Jivant astana sukh gha books and stories free download online pdf in Marathi

जिवंत असताना सुख द्या

जिवंत असताना सुख द्या


पितृपक्ष सुरु असल्यामुळे पिञ जेवु घालण्याचा विधी सर्वञ चालु होता. सुहासच्या घरी सुद्धा तोच कार्यक्रम चालु होता. बरीच पाहुणे मंडळी आली होती. त्याच्या आजोबांना जावुन १ वर्ष झालं असेल. आजोबांच्या फोटो ला टवटवीत फुलांचे हार लखडत होते. सुंगधी अगरबत्ती , दिवा बाजुला तेवत होते. तेवढ्यात एक सुंदर सजवलेले पंचपक्वानाच ताट घेवुन सुहासची आई फोटोजवळ आली. फोटोला अन्न चढवु लागली. १० वर्षाच्या सुहास ला हे सर्व फार कुतुहलात्मक होतं. त्याने न राहुन विचारलं.
सुहास - आई हे काय करतेस ?
आई - बाळा , तुझ्या आजोबांच्या आवडीचे सर्व पदार्थ बनवलेत, त्यांना जेवु घालण्यासाठी . त्यामुळे त्यांच्या आत्म्याला तृप्ती
मिळेल.
सुहास - आजोबांना हे सर्व आवडायचं...??
आई - हो खुप..
सुहास - पण मग ते जिवंत असताना.. यातला एकही पदार्थ तु कधीच बनवला नाहीस..
आता कस खातील ते ?
या प्रश्नावर त्याची आई अवाक झाली. आणि आजु बाजुचे नातेवाईक सुद्धा . त्यांच्या आईला कुणीतरी थोबाडीत मारावी असाच भास झाला.
आपल्या भारतीय संस्कृतीत एकञ कुटुंब पद्धती आहे . पण हल्ली बरेच कुटुंब विभक्त राहतात. कारण काहीही असु शकत. तो ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण या सर्वात एका गोष्टीच वाईट वाटतं. ते याच की म्हाताऱ्या व्यक्तींची हेळसांड होत आहे. बर्याच मुली , सुना , मुले आपापल्या आई - वडिलांची , सासु सासरे यांची निट काळजी घेत नाहीत. त्यांचा आदर करत नाहीत. त्यांना द्यायला हव तेवढ प्रेम आणि वेळ ही देत नाहीत. फक्त घरातील एक सदस्य म्हणुन आणि कर्तव्य म्हणुन किंवा वेळपरत्वे फक्त लोकांच्या भितीने सांभाळतात. म्हातारपण हे दुसर बालपण असतं. आणि बालपणात आपल्याला सर्वात जास्त प्रेम, आधार , कुणाचं तरी अटेंन्शन हवं असतं. आणि आपण इथेच चुकतो. बर्याच घरांमध्ये , म्हाताऱ्या व्यक्तींकडे अजीबात लक्ष दिल जात नाही. त्यांना वेळेला काय हव नको पाहील जात नाही. ते खुश आहेत का ? काही दुखतय का ? हे ही विचारल जात नाही . त्यांना कशाची भाजी आवडते, काय खावसं वाटत आणि कधी खावसं वाटतं हे ही माहीत नसतं . बरेच लोक आई - वडिलांना , 'आमचं म्हातारं...म्हातारी ' असा उल्लेख करतात , त्यामुळे नकळत नातवंड ही तशीच हाक मारतात . यामुळे त्या नात्याचा कुठेतरी अनादर होतो. आणि वृद्ध माणसांच्या भावना दुखावल्या जातात.
मुलं लहान असतात , तेव्हा ह्याच आई - वडिलांनी हाताचा पाळणा आणि जीवाच रान करुन मुलांना वाढवलेल असतं. मुल रडत तेव्हा वडिल राञभर त्याला जोजवत उभे राहतात. राञी - अपराञी मुलांना भुक लागते ,तेव्हा आई मुलाच्या ईच्छेनुसार त्याचा आवडीचा पदार्थ बनवुन देते. मग हेच आई - वडिल म्हातारे होतात तेव्हा मुलं त्यांच्यासाठी तेवढ्याच आत्मियतेने करायला का मागे पडतात. उतार वयात आई - वडिलांना थोड पँम्परिंग केल तर काय वाईट ? फार काही नाही पण काही गोष्टी केल्या तर ते नक्की आनंदात राहतील.
• कधीतरी कपभर गरम चहा करुन द्यावा. त्यांचा चेहरा प्रसन्न दिसेल.
• देवपुजा करणाऱ्या आजीला नातवाने कुठुनतरी ४ फुलं आणुन द्यावीत . त्यावेळी आजीला नातवात बालकृष्ण दिसेल.
• आजी आजोबा नातवांना रोज गोष्ट सांगतात. कधीतरी आपण म्हाताऱ्या आई - वडिलांना पुस्तकाच एक पान वाचुन दाखवावं. त्यांच्या चेहऱ्यावरच समाधान इतर कुठेच मिळणार नाही.
• रोज शक्य नसेल तर महत्त्वाच्या कामाला जाताना आई - वडिलांच्या पायावर डोक टेकवावं. तो क्षण त्यांच्यासाठी अभिमानाचा असतो , कारण आपला मुलगा/ सुन आजही आपल्याला मान देतात. ही गोष्टच क्षणात अंगावर मुठभर मास चढवणारी आहे .
• कधीतरी त्यांना मंदिरात घेवुन जावं मंदिरात ती माऊली हात जोडुन हेच मागेल की ,
' माझ्या लेकराला सुखी ठेव. ' हा निस्वार्थ भाव इतर कुठेच मिळणार नाही.
• म्हाताऱ्या व्यक्तींचे गुडघे खुप दुखतात. नेहमी नसेल शक्य पण महिन्यातुन एकदा १०-१५ मिनीट तेलाने त्यांचे पाय चोळुन द्यावे . त्यावेळेस आपलं वय विसरुन , ते आपल्याला मायेने कुरवाळतात ,
' लई गुणाचय माझ बाळ..किती सेवा करतयं ' हे काळजातुन निघालेल वाक्य नक्की ऐकायला मिळेल.
• कधीतरी अचानक नविन कपडे भेट द्यावे. कौतुकाने सर्वांना दाखवत फिरतील..माझ्या मुलाने/सुनेने घेतलेत म्हणुन.
• कधीतरी कडकडून मिठी मारावी. कधीतरी उगीच विचाराव , ' मी कुठला ड्रेस घालु ?'
कधीतरी त्यांच्या आवडीची खीर सर्वात आधी त्यांना चाखायला देवुन विचाराव , 'कशी झाली आहे ?'
या लहान आणि महत्तवाच्या न वाटणाऱ्या गोष्टीने त्यांना जाणीव होते की ,
" आपलं अस्तित्व अजुन आहे. आपलं मत कुणासाठी तरी महत्त्वाच आहे. आपण कुणासाठी तरी नक्कीच महत्तवाचे आहोत."यामुळे जीवनाचे शेवटचे दिवस समाधानने जगायला मदत होते.


बर्याच जणांच म्हणण असत की काही म्हातारी माणसं खुप वाईट असतात. त्यांच्याशी कस वागायच ? अशांना एक उदाहरण द्यावस वाटेल, माझी एक मैञिण आहे जीने इंटरकास्ट लव मँरेज केल आहे. त्याचे आई - वडिल तिला अँकसेप्ट करायला तयार नव्हते. तिच्याशी ते खुप वाईट वागायचे. अगदी टि.व्ही. सिरियल मधील सासु सासरे वागतात तसेच. पण ती त्यांच्याशी चांगलच वागत राहीली. पुढे तिच्या सासु - सासर्यांना पँरालिसीस झाला. त्या दोघांच खाणं , पिणं ,अंघोळ , सर्व विधी तिच उरकायची. मरणाच्या एक दिवस आधी तिच्या सासुने तिला जवळ बोलावलं आणि मिठीत घेवुन खुप रडली. ' मी खुप वाईट वागले. माफ कर.. खुप सुखी रहा. " बोलली. दुसऱ्या दिवशी ती गेली. सांगण्याचा उद्देश हा आहे की प्रेमाने माणस बदलतात. आपण ठरवायच , आपण प्रेम देवुन समोरच्याला आपल करायच की तिरस्काराने नातं तोडायचं. चाँईस इज अवर्स..!
एखादी व्यक्ती मेल्यावर त्याच्या आवडीनिवडीच्या पदार्थांच पंचपक्वानाच ताट त्याच्या फोटोसमोर ठेवण्यापेक्षा ती जिवंत असताना त्याच्या ईच्छा पुर्ण करणं कधीही चांगल. यातली कुठलीही ईच्छा पुर्ण करायला पैसे लागत नाहीत . लागतो थोडासा वेळ आणि मनातुन ओसंडणारं प्रेम आणि.. प्रेम हे इतरांना वाटण्यासाठीच असतं. आयुष्यात नाती आणि माणसांच शेवटपर्यंत जपायची असतात. मग हृदयातला प्रेमाचा झरा त्याच माणसांवर..नात्यांवर रिता करायला काय हरकत आहे.. !