प्रबोधन

“प्रबोधन ..

सकाळी फिरायला जाताना भेटणारे एक मित्र अचानक काल म्हणाले

माझे एक काम कराल का ..?

काय बरे असे काम की जे फक्त मी करू शकते ..?

जरा समाजाचे प्रबोधन करा ना ..तुम्ही चांगले लिहिता

मग लेखणीतील ताकद दाखवा ना तुमच्या ..!!

मनात विचार आला खरेच असते ताकद लेखणीत ..

पण आहे का गरज या प्रबोधनाची समाजाला ?

सध्या तर सारा समाज सुशिक्षित झाला आहे

घरोघरीच्या मुली बाळी पण घरातून बाहेर पडुन शिकत आहेत

खेडोपाडी फक्त शिक्षण च नव्हे तर मोबाईल.. वाटस अप …आणी फेसबुक सारखा मिडिया पण पोचला आहे

मग का बरे समाज “खरोखर शिक्षित “होत नाहीये ?

सर्व प्रथम एक गोष्ट सध्या खुप जोराने फोफावत आहे

तीला खरोखर विषवल्ली म्हणले तरी चालेलं .

ती म्हणजे पैसे मिळवायचा हव्यास .!!

.समाजात सगळीकडे येईल त्या मागाने पैसा “हडप “करणे हीच वृत्ती दिसतेय

पैसा जरूर आहे ..

प्रथम तो जगण्या साठी मिळवला जातो

नंतर काही सुख सोयी आराम हे प्राप्त करण्या साठी तो थोडा जास्त मिळवावा असे वाट्ते

पण जास्त .म्हणजे कीती जास्त हो ..??

काय आहे प्रमाण त्याचे आणी कोण ठरवणार ते ?

हा पैसा मिळवण्याच्या नादात तो कोणत्या मार्गाने येतोय हे पण आपण विसरतोय की काय ?

पुर्वी असे म्हणत वाम मार्गाने मिळवलेला पैसा अंगाला लागत नाही

पैसा इतकाच मिळवावा की ज्यामुळे आपली सुखाची झोप बरबाद होणार नाही

कारण वाम मार्गाने आलेल्या पैश्या मुळे मनाला टोचणी लागते आणी साहजिकच झोप उडते !!

पण आजकाल पैसा मिळवायचा वेग आणी मार्ग पाहता हे विधान कालबाह्य ठरते की काय असे वाटते

वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे उच्च पदस्थ भला भक्कम पगार अनेक सोयी सुविधा असुन पण

या हव्यासा पायी तुरुंगाची हवा खायला जाऊ लागलेत

काय म्हणावे या गोष्टीला ??..माणसाची बुद्धी पण आता भ्रष्ट झाली आहे की काय ?

तुकाराम महाराज म्हणुन गेलेत “जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी “

धर्मात पण चांगल्या मार्गाने पैसा मिळवावा असे सांगितले आहे भले ही तो कमी मिळाला तरी चालेल

देवाला स्मरणारा .. माणुस वाम मार्गाचा पैसा घेणारच नाही

मग आपण आजच्या जगात देव धर्म संत महंत साऱ्यांना गुंडाळून ठेवले आहे की काय ?

बादशहा औरंगजेबा ची अशी गोष्ट सांगतात की भले ही तो इतका मोठ्या साम्राज्याचा राजा होता

पण या संपत्तीतील पैसा न वापरता तो आपल्या जगण्या साठी टोप्या शिवून पैसे मिळवत असे

नवल वाटले ना हे ऐकून ..पण सत्य आहे हे ..

ट्रक चालवणारे सरदारजी असतात त्यांची एक गोष्ट खुप नवल वाटण्या सारखी असते

ती म्हणजे दर सहा महिन्याला येवून ते बँकेत व्याज कीती झालेय पाहतात

व तेवढीच रक्कम काढुन दान धर्मात खर्च करतात

व्याजा पायी मिळालेला पैसा हा आपला नव्हे म्हणुन तो वाटून टाकायचा ही फिलोसोफी असते

आपल्याला मिळालेला काही भाग दान धर्मात खर्च करणारे पण बरेच आहेत

कारण आपण जिथे राहतो त्या समाजाचे पण आपण काही “देणे “लागतो

ते या ना त्या रुपाने फेडावे लागतेच ..!!!

मला आठवतेय खुप वर्षापूर्वी वडील सुपरीडेंट असताना

एकदा एका कंत्राट दाराने त्यांना चेक काढल्या बद्दल शंभर रुपये त्यांच्या अपरोक्ष दिले होते

वडील कधीच कोणाकडून काम बद्दल काही घेत नसत

म्हणुन त्या कंत्राटदाराने हे पैसे त्यांच्या क्लार्क कडे ठेवले होते

त्या दिवशी वडील खुप अस्वस्थ होते .

दुसऱ्या दिवशी ऑफिस मध्ये बोलावून त्यांनी सर्वा समक्ष हे पैसे परत केले

आणी मी अशी कोणतीच लाच कधी स्वीकारत नाही असे बजावले ..

तेव्हा कुठे त्यांना बरे वाटले...! माझे पती डॉक्टर आहेत लग्न झाल्यावर त्यांनीच मला विचारले होते मी कोणत्या मार्गाने व्यवसाय केलेला तुला आवडेल ?मला हा प्रश्न प्रथम समजला नाही मग ते म्हणाले आता पर्यत मी साधा सचोटीचा व्यवसाय केला आहे पण या व्यवसायात पैसा फारसा मिळत नाही लग्ना नंतर तुझी पण काही स्वप्ने असतील ना ती मला पुरी करायला लागतील मग मला त्यांच्या बोलण्याचा रोख समजला ..!आणि मग मी त्याना स्पष्ट सांगितले भलेही पैसा कमी मिळाला तरी चालेल पण वाम मार्गाने एक कवडी पण नको आपल्या घरात माझी कोणतीही स्वप्ने नाहीत आणि असतील तर ती फक्त सध्या सरळ आयुष्याची आहेत कोणत्याही आर्थिक अडचणीत राहायची माझी तयारी आहे “हे ऐकून त्याना हि समाधान वाटले ..यानंतर आमच्या घरी येणारी प्रत्येक वस्तु थोडी उशिराच आली ..पण रात्रीची “झोप “मात्र बिनदिक्कत आणि गाढ लागत होती ..शिवाय आज इतक्या वर्षा नंतर पण माझ्या पती विषयी लोकात माघारी सुद्धा चांगले बोलले जाते आणखी काय बर मिळवायचे असते ..?

आपण वाम मार्गाने केलेल्या गोष्टीचे परिणाम आपल्याला भोगावे लागतात

शिवाय आपल्या नंतर तिसऱ्या पिढी पर्यंत त्याचे प्रायश्चित्त घ्यावे लागते

इतके हे परिणाम दुरगामी असतात असे म्हणतात..!!!

हे आहेत पैसे मिळवणे ते खर्च करणे या विषयीचे साधे निकष

खरोखर प्रत्येकाने आता स्वत मना पासून विचार करण्याची वेळ आलीय

आपण जगतो कशासाठी? .फक्त पैसे मिळवण्या साठी का ?

आणी हा जो पैसा मिळतोय तो आपण नक्की कशा साठी मिळवतोय कसा मिळवतोय आणी कोणत्या मार्गाने मिळवतोय ?,..आणी तो खर्च करताना कसा खर्च करतोय ?

आणखी एक मनाला सतावणारा प्रश्न हा ड्रायविंग बद्दल आहे

सध्या सगळीकडे पाहण्यात येते गाड्या अतिवेगात चालवणे हे एक व्यसन होवु लागलेले आहे

मोटर सायकल असो वा कार वा बस ..वेग मर्यादा ओलांडून मारणे यात कोणता पराक्रम आहे ??

मी राहते त्या हमरस्त्यावर मी आले की शब्दशः चार पावले पण जीव मुठीत घेऊन चालावे लागते

कोणते वाहन कसे आणी कोणत्या स्पीड ने येईल सांगता येत नाही !

वाहन चालकाला कसलीच काळजी नसते पण आपल्याला आपल्या जीवाची असते ना .!!!

तुझी मोटर सायकल वेगवान का माझी तुझी गाडी मोठी का माझी हा” इगो “ झाला आहे

मला सर्वात जास्त भीती वाटते ती स्कूल बसेसची .

अनेक चिमुकल्यांना घेऊन ही बस जात असते

त्याचा वेग इतका तुफान असतो की बस .

अशा वेळेला या चिमुकल्यांच्या जीवाची खुप काळजी वाटते

आई वडिलांनी मोठ्या विश्वासाने त्यांच्या काळजाचे तुकडे बस मधून पाठवलेले असतात

आपण कीती जीवांची जोखीम घेऊन जात आहोत ..त्यांची सुरक्षा काय आहे ?

ड्रायवर असणाऱ्या या लोकांना इतके पण समजत नसेल का ..?

की ते सारे संवेदना शून्य झाले आहेत

एका मोटर सायकल वरून चार पाच जण स्वार होवून जाणे हे तर आपल्या डोळ्यांना सध्या नित्याचे झाले आहे

काय गरज आहे इतक्या जणांनी एकत्र जायची ?

वाहतुकीच्या सर्व नियमांची आपण यात पायमल्ली करीत असतो

हे नसेल का लक्षात येत त्यांच्या ..?

वाहतूक पोलिसा समोरून पण हे लोक बिनधास्त जात असतात

आणी पोलीस पण “लक्षपूर्वक “..दुर्लक्ष करीत असतात

लायसेन ही गोष्ट अठरा वर्ष पुरी झाल्या वरच मिळते

चार चाकी असो वा दोन चाकी गाडी चालवायचे एक तंत्र असते

ते एखाद्या लहान मुलाला पण समजू शकते ..इतके ते सोपे असू शकते ..

पण जोपर्यंत तुम्ही अठरा वर्षाचे होत नाही तोवर तुम्हाला वाहन चालवायची समज येणार नाही

असे गृहीत आहे आणी त्यानुसार हे लायसेन दिले जाते

प्रथम लर्निंग आणी नंतर पक्के ..लायसेन ..असा त्याचा प्रवास असतो

पण प्रत्यक्षात चित्र वेगळेच दिसत असते ..!

अगदी तेरा चौदा वर्षाची मुले पण सर्रास स्कुटर, मोटर सायकल घेऊन जातात

आणी आई वडिलांना त्याचे कौतुक वाट्ते ..!

किंबहुना आपले वहान आपला लहान मुलगा पण कसे भन्नाट चालवतो याची प्रौढी मिरवली जाते !!

या आई वडिलांना आपल्या मुलाच्या जीवाची काळजी नाही वाटत का ?

आमच्या एका मित्राचा मुलगा शाळेत रोज स्कुटर घेऊन जातो

क्लास ला जाताना मोटर सायकल ..व रविवारी एकटाच चार चाकीचा मोठ्या रस्त्यावर जावून सराव करतो

आम्हाला त्याची काळजी म्हणुन काही बोलावे ...तर ते त्यांना आवडत नाही

सुशिक्षित आणी मुलांना शिक्षित करणारा हा वर्ग .,..या बाबतीत मात्र “अडाणी “..असावा ना !!!

धुम्रपान.. गुटखा अथवा दारू चे व्यसन हा तर कित्येक वर्षा पासून असलेला प्रश्न आहे

त्या विषयी लिहायला घेतले तर प्रबंध सुद्धा होईल .. !!!

अगदी पुराण काळा पासून संत महंत अथवा थोर लोक सांगत आलेत व्यसन करू नका

पण इथे समाजात पाहिले तर काहीच फरक नाही ..

अगदी दहा वर्षाच्या मुला पासून इथे पान टपरी वर गुटखा फोडला जातो

पान तंबाखू तर दिवसातून कीती वेळा खाल्ली जाते याला मोजमापच नाही !!

कॉलेजच्या अथवा शाळेच्या समोर असलेली पानाची दुकाने ओसंडून वाहत असतात

देशी असो... अथवा विदेशी दारूची दुकाने कायम गर्दीने फुल असतात

दारूचे अथवा तंबाखूचे दुष्परिणाम आपल्याला माहीत असतात

शाळा कॉलेज.... पासून चित्रपट नेट पर्यंत यावर प्रबोधन पण झालेले असते !

मग का नाही सोडत लोक व्यसन इथे ?

सिगारेट च्या पाकिटावर चित्रपट गृहात मोठ मोठ्या फलका वर पण जाहिरात असते ..

“धुम्रपान करना सेहत के लिये हानिकारक है “

त्यानंतर होणाऱ्या वेगवेळ्या प्रकारच्या क्यांसर चे पण आपण फोटो अथवा भयानक वर्णने वाचत असतो

त्यानंतर असा क्यांसर व्हायची पाळी वैऱ्या वर पण येऊ नये असेही म्हणतो

मग का नाही करत कोणी स्वता बद्दल असा विचार ?

आपण आणी आपल्या संवेदना इतक्या बोथट झाल्या आहेत का ?

आपले भले बुरे कशात आहे कोण आपल्याला काय आणी का सांगत आहे

याचा विचार पण करायची आपली मानसिकता नाही का ?

अनेक प्रश्न पडतात या गोष्टी विषयी ज्याची उत्तर मिळत नाहीत

आमच्या मित्रांना मी हेच म्हणले की मी प्रबोधन पर लिहून काही फरक होणार आहे का

पण ते म्हणाले तुम्ही लिहायचे काम करा ..

निदान आपण काही तरी लिहिले हे तरी समाधान मिळेल

त्यांच्या विनंतीला “मान देऊन. च हा लेख प्रपंच !!!!

***