Aayushy Jagnyachi kala books and stories free download online pdf in Marathi

आयुष्य जगण्याची कला- सकारात्मकता..

आयुष्य जगण्याची कला- सकारात्मकता..

आयुष्यात बरीच स्वप्न घेऊन प्रत्येक माणूस जगत असतो. सगळ्यांचीच सगळीच स्वप्न पूर्ण होतात अश्यातला भाग नाही. पण काही लोकं स्वप्न पाहतात आणि स्वप्न पूर्तीसाठी कष्ट तर करतात पण अपयश किंवा नकारात्मक गोष्टींना आयुष्यात थारा देत नाहीत. आपल्या आयुष्यात नकारात्मकतेला "नो" म्हणून आयुष्य आनंदानी जगात राहाण हीच आहे सकारात्मक विचार करणाऱ्या लोकांची ओळख!! सकारात्मक लोकांना आयुष्य जगण्याची कला अवगत असते.

सकारात्मक विचार म्हणजे कोणत्याही परिस्थितीला हार न मानणे. कधी काही प्रश्न किंवा अपयश समोर उभ ठाकले तरी त्याचा खंबीरपणे सामना कारण नेहमीच गरजेच असत. आणि ही सवय अंगवळणी पाडून आयुष्य सकारात्मक करणं अजिबात अवघड नाही.

कोणत्या पद्धतीनी आपण आपल्या आयुष्यात सकारात्मकता आणू शकतो-

१. आयुष्यातल्या नकारात्मकतेला सकारत्मक पद्धतीनी सामोरे जा-

माणूस म्हणाला की अपयश हे येणारच. 'अपयश हे यशाची पहिली पायरी असते' पण जी लोकं आयुष्याकडे सकारात्मक पद्धतीने पाहतात त्यांनाच हे कळतं. अपयश हा आयुष्याचा एक भाग म्हणून जी लोकं अपयशाला भिडतात आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी मार्ग शोधतात ते आयुष्याच्या प्रवासात कधीच अपयशी होत नाहीत.

२. वेळ वाया का घालवायचा? ही सकारात्मक शैलीची गुरुकिल्ली-

हल्ली बऱ्याच वेळा आपला महत्वाचा वेळ वाया घालवत असतो. कधी कोणत्यातरी गोष्टीच दुःख गोंजारत किंवा ज्यांची गरज नाही अश्या गोष्टीत वाया घालवत असतो. पण जर आयुष्य यशस्वी बनवायचे असेल तर झालेल्या प्रत्येक गोष्टीतून काही शिकून तो वेळ वाया न घालवता सत्कारणी लावण गरजेच असत. प्रत्येकवेळी काही मोठाच केल पाहिजे अस नसत. कधी छोट्या गोष्टीतून सुद्धा आपण आपल आयुष्य अधिकाधिक खुलवू शकतो. शेवटी आयुष्य आपल्याला जगायचं असत आणि ते अधिकाधिक सुंदर करण आपल्याच हातात असत.

३. बदलाची वाट का पहायची? आपणच बदल घडवायचा-

आयुष्य आपोआप बदलेल, ज्या गोष्टी सुरळीत होत नाहीयेत त्या आपोआप सुरळीत होतील असा विचार करून हातात काहीही येत नाही. त्यापेक्षा जर आपणच स्वतःला बदलून आजूबाजूची परिस्थिती बदलायचा प्रयत्न केला तर त्याचे खूप चांगले परिणाम आपल्याला दिसून येतल. सकारात्मकता म्हणजे हेच असत. रडत बसण्यापेक्षा त्यातून बाहेर पडण्याचे मार्ग शोधायचा प्रयत्न जरी केला तर १० दारं उघडतात. आणि नवीन मार्ग मिळतोच!! त्यामुळे काहीतरी बदल नक्कीच होणार. काहीतरी जादू होईल मग आपल आयुष्य बदलेल असा विचार करण्यापेक्षा स्वतः त्यासाठी प्रयत्न केले तर नक्कीच वेगवेगळे पर्याय खुले होतील.

४. "लेट गो" आयुष्यात खूप महत्वाचा-

आपल्या आयुष्यात बऱ्याच वेळा नको असलेल्या गोष्टी होत असतात. आयुष्य क़्वचितच आपल्या मनाप्रमाणे चालत असत. एखदी नकारात्मक गोष्ट घडली की त्याचा परिणाम बरच दिवस मनावर राहतो. आयुष्य जणू काही स्तब्ध होत पण आयुष्य तर थांबवून द्यायचं नसत. मग अश्या परिस्थितीत आहे त्या गोष्टीच स्वीकार करून फक्त "लेट गो" केल तर भूतकाळातून आपण मुक्त होऊ शकू आणि आपला आज पूर्णपणे जगू सुद्धा शकू. शेवटी आयुष्य जगण हे महत्वाच असत.

५. आंनद आजूबाजूला आहे- तो पाहणं गरजेच-

नकारात्मक गोष्टी आपली एनर्जी आणि शक्ती वाया घालवतात. आंनद हरवून जातो. पण आपली एनर्जी वाया जाऊन द्यायची नसेल, आंनदी मूड परत आणायचं असेल तर आपल्या आजूबाजूला असलेला आनंद पाहणं गरजेच असत. आंनद अगदी छोट्या छोट्या गोष्टींमधून मिळत असतो तो आनंद आपल्याला वेचता आला पाहिजे हे महत्वाच असत.

६. आपल्या चुकांची जबाबदारी आपलीच असते-

कधी कधी आयुष्यात आपल्याकडून चुका होतात. बऱ्याच वेळा त्या चुकांचं खापर दुसऱ्या कोणावर तरी फोडायची आपली सवय असते. पण ही सवय अतिशय चुकीची आहे. त्यामुळे नकारात्मकता वाढू शकते. अबी झालेल्या चुका परत परत घडू शकतात.

७. प्रश्नांना किंवा चुकीला उत्तर शोधण गरजेच-

आयुष्यातला चुका सुधारायच्या असतील, काही प्रश्न अनुत्तरीत असतील तर वेळच्या वेळी त्यावर विचार करून उत्तर शोधून काढने आपल्या हातात असते. त्यामुळे परिस्थितीला घाबरून काहीच न करता बसून राहाण्यापेक्षा त्यावर उपाय शोधले की आत्मविश्वास वाढीस लागतो आणि त्याचा सकारात्मक परिणाम आयुष्यावर होतांना दिसून येतो.

छोट्या छोट्या गोष्टी आयुष्यात सकारात्मकता आणायला पुरेश्या असतात. आयुष्य आनंदी आणि सकारात्मक बनवण्यासाठी प्रत्येक वेळी काहीतरी मोठीच घटना घडावी लागते हा समाज चुकीचा आहे. आयुष्य काय प्रकारे जगायचं हे सर्वस्वी आपल्याच हातात असत. त्याचबरोबर, कोणीही येऊन आपल आयुष्य खराब करू शकत नाही किंवा आपल्या आयुष्यात नकारात्मकता आणू शकत नाही हे मनाला वारंवार सांगण खूप गरजेच असत. छोट्या छोट्या गोष्टींनी आयुष्य सकारात्मक बनू शकते आणि आपल्याला त्याचाच शोध घेण गरजेच असत. शेवटी आयुष्य आपल्याला जगायचं असत. दुसर कोणी येऊन आपल आयुष्य जगू शकत नाही. आयुष्य कस जगायचं हे आपणच ठरवायचं असत. दुसरं कोणी काही सांगो, जे मनाला पटेल तेच केल तर आयुष्यात आनंद भरून जाईल. दुसर कोणी येऊन आपल आयुष्य जगू शकत नाही. त्यामुळे आपल्या आयुष्याची दोरी आपल्याच हातात ठेवण गरजेच आहे आणि आयुष्य सकारात्मकतेनी जगता नक्की येईल.

अनुजा कुलकर्णी.