Doctorki-subhanya books and stories free download online pdf in Marathi

डाक्टरकी-सुभान्या - सुभान्या

विळखा

    मला अजून आठवते सुभान्याच्या पत्नीची ती भकास नजर....

कधी कधी परिस्थिती, नियती, योगायोग असं सगळंच हातात हात घालून येतं. आणि सटवाईचा लेखाजोखा असणारच कुठेतरी.असं दुर्दैवानं म्हणावं लागतं.अगदी अापल्यासारख्या विवेकवादी माणसालाही.

सुभानराव म्हणून माझं एक पेशंट .अंगठाछाप पण बोलण्यात भल्याभल्यांना हरवेल असा.
अंगची हुशारी आजमावण्यासाठी मुंबईला गेला. तिथे भरपूर पैसा कमावला.
देखणी ,गोरीपान ,त्याची हाजी हाजी करणारी बायको .एक मुलगा ,एक मुलगी .सगळं कसं दृष्ट लागण्यासारखं चाललं होतं.

कधीतरी शौक म्हणून पिणं होत होतं.वरातीमध्ये त्या नशेत हजारोंनं पैसे उधळायचा सुभानराव. त्याच्या बायकोला चिंता वाटण्याऐवजी अभिमान वाटायचा त्याचा.
हळू हळू धंद्यात जरा मंदी आली.

   पिण्यासाठी ' वरात ' सोडून अजून एक कारण मिळालं .तरीपण बायको तशी निर्धास्त होती.
आयाबाया तिच्या कानाला लागत.म्हणत की ,

"बग बाई आताच सांभाळ. पुढं जाऊन डोक्याला कुटाना व्हईल नायतर."

ती उलट म्हणे,

" माझा मालकाच्या मागं लई व्याप हायेत. जबाबदार्या हायेत. थोडंफार इकडंतिकडं व्हनारच.सारी दुनिया पिती.काय व्हत नाय कुनाला.
माझा मालक म्हनतो ,

'तुला काय कमी पडलं का? माझ्यावर इश्वास ठेव'.

मग कशाला इचार करु मी तरी??"

सुरुवातीला त्याने त्यांचा शब्द पाळला पण नंतर नंतर दारूने चांगलाच 
विळखा घातला .
मुंबईतली चाळीतली जागा विकून गावाकडे शेती करायची वेळ आली .तरी बायकोने स्वतःच्या मनाला समजावलं ,

'जाऊ दे हक्काच्या शेतात तर राबतोय.कुनाच्या बांधाला तर जावा लागत नाय ना? मंग झालं तर!'

नाही म्हणायला दारू बंद करण्याची बाबाबुवांकडून मिळणारी औषधं ती देऊन बघत होती. आणि मनातली आशा जिवंत ठेवत होती.

एक दिवस सुभान्याला उलट्या झाल्या म्हणून तिनं क्लिनिकला आणलं.

" पितफित झालं असंल. साबुदान्याची खिचडी खाल्ली होती.
मॅडम लवकर औशीदं द्या अन् जाऊद्या. लय कामं पडलीत"

   सुभानाचं रूप पूर्ण बदललं होतं .चेहरा सुकलेला ,गालाची हाडं वर आलेली, पोटाचा घेर फक्त वाढलेला .त्यामुळे लहान मुलांसारखं लुटूलुटू चालत सुभान्या आला आणि गुपचूप तपासणी टेबलवर झोपला. मला क्षणभर आधीचा सुभानराव आठवला .हट्टाकट्टा, तोंडात गुटखा ठेवून स्वतःच्या कर्तबगारीचे किस्से सांगणारा .
पण आता मात्र तो अगदीच केविलवाणा दिसत होता.

....सिंह म्हातारा झाला होता....

त्याची तपासणी केल्यावर त्याच्या बायकोला सांगितलं,

"हे काय साधा पित्त वगैरे नाही.पोटात पाणी झालेलं आहे.आपल्याला काही तपासण्या कराव्या लागतील."

ती बिचारी एकदम हबकूनच गेली .थोड्याशा औषधांवर नवरा ठीक होईल असं तिला वाटत होतं .आणि आता हे नवीन काय उपटलं ?
पैसा, वेळ, मन:शांती सगळाच प्रश्न .

तपासणीअंती कळाले की, सुभान लिव्हर फेल्युअरचा प्रवास करत होता आणि दारू नाही थांबवलीे तर प्रवासाचा वाईट शेवट अगदी अटळ होता.

खूप दिवसांनी उजाड कपाळाने सुभान्याची पत्नी आली. विस्कटलेल्या आवाजात म्हणाली ,

"सारी दुनिया दारू पिती.तांबट आळीतला गन्या,मागल्या शिवारातला बाबू तं सत्तर वर्साचा होऊन मेला.त्या कुनालाच काय झालं नाई अन् यालाच हे दुखनं इतक्या लवकर कसं काय झोंबलं?
सटुबाईनं असं का लिवलं असल तेच्या नशिबात??"

माझ्याजवळ तिच्या प्रश्नाचं उत्तर नव्हतं.थोडं थांबून नंतर ती परत सांगू लागली ,

"शेवट शेवट तर नुसता भात मागायचं. दुसरं काही जिरतच नव्हतं त्येला.पन तांदूळ आनायला पैसं तरी कुडून आनू?

मोकार शिव्या घालायचं. येकडाव तं मारायलाबी धावलं मला. तसं पाह्यलं  तं माझ्या एका हाताचंबी राहीलं नव्हतं  पन  मराया टेकलं व्हतं.  राग तरी कसा धरावा बया त्येचा?"

डोळ्यात पाणी आलं तिच्या.

"मग म्हनलं शेजारीन बाईकडून तरी दोन घासापुरतं तांदूळ आनु.घाई घाई तिच्याकडं गेले बया तं तिच्याकडंबी तांदळाचा पत्त्या नव्हता.मंग म्हन्लं
राशन भेटल्यावर देता येईल करून.चार आठ दिसाचा प्रश्न... पन त्याच्या आधीच त्ये गेलंबी मरून.

उद्या त्येचा महिना हाये. सारभात करीन' तेच्या पुढच्या महिन्याला मासवड्या, तेच्या पुढच्या महिन्याला पुरी गुळवनी,त्येच्या पुढच्या महिन्याला......."

स्वतःशीच बोलत राहील्यासारखं ती बोलत राहिली. माझ्या मेंदूपर्यंत काहीच पोहचलं नाही. जिवंतपणी त्याला दोन घास भात खायला मिळाला नाही एवढंच माझ्यासाठी खरं होतं........

डॉ क्षमा शेलार