Bhai- Vyakti kee valli books and stories free download online pdf in Marathi

‘भाई : व्यक्ती की वल्ली’

‘भाई : व्यक्ती की वल्ली’

'भाई' अर्थात सगळ्या महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पु.ल.देशपांडे.. पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे. आपल्या लिखाणाने वाचकांच्या मनावर राज्य केलेला लेखक. पु. ल. देशपांडे यांच्या जीवनावर आधारित ‘भाई : व्यक्ती की वल्ली’ पूर्वार्ध हा चित्रपट पाहाण्यासाठी मराठी प्रेक्षक उत्सुक आहेत. खर तर पुलंविषयी किती आणि काय बोलवं हे सुचत नाही. इतक अप्रतिम व्यक्तिमत्व होत पुलंच! पु.ल म्हणजे महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व, बहुरंगी, बहुढंगी कलाकार आणि तमाम महाराष्ट्राला खळखळून हसवणारे लेखक अशी त्यांची ओळख पिढ्यान् पिढ्या आपल्या मनावर कोरली आहे. ‘भाई’ म्हणजेच पु.ल. खऱ्या आयुष्यात कसे होते हे जाणून घेण्याचं कुतूहल प्रत्येकाला आहे आणि हेच कुतूहल ‘भाई’ मधून उलगडून जातं.पुलंच्या आयुष्यातील प्रत्येक घटना, त्यांचे साहित्य, त्यांनी केलेली, लिहिलेली नाटके, केलेले रंगमंचावरील प्रयोग, त्यांचे संगीत, यांची गाणी, त्यांनी केलेले चित्रपट ,त्यांनी लिहिलेल्या व्यक्तिरेखा, दूरदर्शनची सुरूवात करून देणे, प्रवासवर्णने... या सगळ्यांचा समावेश करायचा असेल तर किमान दोनशे ते तीनशे तासांची फिल्म बनवावी लागेल. पु.लंच्या आयुष्यातील अनेक महत्त्वपूर्ण घटना या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. उदास व गंभीर चेहऱ्यावर हास्याची लकीर उमटविणारे पु.ल. देशपांडे यांच्या साहित्यकृतीवर चित्रपट निघाले. ‘भाई : व्यक्ती की वल्ली’ हा पूर्वार्ध आहे. आणि या पूर्वार्धाच्या पहिल्या तासात आपण 'पुलं'च्या लोभस रूपाच्या प्रेमात पडणार आहे ह्यात काहीही शंका नाही. मराठी साहित्य आणि संस्कृतीच्या 'गोल्डन पिरेड' मध्ये पुलं, वसंतराव देशपांडे, कुमार गंधर्व, भीमसेन जोशी, राम गबाले आदीसोबत पाहणे ही एकमोठी मेजवानी आहे. तो काळ अनुभवायला प्रत्येक रसिक नक्कीच उत्सुक असेल.

आजपासून कित्येक दशकांपूर्वी महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व बनलेल्या आणि आजही तेच स्थान मिळवून असलेल्या पु. ल. देशपांडे यांच्याबद्दल कोणी माहिती नाही अस म्हणाल तर त्याला वेड्यात काढण्यात येईल. पु.ल माहिती नाहीत असा व्यक्ती महाराष्ट्रात मिळणे अवघड आहे. ते आजही मराठी वाचनाचा, अभिरूचीचा किमान निकष आहेत. ते तेंव्हाही देवाचे लाडके मूल होते, आणि अजून देवाने दुसऱ्याला 'दत्तक' घेतलेले नाही. या देवाच्या लाडक्याने महाराष्ट्राला हसविले, जगणे शिकविले, सगळ्यांचे आयुष्य सुखी केले. साहित्य, संगीत, चित्रपट, नाटक आणि संसारात राहूनही साधले. त्यांचा स्थायीभाव असलेल्या अवलिया स्वभावाने तसे साध्य झाले. पु. ल. देशपांडे हा एवढा मोठा माणूस, इतका मोठा कलाकार...असंख्य लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा!! प्रत्यक्षात किती साधा होता, किती आम होता, किती निर्विष होता, ही गोष्ट आपल्याला भिडते. ह्या चित्रपटात पाहायला मिळते. प्रत्यक्ष भेटण्याची इच्छा असून पुलंना भेटता न आलेले बरेच लोकं असतील त्यांना हा चित्रपट पाहतांना कदाचित भाईना प्रत्यक्ष भेटण्याची इच्छा कदाचित पूर्ण झाली अस वाटून जाईल. सगळ्या गोष्टीत आनंद बघण्याची त्याची दृष्टी किती निरागस होती त्याचे आपल्याला दर्शन घडते आणि आपल्याला वाटतं पुलं आपल्याला समजले.

महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व... व्यक्ती चित्रण किती खुश खुशीत असू शकते, कथेतील प्रत्येक पात्र वाचकाला किती भुरळ घालू शकतात... हे ज्यांच्या लिखाण शैलीतून कळते... लिखाणाची शैली अशी अतरंगी की त्या व्यक्तीच्या प्रेमात माणूस पडतो... हास्य आणि व्यंग यांचा अलौकिक ताळमेळ म्हणजे ही व्यक्ती... लोकप्रिय लेखक, गीतकार, संगीतकार, कथाकार, नाटककार, गायक दिग्दर्शक आणि अभिनेते असे अष्टपैलू व्यक्तिमत्व जे खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे भूषण होते... ज्यांच्या साहित्यकृतींवर आजवर बरीच नाटक, चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले... आता खुद्द त्यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे ..

ह्या चित्रपटात फक्त भाईच्या आयुष्यभराच्या गोष्टी चित्रपटातून दाखवल्या गेल्या नाहीयेत. तर भाई एक माणूस म्हणून कसे होते, त्यांनी आयुष्यात हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, पं. भिमसेन जोशी, कर्मयोगी बाबा आमटेंसारखी माणसे कशी जोडून ठेवली हे पाहायला मिळणार आहे. काही गोष्टी सर्वसामान्यांना माहीती नाहीयेत त्या ह्या चित्रपटात पाहायला मिळणार आहेत. आनंदवनात पु. ल. देशपांडे नियमित मित्र मेळावा घेत. आनंदवनातील कुष्ठरोगी, मूक-बधीर आदींना नाटक बघावयास मिळावे म्हणून आनंदवनातील मुक्तांगण हे व्यासपीठ तयार करून त्यावर प्रसिद्ध नाटके पु.ल. देशपांडे हे आणत. पु. ल. देशपांडे यांचे आनंदवनातील नाते अतुट होते. माणूस म्हणून पुलं खरच 'ग्रेट' होते. त्यामुळे पु. ल. देशपांडे आनंदवनात येणार असल्याची माहिती आनंदवनवासीयांना मिळताच त्यांचा आनंद ओसंडून वाहत असे. आनंदवनातील दिव्यांगांच्या विवाह सोहळ्यातील मंगलाष्टके भाई स्वत: म्हणत होते. अश्याच घटना भाई ह्या चित्रपटात घेण्यात आल्या आहेत. भाई आणि बाबांच्या ऋुणानूबंधाचा उलगडा या चित्रपटातून होणार आहे. आणि ते पहायची उत्सुकता नक्कीच प्रेक्षकांना असणार ह्यात काही शंका नाही.

चित्रपटाची कथा-

ह्या चित्रपटाची कथा म्हणजे पुलंच्या आयुष्याचा प्रवास!! लाडक्या पुलंचा म्हणजेच भाईंचा जीवनप्रवास रुपेरी पडद्यावर पाहणं म्हणजे जुना काळ पुन्हा अनुभवण्याची रसिकांना लाभलेली संधी म्हटल्यास वावगं ठरणार नाही. सिनेमाच्या पूर्वाधाच्या काही मिनिटांतच रसिक भाईंच्या लोभसवाण्या रुपाच्या प्रेमात पडतो. सिनेमाची कथा जसजशी पुढे सरकते तसतशी सगळी पात्र म्हणजेच सगळी माणसं भेटायला येऊ लागतात. ही सगळी मंडळी भाईंच्या जीवनाशी जोडलेली तर काही साहित्यातील. पहिला भाग हा पूर्णपणे पु.लंच्या खासगी आयुष्यावर आधारलेला आहे. चित्रपटात बालपणापासून ते आतापर्यंतचे पु.लं, असा प्रवास सुरू होतो. या प्रवासाताच सुनीताबाई आणि पु.लं या दोन्ही भिन्न स्वभावाच्या माणसांचा फुलत गेलेला संसारही पाहायला मिळतो. मात्र सरसकट एक कहाणी न ठेवता दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी अत्यंत छोट्या छोट्या प्रसंगांतून पु.ल उलगडण्याचा प्रयत्न केला आहे.पु.ल. रुपेरी पडद्यावर पाहताना रसिकांना भावतो तो त्यांचा निरागसपणा. एवढा मोठा माणूस तरीही किती साधा होता ही रसिकांच्या काळजाला भिडते. त्यांचं मनमौजी असणं, स्वच्छंदी जगणं आणि कोणत्याही गोष्टीकडे बघण्याची दृष्टी किती निरागस होती हे सिनेमा पाहताना प्रत्येक सीनमध्ये जाणवते. या छोट्या छोट्या प्रसंगातले काही प्रसंग आणि त्यातले संवाद हे मनाला भावतात मात्र काही प्रसंगांचं आकलन प्रेक्षकांना होत नाही. अनेक ठिकाणी त्यांचे संदर्भ लागत नाही. काही प्रसंगाचे कारण कळत नाही, कदाचित त्याचा खुलासा पुढच्या भागात होऊ शकेल.

सिनेमाचा प्रत्येक सीन काळजाला भिडणारा वाटेल. कधी नकळत डोळ्यात पाणी तरारून जात. आणि बऱ्याचवेळा हसू मात्र थांबवता येत नाही. हे सगळ पाहताना रसिक स्तब्ध झाल्याचं पाहायला मिळतं. पुलंच्या जीवनावरील सिनेमा म्हणजे रसिकांचं खळखळून हसणं ओघानं आलंच, मात्र काही सीन पाहताना रसिक तितकाच भावुक होतो. या सिनेमाचं सगळ्यात मोठं यश म्हणजे सागर देशमुखने साकारलेले पु.ल. महाराष्ट्राच्या लाडक्या व्यक्तीमत्त्वाचा रसिकांना रुपेरी पडद्यावर आनंद देण्यात सागरचा सिंहाचा वाटा आहे. पु.ल. साकारण्यात कुठेही कमी पडणार नाही यासाठी सागरने घेतलेली मेहनत प्रत्येक सीनमध्ये पाहायला मिळते. यासोबतच इरावती हर्षे यांनी साकारलेल्या सुनीताबाईसुद्धा मनाला भिडतात.

महेश मांजरेकर यांनी 'भाई-व्यक्ती की वल्ली' या सिनेमातून पुलंचं जीवन रुपेरी पडद्यावर दाखवण्यात कोणतीही कसर सोडली नसल्याचं पाहायला मिळतं. आणि अप्रतिम कलाकृती पहिल्याचा आंनद रसिकांच्या चेहऱ्यावर नक्कीच येईल. पुलंनी इतक साहित्य लिहिलेलं आहे आणि भरभरून आंनद वाटला आहे. पुलंची साहित्यसंपदा, त्यांनी लिहिलेली नाटकं, रंगभूमीवरील प्रयोग, संगीत, गाणी, चित्रपट, त्यांच्या लेखणीतून अवतरलेल्या व्यक्तीरेखा, प्रवासवर्णनं सारं काही अडीच तासाच्या सिनेमात मांडणं कुणालाही शक्य नाही. तरीही बऱ्याच गोष्टींवर प्रकाश टाकला आहे. त्यामुळे काही तरी पाहायच राहिलं असं भाई-व्यक्ती की वल्ली रुपेरी पडद्यावर बघितल्यावर वाटत नाही. महेश मांजरेकर यांच्या या प्रामाणिक प्रयत्नाचं कौतुक व्हायलाच हवं.

अभिनेता सागर देशमुख या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहे. महेश मांजरेकर यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. ४ जानेवारीला या चित्रपटाचा पूर्वार्ध प्रदर्शित होत आहे. तर उत्तरार्ध फेब्रुवारी महिन्यात प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात फक्त अभिनेता सागर देशमुखच पु.लं साकारत नाही तर अभिनेता सक्षम कुलकर्णीने शालेय जीवनातील पु.लं साकारले आहेत. सागर देशमुख-पु.ल. देशपांडे, इरावती हर्षे-सुनीताबाई, मेघा मांजरेकर-साधनाताई तर संजय खापरे-बाबांची भूमिका साकारणार आहे. सिनेमाचं संगीतही रसिकांना भावणारं आणि प्रत्येक दृष्याला समर्पक असंच आहे. या सिनेमाच्या निमित्ताने ‘कानडा राजा पंढरी'चा हे गाणं नव्यानं पाहायला मिळतं. वायकॉम18 मोशन पिक्चर्स प्रस्तुत भाई – व्यक्ती की वल्ली चित्रपटाचे दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केले आहे तर पटकथा गणेश मतकरी आणि संवाद रत्नाकर मतकरी यांचे आहेत. या चित्रपटाचे संगीत अजित परब यांचे आहे.

मराठी साहित्य तसंच संस्कृतीचा सुवर्णयुगही सिनेमातून रसिकांना अनुभवण्याची संधी लाभली आहे. त्यामुळे भाई-व्यक्ती की वल्ली हा सिनेमा रसिकांचं मनोरंजन करण्यात आणि भाईंचा जीवनप्रवास थोडक्यात उलगडण्यात कुठेही कमी पडत नाही असं म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. पुलंच्या लिखाणाने प्रत्येक मराठीमाणूस भारावून गेलेला आहे आणि त्यांच्या आयुष्यावरचा चित्रपट पाहून पुलंच्या आठवणीत रमणार हे नक्की आणि पुलं म्हणजे आनंदाचा झरा आणि तसच काहीसा अनुभव घेण्यासाठी हा पूर्वार्ध बघायलाच हवा.