Amol goshti - 8 books and stories free download online pdf in Marathi

अमोल गोष्टी - 8

अमोल गोष्टी

पांडुरंग सदाशिव साने

८. राम-रहीम

शंकरराव अलीकडे हिंदुमहासभेचे मोठे अभिमानी झाले होते. काँग्रेसच्या नावाचा उल्लेख होताच त्यांच्या पायांची आग मस्तकास जाई. काँग्रेस म्हणजे धर्मबुडवी, काँग्रेस म्हणजे मुसलमानांची बटीक, वाटेल ते ते बरळत. महात्मा गांधी म्हणजे हिंदुधर्माला लागलेले ग्रहण, असे ते म्हणत. काँग्रेसला शिव्या देणे म्हणजे त्यांची संध्या. काँग्रेसच्या थोर सेवकाची निंदा करणे म्हणजे त्यांचा गायत्री जप.परंतु त्यांचा मुलगा राम हा अगदी निराळा होता. महात्मा गांधींचा जयजयकार करणे म्हणजे त्याचे सुखसर्वस्व होते. त्याच्या त्या अभ्यासाच्या खोलीत महात्मा गांधी, जवाहरलाल वगैरेंची चित्रे होती. तिरंगी झेंडा लावलेला होता. कोटावर तिरंगी झेंडयाचे छोटे बटण लावल्याशिवाय तो शाळेत जात नसे. हृदयात तिरंगी झेंडा व छातीवर तिरंगी झेंडा. थोर काँग्रेस-सेवकांच्या गोष्टी ऐकण्यात तो तहानभूक सारे विसरी. महात्माजींचे चरित्र, काँग्रेसचा इतिहास, जवाहरलालांचे चरित्र, वगैरे पुस्तके तो पुन: पुन्हा वाची, काँग्रेसचा इतिहास वाचून त्याला वाटे, पुन्हा सत्याग्रह केव्हा सुरू होईल व आपण केव्हा जाऊ. जवाहरलालांनी, त्यांच्या डोक्यावर लाठीमार घेतला, असा आपण केव्हा घेऊ शकू, आपण भिणार तर नाही ना! असे विचार तो करीत बसे. तो आपल्या डोक्यावर कधी लाठी मारून घेई. तरी जोराने मारून घेण्यास धीर होत नसे.परंतु मुलांचे हे काँग्रेस-प्रेम पित्याला पापमय वाटू लागले. वेळीच आळा घातला पाहिजे, असे त्याने ठरविले. एक दिवशी राम शाळेत गेला. शंकररावांनी त्याच्या खोलीतील चित्रे फाडून टाकली. तिरंगी झेंडा फाडून फेकून दिला. तेथे एक भगवा झेंडा लावून ठेवला.राम शाळेतून घरी आला तो हा प्रकार! तो खोलीत खिन्न होऊन बसला. त्या खोलीत त्याला शून्य वाटू लागले. इतक्यात पिता तेथे आला. त्यांचा संवाद झाला.

राम : बाबा, काय केलेत हे? तिरंगी झेंडा कोठे आहे? चित्रे कोठे आहेत?बाप : तिरंगी झेंडा चुलीत गेला. चित्रे कच-याच्या पेटीत टाकली.राम : बाबा, येथ तुम्ही भगवा झेंडा लावला आहे. त्याचा मी अपमान करणार नाही. त्याला प्रणाम करीन. विशिष्ट धर्माची म्हणून ती खूण आहे. परंतु तिरंगी झेंडा त्याहून विशाल आहे. ४० कोटी जनता तो आपल्याखाली घेऊ इच्छितो. भगवा झेंडा १७ व्या शतकात ध्येय म्हणून शोभला. आज ध्येय वाढले आहे. आज तिरंगी झेंडा पूजिला पाहिजे.बाप : तिरंगी झेंडा हिंदूंचा अपमान करतो.

राम : तुम्ही म्हणता. तो हिंदूंचा अपमान करतो. मुसलमान म्हणतात, तो मुसलमानांचे अहित करतो. याचा अर्थ काय? याचा अर्थ एकच की, तो दोघांना सांभाळू शकतो. दोघांना संयमात राहा असे सांगतो. विशाल भारत उभारू इच्छितो. महात्मा गांधी वगैरे हिंदुधर्माचे का शत्रू आहेत? हिंदुधर्माला त्यांच्यामुळे सात्त्वि तेज चढले आहे.बाप : त्यांच्याइतकी हिंदुधर्माची हानी कोणीही केली नाही.

राम : पुरव्याशिवाय बोलणे पाप आहे. हिंदुधर्माची सेवा दोन प्रकारची. एक हिंदुधर्मातील थोर तत्त्वे जीवनात आणणे, दुसरे म्हणजे हिंदू समाजाची सेवा करणे. महात्माजी दोन्ही प्रकारची सेवा करीत आहेत. जीवनात सत्य, अहिंसा, ब्रह्मचर्य आणण्याचे जीवनावधी प्रयोग करीत आहेत. आणि ज्या जातीतून लोक विशेषत: परधर्मात जातात ते स्वधर्मात राहावे म्हणून त्यांची सेवा करीत आहेत. भिल्ल, हरिजन वगैरे मागे पडलेल्या, तुम्ही उपेक्षिलेल्या शेकडो जातीतून कोटयवधी लोक परधर्मात गेले. ती भोके महात्माजी व त्यांचे सेवक ठायी ठायी आश्रम काढून आज २० वर्षे बुजवीत आहेत. परधर्मात गेलेली एखादी स्त्री वा पुरुष तुम्ही शुध्द करून घेता व टिप-या बडवता. परंतु लाखो जातीत ते जाऊ नयेत म्हणून मुकेपणाने महात्माजी सेवाद्वारा व्यवस्था करीत आहेत.बाप : ते मुसलमानांना डोक्यावर घेतात.राम : त्यांनी सत्याला डोक्यावर घेतले आहे. सेवेला डोक्यावर घेतले आहे. मुसलमान या देशात शेकडो वर्षे राहिले. त्यांच्याजवळ जर आपणास नीट राहता आले नाही, तर सदैव मारामा-याच होत राहणार. यासाठी दोघांनी स्नेहभावाने राहावे असे त्यांना वाटते. त्यांना चिडवणे किंवा डिवचणे हा तो मार्ग नव्हे.बाप : मुसलमानांनी का चिडावे?राम : कोण म्हणतो?बाप : मग त्याचा निशेध तुम्ही का करीत नाही?राम : मुसलमानांचा निषेध करणे म्हणजे तमाम सारा मुसलमान समाज वाईट म्हणणे असा नव्हे. तुम्ही सर्व समाजाला नावे ठेविता. सात कोटी लोक का सारे पै किंमतीचे? त्यांना का हृदय नाही? मुलमानांतील गुंडांचा किंवा हिंदूंतील गुंडांचा-सर्व गुंडांचा- निषेध काँग्रेस करते. वाईट लोक सर्वांमध्ये आहेत.

बाप : मुसलमान आमच्या आयाबहिणी पळवितात.

राम : पुष्कळ वेळा हिंदू गुंडही त्यांना त्या पुरवतात. शिवाय हिंदू समाजातील एखाद्या स्त्रीचे पाऊल तुमच्या दुष्ट रूढीमुळे वेडेवाकडे पडले तर तुम्ही तिचा सांभाळ करीत नाही. त्या स्त्रिया मग परधर्माचा आश्रय करतात किंवा मरणाला मिठी मारतात. आपल्या अनुदारतेचा हा परिणाम आहे. काही मुसलमान मुद्दाम हिंदू आयाबहिणींची कुचेष्टा करतात. त्यांचे शासन करावयास उभे राहिले पाहिजे. परंतु माझे म्हणणे की, सर्व समाजाला दोष देऊ नका. हिंदुस्थान हिंदूंचाच असे म्हणू नका.बाप : तुम्हा भेकडांना असे म्हणणे शक्य होत नसेल तर तुम्ही नका म्हणू. आम्ही म्हणणार.राम : आम्ही भेकड नाही. इंग्रजांच्या गोळीबाराला न भिणारे, मरणाला न भिणारे लोक भेकड नसतात. राष्ट्राच्या मंगलाची महात्माजींसारख्यांस अधिक तहान आहे. मुलमानांना येथे स्थान नसेल तर तुम्हांसही नाही. तुम्हीही उत्तर धु्रवावरून आलात. वेदांत साम्राज्यवाद्यांच्या व येथील एतद्देशीय राजे मारून राज्य स्थापले, वगैरेंच्या कथा आहेत. मुसलान मक्केकडे तोंड करतात व आपण उत्तर दिशा पवित्र मानतो. खेडयापाडयातून गरीब मुसलमान भगिनी दळताना ज्या ओव्या म्हणतात त्यात सुंदर गंगा जमुनांची वर्णने आहेत. बंगाली मुसलमान कवींनी गंगास्तोत्रे लिहिली आहेत. हिंदु-मुसलमान गुण्यागोविंदाने राहण्यास शिकत होते. परंतु इंग्रज आले. त्यांनी विकृत इतिहास लिहिले. त्यांच्या 'फोडा-झोडा' धोरणाला आपण सुशिक्षित बळी पडत आहोत. इंग्रजांची नीती अप्रत्यक्षपणे आपण उचलून धरीत आहोत. बाबा, काँग्रेसच्याच मार्गाने जाऊ या, त्यायोगेच यश येण्याचा संभव तरी आहे.

बाप : ते काही नाही. माझ्या घरात काँग्रेस नको, मला बुध्दिवाद नको. तुला माझ्या घरात राहावयाचे असेल तर मी सांगेन त्याप्रमाणे वागले पाहिजे.असे म्हणून बाप निघून गेला. रामाला आपल्या जीवनातून रामच निघून गेला असे वाटू लागले. परंतु त्याच्या हृदयातील प्रेम कोण मारणार? तेथील काँग्रेस कोण दूर करणार?एके दिवशी शंकरराव मुलास म्हणाले, ''ती गांधी टोपी काढून टाक. काळी टोपी डोक्यावर घाल. खादी आजपासून बंद. खादीमुळे मुलमानांस धंदा मिळतो. सापांना पोसणे पाप आहे.''

राम : परंतु शेकडो हिंदू माय-बहिणींच्या पोटालाही मिळत आहे!बाप : मला बुध्दिवाद नको.राम : बाबा, हिंदुस्थानातील मुसलमान हे बहुतेक आपल्यातीलच आहेत. ते वाईट असतील तर आपणच वाईट आहोत, असा नाही का अर्थ? आपल्या पूर्वजांची क्षुद्र दृष्टी नव्हती. हे मुसलमान एके काळचे आपल्यातीलच-काही हिंदू धर्मातील छळामुळे, काही परकी धर्माच्या जोरामुळे व काही स्वार्थामुळे परधर्मात गेले. त्यांना आपल्या पूर्वजांनी जगविले. त्यांना काही धंदे दिले. आपल्या समारंभास आपल्या चौघडयांबरोबर त्यांचे ताशेही आपण बोलावीत असू. त्यांनाही जगू दे. आपल्य शेजारचेच ते. त्यांना उपाशी ठेवणे धर्म नव्हे. कोठे ती थोर दृष्टी व कोठे आमचे घातकी इंग्रज सरकारच्या वळणाचे धोरण! बाबा, मी खादीची टोपी घालणार. देशाचे तोंड उजळ करणारी, हिंदु-मुसलमानांचे ऐक्य साधणारी, साम्राज्याला दूर करणारी स्वातंत्र्याची खूण अशी ही स्वच्छ शुभ्र टोपीच मी घालणार! या टोपीवर इंग्रजांनी लाठीमार केले. ही टोपी घालणा-यांवर इंग्रजांनी गोळया झाडल्या, तुम्ही तेच करणार असाल तर तुम्ही त्याच साम्राज्यवाल्यांच्या, माझ्या देशाला गुलाम करणा-यांच्या जातीचे ठराल.बाप : येथे राहावयाचे असेल तर मी सांगेन तसे वागले पाहिजे.बापाने गांधी टोपी फेकून दिली. रामाच्या डोक्यावर काळी टोपी चढविण्यात आली. फाशी देताना टोपी घालतात असे रामला वाटले. त्याच्या डोळयांसमोर काळोखी आली. काय करावे त्याला कळेना.सुदैवाने आतापर्यंत रामच्या शाळेत चांगले शिक्षक होते. त्यांच्यामुळेच रामला असा बुध्दिवाद करता येई. परंतु नवीन वर्षी द्वेषाचे विष वमणारे शिक्षण त्या शाळेत आले. ते इतर परीक्षांबरोबर विषप्रसाराचीही परीक्षा पास झालेले होते. एके दिवशी ते नवीन शिक्षक एका वर्गात येताच विचारू लागले, ''आर.एस.एस. मध्ये किती जण जातात?'' त्या शाळेचे निर्मळ गाव हे कलंकित करणार असे काही थोर वृत्तीच्या मुलांस वाटले.रामाच्या वर्गावर ते नवीन विषारी शिक्षक आहे. तेथे त्यांनी तोच प्रकार सुरू केला. राम एकदम उभा राहिला.राम : आपल्या शाळेत 'सहनाववतु सहनौ भुनक्तु' वगैरे प्रार्थना म्हणण्यात येत असते. गुरुशिष्यांच्या अभेदाची ही प्रार्थना आहे. तुम्ही तर आमच्यात हिंदु-मुसलमान भेद निर्मीत आहात. या शाळेच्या ध्येयाप्रमाणे तुम्ही वागले पाहिजे.

शिक्षक : खाली बैस. तुला पोराला काय समजते? संघटना म्हणजे काय पाप आहे?राम : संघटना दुस-याच्या द्वेषासाठी नको, शेजारी शेजारी राहणा-यांचा द्वेष शिकविणे पाप. निदान आम्हां मुलांना तरी या नरकात, या अग्नीत फेकू नका.शिक्षक उपहासाने हसले. रामला वाईट वाटले. तो त्या शिक्षकांच्या तासाला जातनासा झाला. ते विष त्याला सहन होत नसे. त्या तासाला वाचनालयात जाऊन 'हरिजन' वाची, 'सर्वोदय' वाची, 'क्रांती' वाची. हेडमास्तरांच्या कानांवर ही गोष्ट गेली. ते रामला म्हणाले, ''वर्गात बसले पाहिजे. शिस्त सांभाळली पाहिजे.'' राम म्हणाला, ''मग ती प्रार्थना तरी बंद करा. शिक्षकांची जाहिरात देताना इतर पदव्यासंबंधी लिहिता; परंतु तो मुलांत भेदाचे विष पसरविणारा असता कामा नये, अशीही महत्त्वाची एक अट का घालीत नाही ?'' हेडमास्तर म्हणाले, ''तुम्हाला अजून जगाचा अनुभव यायचा आहे. शाळा चालवताना संस्था चालवताना, काय अडचणी येतात, तुम्हांला काय कळणार ? जा, वर्गात बस. त्या विषाचा परिणाम होऊ देऊ नको.''राम म्हणाला, ''माझ्यावर नाहीच होणार. इतर मुलांचे काय ? त्यांच्या जीवनाला हे द्वेषाची कीड लावणार, तुम्हांला काय कळणार ? जा, वर्गात बस. त्या विषाचा परिणाम होऊ देऊ नको.''राम म्हणाला, ''माझ्यावर नाहीच होणार. इतर मुलांचे काय ? त्यांच्या जीवनाला हे द्वेषाची कीड लावणार, तुम्हाला वाईट नाही वाटत ?'' हेडमास्तर म्हणाले, ''तू माझा गुरू आहेस. परंतु माझे ऐक. माझ्यासाठी वर्गात बसत जा.''राम वर्गात बसू लागला. त्याच्या वर्गात एक नवीन मुलगा आला. त्याचे नाव रहीम. रामचे त्या विषारी शिक्षकाशी खटके उडत. रहीमला कौतुक वाटे. रहीम व राम मित्र झाले. ते दोघे बागेत फिरावयास जात. त्या बागेत अनेक प्रकारची फुले फुललेली पाहून दोघा निर्मळ मित्रांस आनंद होई. त्यांचे संवाद चालत.रहीम : राम, निरनिराळी फुले बगीच्यात फुललेली आहेत. त्यांचे भांडण नाही.

राम : या हिंदुस्थानात नाना धर्म, नाना जाती प्रेमाने फुलतील, एकमेकांस शोभा देतील.रहीम : परंतु काही मुसलमान हिंदुस्थानच्या बाहेर पडतात.

राम : काही हिंदू म्हणतात हिंदुस्थान हिंदूंचा.रहीम : इतर मुसलमान राष्ट्रांतील बंधू आम्हांस हसतात. आमची ही भांडणे ऐकून तो थोर केमालपाशा आमचा तिरस्कार करी. तुर्कस्तानात मशिदीवरून बँड वाजत जातात. परंतु येथे आम्ही हा चावटपणा मांडला आहे.राम : आमच्यातील काहींना मशीद आली, की अधिक जोराने ओरडण्याची व अधिक जोराने वाजविण्याची कधी कधी स्फूर्ती येते.रहीम : माझे वडील मुस्लिम लीगवाले आहेत. ते मला मुस्लिम लीगच्या स्वयंसेवकांत जा सांगतात. मला ते करवत नाही. पेशावर प्रांतात तर तीस सालच्या चळवळीत शेकडो मुसलमान मोटारखाली चिरडले गेले. पंधरा हजार पेशावरी पठाण तुरूंगात गेले. मी ते करणार. काँग्रेस राष्ट्र निर्मीत आहे.राम : मुस्लिम लीग व हिंदुमहासभा या नबाबांच्या आहेत. गरिबांसाठी त्यांचा कार्यक्रम नाही. शेतकरी-कामकरी यांच्याविषयी त्यांना आस्था नाही. जगात खरे भेद हिंदु-मुसलमान असे नसून पिळले जाणारे व पिळणारे असे दोनच भेद. गीतेत हेच दोन भेद सांगितले आहेत.रहीम : कानपूरला हिंदु-मुसलमान कामगार एक आहेत. त्यांचे ऐक्य मोडावे म्हणून तेथे सारखे हिंदू-मुस्लिम दंगे मुद्दाम पेटविण्यात येतात. परंतु कामगार अलग राहतात. परवा बारीसालचे हिंदू-मुस्लिम किसान मिरवणूक काढीत आले. मुस्लिम लीगवाल्यांनी मुसलमान शेतक-यांस फोडण्याचा प्रयत्न केला. परंतु हिंदू-मुसलमान शेतकरी गर्जना करून म्हणाले, ''आम्हांला ही धर्मांची सोंगे माहीत आहेत.'' हिंदू जमीनदार, मुसलमान जमीनदार एक होतात व गरीब हिंदू-मुसलमांनास छळतात.

राम : तिकडे कोकणात हिंदुमहासभेचे अभिमानी खोत खोतसंघात शिरतात. त्या संघातही मुसलमान असतात. त्या वेळेस त्यांचा अभिमान कोठे जातो ?रहीम : सर्वांना पैशाचा अभिमान आहे. पैसेवाले एकमेकांचे भाऊ. गरीब गरीबांचे भाऊ.राम : रहीम, माझे वडील तर मला जसे मारायला उठतात !रहीम : माझी तीच स्थिती.दोघा मित्रांनी हात हातात घेतले. सायंकाळ होत आली. हिंदु-मुस्लिम ऐक्याचा नमाज ते पढत होते. हिंदू-मुस्लिम ऐक्याची संध्या ते म्हणत होते.

त्या दिवशी काँग्रेसचे काही स्वयंसेवक भिक्षेसाठी हिंडत होते. काँग्रेसचे प्रचारक ठेवता यावेत म्हणून ही भिक्षा ते मागत असत. रामाच्या दारी आले ते. राम घरातून ताम्हणभर गहू घेऊन आला; तो तिकडून शंकरराव आले. ''या धर्मद्रोह्यांना एक दाणाही येथे मिळणार नाही. निघा येथून-'' ते गरजले. राम तेथे थरथरत उभा होता. स्वयंसेवक निघून गेले. पितापुत्रांचा संवाद झाला.शंकरराव : कोणी सांगितले हे तुला ?राम : हिंदुधर्मांने. दारात कोणीही येवो, त्याला देव मान, असे हिंदुधर्म सांगतो. हिंदुधर्माचा मोठेपणा तुम्ही नष्ट करीत आहात.शंकरराव : त्या मोठेपणामुळेच समाज मरत चालला. फकीर आला, घाल भिक्षा. अमुक आला, घाल भिक्षा.राम : हे तरी निदान फकीर नव्हते !शंकरराव : फकीर पत्करले. परंतु हे कु-हाडीचा दांडा गोतास काळ असे नकोत.राम : त्या दिवशी त्या सार्वजनिक विहिरीवर हरिजन पाणी भरू लागले; तेव्हा काँग्रेसचे लोक तेथे गेले. तुम्ही हिंदुमहासभावाले कोठे मेले होतेत ? श्री. सावरकरांचे तरी ऐका. परंतु तेही तुम्हांला पचत नाहीत. येथील मंदिरांतून हरिजनांना प्रवेश मिळावा म्हणून सत्याग्रह करा. तुम्ही घरच्या विहिरीवर त्यांना पाणी भरू द्या. तुम्ही त्यांना घरात घ्या. सार्वजनिक ठिकाणी त्यांची अस्पृश्यता राहू नये म्हणून खटपट करा. चालले हैदराबादला. स्वतःच्या हरिजनांना माणुसकी मिळावी म्हणून करा हजारोंनी सत्याग्रह. बाबा, तुमचा दंभ आहे. काँग्रेसला शिव्या देणे एवढाच तुमचा धर्म.शंकरराव : मला बुध्दिवाद नको. तू या घरातून जा. काळे कर तोंड !राम : बरे बाबा.शंकरराव : कोणी सांगितले हे तुला ?रहीम रडत होता.

राम : रहीम काय झाले ?

रहीम : काँग्रेसच्या स्वयंसेवकास मी दाणे घालीत होतो. इतर गरीब मुसलमान आयाबहिणींनी भिक्षा घातली. एका अम्माने पीठ घातले. परंतु मला बाबांनी दाणे घालू दिले नाही. ते खूप बोलले. म्हणाले, 'माझ्या घरातून चालता हो.' मी बाहेर पडलो. अल्लाच्या सेवकाला का फकीरच व्हावे लागते?रामनेही त्याला हकीगत सांगितली. ते दोन गंगा-यमुनांचे प्रवाह होते, ती जोडी गुरू-शुक्रांची जणू युती होती. गुलाब व मोगरा यांची ती भेट होती. राम व रहीम यांची ती भेट म्हणजे भारतीय ऐक्याची नवीन पताका होती. आता ते दोघे रस्त्यातून हिंदू-मुस्लिम ऐक्याची गाणी गात. रस्ते झाडीत. जणू आकाशातील दोन देवदूत असे आयाबायांना वाटे. ते बाल-फकीर बनले. त्या गावाला ऐक्याची कुराण, प्रेमाचे उपनिषद ते आपल्या गीतांनी ऐकवीत. कोणी त्यांना भाकरी देई.त्या दिवशी एकदम हिंदू-मुसलमानांचा दंगा सुरू झाला. लाठया-काठया, सुरे कृतार्थ झाले. रहीमचे वडील व रामचे वडील ह्यांच्या प्रयत्नांस यश झाले. ब्रिटिश सरकारला आनंद झाला. राम व रहीम धावत आले. ''नका भांडू, नका एकमेकांस मारू. नका, भाई हो नका.'' असे ते हात जोडून सांगत होते. परंतु हे काय ? रहीमने किंकाळी फोडली. रामनेही किंकाळी फोडली. रहीमच्या पित्याचा खंजीर रहीमच्या अंगात खुपसला गेला. शंकररावांची लाठी रामाच्या डोक्यावर बसली. ती दोन मुले रक्ताने न्हाऊन तेथे पडली. लोक थबकले. दंगा शांत होऊ लागला. पोलिसही आले.राम व रहीम हॉस्पिटलमध्ये होते. त्यांच्या खाटा जवळजवळ होत्या. ''आमचे हात एकमेकांच्या हातात द्या.'' ते दोघे क्षीण परंतु गोड आवाजात म्हणाले.''हिंदू-मुस्लिम ऐक्याचा जय होवो, काँग्रेसचा जय होवो'' असे म्हणत त्यांनी प्राण सोडले.त्या गावी 'राम-रहीम' या नावाची सुंदर इमारत बांधली गेली. हिंदु-मुस्लिम बंधु-भगिनी तेथे जातात. अश्रूंची फुले वाहतात व प्रेमाचा खरा धर्म शिकतात!