Bhundi books and stories free download online pdf in Marathi

भुंडी

भुंडी

कोवळा सूर्य कोवळी किरणे फेकत होता. सूर्यकिरणांमुळे हिरवा सडा आपसुकच पिवळसर पडत होता. 12
वर्षाचा सुऱ्या, चुलीवरील भगुन्यातील पाणी अंघोळीसाठी उपसत होता. सुऱ्याची आजी तुळशीला पाणी घालत
होती. सुऱ्याची आई चुलीच्या घरात पोतरा लावत होती. सुऱ्याने बकेट उचलुन न्हानी च्या बाजुला असलेल्या
दगडाजवळ ठेवली. तो अंघोळ करु लागला.तेवढ्यात त्याची आई रागाने ओरडली, 'त्या भगुन्यात पाणी कोण
वतायचं?' सुऱ्याअंगावर पाणी ओततच बोलला, 'आयव.... र्हायलं वत्तो..!' एवढ बोलुन सुऱ्यातोंडाला , अंगाला
फसाफसा साबण लावू लागला. आज्जी तुळशीला फेर्या घालु लागली. फेर्या घालत घालत आज्जी सुऱ्या बघुन हसु
लागली आणि स्वतःशीच पुटपुटली 'नुस्त माकडावानी साबण लावतया..' तेवढ्यात आई चुलीच्या घरातुन बाहेर
अंगणात आली. सुऱ्याला दगडावर बसुन अंघोळ करताना बघुन ओरडली, ' न्हानीत अंघुळ कराया काय गड्डा उठतया
कुणास ठाव....त्या दगडावरच बसुन करतय.. समद पाणी फिरुन अंगणात येतयं.. कळत नाही का? सुऱ्या ऐकुन न
ऐकल्यासारखे करतो आणि आणखी जोरजोरात साबण लावतो.
तेवढ्यात सुऱ्याच्या वर्गातील 'भुंडी' हातात वाटी घेवुन येते. ' काकु आईन वाटीभर साखर सांगितल..!' एवढ
बोलुन ती सुऱ्याकडे बघते. साबण फासलेला सुऱ्या भुतासारखा दिसत होता. भुंडीचा आवाज ऐकताच सुऱ्या तिला
ओळखतो पण खाञीसाठी एक डोळा उघडुन तिच्याकडे बघतो. भुंडी त्याच्याकडेच बघत असते.सुऱ्या चाचरतो. बकेट
उचलुन न्हानीत पळत जातो. न्हानी म्हणजे जुन्या फाटक्या चवाळ्यापासुन बनवलेला आडोसा होता. तो आत पळत
गेला, त्याच्या तशा वागण्यामुळे भुंडीला थोड हसु आलं. या सर्व गडबडीत सुऱ्याच्या डोळ्यात साबणाचा फेस गेला.
आत जाताच सुऱ्या बोंबलु लागला. ' आयवं... डोळ्यात साबण गेलं..!' तेवढ्यात आई ओरडली, ' एवढ साबण
फासल्यावर काय व्हईल..?' आई त्याचा चेहरा धुते आणि पदराने पुसते. भुंडी माञ दुरुनच कुतुहलाप्रमाणे बघत
थांबते.
आई वाटीभर साखर भुंडीला देते. भुंडी ते घेवुन जायला निघते. न्हानीच्या फाटक्या चवाळ्यातुन सुऱ्या
भुंडीकडे बघायला लागतो. भुंडी थोडस पुढे जावुन वळुन न्हानीकडे बघते. सुऱ्या डोळे तिला फटीतुन दिसतात. आणि
ती खुदकन हसते. सुऱ्यापण त्यावर गालातल्या गालात हसतो. भुंडी निघुन जाते.
थोड्यावेळाने दोघेही शाळेत प्राथनेला उभे असतात. एक मुलांची ओळ एक मुलींची ओळ असे सर्व उभे असतात.
प्रार्थना झाल्यावर सर्वांना बसण्यासाठी सांगितल जातं. सर्वजण बसतात. मुलींना मुलांकडे आणि मुलांना मुलींकडे
चेहरे करुन बसायला सांगतात. सुऱ्या नेहमी भुंडीच्या बरोबरीलाच बसत असतो, त्यामुळे ते आता समोरासमोर
येतात. सुऱ्या भुंडीकडे बघुन गालातल्या गालात हसतो. तेवढ्यात शिक्षक मुलांच्या हातात पेन, वह्या ,खोडरबर
देतात आणि मुलींच्या हातात राख्या देतात. सर बोलु लागतात , ' आज आपण रक्षाबंधन साजरा करतोय...सर्व
मुलींनी आपल्या समोरील मुलाला राखी बांधा आणि मुलांनी पेन- वही मुलींना भेट द्या . ' सुऱ्या शाँक होतो. भुंडी
आता आपल्याला राखी बांधेल म्हणुन घाबरतो.हातातील पेन तसाच खाली टाकतो, ताडकन उभा राहतो आणि
मुद्दाम पोट धरुन ओरडायला लागतो.

' सर.... लय पोट दुखतय...आ आ..! सु ला जावु का ? ' सर टकमक बघतात आणि बोलतात.. ' जा लवकर नाहीतर
व्हईल पँटमधीच !'
' हा...हा... सर्वजण हसतात. सुऱ्या तिथुन निघतो आणि पळुन जातो. बर्याचवेळानंतर वर्ग सुरु होतात. तेव्हा सुऱ्या
येतो. सर्व मिञ विचारतात , कुठ व्हता रं ? आन राखी का बांधली नाही ? त्यावर सुर्या म्हणतो,
' आरं कसं बांधणार..?' सर्व मिञ एकदाच विचारतात 'का?' त्यावर सुऱ्या पोरींकडे नजर करत बोलतो, 'ती व्हती
ना..!'
मिञ आश्चर्याने विचारतात ' कोण ? ' त्यावर सुऱ्या तावाने बोलतो , ' भुंडी..!'
सर्व पोर जोरजोरात हसायला लागतात. सुऱ्या पण हसायला लागतो. पोर त्याला जोरजोरात चिडवतात, 'भुंडी..
भुंडी..भुंडी..!'