Relationship with the village in Marathi Short Stories by प्रकाश books and stories PDF | नाते जुळले खेड्याशी

Featured Books
Categories
Share

नाते जुळले खेड्याशी

जुळले नाते खेड्याशी....

रिमझिम पाऊस  सुरु होता. निवांत पावसाचा आनंद खिडकीतूनच  घेत होतो. तेवढ्यात फोनची रिंग वाजली. क्षणभर बिचकलोच. माझे जेष्ठ चुलत भाऊ दिर्घकाळापासून आजारी होते. त्यांचं काही बरं वाईट तर झालं नसेल या भावनेनं चिंताग्रस्त झालो. पण तसं काही कळलं नाही. संदेश आनंदाचा होता. माझ्या भावांनी शेतात सहभोजन आयोजित केलं होतं.त्याबद्दल बोलावणे होते. गावी माझी शेती व घरही नव्हते. केंव्हाच ती मी विकली होती.पण आपुलकी ने व प्रेमाने बोलाविल्याने जावे लागत होते. लगेच तयारी सुरु केली. सोपा आणि जलद समृद्धी मार्ग जायला निवडला. कारच्या प्रवासासाठी  नातू ही तयार झाला. आमची नवीन Tata Nexon भन्नाट पण नियंत्रित वेगाने समृद्धीवर धावत होती. वर्धा शहर लवकरच आले. सेवाग्राम रस्त्यावर बापू कुटी बघितली. नंतर समुद्रपूर मार्गावर लागलो.

          समुद्रपूरला पोहोचताच कानावर एकाएकी शब्द पडले. 'भासाजी, भासाजी,   थांबा'.  एवढे आपुलकीचे शब्द हल्ली ऐकायला मिळत नसल्याने माझ्या कार चे ब्रेक आपोआप लागले. समोर बघताच वयोवृद्ध व्यक्ती म्हणजे मामा दिसले. हे मामा मानलेले मामा होते. डोळ्यांनी अंधुक दिसत असले तरी 'आपुलकी असली की स्पष्ट दिसते', असे म्हणतात. तसेच घडले. ते आठवडी बाजारासाठी आले होते. कारण समुद्रपूर आमचे आठवडी बाजाराचे ठिकाण.           एव्हाना आमच्या कार ने समुद्रपूर केव्हाच सोडले होते.   जुन्या आठवणीत असतांनाच मामांनी आवाज दिला.भासाजी, आता एसी बंद करा आणि आमची खेड्याची हवा घेउन बघा.  खरोखरच अशी शुद्ध हवा आता आम्हां शहरवासियांना दुर्मिळच.  काही वेळ पुढे गेल्यानंतर बरड (टेकडी ) लागली. मामांनी तिथे थांबायला सांगितले. कार थांबवली. सुंदर, रमणीय व मोहक आणि शुद्ध हवेनी माझे मन या ठिकाणी आनंदी झाले.            कारणही तसेच होते.  बाजूला हनुमानाचे मंदिर आणि खळखळून वाहणारा ओढा आणि त्यातील शुद्ध पाणी.  माझा नातू तर केव्हाच ओढ्याकडे गेला आणि पाण्यासोबत खेळायला लागला. तिथे छोटा धबधबाही होता. चार पाच फुटावरून पाणी खाली पडत होते. तो मनमुराद पणे आनंद घेत होता. निसर्गातील निखळ आनंदात तो मग्न झाला होता.                                एव्हढ्यात त्याच्या आइनें आवाज दिला....'अरे घाण पाणी असेल...तिथे कश्याला अंघोळ करतोस. मामाही ओरडले. तुमच्या शहरासारख्या नद्या नाहीत आमच्याकडे. बघा. शुद्ध पाणी. बिसलेरीपेक्षाही शुद्ध.          खरोखरच माझ्या मनाला वाटले की आपण एव्हडया सुंदर जगाला विसरून शहराकडे कां वळलोत.    या निसर्गरम्य परिसराला सोडून जावेसे वाटत नव्हते. पण इलाज नव्हता.                         आम्ही हळू हळू गावाच्या जवळ पोहोचलो. गावाच्या बाहेर कचऱ्याचे ढीग न दिसता छोटे छोटे टाके होते. गावात सिमेंटचे रस्ते व नाल्याही दिसल्या. कुठे कचराही व प्लास्टिक पडलेले दिसले नाही. मामा गांव खूप खूप स्वच्छ दिसते. मामा म्हणाले की, आमच्या गावात कचऱ्याचा रिक्षा सकाळी फिरतो आणि गावात प्लास्टिक कुठून येणार. इथे खाऊगल्ली नाही. शाळा, दवाखाना, अगदी छान आहे. शिवाय स्त्रियांनी दारूबंदी केली आहे. त्या आता बचत गट योजनाही चालवितात.           मामा गावाचे वर्णन करीत होते आणि आम्ही वस्तुस्थितीचे दर्शन घेत होतो. घर केव्हा आले कळलेच नाही.  घरी वहिनींनी पाय धुवायला पारंपारिक पद्धतीने पाट आणि पाणयाची बादली ठेवली. आंत जीर्ण वाड्यात शिरलो. जुनी इमारत पण तेव्हढीच मजबूत. सर्व सागाचे व पांढऱ्या मातीचे बांधकाम. घरात थंड वाटत होते. आम्ही गप्पा मारीत होतो. आता संध्याकाळी गावात फेरफटका मारायला गेलो. फिरता फिरता मामाच्या घरी जाऊन आलो. मामी म्हणाल्यात, 'बरं झालं ,नाही तं तुमचे मामा ओरडले असते'. हल्लीच्या पोरांना काही माया च राहत नाही. तसें ते फटकळ आहे म्हणा. मामी ने बोलायची काही संधी सोडली नाही.. रात्री अंगणात बाज टाकून बसलो होतो. लहान मुलं डोकावून बघत होती. ती आपसात पुटपुटत होती. हे काका मोठे साहेब आहेत लेका. त्याय नं लेका खूप खूप अभ्यास केला म्हणे. नाही तर, तू पहा शाळेत जायले रडते लेका.  मुली देखील अधून मधून इकडून तिकडे जातांना दिसत होत्या. त्या देखील संभाषणात कमी नव्हत्या. म्हणे या काकांना लई पगार आहे. हो बाई, म्हणून ते गाडीने फिरते. लई महागाई ची गाडी असेल बाई.. सकाळ ची वेळ होती. भाऊ म्हणाले शेतावर जाऊ. नातू म्हणाला, 'पायी कां आजोबा'. नाही नाही. आता थेट रस्ता झाला शेता पर्यंत. सरकार न रस्ते चांगले केले आहे नं.  मी मात्र मनातच म्हणालो, आमच्या शहरातच कां बरं खड्डेच खड्डे दिसतात.  कार काढली. आम्ही शेतावर गेलो. आता मात्र लहान मंडळी व मोठेही बोरं खायला, पेरू खायला धावले. शेतातही फेरफटका मारीत होते. त्याच्या आनंदाला पारावार नव्हता. यथेच्छ जेवण झाले. आता निघायची वेळ झाली होती. सर्वजण आम्ही गावात आलोत. सर्वांचा निरोप घेतांना मात्र मन दाटून आले. तेवढ्यात मामा आले. मोठे गव्हाचे पोते घेऊन. त्यांच्या गड्याने डिक्कीत टाकले. वहिनींनी हळद, तर शेजाऱ्यांनी मिरची तर कुणी कांदे तर कुणी हुरडा असे भरभरून उदार अंतःकरणाने वस्तू डिक्कीत टाकल्यात. खरंच उगीच शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा म्हणत नाही. त्याच अंतःकरण आभाळा एवढं असत.      फक्त आम्हालाच मात्र वेळ नसते त्यांची भावना व व्यथा समजावून घायला.  जड झालेल्या अंतःकरणाने शेवटी कार सुरु केली. रस्ता गुळगुळीत असला तरी वेग मात्र कार घेत नव्हती. कां कुणास ठाऊक तिचीही पावले जड झाली होती. बरडावर आलो. शेवटी फिरून गावाला एकदा बघितलं. डोळ्यात गांव साठवून घेतलं. शहर चांगले की गांव आणि विकास कुणाचा झाला शहराचा की खेड्यातील माणूस कीचा. या विचाऱ्यांच्या गुंतागुंतीत वापस शहर कधी जवळ आलं, हे कळलंही नाही.- 

प्रा. डाँ. विनोद राऊत, सेवानिवृत्त प्राध्यापक , अमरावती.

सपादन - प्रकाश राऊत दिनांक 23.08.2026***************