Khara Mitra - 6 books and stories free download online pdf in Marathi

खरा मित्र - 6

खरा मित्र

पांडुरंग सदाशिव साने

खरा मित्र

एक होता राजा. त्या राजाचा एक प्रधान होता. राजाला एक मुलगा होता व प्रधानाला एक होता. राजपुत्र व प्रधानपुत्र मोठे मित्र होते लहानपणापासून ते एकत्र वाढले. एकत्र खेळले. त्यांचे एकमेकांवर फार प्रेम होते. प्रधानाच्या मुलाचे लग्न झाले होते. राजपुत्राचे अद्याप लग्न झाले नव्हते. राजा एके दिवशी त्या दोघांना म्हणाला. 'तुम्ही दोघे जा, जगभर हिंडा व राजपुत्राला अनुरूप वधू शोधून काढा.’प्रधानपुत्र म्हणाला ‘हो आम्ही सर्व जागाची मुशाफिरी करतो.’

ते दोघे मित्र निघाले. दोघांनी दोन घोडे घेतले होते. घोडे देखणे असून चपळ होते. वार्‍या प्रमाणे त्या घोडयांचा वेग होता. घोडयावर बसून दोघे जात होते. नद्यानाले, रानेवने, दरीखोरी, हिंडत ते चालले. कधी शहरे बघत तर कधी तपोवने बघत. कधी राजवाडे बघत तर कधी आश्रम. असे करीतकरीत ते खूप दूर गेले; परंतु राजपुत्राला योग्य अशी मुलगी त्यांना दिसली नाही. एके दिवशी ते फार थकले होते. एका विस्तृत व विशाल तळयाच्या काठी त्यांनी मुक्काम केला. तळयाचे पाणी निर्मळ व रूचकर होते.

संध्याकाळ झाली होती. सूर्याचे शेवटचे किरणही गेले. आकाशात लाल रंग पसरला होता व त्याचे प्रतिबिंब पाण्यात पडले होते. फार सुंदर शोभा दिसत होती. त्यांनी घोडयांना पाणी पाजले; त्यांना चारा घातला व झाडाशी बांधून ठेवले. दोघे मित्र घाटावर बसले होते. त्यांनी संध्या केली. नंतर त्यांनी फराळ केला. सुंदर गाणी म्हणत ते बसले होते. शेवटी दोघेजण झोपले.

इतक्यात एक प्रचंड आवाज आला. तळयाच्या पाण्यातून तो आवाज येत होता. पाण्यावर कोणी काही तरी आपटीत असावे तसा तो आवाज होता. घोडे खिंकाळू लागले. त्या आवाजाने ते दोघे मित्र जागे झाले. पाहातात तो एक प्रचंड सर्प त्या तळयातून बाहेर येत होता. तो आपली फणा दाणदाण त्या पाण्यावर आपटीत होता. राजपुत्र व प्रधानपुत्र घाबरले. तो प्रचंड सर्प तळयातून बाहेर आला. त्या सर्पाच्या फणेवर मणी होता. तो मणी त्याने खाली टाकला. त्या मण्याचा प्रकाश सर्वत्र पडला होता. त्या प्रकाशात सर्प आपले भक्ष्य शोधू लागला. प्रधानपुत्र व राजपुत्र भीतीने झाडावर चढले. त्या सर्पाची दृष्टी त्या घोडयांकडे वळली. सर्पाने ते दोन्ही घोडे खाऊन टाकले. झाडावर बसलेल्या त्या दोघा कुमारांना भीती वाटली. झाडावर चढून साप आपणास गिळंकृत करतो की काय असे त्यांस वाटले. परंतु साप अन्यत्र फणफणत गेला. इतक्यात प्रधानपुत्राला एक युक्ती सुचली. सापाच्या मण्यावर घोडयाची लीद टाकली तर त्या मण्याचे तेज नाहीसे होते, असे त्याने ऐकले होते. झाडाच्या खाली घोडयांची लीद पडलेली होती. प्रधानपुत्र धीरे-धीरे खाली उतरला व त्याने तेथील लीद घेऊन त्या मण्यावर टाकली. लगेच आजूबाजूला अंधार पडला. प्रधानपुत्र पटकन् झाडावर चढला. तो सर्प रागारागाने फणा आपटीत होता. हळुहळू तो आवाज येतनासा झाला. सर्प तळयात गेला असावा असे त्या दोघा मित्रांस वाटले.

सकाळ झाली. दिशा फाकल्या. ते दोघे मित्र खाली उतरले. खाली उतरल्यावर थोडया अंतरावर तो प्रचंड सर्प मरून पडला आहे. असे त्यांना आढळून आले. त्यांना फार आनंद झाला. दोन उमदे घोडे मरण पावल्याबद्दल त्यांना फार वाईट वाटले. प्रधानपुत्र त्या मण्याजवळ गेला. त्याने तो मणी तळयावर धुण्यासाठी नेला. तो काय आश्चर्य! हातात मणी घेऊन पाण्यात उतरताच पाण्यातील सर्व दिसू लागले. त्या तळयाच्या तळाशी त्यांना सुंदर बाग दिसली. मोठमोठे बंगले दिसले. त्या दोघांनी पाण्यात बुडी घेण्याचे ठरवले. परस्परांनी परस्परांचे हात धरले व हातात तो मणी धरला. त्यांना पाण्यात कसलीच अडचण झाली नाही. ते दोघे एकदम पाण्याच्या तळाशी आले. तेथे सुंदर बगीचा होता. फुलझाडे होती. फळझाडे होती. त्यांनी फळे खाल्ली, फुले तोडून वासासाठी घेतली. ते हिंडत हिंडत एका बंगल्याजवळ आले. तो एक सुंदर राजवाडा होता. ते त्या राजवाडयात शिरले. तेथे आत एक पलंगडीवर एक सुंदर मुलगी होती. ती दीन होती, केविलवाणी दिसत होती. ती त्या दोघा कुमारांना म्हणाली, 'तुम्ही येथे कशाला आलात? आता तुम्ही जिवंत दोघा कुमारांना म्हणाली, 'तुम्ही येथे कशाला आलात? आता तुम्ही जिवंत राहाणार नाहीत. तो दुष्ट सर्प तुम्हास मारील. त्याने माझ्या घरची सर्व माणसे मारली व मला अभागिनीला मात्र जिवंत ठेवले. तो रोज मला छळतो. धड जगू देत नाही, मरु देत नाही. तुम्ही परत जा. '

राजपुत्र म्हणाला,' तो सर्प तर वर मरुन पडला आहे. हा पाहा त्याच्या डोक्यावरचा मणी. 'तुम्हाला भय नको. आमच्याबरोबर चला. 'प्रधानाचा मुलगा म्हणाला, 'राजपुत्रासाठी या माझ्या मित्रासाठी योग्य अशी वधू पाहावयास आम्ही जात होतो. तुम्हीच योग्य दिसता. राजपुत्र तुम्हाला पसंत असेल, तर तुम्हा दोघांचा मी विवाह लावतो.'

ती दोघे लाजली. मुकेपणाने त्यांनी संमती दिली. प्रधानपुत्राने हार तयार केले. त्याने त्यांचा विवाह लावला. राजपुत्र म्हणाला, 'चला, आता घरी जाऊ. 'प्रधानपुत्र म्हणाला, 'आधी मी एकटाच घरी जातो. घराहून लवाजमा घेऊन येतो. हत्ती, घोडे, वाजंत्री घेऊन येतो. राजपुत्राने असे एकटे अनवाणी जाणे बरे नव्हे. ते शोभत नाही राजपुत्राला असे ते म्हणणे पटले. प्रधानपुत्राने जावे असे ठरले. दोघे मित्र हातात मणी घेऊन तळयाच्या बाहेर आले. एकमेकांस सोडताना त्यांना वाईट वाटले. प्रधानपुत्र म्हणाला, 'मी बरोबर एक महिन्याने येथे येईन. त्या दिवशी येथे तू वर ये. मी तुझी वाट पाहीन. तो दिवस विसरु नकोस.'

प्रधानपुत्र निरोप घेऊन गेला. राजपुत्र त्याच्याकडे बराच वेळ पाहात होता. तो दिसेनासा झाल्यावर राजपुत्र पुन्हा खाली गेला. तेथे दोघेजणे राहिली. फळे खावयास भरपूर होती. तेथे कसला तोटा नव्हता. दुपारी फलाहार झाला म्हणजे राजपुत्र थोडी वामकुक्षी करी. त्या मुलीच्या मनात आले की तो मणी हातात घेऊन आपण वर जावे. बाहेरचे जग पाहावे. किती तरी दिवसांत ती पाण्याच्या बाहेर गेली नव्हती. राजपुत्र झोपला होता. ती हळूच निघाली. तिने हातात मणी घेतला. एकदम ती पाण्याच्या वर आली. बाहेरचे आकाश, बाहेरची सृष्टी, पशुपक्षी, गाईगुरे सर्व पाहुन तिला आनंद वाटला. राजपुत्राची उठावयाची वेळ झाली असेल असे मनात येऊन ती पुन्हा खाली गेली. राजपुत्र जागा झाला नव्हता. आपण वर गेलो होतो हे राजपुत्राला कळू नये म्हणून ती जपत होती. राजपुत्र दुपारी झोपला म्हणजे ती वर येई व बाहेरची हवा खाई.

एके दिवशी नेहमीप्रमाणे ती पाण्याच्या वर येत होती, इतक्यात तेथे तिला पुरुषाची चाहूल लागली. जवळच्या राजाचा मुलगा तिथे शिकारीस आला होता. तो राजपुत्र दृष्टीस पडतासच ती मुलगी एकदम पाण्याखाली गेली. तो राजपुत्र तळयाच्या काळीवर येऊन उभा राहिला व सारखा बघत राहिला. पुन्हा ती मुलगी दिसावी म्हणून तो वाट पाहात होता. परंतु कोणी दिसले नाही. राजपुत्राच्या बरोबरचे शिपाई तेथे आले व म्हणाले, 'महाराज, आता घरी चलावे, राजेसाहेब वाट पाहात असतील. 'परंतु राजपुत्र काही बोलेना, जागचा हलेना. त्या शिपायांना काय करावे ते कळेना तो राजपुत्र म्हणाला, 'आता दिसली, नाहीशी झाली; त्याच्या म्हणण्याचा अर्थ त्या शिपायांस समजेना. कोणी म्हणाला, 'यांना पिशाच्चबाधा झाली. 'कोणी म्हणे, 'वेड लागले' कोणी म्हणाले, 'जलदेवतेचा कोप झाला. 'शिपायांनी राजपुत्राला उचलून घोडयावर घातले व त्याला घटट बांधले. शिपाई राजपुत्राला घेऊन राजवाडयात आले. शिपाई राजाला म्हणाले, 'महाराज, यांना कसली तरी बाधा झाली आहे. तळयाच्या काठी उभे होते व 'आता दिसली, नाहीशी झाली.' एवढेच हे सारखे म्हणतात. 'असे म्हणून शिपाई निघून गेले.

राजाला हा एक मुलगा होता व एक मुलगी होती. गादीचा मालक राजाच्या नंतर हाच होता. एकुलता एक मुलगा-आणि त्याला वेड लागले! राजा दु:खी झाला. गावोगावचे वैद्य आले, हकीम आले; परंतु उपाय चालेना. मांत्रिक आले, तांत्रिक आले; परंतु कशाने गुण पडेना. राजाने आपल्या राज्यात दवंडी दिली, 'जो कुणी माझा मुलगा बरा करील, त्याला माझे अर्धे राज्य व माझी मुलगी देईन. 'अनेकांनी प्रयत्न केले; परंतु कोणास यश येईना.

त्या गावात एक म्हतारी होती. ज्या वेळेस राजपुत्र त्या तळयाच्या काठी आला होता त्या वेळेस ती म्हातारी जवळच होती. ती वाळलेल्या काटक्याकुटक्या जळणासाठी गोळा करीत होती. राजपुत्राचे वेड तिला माहीत होते. ती पाण्यातून वर येणारी मुलगी हे त्या वेडाचे कारण होते. म्हातारीने ती मुलगी वर आलेली पूर्वीही पाहिली होती, तिच्या मनात आले की आपण ती मुलगी फसवून आणू व राज्याचे बक्षिस जिंकू.

ती म्हातारी राजाकडे आली. आधी तिची दाद लागेना; परंतु एकदाची दाद लागली. ती राजाला म्हणाली, 'राजा, तुझ्या मुलाचा रोग मी बरा करीन; परंतु जर तुझा मुलगा बरा झाला तर तुझी मुलगी माझ्या मुलास तू दिली पाहिजेस. अर्धे राज्य तर देशीलच. कबूल असेल तर सांग. 'राजा म्हणाला, 'मला मान्य आहे काही करा, परंतु मुलाला शुध्दीवर आणा. 'ती म्हातारी पुन्हा म्हणाली, 'त्या तळयाच्या काठी मला एक झोपडी बांधून दे. त्या तळयापासून पन्नास कदमांवर नेहमी दहा शिपाई लपलेले असावेत, मी टाळी वाजवताच त्यांनी धावून यावे. ही व्यवस्था झाली पाहीजे' राजा म्हणाला, 'तसा हुकूम आताच देतो. सर्व काही करतो, परंतु मुलगा बरा करा.' म्हातारीने सांगितले तशी सारी व्यवस्था झाली. त्या तळयाकाठच्या झोपडीत म्हातारी राहू लागली. एके दिवशी ती मुलगी पुन्हा पाण्यावर येऊन घाटावर बसली. इतक्यात म्हातारी तेथे आली. बाईमाणूसच आहे, असे पाहून ती मुलगी पाण्यात पळून गेली नाही. ती बाहेर आली. म्हातारी त्या मुलीजवळ आली. म्हातारी वात्सल्याने म्हणाली, 'ये मुली, तुझी वेणी घालते. केस विंचरते. उद्या येताना फुले घेऊन ये. त्यांचा गजरा तुझ्या केसांत घालीन. 'म्हातारी जणू आपली आई असे मुलीला वाटले. तिला आईची आठवण आली व तिच्या डोळयांतून पाणी आले. 'का ग मुली, का रडतेस? तुला काय दु:ख आहे, कोणता त्रास आहे?' म्हातारीने विचारले. मुलगी म्हणाली, 'त्रास आता नाही; परंतु आईची आठवण आली व डोळे भरुन आले. असो. मी आता जाते. उद्या येईन.' असे म्हणून मुलगी खाली गेली.

मुलीचा विश्वास म्हातारीने चांगलाच संपादन केला. मुलगी रोज येई व म्हातारीजवळ बसे. एक दिवस ती लबाड म्हातारी तिला म्हणाली, 'मुली, तुला किती दिवस विचारीन विचारीन म्हणत होत्ये, परंतु रोज विसरच पडतो. आज बरी आठवण झाली. तू पाण्यातून वर कशी येतेस? ओली कशी होत नाहीस? खाली कशी जातेस? जणू जिना चढून येतेस, जिना उतरुन जातेस. काय युक्ती आहे?' ती भोळी मुलगी म्हणाली, 'हा माझ्याजवळ मणी आहे. हा हातात असला म्हणजे सारे शक्य होते. 'म्हातारी मुलगी, 'पाहू दे तरी. चमत्कारच आहे. एवढे का या मण्याचे सामर्थ्य? जे जे ऐकावे ते ते थोडेच बाई. 'असे म्हणून म्हातारीने तो मणी आपल्या हातात घेतला व आपल्या निर्‍यांत लपविला. म्हातारीने मोठयाने टाळी वाजविली; तत्क्षणी ते दहा शिपाई यमदूतांप्रमाणे धावत आले. म्हातारी म्हणाली, 'पकडा हिला; घाला घोडयावर व राजाकडे घेऊन चला'

त्या शिपायांनी मुलीला घोडयावर बांधले. तिच्या ओरडण्याकडे कोणाचेही लक्ष नव्हते. पाठोपाठ म्हातारीही आली. राजवाडयासमोर ही गर्दी. राजपुत्राच्या नजरेस ती मुलगी पडताच 'हो, हीच होती. हीच दिसली. पाण्यावर दिसली व नाहीशी झाली. तू आता माझी हो. बाबा, हिच्याबरोबर माझे लग्न लावा. 'ती मुलगी म्हणाली, 'माझे लग्न लागलेले आहे. असा अन्याय कसा करता? मी परस्त्री आहे. हे पाप करु नका. निदान सहा महिने तरी वाट पाहा. सहा महिन्यांत माझा पती आला नाही तर मग पाहू. 'राजपुत्राला तेवढीच आशा वाटली. सहा महिने हा हा म्हणता जातील असे त्याला वाटले. राजपुत्राचे वेड गेले. म्हातारीने पेज जिंकली.

त्या म्हातारीचा मुलगा वेडगळ होता. त्याला बोलता येत नसे. दोनच शब्द तो बोलत असे. त्याला 'होय' म्हणावयाचे असे, तेव्हा तो 'बम्, बम्, बम् असे म्हणे त्याला नाही' म्हणावयाचे असे, तेव्हा 'धूप्' धूप्' धूप् असे म्हणे. तो कपडा अंगावर घालीत नसे. तो झाडांचे टाळे जमवी व ते कमरेभोवती बांधी. अंगाला भस्म चोपडी. फक्त एक लंगोटी नेसत असे. असे ते वेडबंबूचे ध्यान होते. तो बहुधा घरी कधी नसे. सठी सहामासी एखादे वेळेस येई. म्हातारी रोज मुलाची वाट पाहात होती. माझा वेडगळ मुलगा राजाचा जावई होणार असे ती ऐटीने सर्वास सांगत होती, परंतु मुलगा घरी येईना.

इकडे राजपुत्र पाण्यात अडकला. ती मुलगी नाही व तो मणीही नाही. आपली पत्‍नी आपणास फसवून कशी गेली? कोणी हे कपट केले? कोणी दुष्टावा केला? प्रधानाच्या मुलाचे तर काही नसेल यात अंग? नाना संशय तो घेऊ लागला. पाण्यात तो तडफडत होता. तेथली फळे त्याला रुचत ना, फुले आवडत ना. तो अशक्त व फिकट दिसू लागला.

ठरलेल्या दिवशी प्रधानाचा मुलगा मोठा लवाजमा घेऊन आला. श्रृंगारलेले हत्ती, श्रृंगारलेले घोडे घेऊन तो आला. चौघडा वाजत होता. वाजंत्री वाजत होती. बार उडत होते, अब्दागीर फडकत होता. प्रधानाचा मुलगा तळयाच्या घाटावर वाट पाहात होता; परंतु सायंकाळ होत आली, तरी कोणी वर आले नाही. सर्वांना काळजी वाटू लागली. एक दिवस गेला. दुसरा दिवस गेला; परंतु राजपुत्र वर येईना. चार दिवस झाले. तरी काही नाही. किती दिवस असे पडून राहावयाचे? जवळचे खाणेपिणे संपले. राजाही घरी काळजी करीत असेल. सारी परिस्थिती लक्षात घेऊन प्रधानचा मुलगा सर्वांस म्हणाला, 'तुम्ही घरी जा. राजपुत्र मला भेटेल, तेव्हाच मी घरी येईन. हे तोंड एरवी दाखवणार नाही. 'सर्व मंडळी उत्साहाने आलेली, परंतु निराशेने माघारी गेली.

प्रधानाचा मुलगा विवंचनेत पडला. काय करावे, कोठे जावे, त्याला उमज पडेना. आजूबाजूची गावे हिंडू लागला. जेथे पाय नेतील तिकडे जात हातो. होता होता त्या राजाच्या राज्यात शिरला. त्या राज्यात जिकडे तिकडे आनंदी आनंद होता. तो लोकांना विचारी, 'एवढा उत्सव का?' लोक म्हणत, 'राजपुत्राचे वेड गेले. त्या तळयातील मुलगी त्याला मिळाली. चार दिवसांनी त्यांचे लग्न आहे. 'प्रधानाचा मुलगा चमकला. तो तडक राजधानीस आला. तेथे तो आणखी माहिती मिळवू लागला. त्या म्हातारीजवळ मणी आहे व तिने त्या मुलीस फसवून आणले वगैरे वार्ता त्याला मिळाली. तो लोकांना विचारी, 'त्या म्हातारीचा मुलगा दिसायला कसा आहे? तो कसा बोलतो? तो कसा चालतो?' लोक त्याला म्हणाले, 'तो नाकीडोळी तुमच्यासारखाच आहे तुमच्याच वयाचा, तुमच्याच उंचीचा. तो पाने कमरेभोवती गुंडाळतो. बम् बम् बम्, धूप् धूप् धूप् म्हणतो. 'लोकांनी सर्व माहिती दिली. प्रधानाच्या मुलाने धाडस करावयास ठरविले, त्या म्हातारीचा मुलगा होण्याचे ठरविले. तो गावाबाहेर गेला. त्याने सारे कपडे काढले. एक लंगोटी लावली. कमरेभोवती पाने बांधली. अंगाला भस्म फासले. 'बम् बम् बम्, धूप् धूप् धूप्' करीत तो गावात शिरला.

रात्र पडू लागली होती. तो प्रधानपुत्र त्या वेडगळ मुलाचे सोंग घेऊन म्हातारीच्या घरी आला. बम् बम् बम्, धूप् धूप् धूप् शब्द ऐकून म्हातारीस आनंद झाला. ती एकदम बाहेर आली. मुलाचा हात धरून त्याला तिने घरात आणले. आज मुलगा साळसूदपणे घरात आला हे पाहून तिला आश्चर्य वाटले. आपला मुलगा निवळला असे तिला वाटले. ती मुलाला प्रश्न विचारू लागली,

'बाळ, तुला लग्न करायचे का?'

'बम् बम् बम्.'

'बाळ, राजाची मुलगी तुला बायको हवी का?'

'बम् बम् बम्.'

'बाळ माझ्याजवळ मणी आहे तो तुला हवा का?'

'बम् बम् बम्. '

त्या वेषधारी प्रधानपुत्राने तो मणी घेतला व आपल्या कमरेत लपविला. म्हातारीला मुलाची उत्तरे ऐकून आनंद झाला. पुन्हा ती विचारू लागली, 'ती राजकन्या, तुझी भावी पत्‍नी तुला पहावयाची आहे का?' 'बम् बम् बम्. '

'मग राजवाडयात येतोस का?'

'बम् बम् बम्.'

मुलाची राजवाडयात येण्याची तयारी आहे असे पाहून म्हातारी हर्षली. ती म्हणाली, 'चल माझ्याबरोबर. तू राजाचा जावई होशील. तुला अर्धे राज्य मिळेल. आता वेडेपणा सोडशील ना?'

'बम् बम् बम्.'

म्हातारी त्या वेषधारी प्रधानपुत्राला घेऊन राजवाडयात आली. तिला राजवाडयात जाण्यायेण्यास नेहमी सदर परवानगी होती. तिला मोठा मान होता. ती राजवाडयात गेली व म्हणाली, 'माझा मुलगा आला आहे. त्याला राजकन्या पाहावयाची आहे. त्याचीच ती व्हावयाची आहे. त्याला बघू दे. 'राजकन्या बाहेर आली व खाली मान घालून उभी राहिली. म्हातारी मुलास म्हणाली, 'तुला आवडली ना? 'बम् बम् बम्' तो म्हणाला, म्हातारी पुन्हा म्हणाली, 'आता घरीचल' तो वेषधारी प्रधानपुत्र रागाने 'धूप् धूप् धूप्' म्हणाला.

'मग का येथे राहातोस?'

'बम् बम् बम्,'

'घरी येत नाहीस?'

'धूप् धूप् धूप्. '

शेवटी म्हातारी एकटीच घरी गेली. तो प्रधानपुत्र तेथेच बम् बम् बम्, व धूप् धूप् धूप् म्हणत उभा राहिला. इतक्यात त्याने ती तळयातील मुलगी एका बाजूस रडताना पाहिली. तो एकदम तिच्याकडे धावून गेला व हळूच कानात म्हणाला, 'मी प्रधानाचा मुलगा मी मणी मिळवला आहे. रात्री पळून जाऊ.' इतक्यात शिपाई तेथे आले. 'अरे बेटया, ती नव्हे तुझी बायको. ती तर राजपुत्राची आहे. चल इकडे ये. तो वेषधारी वेडा तिकडे गेला.'

रात्र होत चालली. पहारेकरी आलबेल देऊ लागले. तो प्रधानाचा मुलगा दरवाजापर्यंत जाई व परत येई. पहारेकरी म्हणाले, 'ही स्वारी असेच करणार. आयताच पहारा होईल. आपण जरा झोप घेतली तर हरकत नाही. 'ती तळयातील मुलगी तयार होतीच. सारे पहारेकरी गाफील आहेत असे पाहून प्रधानपुत्राने त्या मुलीला एकदम खांद्यावर घेऊन तेथून पोबारा केला. झपझप पावले टाकीत तो गावाबाहेर आला. तेथे त्याचे कपडे एका झाडावर होते. त्याने आपले कपडे घातले. बाहेर अजून रात्र आहे तोच दोघेजण तळयाच्या काठी आली. तो मणी होताच. दोघेजण पाण्याच्या तळाशी आली. बंगल्यात राजपुत्र प्रार्थना करीत होता. संकटात देवाशिवाय कोणाची आठवण येणार? याची संकटात आठवण येते, तोच आपला खरा साहाय्यदाता. ती मुलगी राजपुत्राच्या पाया पडली. राजपुत्राने डोळे उघडले तो समोर त्याची पत्‍नी व मित्र! सर्वांना आनंद झाला. त्या मुलीने सर्व वार्ता सांगितली. आपण दुपारच्या वेळी बाहेर येत असू, त्याचा परिणाम असे म्हणून ती रडू लागली. राजपुत्राची तिने क्षमा मागितली.

सर्वांनी फलाहार केला. प्रधानपुत्र म्हणाला, 'आताच आपण निघू या. लवाजमा वगैरे काही नको. नाही तर आणखी संकटे येतील. 'बाहेर पडावयाचे ठरले. सूर्य वर येत होता आणि ही तिघे पाण्यातून वर येत होती. जणू पाण्यातून तीन कमळेच वर आली!

तिघे पायी चालू लागली. त्या मुलीला पायी चालण्याची सवय नव्हती. तिचे पाय सुजले. तरी ती चालतच होती. सायंकाळ झाली म्हणजे मुक्काम करीत. प्रधानाचा मुलगा झोपत नसे. तो पहारा करी. एके दिवशी असाच एका रानात रात्रीचा मुक्काम पडला. राजपुत्र व त्याची पत्‍नी झोपली होती. प्रधानपुत्र जागा होता. इतक्यात त्याला पाखरांची मनुष्यवाणी ऐकू आली. झाडावर घरटयात नर मादीजवळ बोलत होता. प्रधानपुत्र ऐकू लागला.

'हे बघ, या प्रधानपुत्राने, राजपुत्राचे प्राण किती जरी वाचवले तरी राजपुत्र लवकरच मरणार यात शंकाच नाही.' नर म्हणाला.

'ते कसे काय?' मादीने विचारले.

'राजपुत्र पत्‍नीसह व मित्रासह येत आहे ही वार्ता राजाच्या कानावर गेली आहे व राजाने हत्ती, घोडे श्रृंगारून पाठवले आहेत. हत्ती प्रधानपुत्रासाठी व घोडा राजपुत्रासाठी श्रृंगारला आहे. राजपुत्र घोडयावर बसेल व घोडा पडेल आणि राजपुत्र मरेल.' नर म्हणाला.

'परंतु जर त्या घोडयावर राजपुत्राला बसू दिले नाही तर तो वाचेल की नाही?' मादीने विचारले.

'हो, तर वाचेल; परंतु पुढे मरण ठेवलेलेच आहे. 'नर म्हणाला.

'ते कसे काय?' मादीने विचारले.

'शहरात दरवाजातून आत शिरू लागताच, दरवाजा अंगावर कोसळेल व राजपुत्र मरेल. 'नर म्हणाला.

'परंतु समजा तो दरवाजा आधी पाडून मग शहरात शिरला तर वाचेल की नाही?' मादीने विचारले.

'हो, तर वाचेल; परंतु पुढे मरण आहेच. ते टळत नाही. राजपुत्राच्या हात धुवून ते पाठीस लागले आहे. 'नर म्हणाला.

'आणखी कोणते मरण? सांगा तरी. 'मादी म्हणाली.

'अग, राजपुत्राच्या विवाहासाठी राजा मोठी मेजवानी देइल. राजपुत्राचे पहिले पान असेल. त्या पानात उत्कृष्ट तळलेला एक मासा असेल. राजपुत्र तो खाऊ लागेल. खाऊ लागताच तो मासा घशात अडकून राजपुत्राने प्राण जातील.' नर म्हणाला.

'परंतु समजा तो मासा कोणी काढून घेतला व राजपुत्राला खाऊ दिला नाही, तर तो वाचेल की नाही?' मादीने विचारले.

'तर वाचेल. परंतु आणखी एक मरण आहे. नर म्हणाला. '

'कोणते ते?' मादीने विचारले.

'राजपुत्र राजधानीत गेल्यावर रात्री झोपला, म्हणजे एक सर्प खोलीत येईल व तो डसेल.' नर म्हणाला.

'परंतु कोणी लपून राहून तो सर्प येताच ठार केला तर?' मादीने विचारले.

'तर तो वाचेल. या संकटातून वाचला तर तो शतायुषी होईल, मोठा राजा होईल. चला आता झोपू. हे आमचे बोलणे जर कोणी ऐकले असेल तर त्याने कोणाला सांगू नये. जर तो सांगेल तर तो दगड होऊन पडेल. 'नर म्हणाला.

मादी म्हणाली,' तो जर दगड होऊन पडला. तर त्याचा पुन्हा मनुष्य व्हावयास काही उपाय नाही का?' नर म्हणाला,' एकच उपाय आहे. ज्याला हे बोलणे सांगेल त्याच्या पहिल्या मुलाला ठार मारून त्याच्या रक्ताने जर त्या दगडाला कोण स्नान घालील तर दगड पुन्हा सजीव होईल. तो मनुष्य जिवंत होईल. चला आता निजू.' प्रधानाच्या पुत्र हा सारा संवाद ऐकत होता, आपल्या मित्रावरची संकटे आधी कळली म्हणून त्याला आनंद झाला. सकाळ, झाली. राजपुत्र व त्याची पत्‍नी उठली. मुखमार्जन करून तिघे चालू लागली. दुरून वाघांचा ध्वनी कानी येऊ लागला.

'हा कशाचा आवाज?' राजपुत्राने विचारले.

'राजाने लवाजमा पाठविला आहे. हत्तीकडे येत आहेत. त्याची वाद्ये वाजत आहेत. 'प्रधानपुत्र म्हणाला.

'बाबांना वार्ता कोणी दिली?' राजपुत्र म्हणाला.

'पाखरांनी, वार्‍याने, तार्‍यांनी. 'प्रधानपुत्र म्हणाला.

'हृदयातील देवतेने. 'राजपुत्राची पत्‍नी म्हणाली.

बोलत बोलत तिघे जात होती. इतक्यात समोरून घोडे, हत्ती येताना दिसले. शिपाई पुढे धावत आले. मुजरे झाले. राजपुत्रासाठी एक श्यामवर्ण वारू मुद्दाम श्रुंगारला होता. राजपुत्र त्याच्यावर बसणार, इतक्यात प्रधानपुत्र पुढे झाला व म्हणाला, मी घोडयावर बसतो, तुम्ही हत्तीवर बसा. एवढे माझे ऐका.'

आपल्या मित्राचे उपकार व प्रेम लक्षात आणून राजपुत्राने संमती दिली. चारचौघांसमक्ष आपला जरा अपमान झाला असे थोडे मनात त्याला वाटले, परंतू क्षणभरच. मिरवणूक सुरु झाली. राजपुत्र व त्याची पत्‍नी अंबारीत बसली. प्रधानपुत्र घोडयावर शोभत होता. मंडळी राजधानीजवळ आली. शहरातून सरदार दरकदार सामोरे आले होते. लाहया, फुले, मोती उधळण्यात आली. दरवाजातून मिरवणूक आत शिरणार, इतक्यात प्रधानपुत्र खाली उतरला व म्हणाला, 'हा दरवाजा आधी पाडा व मग राजपुत्र आत जाऊ दे.'

राजपुत्राला राग आला. आनंदाचा व उत्सवाचा सर्व विरस होणार याचे याला वाईट वाटले, परंतु उपकाराच्या ओझ्याखाली तो दबला होता. शेवटी दरवाजा पाडण्यात आला व मिरवणूक शहरात गेली. राजाने मोठी थाटाची पंगत देण्याचे ठरविले. रात्री आठ वाजता पंगत होती. मोठा मंडप घातला होता. किनखापाने श्रृंगारला होता. तेथील थाट काय सांगावा? पंगतीची तयारी झाली. खाशा स्वार्‍या तयार झाल्या. राजपुत्र पहिल्या पानावर बसला. त्याच्याजवळ त्याच्या मित्राचे पान होते. मंडळी आता जेवावयास आरंभ करणार, इतक्यात प्रधानाच्या मुलाने राजपुत्राच्या ताटातील उत्कृष्ट जातीचा तो मासा उचलून घेतला. भर पंक्तीत अपमान! राजपुत्र रागाने लाल झाला. परंतु करतो काय?

जेवण झाली. राजपुत्र आपल्या मित्रास म्हणाला, 'तू चालता हो. तुझे मला दर्शन नको. आज सकाळपासून मी पाहातो आहे. किती अपमान सहन करावे? काही मर्यादा आहे की नाही सहनशीलतेची? अत:पर हे मला सहन होत नाही. माझा पदोपदी पाणउतारा आणि सर्वांसमक्ष! जा, पुन्हा तोंड दाखवू नकोस,' असे म्हणून राजपुत्र तणतणत निघून गेला.

प्रधानपुत्र रागावला नाही. प्रेम सर्व अपमान पोटात गिळते. निंदा, अपमान, तिरस्कार सहन करुन जे टिकेल तेच खरे प्रेम. प्रधानपुत्र मनात म्हणाला, 'अजून एक वेळ माझी जरुरी आहे. मग मी चालता होईन' तो राजपुत्राच्या झोपण्याच्या खोलीत आधीच लपून बसला. दमला भागलेला राजपुत्र झोपी गेला. पलंगाखालून बाहेर येऊन प्रधानपुत्र नागवी तलवार घेऊन उभा होता. एकाएकी एक नाग आला व पलंगावर चढू लागला. प्रधानपुत्राने एका वारानेच त्याची खांडोळी केली. घाव इतका जोराचा बसला की रक्ताची चिळकांडी उडाली. राजपुत्राचा हात पांघरुणाच्या बाहेर होता. ता उघडया हातावर रक्त उडाले. प्रधानपुत्राच्या मनात आले की ते हळुच पुसावे. त्याने हलक्या हाताने ते रक्त पुसले, परंतु राजपुत्र जागा झाला.

'काय, अजून तू इथेच? आणि हातात तलवार? माझा खून करावयास आलास? मारेकर्‍या दुष्टा -'राजपुत्र संतापाने वेडा झाला.

प्रधानपुत्र म्हणाला, 'महाराज, तुमचे प्राण वाचवण्यासाठी हा दास येथे लपला होता. आज सर्प येऊन तुम्हास दंश करणार हे मला कळले होते, म्हणून मी येथे आलो. हा पाहा सर्प मरून पडला आहे.'

राजपुत्राने सर्प पाहिला. 'मला मारावयास आलेला तू, तुला दुष्टालाच दंश करावयासाठी हा सर्प येत होता. मला दंश करावयास का येईल? वाहवा रे मित्र! मित्राला मारणारा मित्र!' राजपुत्र तिरस्कार, उपहास व संताप याने बोलत होता.

प्रधानपुत्र म्हणाला, 'मी जे आज सकाळपासून वर्तन केले, ते तुमचे प्राण वाचवण्यासाठी. मला सर्व हकीगत तुम्हास सांगता येत नाही. कारण ती जर मी सांगेन, तर मी दगड होऊन पडेन.

राजपुत्र म्हणाला, 'थोतांड! शु़ध्द ढोंग. सारी लफंगेगिरी. म्हणे दगड होऊन पडेल! सांग, सारी हकीगत सांग. झालास दगड तर झालास. सांग.'

प्रधानपुत्र म्हणाला, 'ठीक, मित्राची तुम्हाला जरूर नसेल तर मी तरी कशाला जगू? तुमचे प्राण वाचवण्यासाठी मी जगू इच्छित होतो. अत:पर तुम्हास धोका नाही. मी मेलो तरी चालेल. ऐका. काल रात्री पाखरांचा संवाद मी ऐकला. तुम्ही झोपला होतात. मी पहारा करीत होतो. नर मादीला म्हणाला, 'जर घोडयावरून राजपुत्र गेला तर तो घोडा पडेल व राजपुत्र मरेल' म्हणून मी तुम्हाला घोडयावर बसू दिले नाही. अपमान करण्याचा माझा हेतू नव्हता. प्रधानाचा मुलगा एवढे म्हणून थांबताच गुडघ्यापर्युंत तो दगडाचा झाला. तो राजपुत्रास म्हणाला, 'पाहा माझे पाय दगडाचे झाले. पुढे सांगू का?'

'सांग, सर्व सांग. 'राजपुत्र म्हणाला.

'राजपुत्र दरवाजातून आत जाताच दरवाजा अंगावर कोसळून राजपुत्र मरेल. तो आधी पाडला तर राजपुत्र जगेल, असे ती पाखरे म्हणाली. म्हणून मी दरवाजा पाडवला. 'प्रधानपुत्र एवढे म्हणताच कमरेपर्यंतचा भाग पाषाणमय झाला.

'पाहा, कमरेपर्यंत मी दगडाचा झालो. आणखी सांगू का?' प्रधानपुत्राने विचारले.

'सांग. पुन्हा पुन्हा काय विचारतोस?' राजपुत्र म्हणाला.

'राजा मेजवानी देईल, त्या वेळेस राजपुत्राच्या ताटात एक उत्कृष्ट जातीचा मासा तळून वाढलेला असेल. जर राजपुत्र तो खाईल, तर तो मरेल.'

प्रधानपुत्र एवढे म्हणताच मानेपर्यंतचा भाग दगडाचा झाला.

'आणखी सांगू का?' प्रधानपुत्राने विचारले.

'सांग म्हणून कितीदा सांगू?' राजपुत्र म्हणाला.

'आता शेवटची गोष्ट सांगताच मी सर्व दगडाचा होईन. मागून तुला पश्चाताप होऊन आपला मित्र जिवंत व्हावा असे वाटले तर त्याला एकच उपाय आहे. तुला जे पहिले मूल होईल, ते मारून त्याच्या रक्ताने ह्या माझ्या दगडाला स्नान घाल म्हणजे मी उठेन; परंतु मला उठण्याची इच्छा नाही. मी मित्रावर प्रेम केले. माझे काम झाले. ऐक, शेवटची त्या पाखरांची गोष्ट ऐक. ती म्हणाली, राजपुत्र झोपला म्हणजे एक सर्प येऊन पलंगावर चढेल व दंश करील. जर कोणी तो सर्प आधी मारील तर राजपुत्र जगेल. 'एवढे म्हणत आहे, तोच प्रधानाचा मुलगा सबंध पाषाण होऊन पडला.

राजपुत्र आता विचार करू लागला. आपला मित्र किती थोर मनाचा होता ते मनात येऊन तो रडू लागला. त्या दगडावर तो अश्रूंचा वर्षाव करू लागला. परंतु तेथे अश्रूंचा उपयोग नव्हता. त्याला होणार्‍या पहिल्या मुलाचे रक्त पाहिजे होते.

दुसर्‍या दिवशी राजपुत्राने सारी कथा आपल्या पत्‍नीस सांगितली व म्हणाला, 'आपले पहिले मूल द्यावयाचे का? तुला धैर्य होईल का?' त्याची पत्‍नी म्हणाली, 'देवाची कृपा असेल तर आणखी बाळे होतील; परंतु आपला मित्र जगवला पाहिजे. त्याचे उतराई झालेच पाहिजे.'

राजपुत्र व त्याची पत्‍नी त्या पाषाणाची रोज पूजा करीत. प्रधानाचा मुलगा कोठे गेला कोणास समजेना. कोणी म्हणे राजपुत्राचे व त्याचे भांडण झाले, म्हणून तो देशांतरी निघून गेला. प्रधानाला दु:ख झाले, प्रधानपुत्राची पत्‍नी दु:खी झाली. म्हातार्‍या प्रधानाला सुनेचे दु:ख पाहवेना. शेवटी सून माहेरी गेली. ती रोज देवीची आराधना करी व म्हणे, 'आई, जगदंबे माझे कुंकू घरी आण, माझे चुडे अभंग ठेव. मी तुझी मुलगी. माझे सौभाग्य तुझ्या हाती. तू ते सांभाळ.'

काही दिवस गेले, काही महिने गेले. राजपुत्राला मुलगा झाला. परंतु तो आनंद टिकणारा नव्हता. मित्र का पुत्र हा प्रश्न होता. पुत्र आणखी होतील; परंतु असा मित्र मिळायचा नाही असा उभयतांनी विचार केला. राजपुत्र व त्याची पत्‍नी ते ताजे फूल, ते नवीन कोवळे मूल घेऊन दिवाणखाण्यात आली. दोघांनी हृदय घटट केले. राजपुत्राने मुलाला मारले व रक्ताची धार त्या दगडावर धरली. दगड खडबडून जागा झाला. मित्र मित्रासमोर उभा राहिला. समोर पाहातो तो मारलेले मूल, कुसकरलेले फूल, प्रधानपुत्राला वाईट वाटले, ते मुलाचे तुकडे त्याने रूमालात बांधून घेतले व म्हणाला, 'याला जिवंत करून आणीन, तेव्हाच तोंड दाखवीन.'

प्रधानाचा मुलगा निघाला. हातात ती मृत मुलाची मोटली होती. तो आपल्या सासुरवाडीस जावयास निघाला. पत्‍नीला भेटण्यासाठी पत्‍नीच्या माहेरी तो जात होता. गाव जवळ आला. प्रधानाच्या मुलाने ती मोटली एका झाडावर लपवून ठेवली व एकटा सडाच सासर्‍याच्या घरी आला. पती सुखरूप आला हे पाहून पत्‍नीस आनंद झाला; परंतु तो तिचा आनंद टिकला नाही. पती हसेना, बोलेना. पती दु:खी व कष्टी दिसत होता. आपले काय पाप आहे ते पत्‍नीला कळेना. आपल्यापासून पतीस सुख नाही तर कशास जगावे असे तिला वाटले. रात्री देवीच्या देवळात जाऊन जीव द्यावा असे तिने ठरविले.

प्रधानाचा मुलगा झोपेचे सोंग घेऊन पडला होता. तो खोटे खोटे घोरत होता ती साध्वी उठली व निघाली आपली पत्‍नी कोठे जाते ते पाहाण्यासाठी पाठोपाठ प्रधानपुत्रही निघाला. त्याची पत्‍नी देवळात शिरली व देवीला हात जोडून म्हणाली, 'आई जगदंबे! आजपर्यंत प्रार्थना ऐकलीस, माझा पती परत आणलास; माझे सौभाग्य सुखरूप आणलेस. परंतु आई! त्यांना मी नको. मला पाहून त्यांना आनंद नाही. त्यांना पाहून माझे हृदय उचंबळते, परंतु मला पाहून ते दु:खीच राहिले. ते हसत नाहीत, बोलत नाहीत. नीट खातपीत नाहीत. मी कशाला जगू? तुझ्या पायांवर डोके फोडते. मुलीला क्षमा कर.'

असे म्हणून ती साध्वी पतिव्रता डोके आपटणार, तो देवीने तिला पोटाशी धरले. देवी म्हणाली, 'बेटा, असे करू नकोस. हा वेडेपणा आहे. पतीला त्याचे दु:ख विचार. बोलल्याशिवाय, विचारल्याशिवाय कसे कळणार? त्यांचे काय दुखते खुपते, ते विचार. जा, त्यांचे दु:ख मी दूर करीन. उद्या त्यांना विचारून ये.'

ती पतिव्रता आनंदली व माघारी आली. प्रधानपुत्र हळूच आधी येऊन परत घोरत राहिला. दुसर्‍या दिवशी त्या पतिव्रतेने पतीस दु:खाचे कारण विचारले. तो म्हणाला, 'तुझा पती तू जिवंत पाहात आहेस; परंतु तुझा पती तुला मिळावा म्हणून राजपुत्राने पहिल्या मुलाचा बळी दिला आहे. त्या मलाचे तुकडे मी आणले आहेत. ते जिवंत करून आण तर तू खरी पतिव्रता. ते बालक जिवंत होईल, तरच मी हसेन, आनंदाने जगेन, नाही तर मी जीव देईन. 'पतीचे बोलणे तिने ऐकून घेतले व म्हणाली, 'रात्री आपण दोघे देवीच्या देवळात जाऊ. तुम्ही तुकडे घेऊन या. आई जगदंबा बाळ जिवंत करील. चिंता करू नका.'

उभयता रात्रीची वाट पाहत होती. रात्र झाली. सारे जग झोपी गेले. ती दोघे मृत मुलाला घेऊन मंदिरात गेली. ती पतिव्रता जगदंबेस म्हणाली. 'आई, या मुलाच्या बलिदानाने माझा पती मला परत मिळाला. या बाळाला जिवंत कर, या बाळाला हसव. याला जिवंत करशील तर माझे पतिदेव जिवंत राहातील. या मुलाला हसवशील तर ते हसतील. आई, लाव, तुझा अमृताचा हात या कोवळया तुकडयांना लाव.'

देवीने हात लांबवला व त्या तुकडयांस लावला. एकदम बाळ हसू खेळू लागले. प्रधानाचा मुलगा पत्‍नीसह ते मूल घेऊन राजधानीस आला. सर्वांना आनंद झाला. राजाने राजपुत्रास गादीवर बसविले व प्रधानाच्या मुलास मुख्य प्रधान केले. राजा व प्रधान म्हातारे झाले होते. ते वनात संन्यासी होऊन तप करू लागले. इकडे नवीन राजा व नवीन प्रधान चांगल्या प्रकारे राज्य करू लागले. प्रजा सुखी झाली. कोणी रोगी नाही, दु:खी नाही, कुणाचा छळ नाही. शेते पिकत होती, पाऊस वेळेवर पडत होता. उद्योगधंदे भरभराटीत होते. सारे सुशिक्षित होते. बेकार कोणी नव्हता, आळशी कोणी नव्हता, अनुदार कोणी नव्हता. जुलमी कोणी नव्हता. सारी प्रजा नव्या राजाला व नव्या प्रधानाला दुवा देत होती. आनंदीआनंद होता.

तुमच्या आमच्या देशात तसा आनंद येवो, दुसरे काय?

गोष्ट संपली माझी

फुले आणा ताजी॥

देवा वाहू फुले

नाचू आपण मुले॥

या रे या रे सारे

गाणे गोड गा रे॥

देव आहे मोठा

नाही कुणा तोटा॥

नाही जगी दु:ख

आहे जगी सुख॥

***