SPY BOYS... books and stories free download online pdf in Marathi

SPY BOYS...

SPY BOYS...

हॉस्टेल ची एक रूम. खिडक्या अनेक दिवसांपासून बंद असल्यामुळे रूममध्ये कोंदट वातावरण आहे. सर्वत्र धूळ, पसारा. एका कोपर्‍यात चप्पल आणि शूज चा अस्ताव्यस्त ढीग पडला आहे. कुठे जीन्स तर कुठे शर्ट लोळत आहे. डिओ च्या झाकण नसलेल्या 4-5 बॉटल , 1-2 जेल चे डब्बे टेबल वर आहेत. टेबल च्या खाली असह्य असा वास सोडत सॉक्स कुजत पडले आहेत. टेबल ला लागून एक मोठा आरसा आहे आणि आरशाच्या बाजूला अॅनजेलींना चे पोस्टर आहे. तर आरशात पाहताना , बरोबर आरशात दिसणारं मागच्या भिंतीवर कतरिना चे पोस्टर लटकले आहे. डाव्या बाजूला छोटा गॅस , आणि गॅसवर सांडलेली मॅगी वाळून गेली आहे. मॅगी आणि बिस्किटचे रॅपरं जाणून बुजून गॅस खाली कोंबलेले आहेत. एका बेडवर लॅपटॉप बंद अवस्थेत उघडाच पडून आहे पण त्याच्या चार्जर चे बटन अहोरात्र चालूच आहे. पूर्ण रूम मध्ये फक्त एक कोपरा अतिशय स्वच्छ आणि नीटनेटका आहे. त्या कोपर्‍यात एक बेड आणि त्या बेडवर नुकताच अॅडमिशन घेतलेला पवार नावाचा मुलगा अभ्यास करत आहे. अतिशय शांत आणि सज्जन.

रूमच्या गॅलरीत बाकी सर्व रूममेट्स बसून पार्टी करत आहेत. गॅलरीचा एक कोपरा रिकाम्या बीयर च्या सुंदर बाटल्या आणि सिगरेट्स ची रिकामी पाकीट यांनी भरलेला आहे. 5-6 जण गोल बसून गप्पा मारत आहेत. रम्या आणि काका (टोपण नाव ) बॉटल तोंडाला लावून बसलेत. ‘केत्या’ मस्त सिगरेट च्या धुराचे लोट मुद्दाम ‘दिन्या’ च्या तोंडावर सोडत आहे. पश्या आणि रव्या सोबत बसून कंपनी देत आहेत. ‘ च्या मायला आज लॅब मध्ये लय मज्जा आली...!’ पप्या हसत हसत म्हणतो. ‘ बासका भाऊ.. आता सर्वांसमोर माझी इज्जत काढणार का ? विनवनीच्या सुरात पश्या म्हणाला. त्यावर बाकीचे सर्व ओरडले.. पप्या तू सांग. ह्याची कसली इज्जत रे ! आज लॅब मध्ये मी आणि पश्या थांबलो होतो. समोरच्या बाजूला ती रश्मि होती. काय दिसत होती.. एक नंबर ! पश्या लागला टापायला. पशा इतका गुंग होऊन तिच्याकड बघत होता की पशाला कळलं नाही ती त्याच्याकडं रागानं बघतेय. तिने पशाकडं बघितलं आणि स्वतःकड बघितलं आणि तिने लगेच ओढणी नीट केली. पशाकडं एवढ्या रागनं, तिरस्काराने आणि तुच्छतेने बघून निघून गेली. पशाला खूप वाईट वाटलं. अख्खी लॅब पशाला बलात्कारी पुरुष म्हणून चिडवत होती..! हा हा हा... सर्वांचा एकच हास्याचा कल्लोळ उडाला. अभ्यास करणारा पवार ही पुस्तकात तोंड घालून हसू लागला. पशा चा चेहरा मात्र केविलवाणा झाला होता. पशा कुत्र्या आपल्या गॅंग ची इज्जत घालवलीस ! मारा याला मारा म्हणत सर्वांनी त्याच्या पाठीवर हाथ मोकळे करून घेतले.

पशा पाठ चोळत उटला.. साल्यांनो तुम्ही सगळे SPY BOYS आहात रे ! मला जमत नाही ते म्हणून... नाहीतर तुमचे पण असेच हाल झाले असते . पवार उत्सुकतेने गॅलरी कडे वाकून विचारतो , ‘ दादा SPY म्हणजे ?’ स्पाय म्हणजे गुप्त हेर. मुलीच्या नकळत तिला मनसोक्त टापणारे मूलं . वी आर स्पाय बॉइज !अस म्हणून सर्वजण पुन्हा जोरजोरात हसतात. पवार डोक्याला हात लावून हसायला लागतो. पप्या माझी इज्जत काढतोस , तुझा केळाचा किस्सा सांगू का ? भुवया उंचावत पशा बोलतो. पप्या काही बोलायच्या आधीच, काका सांगायला सुरुवात करतो. ये मी सांगतो.. मी पण तिथच होतो. आपला पप्या रस्त्याने किती दाणे टाकत जातो माहीत आहे ना? सगळे माना हलवत म्हणतात ‘हो.. हो..! फेकू हाय साला..!’. मध्येच पप्या म्हणतो ‘ ये पण मी कधीच कुठल्या पोरीला सिरियस घेत नाही.. फक्त मजाक मजाक करतो !’ तेवढ्यात दिन्या म्हणतो , सिरियस डिपार्टमेंट तुझ्याकड नाही रव्या कडं आहे. आपला रव्या पहिल्या पासून एकीवरच मरतो. दुसर्‍या पोरींकडे बघत सुद्धा नाही. केत्या थोडा झिंगत म्हणतो पण भाऊ रव्याची आयटम पण तशीच हाय ना.. ! सगळे रागाने बघतात. केत्या लगेच कानाला हात लावून म्हणतो सॉरी ‘ वाहिनी’. ती एक नंबर पोरगी आहे. खरच चांगली आहे. चांगल्या पोरींसोबत पोरं चांगलच वागतात. सगळे तिला किती आदराने बोलतात. नाहीतर पप्या च्या गर्ल फ्रेंड त्याच्याकडं कमी आणि आमच्याकडेच जास्त बघतात. हा हा हा.. पुन्हा सगळे हसतात. काका तू केळाचा किस्सा सुरू कर.

मी आणि पप्या चालत होतो. एक पोरगी दिसली.. खूप सुंदर होती. पप्या झाला सुरू. उगाच जोरजोरात गाणे म्हणतोय , आवाज काढतोय तरी त्या पोरीने भाव दिला नाही. ती केळी घेण्यासाठी एका गाड्याजवळ थांबली. तिने काहीतरी रिएक्शन द्यावी म्हणून पप्या ने बाई ला विचारलं , ‘ काकू... ही केळी , केळीच्या झाडाचीच आहे ना ?!’ मुलीला सगळं कळत होत.. पण तरीही तिला हसू आवरलं नाही. ती जोरजोरात हसत सुटली. सगळे हसत होते. हे ऐकून सर्वजण केळीच्या झाडाची केळी... अस सूरात म्हणून हसू लागले. तेवढ्यात समोरच्या गॅलरीत 3 मुली हाफ नाइट पॅंट घालून गप्पा मारत उभ्या राहिल्या. सगळे पोर लगेच गॅलरीच्या कठड्यावर हनुवटी टेकवून टकमक बघू लागले. तेवढ्यात मागून त्यांचा मित्र रॉकी आला आणि म्हणाला, ‘ बॉइज डोन्ट सी द पॅकिंग... सी द कंटेंट.. !’ वाक्य ऐकताच द्विगुणित आनंदाने पोर नाचू लागले आणि ओरडू लागले..ओ.. हो.. ओ! मित्रांनो माझा के. टी. चा विषय निघाला.. रॉकी आनंदाने बोलला. सर्व पोर जितक्या आनंदाने त्याला मिठी मारण्यासाठी त्याच्या अंगावर पडले तितक्याच पटकन नाक धरून मागे झाले. भाडकावू.. आज तुझा नंबर आहे का हा कधीच न धुतलेला शर्ट घालण्याचा? नाक दाबत रम्या म्हणाला. रॉकी मानेने होय म्हणाला. ठरल्याप्रमाणे न धुता शर्ट एक महिना वापरुन झाला आहे , आता तो फेकून देण्यात यावा. अन्यथा ज्याने शेवटी घातला त्यालाच धुवायला सांगितलं जाईल , पशा म्हणाला. आणि क्षणाचाही विलंब न करता रॉकी ने तो काढून गॅलरीतून खाली भिरकावला. समोरच्या पोरी नाक मुरडून निघून गेल्या. पोरांची पुन्हा हशा पिकली. सर्वांनी रॉकी ला उचलून घेतलं.. पार्टी पार्टी म्हणून ओरडू लागले. रॉकी थोडा निराश होऊन म्हणाला , यार मंथ एंड आहे..पैसे नाहीत. लगेच दिन्या म्हणतो ‘ आम्हाला काय करायचय .. उधारी कर.. चोरी कर पण पार्टी पाहिजे! ओके माझ्या मित्रांनो.. मला माहीत आहे तुम्ही आज मला लुटणार..! चला.. अस म्हणून रॉकी रूम मध्ये येतो. सर्व जण पार्टी ला निघण्याच्या तयारीत असतात. तेवढ्यात रॉकी चा फोन वाजतो. रॉकी च्या आई ला अटॅक आलाय हे कळत. क्षणात सर्व शांत होतात. रॉकी ला धीर देतात. पटापट आपल्या पॉकेट मधून पैसे काढतात आणि रॉकी च्या पॉकेट मध्ये ठेवतात. हॉस्पिटल मध्ये आम्ही पैसे देण बरोबर वाटत नाही . रॉकी भरल्या डोळ्याने त्यांच्याकडे बघतो. त्यावेळी रव्या त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणतो , प्रत्येक मुलाला दोन गोष्टी शेवटपर्यंत हव्या असतात ‘ एक म्हणजे आई चे प्रेम आणि दुसरी मित्रांची साथ.. !’ म्हणत रॉकी चे अश्रु पुसतो . चला उशीर नको करायला. इतरवेळी एकाच गाडीवर 6 जण बसणारे आज मात्र शहाण्या प्रमाणे 3 बाइक वर जात होते. रात्री 12 वाजता ती अंधाराची शांति चिरत आरडा ओरडा करत जाणारी ही पोर आज मात्र रूम मध्ये , गॅलरी मध्ये आणि त्या अंधारात शांति पेरत जात होते. काही वेळा पूर्वी मित्राला लुटण्याचा प्लॅन करणारे पोर आता मित्रासाठी सर्वकाही लुटवत होते. मुलांचं हे परिस्थिति नुसार बदलणार रूप पवार पहिल्यांदा पाहत होता. ही आगाव, टपोरी वाटणारी , छपरी पणा करणारी पोर वरुण दाखवतात तशी अजिबात नाहीत याचे त्याला आश्चर्य वाटत होते. क्षणात आपण यांच्यासोबत राहत असल्याचा त्याला अभिमान वाटून गेला. समोरच्या भिंतीवर लावलेल्या सर्वांच्या फनी फोटो कडे बघून पवार आपल्याच विचारात गढून गेला.