात.
 तुझ्या कृपेची अगाध शक्ती अवघी विघ्ने भस्म होतात. मी तुझ्या चरणी वंदन करतो या दासगणुंच्या मुखाने रचना तू बनवून घे मी अज्ञान व मंदमती आहे तू माझ्या चित्तात वास केलास तर माझ्याकडून हे काव्यनिर्मितीचे कार्य पूर्ण होईल. ब्रह्माची प्रवृत्ती , कवीवरांची ध्येयमुर्ती अशी ब्रह्मकुमारी शारदा, आदिमाया सरस्वती व जगदंबेला साष्टांग नमस्कार करुन प्रार्थना करतात तुझ्या कृपेने पांगळा पर्वत चढू शकतो. मुका सभेमध्ये व्याख्यान देऊ शकतो अशी तुझी कीर्ती आहे. त्या कीर्ती प्रमाणे तू मला या ग्रंथरचनेमध्ये सहाय्य करावे.
नंतर ते म्हणतात हे पांडुरंग सत्चिदानंद दीनबंधू तू माझ्यावर कृपा कर तोच एक परिपूर्ण सगुण निर्गुण आहेस तुझा अगाध महिमा कळणे कठीण आहे. जेव्हा रामकृपा झाली तेव्हा वानरांना शक्ती मिळाली. गोप बलशाली झाले .तुझ्या चरणी अनन्य भावनेने आल्यास तुझी कृपा होते त्यासाठी धनाची आवश्यकता नाही .संत म्हणतात की तू कृपाळू आहेस तरी मला विन्मुख पाठवू नको मला हा ग्रंथ पूर्ण करण्यास मदत कर. मी गणुदास लोखंड आहे तुझी कृपा हा परिस आहे. हे त्र्यंबकेश्वरा माझ्या शिरावर आपला वरदहस्त ठेवा त्यामुळे मला कशाची भीती वाटणार नाही माझी कुलदेवता कोल्हापूरवासिनी आहे, तिच्या चरणी मस्तक ठेवून प्रार्थना करतो की हे दुर्गे तुळजाभवानी हे अंबे तुझा वरदहस्त माझ्या शिरावर ठेव .नंतर दत्तात्रेयाना वंदन करून कृपाप्रसादाची प्रार्थना करतात की हे गजानन चरित्र पूर्ण करण्यासाठी स्फूर्ती द्या.
 आता शांडील्य ,वशिष्ठ गौतम इत्यादी ऋषी , ज्ञाननभीचे दिनकर शंकराचार्य यांना नमन करून व सर्व संत महंताना नमन करून सांगतात की माझा हात धरून या ग्रंथाचे लेखनासाठी सहाय्य करा. गहिनी, निवृत्ती ज्ञानेश्वर, देहूवासी संत तुकाराम, रामदास स्वामी, शिर्डीचे साईबाबा वामन शास्त्री अशा सर्वांना नमन करून सांगतात की हे संतजन मला अभय द्यावे तुमच्या सर्वांच्या कृपेने मी हा ग्रंथ लिहिणार आहे तुम्ही मला आईप्रमाणे आहात, ज्याप्रमाणे आई मुलाला बोलायला शिकवते तसेच तुमचे माझे नाते आहे माझ्या लेखणीत इतकी शक्ती नाही तेव्हा ती लेखणी हे सर्व संतांनो तुम्ही धारण करा व हा ग्रंथ रसभरीत व्हावा यासाठी लेखन कार्यास सहाय्य करा. श्रोतेहो मन एकाग्र करून स्वकल्याणा साठी संत महिमा ऐका .
संत चालते बोलते ईश्वर आहेत मोक्ष पदाची प्राप्ती करून देणारे आहेत .संत हे ईश्वर तत्वाचे वाटाडे आहेत. अमोघ ज्ञान त्यांच्याकडे आहे .
आता श्री गजानन चरित्र ऐकण्यास मन शुद्ध करा असे सांगतात. या भरतखंडा मध्ये अनेक संत झाले या भूमीला अनेक संतांचे चरण अनादीकालापासून लागत आले आहेत. नारद ,ध्रुव ,सुदामा, हनुमान, धर्मराज , जगद्गुरु शंकराचार्य यासारखे अध्यात्माचे महामेरू या देशात झाले. 
मध्ववल्लभ ,रामानुज, नरसी , तुलसीदास, सूरदास यांनी महान कार्य केले आहे योगेश्वर गोरख मच्छिंद्र जालंदर यांच्या लिला सांगणारा नवनाथ भक्तिसार हा ग्रंथ आहे. महान भक्त मीराबाई नामदेव , जनाबाई कान्होपात्रा, चोखामेळा ,सावता माळी इ. सर्वानी हरिभक्ति केली. अशा सर्वांचे चरित्र महिपतीने सांगितले आहेत ते आता मी परत सांगत नाही आता मी तुम्हाला श्री गजानन महाराज या अवतारी पुरुषाचे चरित्र विस्तार पूर्वक सांगणार आहे . 
शके अठराशे मध्ये महाराज शेगाव मध्ये आले. देविदास नावाच्या गृहस्थाकडे भोजनाचा कार्यक्रम होता. तीथे उष्ट्या पत्रावळी रस्त्याचे बाजूला टाकल्या होत्या. तीथेच महाराज पहिल्यांदा दिसले. महाराजानी एक जुनी बंडी घातली होती. जवळ एक भोपळा होता आणि हातात कच्ची चिलीम होती. बंकटलाल अखरवाल व दामोदरपंत कुलकर्णी ताथून चालले असता त्यानी महाराजाना पत्रावळीतील शिते उचलून खाताना पाहिले. (अन्न हे परब्रह्म हे महाराज दाखवत होते). बंंकटलाल म्हणाले देविदासकडे मागीतले असते तर याला जेवण मिळाले असते. ते महाराजांजवळ जाउन म्हणाले पत्रावळी का शोधता भुक लागली असेल तर जेवण देतो. महाराजानी त्यांचेकडे न बोलता बघितले . त्यांचे पिळदार शरीर , स्थिर नजर व तेज पाहून ते समजले की हा माणूस वेडा नसुन कोणी योगी आहे. त्यांनी देविदासकडून ताट आणले व महाराजाना‌ दिले. महाराजानी ते घेतले आणि सर्व पक्वान्ने एकत्र करुन खाल्ली. पाणी देऊ का विचारल्यावर महाराज म्हणाले देहाने अन्न घेतले म्हणजे त्याला पाणी पाहीजे. तुम्ही दिलेत तर घेऊ. बंकटलाल पाणी घेऊन आले तोपर्यंत महाराज तीथेच जनावराना पाणी देण्यासाठी जी जागा होती तिथे महाराज पाणी पिताना दिसले.