Bhorpi from Konkan - Part 5 in Marathi Moral Stories by Prof Shriram V Kale books and stories PDF | कोकणातले भोरपी - भाग 5

Featured Books
Categories
Share

कोकणातले भोरपी - भाग 5

कोकणातले भोरपी- भाग ५

      दुसरे दिवशी दोघीही वेळेवारी आल्या. आईने  दिलेली चहा चपाती खावून त्या कामाला लागल्या. पोरं अंगणात रेवे घेवून खेळायला लागली. मी शाळेतून आलो तेंव्हा बरच काम पुरतावत आलेलं होतं बारा वाजता  गोधड्या पुऱ्या झाल्या. “जुन्या फाट्लेल्या वाकळा  थांग़डायच्या असल्या तर दे मावशी” पोरगेली भोरपीण आईला म्हणाली.  जुन्या दोन तीन गोधड्या  एकदोन ठिकाणी  विरल्या होत्या. त्याना  फाटलेल्या   टीच भर वीतभर  ढिगळं मारून त्या धडावून झाल्यावर काम संपलं . आजही  आईने पुन्हा भाताचे ठाय लावून आणल्यावर भोरपीणी ओशाळून बोलल्या. “ मावशी, च्या  चपाटी  रग्गड झालती की . पुना आणी जेवाण कशा पायी..... ” जेवून  झाल्यावर  आई  हिशोबाची रक्कम  बारा  रुपये  घेवून आली. भोरपिणी  म्हणाल्या, “ मावशी  दिलस त्येच बक्कळ झालं की .... नवीकोरी साडी चोळी  दिलासा त्येचच फीटाना..... वर आनी  पैसं कसलं....... पुना कदीतरी  येतंव तंवर   आनिक दोन वाकळांची भर करून ठेव.... “ द्यायचच तर  माला जुनी पानी चोळी  आसली तर द्ये, नी    चार कोंजळी  भाकरीचं पीट आसलं  तर द्ये, नी  चिच , आमसोलं  लय थोडी  नी   घोटया  देलीस तर लई  उपकार झालं. पैसं म्हणशील तर अज्याबात नकूत ........ ” मोठी भोरपीण बोलली.

                  आईने  तिच्या  मापाची दोन खणाची  नवी चोळी नी  दोन जुनी  सुस्थितीत असलेली  पोलकी दिली.  दोनेक शेर  भाकरीचं पीठ , चिंच  गोळा नी  चार वाट्या कुळथाचं पीठ ,  उन्हाळी  माती लावून सुकवलेल्या  आठिळा  पायलीभर  दिल्या.  गोधड्यांची  निम्मी  मजूरी   सहा   आईने तिच्या हातात घातली. ती आईच्या पायाशी  ठेवून  चिमटीने गळ्याची  चामडी पकडित गदगदलेल्या  स्वरात भोरपीण म्हणाली, “मावशी ,द्येवाचान्  सांगतो,  तू दिलीस त्ये  थोडं म्हनून म्या   लाज सोडून चार जिनसा  मागितलो की तुज्याकडं  ....वर आणी पैसं नकू......”  

          तरीही    तरण्या पोरीच्या  हातात नोट  कोंबून आई म्हणाली,“ कोणा रुपाने  सवाष्णी  आल्यात माझ्या  दारात......ह्याच्या बांग़ड्या भरा दोघीनी.......” भोरपिणी  गेल्यावर आम्ही भावंडं त्यांच्या टायल्या  मारीत होतो. पैसे नको म्हणत  होत्या  पण चार तोंडानी  त्याच्या  चौपट जिन्नस अगदी योजून योजून  मागून न्हेलेनी...... आम्हाला  दटावून आई म्हणाली, “ द्यायचे ते दिल्यावर असं बोलून फुकट घालवू नये. हातावर  पोट असणारी  जात. त्याना मागितल्या शिवाय कसं मिळणार?  परिस्थिती माणसाला निर्लज्ज  बनवते. कोणाच्या परिस्थितीच्या  टायल्या मारू नये कधी. देव कोणावर कधी नी कशी वेळ आणील सांगता येत नाही आपल्याकडे असलं  नी द्यावं वाटलं तर द्यावं नायतर देवू  नये, पण कोणाच्या गरिबीला हसू नये. शत दारिद्र्यात असूनही  मजुरीचे  बारा रुपये  सोडायची दानत  त्या फाटक्या  भोरपीणीनी  दाखविली . लांड्या लबाड्या  न करता   बापड्या  साडीला ठिग़ळ  लावून  अब्रूदारपणे  रहाताहेत काय तीळ थेंब दिलं  ते लक्ष्मीच्या  चरणी रुजू   मी देणारी कोण नी  त्या घेणाऱ्या  कोण” आमच्या डोळ्यात चांगलं झणझणीत अंजन पडलं होतं. 

                     त्या नंतरही  भोरपी  दर सीझनला नेमाने यायचे  त्याना बहुशा  बरे दिवस आलेले असावेत, कारण आता  पंचवीसेक पाडे असत. एवढी  रक्कम  उभी  करायची  ऐपत  त्याना  आली  असणार.  आठवडाभर आमच्या  गावात मग वाडा  असा त्यांचा मुक्काम असे. तिर्लोटीतून सदला बदलीत एक उमेदवार पाडा कोणीतरी दिला  होता. त्याची शिंग  पाशी नी  एक लांब नी एक आखूड हे वैगुण्य! गावातल्या  न्हाव्याने  बेताबाताच्या किमतीत तो  उचलला. इथला बाजार आटोपून भोरपी  वाद्या चांभार घाटी जवळ गेले.  शनिवारी शाळा सुटल्यावर  आम्ही घरी येत होतो . खाम तळ्याजवळ गर्दी दिसली म्हणून आम्हीही  पुढे गेलो. न्हाव्याने तिथे  चिखल धरली होती. भोरप्याने दिलेली  पाडा  जुवासकट बसलेला होता नी सोबतचा पाडा मान खाली घालून उभा होता. भोरप्यानी खोड्याळ बशा बैल फसवून गळ्यात बांधला होता. आजुबाजूला नांगरट   करणारे जाणकार आले . ज्याला जे सुचले ते उपाय करून झाले . जनावर असं डॅंबीस की पेंडीचा खडा  खाण्यासाठी  मुस्कर वर करणं दूरच गालोडीत बळे बळे कोंबलेला  खडा थुकून टाकी  

           पाचसहा दांडग्या  बापयानी पोटाखाली  दांडे घालून वर उचललेनी तरी  द्वाड  झालेला पाडा पायच टेकिना . मग़ शेपटी खाली  काटेरी निवडूंग  सारायचा अघोरी उपाय केला .  त्या उपायाने चामडी रक्ताळळी  पण पाडा  उठला नाही. माळक जू सोडून  बाजुला गेला. तासाभराने कंटाळून घरी गेला तरी  पाडा बसूनच. सगळं सामसूम झाल्यावर पाडा उठला नी आल्यावाटेने गोठ्यात गेला. पाणी प्याला नी  गवत  खायला लागला. भोरपी वाड्यात होते म्हणून त्याना वर्दी द्यायला  न्हाव्याचा पोरगा वाड्यात गेला. दुपारी  तीन न वाजता  मालकाने पुन्हा प्रयत्न  करून बघायचे ठरवले.  पाडा  काणी काढल्यावर ढिम्म हालेना. मालकाने  दोन तीन छमक्या  लगावल्यावर  पाडा  शिकस्तीने गोठ्याबाहेर आला नी तिथेच बसकण मारली. त्यानंतर पाचच मिनिटानी  न्हाव्याच्या मुलासोबत  काळू भोरपी आला  पाळंदीतून येताना  “त्येच्या मारी तेच्या तेला खाल्ला वागानी ”म्हणत काळू पुढे आला.  भोरप्यांजवळ दुमती  करून पीळ भरलेली लेली  वावभर लांब, आंगठ्या एवढी जाड वाखाची रशी  असते . काळूने  रशी गोल फिरवून   झम्मकन   त्याच्या   पाठभर  वादाडा ओढला त्यासरशी  पाडा उठून चालायला   लागला.  काळू निघून गेला . त्यानंतर दोन दिवस  खटखट न करता त्याने काम केलं  नी परत  गोठ्या बाहेर येवून बसकण मारली. ( क्रमश:)