Khidki books and stories free download online pdf in Marathi

खिडकी ...

खिडकी ..

खिडकी म्हणले की इतक्या आठवणी दाटून येतात की मनच एखाद्या जाऊन खिडकीत बसते .!
लहानपणी आमच्या चाळीतल्या दोन खोल्यांच्या घरात एक छान मोठी खिडकी होती .
तिला अगदी पूर्वी असत तसे आडवे गज होते .
तशी थोडी उंचावर असलेली ती खिडकी मला भारी प्रिय होती .
खिडकी अगदी ऐसपैस नसली तरी मी आरामात तिथे बसू शकत असे
शाळेतून आले की आईने दिलेली खाउची वाटी आधी मी खिडकीत ठेवत असे
मग एक उंच उडी मारून खिडकीत चढून बसत असे .
आई जोरात ओरडत असे अग जरा जपून ...
पण तो पर्यंत मी खिडकीत बसून फ्रॉक वर वाटी ठेवून खायला सुरु करीत असे
मग खिडकीत बसून गल्लीत कोण आला गेला पहात ..
बाहेरच्या ओळखीच्या लोकांशी बोलत माझे खाणे तास भर चालत असे .
माझा मुलगा पण नंतर त्याच खिडकीत बसून खेळत असे .
माझ्या सारखाच त्याला पण खिडकीच वेड होत ..
थोडा मोठा झाला तेव्हा तोही धपकन खिडकीतून उडी मारायचा
आणि मला पण भीती वाटायची पडेल की काय ..(अगदी माझ्या आईला वाट्त होती तश्शीच !)
कुठेही प्रवासाला निघाले की रेल्वे किंवा बस मध्ये मला कायम खिडकी कडेची जागा हवी असे
कधी जर चुकून तशी जागा नाही मिळाली तर मी त्या वेळेस खिडकीमध्ये बसलेल्या व्यक्तीशी
गोड गोड बोलून ती जागा पटकावत असे !

हायस्कुलला गेल्यावर मात्र माझ्या खिडकीत बसण्या वर बंधने आली ..
तशीही खिडकी आता माझ्या बसण्या सारखी राहिली नव्हती ..
पण आता खिडकीत फार वेळ उभ राहिले तरी आई ओरडू लागली
कारण वेश्या किंवा नायकिणी खिडकीत बसुन गिऱ्हाईकबोलवत असत असे ऐकलेले असे ना
त्त्यामुळे तरुण मुलीना घरची लोक खिडकीत नाही उभे राहु द्यायचे ..
शिवाय गल्लीतील तरुण मुले उगाचच खिडकी बाहेरून मुलीसाठी शिळ घालत असत
त्यामुळे त्यानंतर घरातली खिडकी हा प्रकार माझ्या साठी बंद झाला ..
आमची शाळा म्हणजे एक राजवाडा च होता जुना आणि मोठा असा
दरवाजे आणि खिडक्या पण मोठ्या मोठ्या
आणि या खिडक्यांचे “विशेष “म्हणजे त्या उघड्या होत्या गज नसलेल्या
त्यामुळे मधली सुट्टी संपली तरीही मैदानावर खेळत राहायचे
आणि मग वर्ग सुरु झाल्यावर खिडकीतून उडी मारून आत यायचे
यासाठी मी किती तरी वेळा बाईकडून अंगठे धरायची शिक्षा भोगली आहे
पण सवय कधीच सुटली नाही ....
आमच्या ग्रुप मधल्या एका मैत्रिणी कडे मागील दारी असलेल्या खोलीला एक मोठी खिडकी होती
त्या खिडकीला गोल बांधीव असा एक कट्टा पण होता
तशी तिच्या भल्या मोठ्या घरातली ही खिडकी असलेली खोली अगदी बाजूला होती “
आणि खोली पण वापरात नसल्याने थोडी धूळ असे
पण आम्ही मैत्रिणी रोज तिच्याच घरी त्याच खोलीत त्या खिडकीतील कट्ट्यावर गोल करून बसत असू
आणि मग आमच्या गप्पा गाणी सिक्रेट सारी त्या खिडकीतच शेअर होत असत
तिची आजी आम्हाला म्हणत असे” अग कशाला त्या खोलीत बसता ?किती धूळ आहे तिथे
पण नाही आम्ही ती खिडकी कधीच सोडली नाही
कॉलेज शिक्षणासाठी परगावी होस्टेल ला राहायला गेले
दुसर्या मजल्या वरील खोलीत आम्ही चोघी जणी रहात होतो
होस्टेल च्या आवाराबाहेर खूपशी गुलमोहोराची झाडे होती
त्याच्या फांद्या फुला सकट आमच्या खोलीत डोकावत असत
सकाळी उठल्या पासून गुलमोहोरा सोबत आमचा दिवस सुरु होत असे .
खुप प्रसन्न वाटत असे त्या गुलमोहोराचे दर्शन !!!
गुलमोहोराच्या फुलांचा एक उग्र पण मनमोहक गंध कायम त्या खोलीत असे
होस्टेल च्या इतर खोल्यातील आमच्या मैत्रिणी ना पण त्या खिडकी चे आणि गुलमोहोराचे आकर्षण असे
कुठल्याच रूम फेशनर ची तिथे गरज नसे
आजूबाजूच्या खोल्यातल्या मैत्रिणी आमचा खुप हेवा करीत असत ..!
आणि आमच्यापैकी एखादी गावी गेली की आवर्जून आमच्या खोलीत झोपायला येत असत
त्या खिडकी जवळ असणार्या बेड वर झोपायला प्रत्येकीने आम्ही एक आठवडा वाटून घेतला होता .
जेणे करून प्रत्येकीला खिडकीतल्या गुलमोहोराचा मनसोक्त सुवास मिळावा ..

त्यावेळची आमची सर्व सुख दुख्ख आम्ही त्या गुलमोहोरा सोबत वाटत असु
शिक्षण संपल्यावर ती खिडकी आणि तो गुलमोहोर याचा निरोप घेणे फार कठीण गेले .

लग्नानंतर आम्ही एका अपार्टमेंट मध्ये चौथ्या मजल्यावर राहायला गेलो .
मुलगा आता शाळेत जात होता
मी ऑफिस मधून येताना मुलाला घरी घेवून येत असे
पती डॉक्टर असल्याने त्याना रात्री घरी येण्यास उशीर होत असे
संध्याकाळी अभ्यास झाला मुलगा खिडकीत जाऊन बसत असे
तशी या खिडकीला कट्टा वगैरे नव्हता पण जवळच आम्ही बेड ठेवला होता
त्यामुळे तेथे बसता येत असे .
वडिलांची वाट पाहत मुलगा खिडकीत बसुन राही ..
या खिडकीतून पार लांबवर सर्व दिसत असे ..
लांबवर वडील दिसले की मुलगा खुश होऊन आई बाबा आले असे म्हणून आनंदित होत असे
त्याचे वडील अपार्टमेंट च्या कोपर्यला आले की त्याला हात करीत
मग तो आनंदाने दार उघडायला धावत जात असे .
लग्ना नंतर कल्याण ला मावशी कडे गेलो होतो
तेव्हा मावशी म्हणाली चला आज खिडकी वडा खायला जाऊ
खिडकी वडा ?..हा काय प्रकार आहे ? आम्ही विचारले
चल तर ..दाखवते तुला काय प्रकार आहे ते अशी मावशी म्हणाली
मग गेल्यावर समजले एका ठिकाणी बटाटे वडा खुप छान मिळतो
पण त्याची देव घेव खिडकीतुन होते म्हणुन तो “खिडकी वडा “
खुप हसू आले होते ते पाहून
यानंतर ची खिडकीची आठवण खुप वाईट आहे
कोकणात सासरच्या घरी मोठी उभ्या गजाची खिडकी आहे
त्याला कट्टा नाही कारण जमिनी पर्यत होती ती
एकदा एकत्र आलो होतो घरची सर्व जण तेव्हा धाकटे दीर काही कामाने बाहेर गेले होते
संध्याकाळ उलटून गेली तरी त्यांचा पत्ता नव्हता
रात्र चढू लागली पण ते आले नाहीत
धाकटी जाऊ खुप चिंतातुर झाली होती ..
काय कराव तेच सुचत नव्हत कारण तेव्हा फोन सरसकट नव्हते
ते बाहेर पडले गावाच्या वेशी पर्यंत सर्वांनी त्याना पाहिले होते ..
पण नंतर चे काहीच समजत नव्हते
घरची वाटेकरी माणसे त्यांना शोधायला गेली
सासूबाई पण अस्वस्थ होत्या त्यांनी धाकट्या जावेला सांगितले
“जा ग एक भांड पालथ घाल खिडकी पाशी म्हणजे येईल लवकर ..तो “
भांडे पालथे घातले म्हणजे बाहेर गेलेली व्यक्ती लवकर येते असा तेव्हा समज असे
आणि कित्येकदा त्याची योगायोगा ने प्रचीती पण येत असे
जावेने भांडे पालथे घातले ..तिच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वहात होत्या
जेवण तयार होते पण घरचे कोणीच जेवायच्या मुड मध्ये नव्हते
पुरुष बैठकीवर बसुन आणि बायका स्वयपाक घराच्या आतून फक्त खिडकीत ठेवलेल्या पालथ्या भांडया कडे पाहत होत्या
अखेर रात्र पडली ..घरचे सर्व कंदील बंद केले
एक कंदील फक्त खिडकी तील भांडया जवळ ठेवला होता
रात्री दोन घास चिवडून सगळी अंथरूणा वर पडली
झोप येणे केवळ अशक्य होते ..
केवळ रात्र संपली म्हणून सकाळ झाली म्हणायची
आणि मग सकाळी नदीत दिराचे प्रेत सापडले ..
हत्या का आत्महत्या हे तर काहीच समजले नाही
सगळे घरच शोकसागरात बुडून गेले
त्यांचे प्रेत आणुन खिडकी जवळ ठेवले होते
काल संध्याकाळी खिडकीत ठेवलेले भांडे आता अगदी केविलवाणे वाटत होते ..
अजूनही खिडकी आणि ते भांड हे दृश्य माझ्या मनातून जात नाही .....
नंतर एका वर्षी दुर्धर आजार पणा मुळे वडिलाना दवाखान्यात ठेवावे लागले
तब्येत खुप खालावली असल्यामुळे ते आय सी यु मध्ये दाखल होते
पूर्णतः डॉक्टराच्या निगराणी खाली असल्याने त्याना भेटण्याची कोणालाच परवानगी नव्हती
मग आय सी यु च्या खिडकीतून त्याना पहावे लागे ..
अत्यंत उत्साही आणि आनंदी असलेया वडिलाची ती अवस्था बघवत नसे ..
आणि मग त्यांचा मृत्यू पण आय सी यु च्या त्या खिडकीतूनच पहावा लागला !
एके वर्षी इंदूरला वाहिनीच्या माहेरी काही कार्यक्रमासाठी गेले होते
तेव्हा मला राहायला दिलेल्या मोठ्या वाड्यातली भली मोठी सर्व सोयीनी युक्त असलेली खोली “पंचकोनी “होती
त्या खोलीला प्रत्येक बाजूला एक अशा पाच खिडक्या होत्या ...
पाची खिडक्यातून वेगवेगळ्या रस्त्यावरचा “नजारा “दिसत होता ..
मी तर अगदी वेडी झाले ती खोली पाहून ..
तीन चार दिवसांनी त्या खोलीचा “निरोप “घेताना अगदी जीवावर आले होते मात्र ,,
हिंदी चित्र गीतातातून पण खिडकी विषय खुप रसिकतेने हाताळला आहे
शाम ढले खिडकी तले तुम सिटी बजाना छोड दो
घडी घडी खिडकी मी खडी तुम तीर चलाना छोड दो ..
हे भगवान गीता बाली च गाण असो
किंवा ..ये खिडकी जो बंद रेहेती ही हे गाणे असो ....

देव आनंद च्या सिनेमात फुलोन्के रंगसे गाण्यामध्ये
डेन्मार्क दाखवले आहे तेव्हा तो आल्या वर तिथे असलेल्या बिडिंग मधल्या प्रत्येक खोलीची खिडकी उघडते “
आणि त्या खिडकीतून सुंदर सुंदर मुली त्याला हात करतात
इतक भारी वाटत ते पाहताना की बस ..!!!
आणखी एका चित्रपटात परगावी गेलेल्या नायिकेला शोधण्या साठी नायक एक दिवस भर अख्ख गाव पालथ घालतो
पण नायिकेचा ठाव ठिकाणा लागत नाही
आणि अगदी शेवटच्या प्रसंगात समोरच्या घराची एक खिडकी उघडते आणि त्याला नायिकेचे “दर्शन “
होते ..मग काय आनंदी आनंद बस !!!

हिंदी चित्रपटात रेल्वे च्या खिडकीतुन नायक नायिका निरोप घेतात
मग अचानक रेल्वे वेग पकडते आणि दोघांचा हात कायमचा हातून सुटतो
हे नेहेमीचेच दृश्य ..
आणि तो वेश्यांचा मुहल्ला ..नायक तिथे अपघाताने गेलेला
पळवून नेलेल्या नायिकेला शोधायला .
त्या खिडक्या खिडक्यातून नटलेल्या अनेक जणी नायकाला खुणा करीत असतात
आणि मग एका खिडकीत रडवेल्या उदास चेहऱ्याची नायिका दिसते
मग पुढे नेहेमीचेच ..हाणा मारी तिची सुटका वगैरे ..
खिडकी .....एक महत्वाचा घटक आहे चित्रपटाचा ..!
मन हे पण एक “खिडकी “ आहे शरीराची असे मानले जाते ..
आणि डोळे ही एक” खिडकी “आजुबाजू चे पाहुन मनात सर्व साठवून ठेवायची
ढग ही पण एक खिडकी आहे ज्यातून परमेश्वर आपल्यावर “नजर “ठेवत असतो ..
अशी पण एक कल्पना !!!
अशी ही खिडकी अगदी लहान पणा पासून सतत सोबत राहणारी !!!