स्वतःच भविष्य घडवायच आहे, स्वयंपाक शिकायचा आहे. आई-वडिलांची काळजी घ्यायची आहे, लग्न करायच आहे, बचत करायची आहे, स्वतः च घर घ्यायच आहे, आई-बाबांच स्वप्न पूर्ण करायच आहे, हे करायचंय ते करायचंय पण ह्या सगळ्यात मला काय करायचंय? हे सगळं तर मी कोणा ना कोणा साठी तरी करतीये पण माझं काय मी माझ्यासाठी काय करतीये?
मला जे करायचंय ते तर ह्यात आलच नाही. कारण मला या पेक्षा वेगळ करायचंय मला नृत्य शिकायचय, गिर्यारोहण करायचंय, मनसोक्त फिरायचंय, मुक्या जिवांची काळजी घ्यायची आहे, चित्रकार बनायचंय, कार्यक्रम व्यवस्थापक व्हायचंय, मनसोक्त हसायचय, बागडायचय, एकट राहायचय, "मला मी व्हायचंय."
होय मला मी बनायचय. ती मी जिला सगळ करता येत जी कोणाच्या दबावा खाली नाहीये. ती सतत मनापासून हसत खेळत राहते जी कसलाही विचार करत नाही मुख्यतः चार लोक काय म्हणतील याचा. जस तिनी स्वतःला जपलं आहे ना तसं मला जपायचंय. त्रास होतो मला लोकांच्या माझ्यावर असलेल्या नजरांमुळे सतत काही ना काही बोलतात असं नको बसू, तिथे नको जाऊ, हे कर मग चांगल होईल इकडे नको बघू, त्याच्याशी नको बोलू..बास! हे सगळ कुठे तरी थांबवायचे आहे नाही ऐकायचे कोणाचे चार चांगले-वाईट शब्द ,नाही करायचा कोणाचा विचार,मला माझ्या मनाप्रमाणे जगायचंय माझ चांगल वाईट मला पाहायचय. सर्वांना सांगायचा कि नका माझ्या चांगल्यासाठी काही सांगू मला माझ्या चांगल्या -वाईट कृत्यांचे परिणाम अनुभवायचेत जर चांगल झाल तरी माझ्यामुळे आणि वाईट झाल तरी ते माझ्याचमुळे असेल. पण मला मनासारखं वागायचय.
नाही अडकायचे या नात्यांच्या बंधनात, नाही गुंतायचं या शब्दांच्या वेढ्यात. नाही उर्जा घालवायची मला समोरच्याला समजून सांगण्यात किंवा समजून घेण्यात. नाही बदलायचं स्वतःला कोणाच्या नजरेत चांगल दिसण्यासाठी. मी जशी आहे मला तसं राहायचय. सगळे संगतात मी साडीत छान दिसते, हसताना छान दिसते, कुर्ती मध्ये छान दिसते पण कोणी अस का नाही सांगत कि तू जशी आहेस तशी छान आहेस कारण ही सगळी तर माझीच रूपं आहेत नकळत म्हणण्यापेक्षा सरळ का नाही म्हणत.
माझ्या मनातलं जग खूप वेगळं आहे मी जिच्या बद्दल बोलत होते ती त्या जगात राहते. तिला हवं ते करायला कोणी अडवत नाही. हो करते ना ती सुद्धा नोकरी घर देखिल सांभाळते पण थोडा तरी वेळ ती तिच्या साठी देते मग त्या वेळात ती तिच्या आवडीच्या गोष्टी करते आणि सर्व जण तिला प्रोत्साहन देतात ती पुढे कशी जाईल याचा विचार करून तिला सांगतात मग तिचा अभिप्राय घेऊन बोलतात. तिला मागे नाही खेचत.
कोणाला कमी पणा नाही वाटत तिला प्रोत्साहन देताना. ती मनापासून खुश आहे.
ही समस्या मी मुलगी आहे म्हणून नाही तर मुलांना देखील याचा सामना करावा लागतो. कोण म्हणतं मुलांच्या आयुष्यात असे प्रसंग येत नाहीत मला तरी अस नाही वाटत त्यांना पण असे अनुभव असतीलच. पण आपण सर्वांनी याला कस उत्तर द्यायचं हे आपल्यावर आहे. अशा गोष्टींना घाबरून नाही तर हसून उत्तर द्यायचं. आपण सर्व एक स्वतंत्र व्यक्ती आहोत निर्णय घेण्याआधी सर्वांच ऐकायचं पण आपण ऐकलं म्हणून तुमच्या मताप्रमाणे निर्णय घेतले जातील असं नाही आपल्याला जे वाटेल तेच करायचं. प्रत्येकाची मत वेगळी असूच शकतात ते म्हणतात ना ऐकावे जनाचे, करावे मनाचे अगदी तस करायचं.
आणि आता एकदा तरी मी मी म्हणून वावरणार आणि मिरवणार. एकदा तरी नाही तर आज पासून मी मी बनणार. नाही घेणार कोणाची परवानगी काही करायची. मी माझ्या पायांवर खंबीर उभी आहे, नाही मला कोणाची गरज ज्यांना पटेल, आवडेल त्यांनी साथ द्यावी आणि बाकीच्यांनी आता मी त्यांच्यामनासारखे जगेन, वागेन याची वाट पाहावी.