स्वप्नद्वार... भाग 10 ( अंतारंभ)
भाग 9 वरून पुढे
" शक्य नाही "
" पण का?" निशांत प्रश्नार्थक नजरेने विचारू लागला. त्याच्या कपाळावरील एक शीर सरळ रेषेत आकसली होती.
" मायावी... आभासी किंवा स्वप्नदुनियेत जाण्याची अद्भूतं क्रिया म्हणजे अनाहतभेदन. अनाहतभेदन क्रियेसाठी चंचल मनाला स्थिर करणे तसेच या क्रियेचा दुसरा चरण म्हणजे संमोहन ह्या सर्व गोष्टी जर अगदी लयबद्ध पद्धतीत जुळून आल्या तरच ही क्रिया यशस्वी होऊ शकते. मागच्या वेळी तू तुझ्या स्वप्नदुनियेत अगदी सहज प्रवेश करू शकला कारण त्यावेळेस तुझं चित्त हे निर्मळ जलासारखं स्थिर होत. पण या वेळेस तुझ्या मनाच्या आकाशात भीती, चिंता, निरउत्सहाचे ढग जमले आहे. या मनःस्थितीत स्वप्नदुनियेत प्रवेश करणं म्हणजे खूप मोठ्या धोक्याला आमंत्रण देण्यासारखंच आहे. आणखी एक गोष्ट कान देऊन ऐक. कुठलाही सामान्य मनुष्य दुसऱ्यांदा आभासी किंवा स्वप्नदुनियेत जाऊन परतला नाही आहे . एक तर तो त्यांच दुनियेत अडकून राहिला . ज्यामुळे त्याला मृत्यू कवटाळावा लागला म्हणून स्वप्नदुनियेत जाण्याचा विचारच तू सोडून दे. याशिवाय जर दुसरा काही पर्याय असेल तर त्यांचा विचार केलेला बरा " डॉक्टर सर्वांवर नजर फिरवित म्हणाले. निशांतच्या मनाच कृष्णकमळ भीतीच्या जोरदार वादळाने झोडपून निघाल्यामुळे पार असहाय्य झालं होत. सर्वच रस्ते त्यासाठी बंद झाले आहे असेच त्याला भासू लागले होते.
" या लढाईच अंतिम सत्य म्हणजे ती गुहा. कुठल्याही परिस्थितीत त्या गुहेत जाऊन त्या अमानवी शक्तींचा उलगडा करायला हवा. ही या लढाईतल्या काळ्या दगडावरची रेष आहे म्हणून त्या गुहेत जाण माझ्यासाठी भाग आहे " खिन्न होऊन निशांत म्हणाला.
शब्दांचे तीक्ष्ण बाण फेकून आपल्या भेदक नजरेने डॉक्टर म्हणाले
" जर मी तुला तुझ्या स्वप्नदुनियेतुन त्या तिमिरमयी गुहेत पाठवल आणि वेळेत म्हणजे दहा मिनिटात जर तू परत वास्तविक जगात येण्यास असमर्थ ठरलास तर तुझा मृत्यू अटळ असेल. आता तू म्हणशील दहा मिनिटात येण्यास मी असमर्थ कसा ठरू शकेल.. जर त्या अमानवी शक्तीने तुझा रस्ता रोखून ठेवला तर मृत्यूचा घोट तुला घ्यावा लागेल, जेव्हा तू स्वप्नदुनियेत जाशील तेव्हा तुझं हे वास्तविक जगातलं शरीर दहा मिनिटासाठी मेणाच्या पुतळ्या सारख होईल. जर इथे प्रतिघात झाला आणि त्या अमानवी शक्तीने जर तुझं हे शरीर संपवलं तरीही तुझा मृत्यू निश्चित असेल, स्वप्नदुनियेत तू तुझी सर्व शक्ती, स्पर्शज्ञान, पंचइंद्रिये ह्या सर्व शक्तिशाली गोष्टी घेऊन जाशील. जर तिथे त्या अमानवी शक्तीने तुझ्यावर निगरगट्ट मृत्यूझेप घेतली तर या जीवनाचं अंतिम सत्य म्हणजेच मृत्यू तुला स्वीकाराव लागेल. या जीवघेण्या लढाईत तू त्रिकोणी मृत्युचक्रव्युवात अडकला आहे. जिथे तीनही बाजूंना मृत्यू आहेच म्हणून शांत डोक्याने परत एकदा विचार कर".
निशांतच्या चेहऱ्यावर चिंतेच्या गडद छटा उमटल्या होत्या. त्याच्या खांद्यावर आचार्य विष्णुगुप्त यांनी आपला भरदार हात ठेवला. सर्वांचे कान आता आता आचार्य विष्णुगुप्त यांच्या शब्दाकडे लागेल होते.
" महाभारतात जेव्हा कुरुक्षेत्रात सत्य आणि असत्य यांच्यामध्ये घनघोर अशी लढाई जुंपली होती तेव्हा असत्याच्या बाजूने एकापेक्षा एक कुशल, शूर, पराक्रमी असे योद्धे उभे ठाकले होते . तर सत्याच्या बाजूने फक्त मूठभर योद्धे होते पण या युद्धाचा शेवट काय झाला हे सर्वांनाच ज्ञात आहे. जेव्हाही दानव आणि देव, नकारात्मक शक्ती आणि सकारात्मक शक्ती, सत्य आणि असत्य यामध्ये युद्ध छेडत त्यावेळेस हा अलिखित असा नियमच आहे.. विजय हा सर्वोतपरी सत्याचाच होतो आणि या युद्धात तू सत्याच्या बाजूने आहेस म्हणून धीर सोडू नकोस. या युद्धात मी मेरुपर्वताप्रमाणे तुझ्यासोबत आहे".
आचार्य विष्णुगुप्त यांच्या शब्दांनी निशांतच्या जीवात जीव आला होता. दुहेरी मनःस्थितीत तो भरटकत चालला होता
"अंतिम विजय सत्याचाच होतो..." हे आचार्य विषुगुप्त यांचे शब्द मनावर आठवताच त्याची छाती निर्भीडपणे फुगुन जात होती. तर " मृत्यूच्या त्रिकोणी चक्रात प्रत्येक जागी तुझा मृत्यूचं आहे.. " हे आठवताच त्यांच मन चिंतेने हेलकावे घेत होत. शेवटी त्या दुहेरी मनःस्थितीतुन तो बाहेर आला. स्वप्नदुनियेत जाऊन त्या अमानवी शक्तीला छातीठोकपणे भिडायचं हे त्यानं निर्धारित केलं. परत विचारविनिमयास सुरवात झाली. शेवटी कुठलाच दुसरा मार्ग नसल्यामुळे सर्वांनीच या योजनेला सहमती द्यावी लागली.
" जेव्हा निशांत स्वप्नदुनियेत जाईल तेव्हा त्याच्या निपचित मेणासारख्या शरीराच सरंक्षण करण्यासाठी त्या अमानवी शक्तीला थोपवून धरण्याचा भार माझा असेल " आचार्य विष्णूगुप्त कणखर स्वरात म्हणाले. आर्यनेही त्यांची साथ देण्याचं वचन दिलं.
डॉक्टर अजूनही काहीसे गोंधळल्या सारखे दिसत होते. न राहवून ते म्हणाले
" एक धोका आणखी आहे ".
" कुठला धोका? "
" जाऊदे काही गोष्टी तुला वेळेतच कळेल. आता जर काही गोष्टी मी तुला सांगितल्या तर तुझ्या मनाचा बुरुंज ढासळेल ".
डॉक्टरांच असं कोड्यात बोलण्यानी निशांत बुचकळ्यात पडला.
डॉक्टरांना नक्की सांगायच तरी काय हा प्रश्न तो स्वतःच्या मनाला वारंवार विचारत होता.
आता सर्वजण या लढाईसाठी सज्ज झाले होते. आचार्य विष्णगुप्तांनी अभिमंत्रित भस्म, पवित्र जल, सात प्रकारचे धान्य, सुगंधित पुष्प, धूपबत्ती, काळोखाचा लवलेशही दूर करण्यासाठी मेणबत्ती, अभिमंत्रित धागेदोरे, मंत्रशक्तीसाठी काही मंत्रग्रंथ हे सर्व साहित्य जमवले.
डॉक्टर अजूनही अनाहतभेदन क्रिया करण्यासाठी शंकास्पद होते पण नाईलाजाने ते तयार झाले. आचार्य विष्णुगुप्त यांनी अभिमंत्रित भस्माने एक दीर्घ असं वर्तुळ आखलं. उद्देश एकच जर ती अमानवी शक्ती तेथे आलीच तर त्या अभिमंत्रित भस्माला पार करू शकणार नाही. आचार्य विष्णुगुप्तांनी निशांतला त्या अभिमंत्रित भस्माच्या वर्तुळात मृगांजिनी अंथरून बसण्यास सांगितले. निशांत त्या वर्तुळात ध्यान करण्यास सज्ज झाला. त्या अभिमंत्रित भस्मामुळे निशांतच्या शरीराच्या रक्षणासाठी बळकट अशी संरक्षण भिंत निर्माण झाली . त्या खोलीत पवित्र अभिमंत्रित जलाचे तुषार उडवले. दूरदूरपर्यंत मेणबत्तीचा प्रखर प्रकाश पसरून गेला... चंदन धूपबत्तीचा सुगंध संपूर्ण खोलीत दरवडत होता. एक सकारात्मक ऊर्जेचं रिंगण त्या खोलीभोवती गुंफलं होत.
डॉक्टर आता अनाहतभेदन क्रिया प्रारंभ करण्यास तयार होते . मागील सर्व घटना एकापाठोपाठ त्यांच्या समोर नाचत होत्या. मनात दिसणाऱ्या त्या सर्व घटनांना त्यांनी पूर्णविराम दिला आणि आता एकच लक्ष्य म्हणजेच... अनाहतभेदन क्रियेवर ते लक्ष्य केंद्रित करू लागले. निशांत गाढ ध्यानात बुडून गेला होता. डॉक्टरांनी निशांतला अनाहतचक्र तसेच अनाहतभेदन क्रियेचे बीजमंत्र दिले. आता त्या सकारात्मक ऊर्जेच्या खोलीत निशांतच्या मंत्राचे सुर घुसळून मिसळून गेले होते. कसलीतरी सुप्त शक्ती मूलाधार चक्रापासून वर तिसऱ्या नेत्राजवळ एकवटवली होती. निशांतच्या चेहऱ्यावर निरनिराळ्या भावलहरी क्षणाक्षणाला उसळत होत्या. आता या क्रियेचा दुसरा चरण म्हणजेच... संमोहन करण्यासाठी डॉक्टर सज्ज होते.
" कसं वाटतंय तुला? "
" छान ! आता तुला तुझ्या भुतकाळातील काही भीतीदायक किंवा मर्मभेदी आकृत्या दिसेल.... त्यानंतर तू असशील तुझ्या भावनामय इमारतीत".
निशांतच्या ज्ञानेंद्रियालाही थरकाप सुटेल अश्या काही आकृत्या त्याला दिसत होत्या . त्याच्या भुवया सरळ रेषेत उंचावल्या.. पण तो मनावर ताबा ठेवून होता. पुढच्याच क्षणी नयनासमोर मिट्ट काळोख पसरला. एका भल्या मोठ्या बुल्डींग मध्ये आता तो उभा होता.
" आता कुठे आहेस तू? " डॉक्टरांनी प्रश्न केला.
" कुठल्यातरी भव्य इमारतीत आहे. ही तीच इमारत आहे ज्यामध्ये मी मागच्या वेळेस आलो होतो. पण यावेळेस ही इमारत काळोखात तुडुंब बुडून गेली आहे. निशांतला चांदण्याच्या प्रकाशात त्या इमारतीची ओळख पटली. त्याच्या मनाच्या उत्साहाचं अंकुर भयग्रस्त उष्णतेने पार सुकून गेल होत. त्या इमारतीत कुणाच्यातरी भेसूर मतदीसाठी किंचाळ्या त्याच्या कानावर आदळू लागल्या ... त्या किंचाळ ध्वनी क्षणाक्षणाला अधिकच तीव्र होऊ लागल्या होत्या.एवढ्यात त्याचा कर्ण कल्लोळ करून उठेल असा एक कर्कश्य स्वर त्यांच्या कर्णात थैमान घालू लागला. कुठला होता तो स्वर.. तो स्वर तोच होता.. ज्याने त्याची रात्रीची झोप उडवली होती. त्या अमानवी शक्तीच्या तलवारीच्या जमिनीला घर्षण करण्याचा. जिथंपर्यंतही नजर जाईल तिथपर्यंतही मनाला हुरहूर लावून जाणारा गर्द काळोख होता. मनाचा थरकाप उडवानारा त्या अमानवी शक्तीच्या तलवारीचा स्वर, मदतीसाठी आक्रसणारी किंकाळी.. या सर्वांमुळे निशांतच्या मनाच सुकलेलं पान भीतीच्या वाऱ्याबरोबर इकडून तिकडे उडून जात होत. न राहवून तो म्हणाला.
" डॉक्टर हे काय होत आहे. मागच्या वेळेस मी जेव्हा या इमारतीत आलो होतो तेव्हा केवढी प्रसन्नता,आनंद हर्षेउल्हासीत वाटतं होत. आता ही इमारत एवढी भयाण का वाटतं आहे? " त्याच्या मनाच्या इंदधनुष्यातील सर्व हर्षेउल्हासाचे, प्रसन्नतेचे सप्तरंग उडून गेले आणि एकच बोचरा भींतीदायक काळा रंग सर्वदूर पसरला.
" मी तुला आधीच म्हणालो होतो... एक धोका आणखी आहे तो म्हणजे हाच . मागच्या वेळेस जेव्हा तू या स्वप्नदुनियेत आला होता तेव्हा तुझ्या मनात हर्ष, प्रसन्न, आंनद या सकारात्मक भावना होत्या. पण या वेळेस तुझ्या मनात भीती, निराशा, असहाय्य, निरुत्साह या नकारात्मक भावना आहे. खरंतर ती भावनामय इमारत आहे. तुझ्या मनात असलेल्या भावना, विचारांचं प्रतिबिंब आहे. वेळीच आपल्या मनाला आवर घाल आणि तेथून लवकरच आपल्या ध्येयाकडे प्रस्थान कर" डॉक्टरांनी तीव्र शब्दात निशांतला ठणकावले.
निशांत आपल्या मनात असेलेल्या सर्व भावनां, विचारांना आवर घालण्यास यशस्वी झाला. त्याने त्या इमारतीतून उडी घेऊन आपल्या ध्येयाकडे प्रस्थान करण्यास प्रारंभ केला.
" आता कसं वाटतं आहे तुला? " डॉक्टरांनी विचारले .
" इमारतीवरून उडी घेतल्यामुळे माझ्या शरीर प्रचंड वेगाने जमिनीकडे धाव घेत आहे. वाऱ्याबरोबर होणाऱ्या घर्षणामुळे माझी संपूर्ण कायाच अग्नीज्वाळेत भस्म होईल असच वाटतंय ".
" आता तुझ्या शरीराचा वेग खूप कमी होतोय.. आता काय दिसतंय तुला " डॉक्टरांनी हळुवारपणे प्रश्न केला.
" लांबच लांब विजेचे तार दिसतेय आणि त्यावरून टप.. टप..करीत गळणार काळपट रक्त... काही जळलेल्या रक्तांचे काळपट थेंब स्थायू अवस्थेत विजेच्या खांबावर चिकटले आहे, काही ओठ फाटलेल्या आकृत्या, तर कुणाचे डोक्यातून आंतरइंद्रिये बाहेर निघालेल्या आकृत्या, त्या विजेच्या तारावर उलटी अशी एक चेटकीण लटकलेली आहे. तिच्या हातात कुणाचतरी
मस्तक आहे.. तिच्या दाताला मासाचा खच चिकटला आहे. हे सर्व काळजाला चिरणार भयग्रस्त दृश्य मला दिसतंय. पण हे कसं शक्य आहे... डॉक्टर मागच्या वेळेस मी जेव्हा स्वप्नदुनियेच्या अगदी जवळ आलो होतो तेव्हा गवताची लुसलुशीत पाती, मनोहर पक्ष्याचे थवे, नारळाची मनमोहन काटेरी पाने, पक्ष्याच्या सुमधुर किलबिलाट ऐकू येत होता. यावेळेस मात्र अशी हृदयविकारक दृश्य का दिसत आहे? "
" स्वप्नदुनियेत पाय ठेवेपर्यंत भावनामय जग संपत नाही. मागच्या वेळेस तुझ्या मनात असलेलं सकारात्मक दृश्य तुला दिसत होत. यावेळेस मात्र तुझ्या मनात साचलेलं नकारात्मक दृश्य तुला दिसत आहे. आता तू तुझ्या स्वप्नदुनियेच्या अगदी जवळ पोहचलाय ".
" हो माझ्या समोर आता तीच गुहा आहे. आता मी माझं पहिलं पाऊल त्या गुहेत टाकतोय ".
" छान आता माझा आवाज तुला तीस सेकंदच येईल. 10....9......8......7.......6......5.......4........3......2...1 ". निशांतला येणारा डॉक्टरांचा आवाज एकाएकी बंद झाला. भयाण अशी शांतता सर्वत्र पसरली.
आचार्य विष्णुगुप्त यांच गळ्यातील रुद्राक्षाच्या माळा वर्तुळाकार गतीने हलत होत्या. दूरदूरपर्यंत असलेल्या प्रकाशात एक काळी सावली त्याच्या दृष्टीस पडली. त्यांच्या बलाढ्य मनाला प्रश्नाचे असंख्य तीक्ष्ण काटे रुतले. त्यांना कळून चुकलं होत.. आता वेळ आली आहे त्या अमानवी शक्तीशी छातीझुंज घेण्याची. आर्य आणि विष्णगुप्त आपली शक्ती जमवून त्या अमानवी शक्तीच्या समोर उभे ठाकले होते. ती अमानवी शक्ती जमिनीला तलवार घर्षूण समोर येत होती. एक जोरदार भेसूर किंकाळी त्या खोलीत थैमान घालू लागली.
क्रमश.....
टीप :- उद्या या कथेचा शेवटचा भाग प्रकाशित होईल.
--- निखिल देवरे