विक्रम आणि वेताळ
विणले जाळे १
धिर गंभीर पावलं टाकत राजा विक्रमादित्य त्या विशाल वृक्षाच्या दिशेने चालला होता.त्या काळ्या कुट्ट काळोखात आकाशात सतत वीजा चमकत होत्या.त्या चमचमाटात अनेक चित्र - विचित्र आकृत्या सूर मारत इकडे तिकडे फिरताना दिसत होत्या. आजू बाजूला सरसरणाऱ्या सापांचे आवाज ...अंगाला घासून जाणारी वटवाघळे...झाडावर उलटीलटकत असलेली प्रेते...या अशा वातावरणात राजा विक्रमझाडाजवळ पोहोचला.लटकत असलेले एक प्रेत उचलून त्याने खांद्यावर टाकले.त्याच क्षणी असंख्य किंकाळ्या आणि हसण्याचा गडगडाट ऐकू आला.पण त्याकडे लक्ष न देता तो मौन धारण करून तो वाट चालू लागला.तेवढ्यात खांद्यावरच्या प्रेतातील वेताळ म्हणाला..." राजा, तुझे कौतुक करू की कीव करू ते कळत नाही.गेले कित्येक शतके तू आणि मी हा खेळ खेळत आहोत.ना तू थकलास ना मी. आता एकविसाव्या शतकात आपण तेच करतोय.तुझे मनोरंजन होण्यासाठी मी तुला एक गोष्ट सांगतो...ऐक.... वारणा शहरातील पोलिस स्टेशनमधले त्या रात्री ड्युटीवर फक्त चार जण होते.इन्सपेक्टर मातले, हवालदार शिंदे,हवालदार वरक मॅडम व हेड कॉन्स्टेबल शेख.साधारण दहा वाजले होते.मातले साहेब स्टेशन डायरी न्याहाळत होते. हवालदार शिंदे व शेख खुर्चीवर बसून गप्पा मारत होते तर वरक मॅडम मोबाईल मधले दिवसभरातले मेसेज चेक करून डिलीट मारत होते. कालरात्री एका फ्लॅटमध्ये चोरी झाली होती.चोरट्यांनी चाळीस हजारांची रोकड व सोन्याचा हार पळवला होता. मातले त्याचाच विचार करत होते.तेवढ्यात वरक मॅडमच लक्ष समोर गेले." साहेब रमाकांत येतोय." त्यांनी मातले साहेबांना सूचना दिली." तरी म्हणतोय मी, हा अजून कसा आला नाही. आता चोरी मीच केली ....मला अटक करा असं सांगेल."मातले वैतागून म्हणाले." साहेब, याला मेंटल हॉस्पिटलमध्ये का पाठवत नाही?"" ते नाही करू शकत आपण.त्यासाठी मानोसोपचारतज्ञा कडून प्रमाणपत्र घ्यावे लागेल. हे काम घरच्यांनी केलं पाहिजे.पण तो तर एकटा आहे." तो पर्यंत रमाकांत आत आला.तीस वर्षांचा रमाकांत तसा गोरा होता. लांब चेहरा...थोडं बाकदार नाक... दाढी वाढलेली...पण मिशी मात्र कोरुन बारीक केलेली. काळी लांब पॅण्ट,लांब हाताचा मळकट शर्ट... हात कोपरापर्यंत अस्ताव्यस्त दुमडलेले...इन शर्ट केलेल होत पण बेल्ट नव्हता . त्याच्या चेह-यावर ओशाळवाण हसू होत पण डोळे तेजस्वी व सतत इकडे तिकडे भिरभिरणारे होते." साहेब,काल रात्रीची चोरी मीच केली. साहेब मला असं काय होतंय तेच कळत नाही.सतत वाटत राहतं काय तरी पळवावे...चोरी करावी कुणाला तरी मारून टाकाव. कुठेतरी आग लावावी. म...म..मला अटक करा.आयुष्यभर लॉकअप मध्येडांबून ठेवा." " हे बघ, रमाकांत तू घरी जा.". मातले साहेब वैतागून म्हणाले." साहेब,असं कसं? मी माझा गुन्हा कबूल करतोय."" मग ते चाळीस हजार आणि सोन्याचा हार कुठे आहे?"" पैसे जाळले साहेब आणि हार धरणात फेकला."रमाकांत विचित्रपणे हसत म्हणाला." शेख , याला कोठडीत टाका."शेख उठले पण रमाकांत सवयीप्रमाणे आपणच चालत कोठडी पर्यंत गेला.शेखने कूलूप उघडले तसा तो आत शिरला. रमाकांतची हिस्ट्री मजेशीर होती.सात वर्षांपूर्वी तो असाचएका चोरीच्या नंतर स्वतः पोलीस स्टेशनमध्ये हजर झाला व आपण चोरी केली असं सांगू लागू लागला. पोलीस चक्रावले.पण आरोपी विनासायास हाती लागला म्हणून जास्त खोलात न जातागुन्हा दाखल केला व त्याला कोर्टात हजर केलं. पुढील तपासासाठी चार दिवसांची पोलीस कोठडी मिळवली. पण दुसर्याच दिवशी गस्त घालणा-या पोलीसांनी दोन चोरांना दुकान फोडताना रंगे हाथ पकडलं.त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे आदल्या दिवशीच्या चोरीचा मुध्देमालही सापडला.त्यांनी ती चोरीपण कबूल केली. पोलीसांना अर्ज देऊन रमाकांत निर्दोष असल्याचे कोर्टाला सांगावं लागलं पण कोर्टाने पोलीसांवरताशेरे ओढले. त्यानंतर सात महिन्यांनी धरणात कुणाचा तरी मृतदेह तरंगताना आढळला.रमाकांत पुन्हा पोलीसांसमोर हजर झाला व म्हणाला ' आम्ही दोघं फिरायला गेलो होतो.आमच्यात वाद झाला व मीच त्याला पाण्यात ढकलले .आता मला पश्चात्ताप होतोय." पोलीसांनी त्याला कोठडीत टाकलं.पण यावेळी पोलीस सावध होते. त्यांनी घाई केली नाही.पण तपास सुरू ठेवला.तपासात कळालं की तो माणूस व रमाकांत कधीच एकमेकांना भेटले नाहीत...त्या माणसाने आत्महत्या केली होती व तसं पत्रही लिहून ठेवले होते. यावेळी पोलीसांनी रमाकांतला बरा चोप दिला.पण गेल्या सात वर्षांत तो असा काही वेळा गुन्ह्याची कबुली द्यायला आला होता.पण पोलीसांनी त्याच्यावर विश्वास ठेवला नव्हता .तेवढ्यात ड्रायव्हर मुंडे आत आला." साहेब, पेट्रोलिंगला जायचे आहे ना?"" हो चल. मॅडम रमाकांतला सकाळी सोडा. शिंदे थोडा प्रसादद्या त्याला.उगाच डोक्याला ताप देतो." ***-----******------******------*******------*****----" राजा, तूझ्या मनात रमाकांतचा इतिहास जाणून घेण्याचीइच्छा जागृत झाली असणार आणि ते योग्यच आहे.ऐक...रमाकांत सदाशिव गोरे हा लहानपणापासून अत्यंत हुषार होता.चौथीत व सातवीत त्याला स्कॉलरशिप मिळाली होती.तर दहावीत तो जिल्ह्यात तिसरा आला होता.विज्ञान शाखेत प्रवेश घेऊन तो बारावीत नव्वद टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाला होता. त्यालाकेमीकल इंजिनिअर व्हायचे होते.त्याचे वडील जिल्हापरिषदेत पाटबंधारे विभागात हेड क्लार्क होते.ते पापभिरू होते.त्याचीआई सारिका गोरे ही प्राथमिक शिक्षिका होती. पाटबंधारे विभागाचे ज्युनिअर इंजिनियर्स , हेड इंजिनिअर व अकाऊंट विभाग टक्केवारीच्या खेळातले प्रविण खेळाडू होते.पण सदाशिव गोरे यांना ते आवडत नसे. त्यांनी वरच्या ऑफिसमध्ये गुपचूप तक्रार केली.पण सगळेच एका माळेचे मणी होते. ऑफिस मधल्या लोकांनी कट करून सदाशिवलाच ॲण्टीकरप्शन करवीअटक करवली. खरं ते पैसे सदाशिव यांचेच होते . एक छोटा कॉन्ट्रॅक्टर एका कामात अडकला होता. गयावया करू लागला म्हणून त्यांनी बायकोच्या पतपेढीतून कर्ज काढून त्याला एक लाख रूपये दिले होते.हेच एक लाख रुपये परत करताना ते पकडले गेले होते. यात त्या कॉन्ट्रॅक्टरला ऑफिस मधल्या लोकांनी फितवून तक्रार दाखल करायला भाग पाडले होते.त्यानंतर सदाशिव व सारिका राहात्या घरात मृतावस्थेत सापडल्या. दोघांनी बदनामी असह्य झाल्याने विष घेऊन आत्महत्या केली असा तपास करून पोलीसांनी केस बंद केली होती.यावेळी रमाकांत केमिकल इंजिनिअरींगच्या शेवटच्या वर्षाला होता. या घटनेनंतर त्याने शिक्षण सोडले. तो शहरात उदासपणे एकटाच भटकायचा.एखाद्या झाडाखाली किंवा धरणाच्या जवळ तासनतास बसायचा. वडिलांना झालेल्या अटकेचा त्याच्यावर परीणाम झाला होता व म्हणूनच कुठेही गुन्हा घडला तरी तो आपणच केला अस पोलीस स्टेशनमध्ये येऊन सांगू लागला. पोलीसांनी अखेर तो मनोरूग्ण आहे हे निश्चित केले होते.******-------*******--------********-------*******--------**** शेखनी रमाकांतला दुसर्या दिवशी सकाळी दोन फटके लगावले आणि सोडून दिले. ओशाळवाण हसत केविलवाणा रमाकांत घरी निघून गेला.आई -वडील गेल्यानंतर तो घरात एकटाच राहत होता.कधीतरी तो गावी गडहिंग्लजला जायचा.त्याचा गाव सामान गडाच्या पायथ्याशी होता.सुंदर व हिरवगार गाव होतं ते. ऊस,ज्वारी ,झेंडू व गुलाबाची शेती तिथे होई. गावी त्यांची वडिलोपार्जित शेती होती. रमाकांतचा एक सख्ख्या काका जो पुण्याला राहत होता.त्याला गावातली जागा विकून आलिशान फ्लॅट घ्यायचा होता.पण सदाशिवने त्याला नाकार दिला होता.स्वत:ची गावातली जागा विकणे म्हणजे मूर्खपणा असं त्यांचं मत होतं.पण सदाशिव वारल्यानंतर त्याने आपला भाग वेगळा करून घेतला व विकून पुणे येथे एक मोठा फ्लॅट घेतला. पोलीस स्टेशनमधून आल्यावर वर रमाकांत गावी गेला. तो दोन महिन्यांनी पुन्हा वारणा मध्ये आला. या दरम्यान जिल्ह्या कार्यकारी अभियंता संतोष सासणे हे आपल्या बंगल्यात दारू पीत बसले होते.समोर खाण्यासाठी खारवलेले शेंगदाणे ठेवलेले होते.भिंतीवरचा एल.ई.डी.टि.व्ही.चालू होता.त्यावर कसला तरी विनोदी कार्यक्रम चालू होता. एक एक घोट व्हिस्की घेत ते शेंगदाणे तोंडात टाकत होते.समोरचा कार्यक्रम बघता- बघता ते हातही होते.आज घरात कुणीच नव्हते.त्याची बायकोबंगलोरला मुलाकडे गेली होती. अचानक त्यांना जोराचा हसू आल व मग ते खुदूखुदू हसतचराहिले. हसत हसता त्यांचं थुलथुलीत पोट गदागदा हलत होत.आता त्यांना हसू आवरेना झाले. कालपासून त्यांची कंबर खूप दुखत होती पण आता त्या वेदनांचा मागमूसही नव्हता.आता ते एवढं हसू लागले की तिथेच कोचावर गडाबडा लोळू लागले.जवळ पास वीस मिनिटे ते हसतचहोते.त्यांच्या नाक व डोळे यातून घळाघळा पाणी यायला लागले.ह्रदयावरचा दाब वाढला व ते कोचवरून खाली कोसळले. यापूर्वी त्यांची बायपासही झाली होती.काही वेळाने त्यांची हालचाल मंद होत गेली. दुसर्या दिवशी मोलकरीण आली तेव्हा दरवाजा आतून बंद होता.हाका मारूनही कुणी आलं नाही म्हणून तिने मालकिणीला फोन लावला.अखेर पोलीसांना पाचारण करून दरवाजा तोडण्यात आला.डॉक्टरांनी त्यांना ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू आल्याचे घोषित केले.वर्तमानपत्रात ही बातमी ठळकपणे प्रसिद्ध झाली. 'गूढ मृत्यू ' असा मथळा बातमीचा होता.दुसर्या दिवशी रमाकांत पुन्हा एकदा पोलिसांत गेला. संतोष सासणे यांच्या मृत्यूला आपणच कारणीभूत असल्याचे सांगितले.पण वरक मॅडमनी अक्षरशः त्याला हाकलून लावले.-----****-----*****-----******-------*****-----******------बाळकृष्ण सखाराम राणे 8605678026