Antarman in Marathi Business by Jaydatta khile books and stories PDF | अंतर्मन - भाग 7

Featured Books
Categories
Share

अंतर्मन - भाग 7

भाग : भाऊसाहेबचा खरा चेहरा

प्रकाशने "सॉरी जय भाऊ" म्हटलं आणि मी त्याला माफ केलं. तो त्याच्या दुकानात परत गेला, पण माझ्या डोक्यातून एकच प्रश्न जात नव्हता.


राम हा वेडा आहे, गरीब आहे, पण गद्दार नाही. तो प्रकाशचा मित्र आहे, पण तो माझा भाऊ पण आहे. तो मला धोका देईल का?


त्या रात्री मी रामला घरी बोलावलं नाही, मी त्याला आमच्या जुन्या लॉजच्या टेरेसवर बोलावलं. जिथे आम्ही दोघांनी पहिलं स्वप्न बघितलं होतं.


राम आला. घाबरलेला होता. त्याने तोच जुना शर्ट घातला होता.


मी त्याला म्हणालो, "राम, बस."


तो बसला.


मी म्हणालो, "राम, तुला आठवतंय का, आपण इथे बसून म्हणायचो, एक दिवस आपली मोठी कंपनी असेल?"


राम म्हणाला, "आठवतंय भाऊ."


मी म्हणालो, "मग तू प्रकाशला माझं सिक्रेट का सांगितलंस? मी तुला सांगितलं होतं ना, आपलं गणित कोणालाच सांगायचं नाही."


रामने मान खाली घातली. दोन मिनिटं काहीच बोलला नाही. मग तो रडायला लागला.


म्हणाला, "भाऊ, मला माफ कर. भाऊसाहेबने मला विचारलं होतं. काल रात्री त्यांनी मला बोलावलं होतं. म्हणाले, जय रोज किती पैसे गोळा करतो? मी नाही सांगत होतो. मग त्यांनी मला 500 रुपये दिले. म्हणाले, तुझ्या आईला बरं नाही ना, घे औषधासाठी."


"भाऊ, माझ्या आईला खरंच बरं नव्हतं. मी पैसे घेतले आणि सांगितलं. मला वाटलं भाऊसाहेब आपलेच आहेत, त्यांना सांगितलं तर काय होईल."


त्याचं ऐकून मला राग नाही आला, मला त्याची दया आली. 500 रुपयांसाठी तो विकला गेला होता. पण चूक त्याची नव्हती, चूक गरिबीची होती.


मी त्याला म्हणालो, "राम, जा घरी."


राम गेला.


मी रात्रभर तिथेच बसलो होतो. सकाळ झाली.


सकाळी मी सरळ भाऊसाहेबच्या गोडाऊनवर गेलो. भाऊसाहेब चहा पीत बसला होता.


मी त्याला म्हणालो, "भाऊसाहेब, तुम्ही रामला 500 रुपये देऊन माझी माहिती काढलीत का?"


भाऊसाहेबने चहाचा कप खाली ठेवला. तो जराही घाबरला नाही. तो हसला.


म्हणाला, "हो, काढली."


मी म्हणालो, "का?"


भाऊसाहेब म्हणाला, "जय, इकडे ये, बस."


मी बसलो.


तो म्हणाला, "जय, मी तुला 2 लाख रुपये देतोय. माझं नाव लावतोय. मला तपासावं लागेल ना तू किती पाण्यात आहेस ते. मी रामला नाही तपासलं, मी तुला तपासलं."


"मला बघायचं होतं, जर तुझा मित्रच फुटला तर तू काय करतोस. तू त्याला मारलंस का? नाही. तू त्याला शिवी दिलीस का? नाही. तू त्याला समजावलंस आणि प्रकाशला पण परत आणलंस. हाच खरा बिझनेसमन आहे. जो माणसांना तोडत नाही, जोडतो."


"रामला 500 ची गरज होती, त्याने घेतले. उद्या त्याला 5000 ची गरज लागेल, तो अजून काहीतरी विकेल. म्हणून त्याला पैशाच्या जवळ ठेवायचं नाही."


मला त्याचं बोलणं पटत होतं आणि टोचत पण होतं.


मी म्हणालो, "मग आता काय करायचं रामचं?"


भाऊसाहेब म्हणाला, "त्याला काढू नकोस. त्याला प्रमोशन दे. आजपासून तो कलेक्शनला जाणार नाही. तो ऑफिसमध्ये बसून हिशोब लिहिल. जिथे पैसा नाही, तिथे तो गद्दारी पण करणार नाही."


त्या दिवशी मला कळलं, भाऊसाहेब व्हिलन नाहीये, तो माझा खरा गुरु आहे.


मी ऑफिसला आलो. राम कोपऱ्यात उभा होता.


मी त्याला म्हणालो, "राम, आजपासून तू बाहेर जाणार नाहीस. तू इथे बसून सगळ्या दुकानांचा हिशोब लिहिशील. पगार तोच, काम मोठं."


रामच्या डोळ्यात पाणी आलं. त्याला कळलं होतं की त्याला शिक्षा नाही, संधी मिळाली आहे.


मी भिंतीवर जाऊन पाचवा नियम लिहिला. मोठ्या अक्षरात.


नियम 5: तपासायचं सगळ्यांना, विश्वास ठेवायचा फक्त सिस्टमवर.


त्या संध्याकाळी भाऊसाहेब परत आला. म्हणाला, "जय, उद्या एक मोठा माणूस येणार आहे. माझा मोठा भाऊ. मुंबईहून. त्याला तुझी सिस्टम दाखवायची आहे. जर त्याला आवडली तर सात नाही, सत्तर दुकानं मिळतील."


मी म्हणालो, "कोण आहे तो?"


भाऊसाहेब म्हणाला, "अण्णा. खरा मालक."


त्या रात्री मी झोपलो नाही. कारण मला माहिती होतं, उद्याचा दिवस माझं आयुष्य बदलणार आहे.


---