प्रस्तावना:
नमस्कार, आज आपण झपूर्झा ह्या कवितेचे रसग्रहण करूयात. ही कवी केशवसुतांची म्हणजेच कृष्णाजी केशव दामले ह्यांची एक प्रसिद्ध कविता आहे. आजच्या काळातल्या लयबद्ध गीतांना लाजवेल अशी सुंदर लय व ताल ह्या कवितेला आहे. केशवसुतांना आधुनिक मराठी कवितेचे जनक म्हटले जाते. त्यांच्या कवितांनी मराठी साहित्य क्षेत्राला नवी दिशा दिली. माझ्या आवडत्या कवितांपैकी असलेल्या ह्या कवितेने मी ह्या मालिकेला सुरूवात करणार आहे. कुठल्याही काव्याला गद्य रूपात आणल्यावर त्याची तीव्रता कमी होऊ शकते व जे म्हणायचे आहे त्याचा अर्थ बदलू शकतो, हा धोका लक्षात घेऊनच मी माझे रसग्रहण मांडतो आहे.
© मंदार कुळकर्णी, 2026
सुरूवात:
कवितेच्या शीर्षकापासून सुरूवात करूयात. मराठी, प्राकृत अथवा संस्कृत ह्यांपैकी कुठल्याही भाषेच्या शब्दकोशात न आढळणारा “झपूर्झा” हाच शब्द त्यांनी शीर्षक म्हणून का योजला असावा? तो शब्द नेमका कुठून आला हा प्रश्न नक्कीच पडतो. काही अभ्यासकांच्या मते तो “जा पोरी जा” ह्या शब्दांचे गतीने उच्चारण केल्याने येणारा ध्वनी आहे. मात्र ह्याला कुणीही ठाम दुजोरा देत नाही. मात्र माझे मत थोडे वेगळे आहे.
बऱ्याचदा कवी मनात काही विशिष्ट प्रतिमा ठरवून असे लिहित नाहीत. लिहिताना जे जे उत्स्फूर्तपणे सुचत जाते तसे ते लिहित जातात. त्यातून समोर येणारी मूर्त अथवा अमूर्त कल्पना कवितेतून आपल्यासमोर उभी राहते. त्यामुळे “झपूर्झा” ह्या शब्दाचा अर्थ एक सुटा शब्द म्हणून न लावता “झपूर्झा! गडे झपूर्झा !” ह्या शब्दसमूहाचा म्हणून एक अर्थ लावावा. असे केल्याने आपले काम सोपे होते? ते कसे तर प्रत्येक कडवे आपल्याला एका अनुभूतीबद्दल सांगू पाहतेय. मात्र त्या अनुभूती वेगवेगळ्या आहेत. त्यांना सांधणारा धागा म्हणजे हा शब्दसमूह. त्यामुळे “झपूर्झा! गडे झपूर्झा !” ह्याचा एकच अर्थ नाही तर प्रत्येक कडवे जी काही कल्पना मांडू पाहतेय ती सगळी मिळून पण त्यांच्या पर्यंतच मर्यादित न राहता जी भावना, जी कल्पना आपल्यासमोर उभी राहील ती म्हणजेच “झपूर्झा! गडे-झपूर्झा !”.
इथे मला आठवते ती “आंधळी माणसे आणि हत्ती” ही बोधकथा. त्यातल्या प्रत्येक आंधळ्या माणसाला हत्ती वेगवेगळा भासतो, पण हत्तीचे संपूर्ण स्वरूप वेगळेच असते. तिथे प्रत्येक जण जे हत्तीचे वर्णन करतो ते केवळ त्याच्या एका अंगाचेच दर्शन असते. मात्र त्या सगळ्या कथनांना एकत्र करूनही हत्तीचे पूर्ण स्वरूप समजेलच असे नाही. कदाचित मानवी बुद्धीच्या पल्याड कार्यरत असलेल्या शक्तीचेही तसेच असावे. तिचे वर्णन करायला केवळ माणूस प्राण्याची बोली का म्हणून पुरेशी ठरावी? हा विषय आणखी सविस्तर मांडायला गेलं तर वेगळा लेख होईल, पण असो. हे सांगण्याचा मुद्दा हाच की “झपूर्झा गडे झपूर्झा” असे म्हणून त्या शक्तीचे स्वरूप कसे असेल हे सांगण्याचा एक उत्तम प्रयत्न केशवसुतांनी केलेला आहे. त्यासाठी पुरावेही या कवितेत दिसून येतीलच व ते मी पुढे मांडेल.
अर्थात हे सगळे समजून घ्यायला आपण पूर्ण कविता आधी वाचली पाहिजे. ती एकदा वाचूया आणि मग त्याच्या भावार्थाकडे वळूया.
संपूर्ण कविता:
हर्षखेद ते मावळले
हास्य निमालें,
अश्रु पळाले;
कंटक-शल्यें बोथटलीं,
मखमालीची लव वठली;
कांही न दिसे दृष्टीला
प्रकाश गेला,
तिमिर हरपला;
काय म्हणावें या स्थितिला ?—
झपूर्झा! गडे-झपूर्झा !
हर्षशोक हे ज्यां सगळें,
त्यां काय कळे ?
त्यां काय वळे ?
हंसतिल जरि ते आम्हांला,
भय न धरु हें वदण्याला:—
व्यर्थी अधिकचि अर्थ वसे
तो त्यांस दिसे
ज्यां म्हणति पिसे;
त्या अर्थाचे बोल कसे ?—
झपूर्झा! गडे-झपूर्झा !
ज्ञाताच्या कुंपणावरुन,
धीरत्व धरुन,
उड्डाण करुन,
चिद्घनचपला ही जाते,
नाचत तेथे चकचकते;
अंधुक आकृति तिस दिसती,
त्या गाताती
निगूढ गीती;
त्या गीतींचे ध्वनि निघती—
झपूर्झा ! गडे-झपूर्झा !
नांगरल्याविण भुई बरी
असे किति तरी;
पण शेतकरी
सनदी तेथे कोण वदा ?—
हजारांतुनी एखादा !
तरी न तेथुनि वनमाला
आणायाला,
अटक तुम्हांला,
मात्र गात हा मंत्र चला —
झपूर्झा ! गडे-झपूर्झा !
पुरुषाशी त्या रम्य अति
नित्य प्रकृति
क्रीडा करती
स्वरसंगम त्या क्रीडांचा
ओळखणे, हा ज्ञानाचा
हेतू; तयाची सुंदरता
व्हाया चित्ता-
प्रत ती ज्ञाता
वाडे कोड़े गा आता-
झपूर्झा! गडे-झपूर्झा!
सूर्य चंद्र आणिक तारे
नाचत सारे
हे प्रेमभरें
खुडित खपुष्पें फिरति जिथें;
आहे जर जाणें तेथें,
धरा जरा निःसंगपणा,
मारा फिरके,
मारा गिरके,
नाचत गुंगत म्हणा म्हणा-
झपूर्झा ! गडे-झपूर्झा !
— केशवसुत[कृष्णाजी केशव दामले]
रसग्रहण:
मघाशी मी म्हणालो तसे अलौकिक शक्तीकडे बोट दाखवणारी पहिली दोन कडवी आहेत. त्यातल्या काव्याला थोडा वेळ बाजूला ठेवून मांडलेल्या कल्पनेकडे बघूया. साध्या भाषेत सांगायला गेलं तर पहिलं कडवं एका विशिष्ट स्थितीबद्दल बोलत आहे.
हर्षखेद ते मावळले
हास्य निमालें,
अश्रु पळाले;
कंटक-शल्यें बोथटलीं,
मखमालीची लव वठली;
कांही न दिसे दृष्टीला
प्रकाश गेला,
तिमिर हरपला;
काय म्हणावें या स्थितिला ?—
झपूर्झा! गडे-झपूर्झा !
जेव्हा आयुष्यात सहसा प्रखरपणे जाणवणाऱ्या गोष्टींची तीव्रता कमी होत जाते ती ही स्थिती. इथे हर्ष, खेद विलयास जातात. हसणे आणि रडणे कमी होते. ज्या काट्यासारख्या टोचणाऱ्या गोष्टी असतात त्या तितक्या टोचत नाहीत किंवा मखमालीचा मऊपणा तितकासा जाणवत नाही. डोळ्यांना दिसणे कमी होते. प्रकाश जातो (त्यासोबत प्रकाशाने ज्याचे सूतोवाच होते ते सगळेच) आणि अंधार हरवतो. इथे एक विशेष जाणवणारी गोष्ट म्हणजे वैज्ञानिक किंवा सामान्य बुद्धीप्रमाणे प्रकाश गेल्यावर अंधार वाढायला पाहिजे तो उलट हरवतो आहे. म्हणजे ना धड प्रकाश आहे ना धड अंधार! ह्या स्थितीला काय म्हणावे तर “झपूर्झा! गडे झपूर्झा!”.
अशी स्थिती केव्हा होईल? तर तीन वेगळ्या प्रकारे ही स्थिती येऊ शकते. पहिली जेव्हा माणूस वृद्धपणाकडे झुकतो. तेव्हा सर्व इंद्रियांची शक्ती कमी होत जाते. हळूहळू सर्व संवेदना बोथट होत जातात आणि काही न कळण्याची अवस्था येते. तेव्हा असे घडू शकते. दुसरी शक्यता अशी की जेव्हा माणसाच्या मेंदू व बुद्धीचे नियंत्रण करणारी रसायने कमीजास्त होतात, नैराश्याचे प्रमाण खूप जास्त वाढते, तेव्हा सर्व भावना बोथट होत जातात. सर्व काही निरर्थक वाटते व कुठलीच आशा दिसत नाही. तेव्हाही ही स्थिती येऊ शकते. तिसरी शक्यता सगळ्यात महत्त्वाची कारण ती अशा मनुष्याची असते ज्यांनी सर्व इंद्रियांवर विजय मिळवलेला असतो आणि ते मानवी भावना व ऐहिकाच्या पलीकडे पोहोचलेले असतात. तिथे आनंद, दुःख, हसू, रडू , वेदना, संवेदना, आशा, निराशा हे सगळे सारखेच भासते. ते त्या बुद्धी पलीकडच्या अलौकिक शक्तीकडे झुकलेले असतात. तिथे ना प्रकाश असतो ना अंधार. तिथे डोळ्यांना पुढे काहीच दिसत नाही, कारण तिथे मार्गच संपतो आणि उरते ती एक निराकार स्थिती. ह्या अनुभूतीलाच केशवसुत म्हणतात “झपूर्झा! गडे झपूर्झा!”
ही अनुभूती कुणाला प्राप्त होते आणि त्या लोकांना ती कशी भासते ह्याचे वर्णन केशवसुत पुढील कडव्यात करतात.
हर्षशोक हे ज्यां सगळें,
त्यां काय कळे ?
त्यां काय वळे ?
हंसतिल जरि ते आम्हांला,
भय न धरु हें वदण्याला:—
व्यर्थी अधिकचि अर्थ वसे
तो त्यांस दिसे
ज्यां म्हणति पिसे;
त्या अर्थाचे बोल कसे ?—
झपूर्झा! गडे-झपूर्झा !
त्यासाठी ते अट टाकतात की ज्या लोकांसाठी हर्ष आणि शोक ह्या पलीकडे जग नाही त्यांच्यासाठी हे नाही. त्यांच्या बुद्धीची झेप केवळ मानवी अनुभवांपाशी येऊन थांबते त्यांना हे कळणार नाही तसेच वळणार देखील नाही. जे केवळ मानवी जीवनात अडकून राहू इच्छितात त्यांनी ह्या फंदात पडूच नये. कारण ते आम्हाला हसतील, वेड्यात काढतील. मात्र का म्हणून त्यांचे भय आम्ही बाळगावे? आम्हाला जे सांगायचे आहे ते आम्ही सांगूच! व्यर्थ, निरर्थक आणि कुठल्याही परिणामाची, अथवा फळाची अपेक्षा न ठेवता सतत केलेल्या प्रयत्नातून जो काही एक अर्थ मिळतो. किंबहुना त्यालाच एक अर्थ आहे. तो ज्यांना दिसतो त्यांना तुम्ही भलेही वेडे का म्हणा ना! मात्र त्याच लोकांसाठी ही अनुभूती आहे जे वेडे ठरवले जाण्याची भीती न बाळगता त्या अर्थामागे लागतात. ह्या घुसळणीतून त्यांना जो काही अर्थ प्राप्त होतो त्याचे बोल म्हणजे “झपूर्झा! गडे झपूर्झा!”
मागच्या कडव्यात सांगितलेला टप्पा पार पडला तरी शोध अजून संपलेला नाही. त्यासाठी काही दिव्य पार करावी लागतात. ती कोण करणार?
ज्ञाताच्या कुंपणावरुन,
धीरत्व धरुन,
उड्डाण करुन,
चिद्घनचपला ही जाते,
नाचत तेथे चकचकते;
अंधुक आकृति तिस दिसती,
त्या गाताती
निगूढ गीती;
त्या गीतींचे ध्वनि निघती—
झपूर्झा ! गडे-झपूर्झा !
ती सगळे अडथळे पार करणारी शक्ती म्हणजे चित्घनचपला. ह्या शब्दाची फोड होते चित्(चैतन्य)+घन(भरलेली)+चपला(वीज) म्हणजे चैतन्याने भरलेली शक्ती. ही विद्युल्लता काय करते तर मानवाला जे काही ज्ञात आहे त्याचे कुंपण ओलांडून पलीकडे जाते. मानवी आकलनशक्तीला काही मर्यादा आहेत. त्या ओलांडून पुढे जाण्याचे धैर्य पाहिजे. ते ओलांडायला उड्डाण करावे लागणार आणि त्यासाठी मोठ्या शक्तीची गरज असेल जी सहज कुणालाही सापडणार नाही. ही अशी चित्घनचपला म्हणजे दुसरी तिसरी कुणी नसून भारतीय अध्यात्मानुसार प्रत्येक देहात वसणारी कुंडलिनी शक्तीच होय. हे कोडे एकदा उलगडले की पुढच्या ओळींचा अर्थ लागणे सोपे होते.
जेव्हा ही विद्युल्लता ज्ञाताच्या कुंपणावरून उड्डाण करते तेव्हा तिला काय दिसते? केशवसुतांची कल्पनाशक्ती इथे काय कमाल करते बघा! विजेचा प्रकाश क्षणिक असतो आणि त्यात फार काही दिसण्याची शक्यता कमीच. जे काही दिसेल तेही अंधुकच. म्हणून त्या अगदी कमी प्रकाशात कुंडलिनीला केवळ थोडेसेच आकलन होते. त्यातून अंधुक अशा आकृती दिसतात. ज्यांचे पूर्ण स्वरूप सहज कळून येत नाही. मात्र त्या अंधारात शांतता नसते. तिथे त्या अंधुक आकृती एका गीताप्रमाणे काहीतरी गात असतात. ही संपूर्ण अनुभूती शब्दांच्या पलीकडली असल्याने त्याचे ध्वनी सुद्धा निगूढ, सहज न समजणारे असतात. मग अशा शब्दातीत ध्वनींना शब्दरूप द्यायचेच ठरवले तर काय म्हणावे? केशवसुत त्यास नाव देतात “झपूर्झा! गडे झपूर्झा!”.
अशाप्रकारे अद्भुताची झलक आपल्याला दिसते. असा अलौकिक अनुभव घेतल्यावर सावरून बसायला होतं, काहीतरी आधार लागतो आणि त्यासाठीच केशवसुत पुढील कडव्यात आपल्याला पुन्हा भूलोकात आणतात. केशवसुत इथे शब्दांच्या तारेवर एकाच काठीच्या दोन टोकांवर दोन वेगळे अर्थ उत्तमरित्या पेलत आहेत. एकीकडे रूढ शब्दार्थ तर दुसरीकडे गूढ भावार्थ!
नांगरल्याविण भुई बरी
असे किति तरी;
पण शेतकरी
सनदी तेथे कोण वदा ?—
हजारांतुनी एखादा !
तरी न तेथुनि वनमाला
आणायाला,
अटक तुम्हांला,
मात्र गात हा मंत्र चला —
झपूर्झा ! गडे-झपूर्झा !
कल्पना करा, एक जमिनीचा तुकडा आहे. तो काहीच वापर न करता ठेवला तर किती बरे होईल? असा विचार करणारे किती तरी लोक असतील, पण त्यातला कुणीतरी शेतकरी असेल का? किंबहुना कुठला शेतकरी त्याची जमीन न पिकवता तशीच उनाड सोडेल काय? बरं, असेल कुठला शेतकरी असा तर तो नक्कीच हजारातून एखादा असेल. तो असा सनदी शेतकरी असेल जो अत्यंत सधन आहे, त्याच्या सर्व गरजा पूर्ण झाल्या आहेत आणि त्याने ही जमीन स्वकष्टाने मिळवलेली नाही. तसं पाहिलं तर हजारातला एक म्हणजे फार लहान संख्या नाही. त्यामुळे काळजीचे कारणही नाही. तेव्हा तुम्ही अशा जमिनीत उगवलेल्या वनराजीतून एखादी वेल जरी आणली तरी काही गुन्हा ठरणार नाही. मात्र त्यासाठी तुम्हालाही एक मंत्र गाता आला पाहिजे: “झपूर्झा! गडे झपूर्झा!”.
भावार्थाने पाहिलं तर, आपला देह हीसुद्धा एक भुईच आहे आणि आपण त्या भुईवर पीक घेणारे शेतकरी. अशा जमिनीची सद्गुणांचे बियाणे टाकून, सदाचाराच्या नांगराने मशागत न करता तिला तसेच सत्कर्मांचे पीक न घेता सोडून दिले तर अर्थ काय उरला? तेव्हा आपल्या देहाचा, आपल्या भूतलावरील अस्तित्वाचा उपयोग न करता त्याअधीन कुणी राहू शकेल तर एखादा सनदी शेतकरीच! पण समजा तुमच्या दुर्लक्ष करूनही घडलेल्या सत्कृत्यातून काही वनमाला उगवल्या, त्यातून तुम्हाला काही उत्तम फळ भेटत असेल तर तिथे तुम्हाला कुणी अटक करणार नाही. मात्र अशावेळी “इदं न मम”(हे माझे नाही) असे म्हणून पुढे जाता आले पाहिजे. त्यासाठी जो मंत्र, जी तपश्चर्या लागेल ती म्हणजे “झपूर्झा! गडे झपूर्झा!”.
केव्हा, कोण, कुठे, कसे, ह्या प्रश्नांची उत्तरे देऊन झाल्यावर अंताला पोहोचण्यापूर्वीचे हे कडवे “का” ह्या प्रश्नाचे उत्तर देऊ पाहते. “झपूर्झा! गडे झपूर्झा!” म्हणण्याचा हेतू स्पष्ट करण्याचा सार्थ प्रयत्न करते.
पुरुषाशी त्या रम्य अति
नित्य प्रकृति
क्रीडा करती
स्वरसंगम त्या क्रीडांचा
ओळखणे, हा ज्ञानाचा
हेतू; तयाची सुंदरता
व्हाया चित्ता-
प्रत ती ज्ञाता
वाडे कोड़े गा आता-
झपूर्झा! गडे-झपूर्झा!
त्या अलौकिक शक्तींना, केशवसुत प्रकृती म्हणून संबोधतात. रम्य अशा या प्रकृती माणसांसोबत खेळतात. गद्य रूपात मांडलं तर त्या क्रीडांचा स्वरसंगम ओळखणे हा ज्ञानाचा हेतू आहे. थोडक्यात पूर्वीपासून प्रकृतींचे जे काही खेळ आपल्यासोबत आणि सभोवती चालतात ते ओळखणे हा ज्ञानप्राप्तीचा मूळ हेतू राहिला आहे. निसर्गात घडणाऱ्या विविध घटनांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न मनुष्य प्राणी फार आधीपासून करतोय. त्यात त्याला त्याच प्रकृतीचाही हातभार लागतो. कधी अध्यात्म, विज्ञान यांची सांगड घालून तो आपल्या अस्तित्वाचा अर्थ शोधू पाहतो. आपले इथे कार्य काय ह्याचे ज्ञान मिळवणे हा ह्या प्रयत्नांचा हेतू होय. ह्या हेतूची सुंदरता आपल्या चित्तापर्यंत पोहोचावी म्हणून तुम्हाला आनंदाने गावे लागेल: “झपूर्झा! गडे झपूर्झा!”
एक विशेष लक्षात घेण्याची गोष्ट म्हणजे प्रत्येक वेळी केशवसुत आपल्याला झपूर्झा फक्त म्हणायला नाही तर गायला सांगतात. कारण माणूस लयीतून कुठल्याही माहितीचा आकृतीबंध काढतो. किंबहुना ज्या काळात माहिती फक्त मेंदूत साठवून ठेवायची गरज असायची त्या काळात माणसांनी शब्दांना, कथांना गाऊन व चाली लाऊन लक्षात ठेवले. त्यामुळे काव्य व गीतमाध्यमाचा इतिहास मोठा आहे.
पाच कडव्यांमध्ये “झपूर्झा! गडे झपूर्झा!” प्रतिमेबद्दल आपल्या मनात येणारे सगळे प्रश्न सोडवल्यावर पुढे काय करायचे या “काय” प्रश्नाचे उत्तर केशवसुत शेवटच्या कडव्यात मांडतात. सगळ्या चिंता बाजूला ठेवून काय करायचे हे सांगतात.
सूर्य चंद्र आणिक तारे
नाचत सारे
हे प्रेमभरें
खुडित खपुष्पें फिरति जिथें;
आहे जर जाणें तेथें,
धरा जरा निःसंगपणा,
मारा फिरके,
मारा गिरके,
नाचत गुंगत म्हणा म्हणा-
झपूर्झा ! गडे-झपूर्झा !
मनुष्य प्राणी हाच केवळ मृत्यूचा, त्यानंतर पुढे मागे काय होईल ह्याचा विचार करत असतो. बाकी सर्व प्राणीमात्रांना या शाश्वत सत्याचे ज्ञान असते. सगळ्यांना शेवटी जिथे सूर्य, चंद्र, तारे विहार करतात, प्रेमाने एकत्र नांदतात, एकरूप होऊन जातात अशा आकाशात कधी ना कधी जायचे आहे. मग उगाच चिंता ती का म्हणून करावी? म्हणून केशवसुत फार नाही पण जरासा तरी निःसंगपणा धरायला सांगतात. ते म्हणतात इथली आसक्ती, मोह, चिंता बाजूला ठेवून आनंद घ्यायला शिका. आनंदाने मनसोक्त नाचा, फिरकी घ्या आणि गिरक्या मारा. जगून घेण्यात, त्याचा अर्थ समजण्यात गुंगून जा. त्याने तुम्ही आत्मसात कराल ती गोष्ट म्हणजे “झपूर्झा! गडे झपूर्झा!”
शेवट:
कवितेत यमक आणि अनुप्रास अलंकारांचा खेळ सतत सुरू राहतो.. मात्रांचा संचानुसार उद्धव आणि पादाकुलक मात्रवृत्तांची मिसळण केल्याने सुंदर विशिष्ट अशी लय त्यामुळे कवितेला आहे. म्हणूनच कविता गेय होते आणि तिची बांधणी आजच्या काळातल्या रॅप गीतांना सुद्धा लाजवेल इतकी जबरदस्त आहे. इथे एकाच कल्पनेची कुठेच पुनरावृत्ती न होता किंवा उगाचच शब्द न वाढवता प्रत्येक शब्दाने आपली जागा हक्काने मिळवली आहे. मराठी जनमानसावर या कवितेने का गारूड केले हे आपल्याला कविता वाचल्यावर कळून येते.
तेव्हा तुम्हांला ही कविता आणि मी केलेले रसग्रहण कसे वाटले ते नक्की सांगा. पुढील भागात रसग्रहण करण्यासाठी मी काही कविता निवडून ठेवल्या आहेत. मात्र तुमची फर्माईश असलेल्या एखाद्या कवितेचे रसग्रहण नक्की करायला आवडेल. पुन्हा भेटू पुढच्या भागात!